साधित शब्द

(१६) आपण वर सिद्ध शब्दांचा विचार केला. ह्यापुढें आपण व्याकरणांत शिरणार आहों. म्हणून प्रथम साधित शब्दांचा विचार करूं. कोंकणींतील व मराठींतील धातुसाधितांमध्यें साम्यभेद खालील कोष्टकावरून सहज दिसेल.

मराठी कोंकणी सकर्मक अकर्मक (PDF साठी येथे क्लिक करा)

वरील कोष्टकावरून वाचकांच्या ध्यानांत सहज येईल कीं, कोंकणीचें मराठीशीं जितकें साम्य आहे तितकें इतर कोणत्याहि मृत अथवा जिवंत भाषेशीं नाहीं; आणि जेथें भेद आहे तेथें तो केवळ उच्चाराचा आहे; किंवा कोंकणींत कांहीं साधितांचीं रूपेंच वेगळीं आणि जास्त आहेत. हाच प्रकार खालील कोंकणी प्रत्ययांवरून नामांच्या विभक्तींसंबंधानें आणि क्रियापदांच्या काळांच्यासंबंधानेंहि दिसून येत आहे. तो असा :

तक्ता (PDF साठी येथे क्लिक करा)


वरील कोष्टकावरून दिसून येईल कीं, द्वितीया आणि चतुर्थीशिवाय बाकी प्रत्यय बहुतेक मराठीसारखेच आहेत. मात्र कोंकणींत कांहीं विभक्तींत निराळे जास्त प्रत्यय आहेत ते मराठींत नाहींत. पंचमीचे प्रत्यय ‘च्यानं’, ‘ज्येन’ हे व्यावहारिक मराठींत आढळतात; जसें, माझ्येंन किंवा माझ्याच्यानं हें काम होत नाहीं. मराठीच्या लिखाणांत जरी ‘रामानें’ अशी तृतीया होते, तरी बोलण्यांत कोंकणीप्रमाणें ‘रामानं’ असेंच रूप होतें. ह्याशिवाय विशेष महत्त्वाचें साम्य म्हणजे नामाचीं सामान्यरूपें बहुतेक सर्व मराठीप्रमाणेंच कोंकणींतहि होतात.
(१७) क्रियापदांच्या काळांचीं रूपें पाहिलीं असतां कोंकणीचें इतर कोणत्याहि चालू प्राकृतांपेक्षां मराठीशीं विलक्षण साम्य आहे. इतकेंच नव्हे, तर गुजराती, सिंधी, अगर हिंदीपेक्षांहि, बंगाली अथवा ओरिया भाषेंतील काळांच्या आणि प्रयोगांच्या रूपांकडे तिच्या रूपांचा अधिक कल झुकत आहे, आणि तसाच मराठीच्याहि रूपांचा झुकत आहे. ह्या गोष्टीवरून मराठी भाषा, बंगालचा पश्चिम भाग आणि ओरिसा ह्या प्रांतांतून प्रवास करून दक्षिणेंत आल्यावर तिचें जें रूप बनलें, तें रूप सारस्वतांनीं कोंकणांत नेलें असावें असें अनुमान होतें. उदाहरणार्थ, भूतकाळचा ‘ल’ आणि भविष्यकाळचा ‘न’ अथवा ‘ल’ हा आदेश बंगालींत, ओरियेंत आणि मराठींत आहे. तो गुजरातींत, सिंधींत किंवा हिंदींत नाहीं. पण तोच नेमका कोंकणींत मात्र आढळतो. ह्या भविष्यकाळच्या ‘ल’वरून आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीचा सुगावा लागत आहे, तो असा. व्याकरणकार रा. भि. जोशी ह्यांनीं आपल्या प्रौढबोध व्याकरणांत ( पानें १६१, १६२ कलम (ई)) मराठींतील जुन्या आणि नव्या भविष्यकाळाचा विचार करीत असतांना म्हटलें आहे कीं, जुन्या मराठींत म्हणजे इसवी सन १२०६ ह्या वर्षापर्यंत जुन्या वर्तमानकाळाप्रमाणेंच भविष्यकाळाचीं रूपेंहि असत. इसवी सन १२८६ च्या परळ येथील मराठी शिलालेखांच्या “जो कोणी हुवी ए शासन लोपी”, ह्या वाक्यांतील हुवी आणि लोपी हे वर्तमानकाळीं प्रयोग भविष्यकाळीं योजिले आहेत. तसेंच इसवी