स्वरवैशिष्ट्य

(२२) अनुस्वार :- कोंकणींत अनुनासिकांची लयलूट आहे, तशी मराठींत नाहीं. सदर्न मराठा रेल्वेंतून गोव्याकडे जाऊं लागलें असतां, देशावरील माणसाला स्टेशनावरील नांवाच्या पाट्या वाचतांना अनुस्वारांची चंगळ पाहून मौज वाटते. तामिळ देशांत, रामेश्वरं, चिदंबरं, श्रीरंगं, वेंकटाचलं, मंडपं, अग्रहारं वगैरे पुल्लिंगी शब्दांवरहि अनुस्वार पाहून प्रथमदर्शनीं संस्कृत येत नसतांहि तें येतें असें दाखविण्याचा तामिळांचा हा मोह असावा असें वाटतें. पण बिशप कॉल्डवेलनें म्हटल्याप्रमाणें अशा शब्दांच्या पुढें पूर्वीं “न” हें अर्धाक्षर होतें, त्याचा हा अनुस्वार झाला आहे. पालींत हा प्रकार आहे. “निद्दरो होति निप्पापो धम्मपीतरसं पिबं ||९||” (धम्मपद, वग्ग १५ वा.) ह्यांत पिबन् ह्याचें पिबं असें रूप झालें आहे. असाच कांहीं तरी इतिहास ह्या कोंकणी अनुस्वाराचा असावा. त्यांत कोंकण्यांना गेंगाणे म्हणून हंसण्याचें कांहीं कारण नसून, उलट हा इतिहास त्यांनीं आपल्या अनुनासिकांच्या द्वारां कायम ठेविला ह्याबद्दल त्यांचे आभारच मानिले पाहिजेत.
(२३) रुंद स्वर :- इंग्रजींतील Bat, Ball ह्या शब्दांत असलेले ऍ, ऑ, ह्या स्वरांना अहमदाबादचें तौलनिक भाषाशास्त्री नरसिंगराव दिवाटिया हे रुंद स्वर असें म्हणतात. हे स्वर बंगालींत व कोंकणींत फार आहेत. हे स्वर नागर मराठींत नसले, तरी कुणबाऊ मराठींत आढळतात. यॅड (वेड) तॅल (तेल), शॅन् (शेण) हे स्वर रुंद आहेत. सर भांडारकर आपल्या “Wilson Phylological Lectures” मध्यें “The Law of Accentuation” संबंधीं बोलतांना, पाताळ, कापाड, वतान, जतान असे दीर्घ उच्चार कोंकणीचा विशेष म्हणून सांगत आहेत (पृष्ठ १५६). परंतु कुणबी मराठींत तर धोतार, मुस्काड, वराण असे उच्चार आहेतच. शिवाय त्वांड, ग्वाड, प्वाट, प्वार, असे रुंद उच्चारहि विपुल आहेत. हे रुंद उच्चार संस्कृतांत मात्र नाहींत. पण कानडी बाराखडींत ए, ऍ, ऐ; ओ, ऑ, औ; असे तीन तीन स्वर आहेत. म्हैसूरकडील नागर कानडींत बेसर = कंटाळा, कोण = रेडा, असे दीर्घ स्वर आहेत. त्यांचेच हुबळीकडील कुणबाऊ कानडींत बॅसर अथवा ब्यासर, कॉण अथवा क्वाण असे रुंद स्वर होतात. ह्यावरून कोंकणीचा हा कांहीं विशेष नसून, हे स्वर मूळ द्राविडींतील किंवा मोंगली भाषेंतले असावेत, ते कोंकणींत आणि कुणबाऊ मराठींत कायम राहिले आहेत, पण नागर मराठींतून आणि नागर कानडींतून ते मागाहून गेले असावेत, असा तर्क करण्यास जागा आहे.