मूर्तिकार ब्राह्मणच!

विश्वकर्मा ऊर्फ विश्वब्राह्मण नांवाचा एक ब्राह्मणवर्ग पूर्वींपासूनच वैदिक काळांत शिल्पकाराची वृत्ति संभाळून आपलें पोट भरीत होता. शांततेच्या काळीं यज्ञयागांत लागणारीं पात्रें व इतर उपकरणें करण्याचे कामांत व लढाईचे काळांत जादूचे रथ, विमानें, कळसूत्री घोडे आणि इतर स्वयंवाहनें (Motors व Automobiles) करण्यांत ही शिल्पज्ञ जादुगार ब्राह्मण मंडळीं फार पटाईत होती. ह्या शिपशास्त्राच्या उपदेशकांत पुढें वासुदेव आणि अनिरुद्ध ह्या क्षत्रियांचींहि नांवें आढळतात! “भृगुरत्रिर्वसिष्ठश्च् विश्वकर्मामयस्तथा| नारदो नग्नजिच्चैव विशालाक्ष: पुरंदर: || ब्रह्मा कुमारो नंदीश: शौनको गर्ग एव च | वासुदेवोSनिरुद्धश्च तथा शुक्रबृहस्पति: || अष्टादशैते विख्याता: शिल्पशास्त्रोपदेशका: |” (मत्स्यपुराण सं. १ पृ. ५१). ह्या मूर्तिकार ब्राह्मणांनाच स्थपति आणि पांचाल अशीं नांवें होतीं. इतर सामान्य शिल्पकारांनीं केलेल्या मूर्तींची पूजा करणें पाप समजलें जात असे. “तेषामेव स्थपत्याख्यो विश्वकर्मेति संस्कृत:| एभिर्विनाहि कर्म कर्तुं न शक्यते || तस्मादेते सदा पूज्या स्थपत्यादि च पञ्चकम् | एभि: स्थपत्यादिभिरत्रलोके विना गृहीतुं सुकृतं न शक्यते ||” (शिल्प-मय-मत-अध्याय ५.) त्यांतल्या त्यांत ह्या पांचाल ब्राह्मणांनीं सोन्याच्या मूर्ति करण्याचें थोड्या श्रमाचें व अधिक फायद्याचें कसब आपल्याकडे ठेवून बाकी दगडविटा-पाषाणाचीं कामें इतरांना दिलीं ! अग्निपुराण अध्याय ८ आणि स्कंदपुराण काशीखंड अध्याय ८६ ह्यांत देवादिकांच्या मूर्ति करावयाच्या त्या पांचाल ब्राह्मणांकडूनच केल्या असतां सात जन्मांचीं पापें नाश पावतात, असें सांगितलें आहे. अशा थोतांडांनींच भागवत धर्माचा प्रसार बहुजनसमाजांत करणें शक्य झालें. पण अशानें स्वत: तो धर्मच हीनदशेप्रत गेला, हें निराळें सांगणें नकोच.