सन १२०६ च्या पाटणच्या मराठी शिलालेखांतील “येथें जें मविजे तें मढीचेन मापें मवावें” ह्या वाक्यांत मविजे हें वर्तमानकाळाचें रूप भविष्यकाळीं योजिलें आहे. पण ज्ञानेश्वरींत (इसवी सन १२९०) आणि त्याच्यापुढील काळांत ह्याच रूपापुढें ‘ल’ हा प्रत्यय लागून भविष्यकाळाचा प्रयोग होऊं लागला. हा मराठीचा ‘ल’ प्रत्ययच कोंकणींत ‘लो’ ह्या रूपानें आहे. जोशी आपल्या ह्याच (ई) कलमाचे आरंभीं म्हणतात “हा भविष्यकाळाचा ‘ल’ कसा आला, कोठून आला हें सांगतां येत नाहीं.” परंतु कानडीच्या भविष्यकाळाच्या रूपांत नु, लु, रु असे प्रत्यय आहेत, त्यावरून मराठींत व कोंकणींतहि हे कानडी ‘न’ आणि ‘ल’ हे प्रत्यय अगर आदेश आले असावेत; किंवा खुद्द जोशी आपल्या त्याच पानावरील (आ) ह्या कलमांत हा भविष्यकाळचा ‘ल’ जुनी मारवाडी, गरवाली, कमाउनी आणि नेपाळी ह्यांमध्यें एकवचनी ‘लो’ आणि अनेकवचनी ‘ला’ असा आहे.” असें जें म्हणतात, त्यावरूनच सारस्वतांच्या द्वारां हा ‘ल’ मराठींत आला असें म्हणण्यास काय हरकत आहे ? इतकेंच नव्हे तर ह्या ‘ल’ ला जरी मराठींत जोशी म्हणतात त्याप्रमाणें “ लिंग आणि वचन ह्या दोहोंचाही भेद नाहीं,” तरी कानडी आणि कोंकणी ह्या दोन्ही भाषांत ह्या दोहोंचाहि भेद आहे. ह्या विलक्षण साम्यावरून, मराठीचा आणि सारस्वत ब्राह्मणांचा समागम इ. स. १२०६ आणि १२९० च्या दरम्यान घडला असावा व त्यानंतर हे लोक ही नवीन अर्धवट संपादलेली ज्ञानेश्वरीच्या काळची जुनी मराठी घेऊन कोंकणांत गेले असावेत. त्यानंतर त्यांचा आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडील मराठीचा संबंध तुटल्यामुळें, आणि कानडीचा संबंध जास्त जडत चालल्यामुळें, त्यांच्या भाषेंत कानडी शब्दांचाच नव्हे तर, कांहीं क्रियापदांच्या रूपांचीहि भर पडत चालली. उदाहरणार्थ, “मला माहीत नाहीं” ह्या अर्थी कोंकणींत “माका गोत्त ना” असें म्हणतात. हा “गोत्त” शब्द निव्वळ कानडी आहे. आणखी पुष्कळशा शब्दांवरून, नामाच्या विभक्तींवरून आणि क्रियापदांच्या काळांवरून कोंकणीचें जुन्या मराठीशींच साम्य नवीन मराठीपेक्षा किती तरी जास्त दाखवितां येतें. पण पुढच्या काळांत मात्र तिचें कानडीशीं साम्य आढळतें. संयुक्त प्रांत, बिहार आणि बंगाल ह्या प्रांतांवर इ. स. १३०० शतकांत मुसलमानांनीं अनेक स्वा-या करून तेथील लोकांचा अनन्वित छळ केला; बौद्ध धर्माचा आणि मठांचा उच्छेद केला; म्हणून ते लोक उत्तरेस नेपाळांत व दक्षिणेंत ओरिसा प्रांतांत जीव घेऊन पळाले. त्याच धांदलींत गौडसारस्वत ब्राह्मणहि त्याच मार्गानें प्रथम गोदावरीच्या तीरावर आणि नंतर कोंकणांत उतरले असावेत. तेथें विजयनगरच्या कानडी साम्राज्यछत्राखालीं, पोर्तुगीजांची धाड येईपर्यंत, त्यांनीं आपल्या वसाहती सुखानें चालविल्या असाव्यात. ही उपपत्ति त्या काळीं घडलेल्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील राज्यक्रांतीला अगदीं सुसंगतच आहे.
(१८) कोंकणीचा दुस-या कोणत्याहि चालूं प्राकृतापेक्षां मराठीशींच संबंध असल्याचें व त्यांतल्यात्यांत, बंगाली व ओरियाशीं संबंध असलेल्या मराठीशींच अधिक संबंध असल्याचें खालील गोष्टीवरून आणखी सिद्ध होतें. मराठींतील पंचमी विभक्तीचे “ऊन”, “हून” हे, “होऊन” ह्या धातुसाधितावरून आले आहेत. जुन्या मराठींत ‘घर होऊन’ (घराहून) असें जें रूप क्वचित् आढळतें तें बंगालींतील घर “होइते” ह्या रूपाबरहुकूम आहे. हिंदी भाषेंत द्वितीया आणि चतुर्थीचे प्रत्यय कु, को असे आहेत. आणि बंगालींत पंचमी “होइते” (होऊन) ह्या धातुसाधितावरून होते; ह्या दोन कारणांवरून सारस्वतांनीं ही भाषा उत्तरेकडून आणिली म्हणावी, तर इतर बहुतेक सर्व विभक्तींचे प्रत्यय-विशेषतः तृतीयेचे प्रत्यय दुस-या कोणत्याही भाषांशीं जुळते नसून मराठीशींच जुळतात. ह्यावरून सारस्वतांनीं दक्षिणेंत आल्यावरच ही भाषा घेतली असेंहि होतें. इतर भाषांतून एकेका विभक्तीचा बहुशः एकेकच प्रत्यय आहे. संस्कृताचाहि हाच प्रकार आहे. पण मराठीचे प्रत्यय एकेका विभक्तीला तीन चार आहेत आणि कोंकणींत तर त्याहूनहि जास्त आहेत. क्रियापदाचे काळहि ह्या दोन भाषांचे इतरांपेक्षां जास्त आहेत. ह्यावरून ह्या दोन्ही भाषा फिरत्या स्थितींतल्या  लोकांच्या आहेत, आणि कोंकणी तर त्यांतल्यात्यांत जास्त आहे, हें उघड दिसतें. कोकणींतलें कांहीं काळ किंवा अर्थ हल्लींच्या नव्या मराठींत जरी प्रचारांत फारसे नाहींत तरी पूर्वीं जुन्या मराठींत ते होते. हांव निजं = मी निजें, हांव मारीं = मी मारीं; तो करी = तो करी; ते करीत = ते करीत; हीं रीतिभूतकाळाचीं रूपें कोंकणींतलीं जुन्या मराठीसारखींच आहेत. हांव चालों, आमी करूं, तो करों, ते करोत हा कोंकणी विध्यर्थ जुन्या मराठींतहि होता. “चालों वाटे आम्ही तुझाचि आधार” (तुकाराम) “ सदाहि हित नायकों, बहु अपाय केले, करूं” (मोरोपंत). आणखी एक बारीक पण विलक्षण साम्य कोंकणींत आणि मराठींत आहे, तें दुस-या कोणत्याहि भाषांत आढळत नाहीं. तें असें : सकर्मक क्रियापदाच्या रूपांत “इ” हा आदेश होतो तो अकर्मकांत होत नाहीं. जसें, “हांव निजतां” = मी निजतों, “हांव मारीन” = मी मारीन. चमत्कार हा कीं, मराठींत हा “इ” आदेश विकल्पानें होतो, तसा कोंकणींतहि तो विकल्पानेंच होतो !
(१९) हे सर्व प्रकार, व्याकरणाच्या ज्या रूपांनीं मराठी आणि कोंकणीमधील साम्य सिद्ध होतें, त्यासंबंधी झाले. आतां मराठींत जीं रूपें आहेत ती कोंकणींत नाहींत, आणि कोंकणींत आहेत तीं मराठींत नाहींत त्यांची वाट काय? आणि तींच तर वादाचा मुख्य विषय आहेत. कारण त्यांवरूनच दालगादोसारख्या पंडितांना, मराठीपासून कोंकणी भिन्न आणि स्वतंत्र असावी, अशी शंका येत आहे. वर निर्दिष्ट केलेल्या ऐतिहासिक परिस्थितीवरून आणि व्याकरणाच्या समान रूपांवरून कोंकणी ही मराठीपासून भिन्न नाहीं हें सिद्ध झालें, तरी तिचा कांहीं भाग मराठीपासून स्वतंत्र आहे, तो कशामुळें ह्याचा उलगडा करणें आवश्यक आहे. हें परस्पर स्वातंत्र्य ह्या दोन्ही भाषांतील जीं भिन्न भिन्न कालांचीं व अर्थांचीं रूपें आहेत त्यांवरून मुख्यतः दिसून येतें. ह्यांचा उलगडाहि ह्या भाषांच्या घटनेच्या इतिहासांतच सांपडणें शक्य आहे. ह्या दोन्ही भाषा उत्तरेकडून खालीं आलेल्या लोकांच्या आहेत. हे लोक निरनिराळ्या वेळीं आणि विध्यांद्रीच्या पूर्व आणि पश्चिम टोकाला वळसा घालून दक्षिणेंत उतरले आहेत. इतकेंच नव्हे, तर हे लोक म्हणजे सारस्वत ब्राह्मण आणि मराठे हे कांहीं काळ एकत्र राहून पुनः वेगळे राहूं लागले आहेत, व पुनः त्यांच्यामध्यें सह्याद्रि आडवा पडला आहे. नर्मदेच्या उत्तरेकडील अथवा पूर्वेकडील दुस-या कोणत्याही चालू भाषांचा असा प्रकार घडलेला नाहीं. त्या, जुन्या पैशाची, शौरसेनी, मागधी, अर्धमागधी अथवा महाराष्ट्री ह्यांपैकीं कोणत्या तरी एका प्राकृतांतून निर्माण होऊन, पुढें निश्चल आणि निर्विंघ्न वाढत गेल्या, पण मराठीला मात्र विंध्याद्रीच्या दोन्ही टोकांला वळसे घालावे लागले आहेत, म्हणून हिच्यांत वरील चारपांचहि प्राकृतांची भेसळ झाली आहे. इतकेंच नव्हें तर तिचें बाळपण, मी ‘केसरीं’तील उपरिनिर्दिष्ट लेखांत सिद्ध केल्याप्रमाणें कानडीच्या तालमींत वाढलें आहे. निराळ्या वेळीं पण अगदीं असाच प्रकार कोंकणीचाहि घडला आहे. ह्या परिस्थितीमुळेंच ह्या दोन्ही चालू भाषा इतर उत्तरेकडील किंवा पूर्वेकडील भाषांपासून जशा अगदीं भिन्न आहेत तशाच किंचित् अंशानें परस्परांपासूनहि अगदीं भिन्न नसल्या तरी स्वतंत्र असल्याचा भास होण्याइतक्या वेगळ्या आहेत. हें स्वातंत्र्य स्पष्ट करून दाखविण्यासाठीं खालीं कांहीं उदाहरणें देतों.
(२०) राव. सा. चव्हाण ह्यांनीं आपल्या व्याख्यानाच्या १४ व ३२ पानांवर कोंकणी आणि मराठी शब्दांची तुलना करून, कोंकणी शब्द मराठी शब्दापेक्षां संस्कृताला जवळ आहेत असें ध्वनित केलें आहे. हांव = मी; उदक = पाणी; गीम = उन्हाळा; आयदन = भांडें; कुकड = कोंबडा, इ.; उलटपक्षीं, कुणबाऊ मराठींतील खालील उदाहरणें, नागर मराठींतल्या शब्दांपेक्षां संस्कृताला अधिक जवळ हें ध्यानांत घेण्यासारखें आहे. कुणब्यांच्या भाषेंत “घ्या” म्हणजे दिवसा असा शब्द आहे. ऋग्वेदांत वरुणाच्या स्तोत्रांत “यचिद्धि ते विशो यथा प्रदेव वरुण व्रतम् | मिनिमसि द्यवि द्यवि ||” यांतील द्यवि ह्याचा दिवसा असा अर्थ आहे, त्याला वरील “ध्या” हा शब्द फार जवळ आहे. पुण्याकडील ‘कुणबी’ बघ न म्हणतां ‘पघ’ म्हणतात; हा शब्द प्रेक्ष-पेख ह्याला नागर मराठींत बघ पेक्षां अधिक जवळ आहे. करून शानी, देऊन शानी, हा कुणबी प्रयोग वेदांतील संस्कृतांत आढळतो, असें राजवाडे सांगतात. मराठींतील “हो” हाहि धातु संस्कृत “भू” चा अपभ्रंश आहे. पण कोंकणींत “जा”  म्हणजे “हो” ह्या अर्थाचा शब्द संस्कृत जनपासून झालेला ह्याच अर्थीं आहे. “मुई जासी, साखर खासी” = मुंगी होशील तर साखर खाशील. ह्याच धातूपासून “जाय” असें एक साधित “पाहिजे” अशा अर्थीं कोंकणींत आहे. “दिवुळान् रिक्तोंच शेण काढूंक जाय”= देवळांत शिरतांच शेणहि काढावयाला (तयार असलें) पाहिजे. “तुका जाय”? = तुला पाहिजे काय? हिंदी व गुजरातीप्रमाणें मराठींत “चोर पकडला जातो” असा कर्मकर्तरी प्रयोग होतो. हा प्रयोग मराठींत नवा आहे. जुन्या मराठींत “धरिजे,” “देखिजे” असा प्रयोग होतो. ह्याच रीतीनें कोंकणींत हा प्रयोग आहे. जसें :- “सोंदीर आणि संसार कोणाच्यान् चिंतून काढून न जो”= समुद्र आणि संसार कोणाच्यानेंहि चिंतून काढला जात नाहीं (थांग लागत नाहीं). ह्यांत “जो” हा शब्द मराठींतल्याप्रमाणें “जा” ह्या अर्थीं नसून इंग्रजी कर्मकर्तरि प्रयोगाप्रमाणें असू = is ह्या अर्थीं (is caught) असा आहे. अव्वल आर्यभाषेंत कर्मकर्तरि प्रयोग होता कीं नाहीं ह्याची शंका आहे. तो प्राकृतांत मात्र राजरोस आढळतो. संस्कृतांत तो आत्मनेपदींच आढळतो, व पदाचे प्रत्यय कानडीशीं अधिक जवळ आहेत म्हणून हा कर्मकर्तरि प्रयोग कदाचित् द्राविड असावा अशी शंका येते. असो. हें प्रकरणच स्वतंत्र आहे. तूर्त कोंकणींतला प्रयोग इंग्रजींतल्या प्रयोगाला किती जवळ आहे एवढें कळलें कीं पुरे. इंग्रजी भाषा सर्वस्वीं आर्य नाहीं हेंहि ध्यानांत ठेवणें आवश्यक आहे.

(२१) वर ज्या शब्दांवरून कोंकणी ही मराठीपासून स्वतंत्र आहे असा भास होतो असे पुष्कळ शब्द इतरहि देतां येतील. हे सर्व संस्कृत तद्भव आहेत. पण असले पुष्कळ संस्कृत तद्भव हल्लींच्या कुणबाऊ मराठींत किंवा जुन्या महानुभावींत आढळतात. ते नागर मराठींत किंबहुना कोंकणींतहि आढळत नाहींत. ह्यावरून ही जुनी महानुभावी अगर आतांची कुणबाऊ देखील मराठीपासून स्वतंत्रच म्हणावयाची कीं काय? मात्र एवढें खरें कीं, कोंकणींत जे असे स्वतंत्र तद्भव सांपडतात त्यांवरून ती मूळ मराठीपासून कधीं फुटून वेगळी झाली हें ठरविण्याच्या कामीं कांहींसा अंधुक पुरावा मिळतो. उदाहरणार्थ “वेगुवि” हें कोंकणी क्रियाविशेषणच घेऊं. हा शब्द जुन्या मराठींत “वेगोवित्तर” अशा रूपानें होता. आतां नाहीं. श्रीपतिकृत “रत्नमाला” नांवाचा एक त्रुटित ज्योतिषग्रंथ, शालिवाहन शके ९६१ सालांतला अगदीं जुना, भारत इतिहाससंशोधक मंडळानें आपल्या अहवालांत प्रसिद्ध केला आहे, त्याची भाषा अगदीं महानुभावी वळणावर आहे. त्यांतील प्रकरण ३, श्लोक १० मध्यें “वेगोवित्तर” असा मराठी शब्द आढळतो. संशोधक राजवाडे, ह्याचा अर्थ लागत नाहीं, असें कां म्हणतात हें कळत नाहीं. हा ग्रंथ म्हणजे मूळ संस्कृत श्लोक व त्यावरील त्याच वेळच्या मराठींतील टीका मिळून झाला आहे. “...अषिल (अखील) भोगानुभवं नृणां तैलाभ्यंगात् सपदि कुरुते सूर्यतनय: ||१०||” ह्या आपल्या संस्कृत श्लोकाचें भाषांतर, ग्रंथकार श्रीपती आपल्याच तत्कालीन मराठींत असें करीत आहे :- “शनिश्चरे (शनिवारीं) पुरुषा(ला) तैलाभ्यंगास्तव वेगोवित्तर सकळभोग प्राप्ती” (१०) ह्यावरून “सपदि” ह्या संस्कृत शब्दाचें “वेगोवित्तर” ह्या तत्कालीन मराठी शब्दानें भाषांतर झालें आहे, हें उघड आहे. हाच शब्द ‘वेगुवि’ ह्या अपभ्रंशरूपानें हल्लींच्या कोंकणींत आहे व त्याच अर्थीं, (वेगानें) असा क्रियाविशेषणवाचक आहे असें म्हणावयाला काय हरकत आहे? एकंदरींत हल्लींची कोंकणी ही मराठीपासून स्वतंत्र नसून तिच्यांतील कांहीं तद्भव व देश्य शब्द आणि व्याकरणाचीं रूपें जशीं सारस्वत ब्राह्मणांनीं आणिलीं आहेत तशींच कांहीं क्षत्रिय मराठ्यांनीं किंवा कुणब्यांनीं आणिलीं आहेत, असेंच अनुमान निघतें. शालिवाहन शके ९६१ त (इ. स. १०४०) जे सारस्वत ब्राह्मण व मराठे गोदावरीच्या आसपास मिळूनच होते, तेच वरील कलम (१७) मध्यें दर्शित केल्याप्रमाणें इ. स. १२०६-१२९० च्या दरम्यान विभक्त होऊन सारस्वत हे कोकणांत शिरून त्रावणकोरपर्यंत खालीं उतरले, आणि कुणबी व क्षत्रिय मराठे पुढें देशावरूनच खालीं तंजावरापर्यंत द्राविड देशांत उतरले, असें मानण्यास काय हरकत आहे? असें न मानतां उलट कोंकणी ही मराठीच नव्हे असें मानण्यास काय काय हरकती आहेत, त्यांचें विवरण वरील ऐतिहासिक विवेचनांत कलम ५ पासून १२ पर्यंत करण्यांत आलेंच आहे.