व्याख्यान दुसरें

‘सनातन भागवतधर्माचा विकास’ ह्यावर श्री. शिंदे ह्यांनीं इ. स. १९२५ च्या पावसाळ्यांत पुण्यांत एक व्याख्यानमालिका गुंफली, तिच्या उत्तरार्धाची प्रस्तावना म्हणून हीं दोन प्रवचनें झालीं. त्यांनीं सासवड येथें भागवत धर्माच्या चालू सहस्त्रकांतील हिंदुस्थानांतल्या इतिहासाचें अगदीं संक्षिप्त सिंहावलोकन केलें.
इ. स. च्या १२ व्या शतकांत व-हाडकडे महानुभाव व दक्षिण हैदराबादकडे लिंगायत पंथाची स्थापना झाल्यावर तेराव्या शतकांत पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाचा उदय झाला. त्यानंतर उत्तरेस वाराणशीस समानंदी, पंजाबांत नानक आणि बंगाल्यांत चैतन्य पंथाची प्रतिष्ठा झाली. वारकरी आणि महानुभाव पंथ लौकिक दृष्ट्या जितका अप्रिय तितकाच दुसरा म्हणजे वारकरी पंथ प्रिय आहे; हा एक मोठाच ऐतिहासिक चमत्कार कां व कसा आहे, तें रा. शिंदे ह्यांनीं स्पष्ट करून सांगितलें. मूर्तिपूजा, जातिभेद, कर्मठ सोवळें वगैरे अधार्मिक गोष्टी दोन्ही पंथांत प्रथम नव्हत्या, तरी पण मागाहून शिरल्या. इतकेंच नव्हे तर धार्मिक वाङ्मयाचा प्रसार मराठींत करण्याचा अग्रमान निःसंशय महानुभावांचा आहे. आणि त्या धर्माचा प्रसार बहुजनसमाजांत करण्याची अपूर्व कामगिरी तो पंथ आजहि करीत आहे, तरी तो अप्रिय आहे; ह्यावरून “जनपदहित” कर्ता ‘द्वेष्यते पार्थिवेंद्रैः’ ह्या म्हणीचा तात्पर्यार्थ म्हणजे डोईजडांचें राजकारण हेंच ह्या चमत्काराच्या तळाशीं असणें संभवनीय आहे, असें रा. शिंद्यांनीं अनुमान केलें.
तुकारामानंतर वारकरी पंथाची आत्मिक वाढ संपली. निळोबांनीं तुकोबाच्या कामगिरीला त्यांची इच्छा नसतां सांप्रदायिक स्वरूप दिलें. ह्यावरून ही वाढ खुंटलेली दिसते. पण ह्या सांप्रदायिकपणामुळेंच ह्या वारकरी पंथाचें व त्यांचें उत्तरेकडील व पूर्वींच्या महानुभावांशीं व्यापारी मात्सर्य वाढून ते एकमेकांचा उलट हेवादेवा करू लागले असावेत, असा शिंद्यांनीं तर्क केला.
महिपतीनें आपला भक्तिविजय ग्रंथ पानिपतच्या लढाईनंतर इ. स. १७६२ सालीं (शकें १६८४ वैशाख वद्य द्वादशीस) प्रवरेच्या दक्षिणेस ताहराबाद येथें प्रसिद्ध केला. महिपतीनें मूर्तिपूजा, वर्णाश्रमधर्म, कर्मठ सोवळेपणा, ब्राह्मण, संस्कृतचें बंड, धार्मिक मध्यस्थांचा जुलूम इत्यादि गोष्टींची उघडउघड निंदा हल्लींच्या सत्यशोधकांहूनहि किती तरी अधिक स्पष्ट व फटकळ भाषेंत केली आहे. त्यावरून तुकारामांच्याहि मागें १०० वर वर्षें ख-या भागवतधर्माची ज्योत अगदींच मावळलेली दिसत नाहीं. अशा प्रकारच्या ह्या भागवतधर्माचें मुख्य कार्य सांगतांना रा. शिंदे म्हणाले, “(१) धर्मभेद, (२) जातिभेद, (३) मूर्तिपूजा, (४) अतिवैराग्य, (५) अतिकर्म, (६) अतिज्ञात, (७) ग्रंथप्रामाण्य, (८) गुरुपुजा, (९) राजकारण, (१०) तर्कवाद, (११) तात्पुरता हितवाद, ह्या ११ बाह्य गोष्टींचा ख-या धर्माशीं घटस्फोट भागवतधर्मानेंच केला.” हें शिंदे ह्यांनीं महिपतीच्या ग्रंथांतील उतारे देऊन सिद्ध केलें. “ज्ञानदेवें घातला पाया | तुका झाला कळस ||” ही वारकरी म्हण कांहीं अंशीं दुरुस्त करण्यासाठीं वारकरी पंथाचा महाराष्ट्रांतच नव्हे तर अखिल हिंदुस्थानांत प्रसार करण्याच्या कामीं श्रीनामदेवांनीं जो भाग उचलला तो श्रीज्ञानदेवांसच काय, पण प्रत्यक्ष श्रीतुकोबांनाहि उचलणें शक्य झालें नाहीं; म्हणूनच नामदेवांचें अवतारकृत्य श्रीतुकोबांनीं आटोपलें, हें महिपतीचें काव्यमय मत यथार्थ आहे, असें शिंदे ह्यांनीं आपलें मत दिलें.
आम्ही वैकुंठवाशी | आलों ह्याच
कारणाशी | बोलीले जे ऋषी |
साच भावें वर्ताया ||

हा तुकारामांचा सात्त्विक दावा हल्लींचा वारकरी अगर तदनुषंगी कोणताहि पंथ किती सिद्ध करीत आहे हा प्रश्न अलाहिदा आहे. मात्र हाच दावा हल्लींचे ब्राह्मसमाज, आर्यसमाज व सत्यशोधक समाज ह्यांचा आहे, असें शिंदे म्हणाले. अगोदरच्या उदार पंथांनीं हा दावा सिद्ध केला असता, तर हे नवीन समाज निघावयाला अवकाशच उरला नसता. पण भागवतधर्माचें क्षेत्र सनातन व सार्वत्रिक असल्यानें, तें पूर्णपणें आक्रमण्याला हे नवे समाज अपुरे पडल्यास कोणी आश्चर्य मानण्याचें कारण नाहीं. जेथें श्रीचक्रधर महानुभाव, ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम, नानक, कबीर, चैतन्य, राममोहन राय, दयानंद, ज्योतिबा फुले अशांनीं हात टेकले, तेथें पूर्ण यशाचा चंग कोण बांधिल? अहंकाराचा नाश ह्यांतच भक्तीचा विजय आहे. आणि तेथेंच भागवतधर्माची ध्वजा फडकत आहे, असा निर्वाळा देऊन रा. शिंदे ह्यांनीं सासवड येथील प्रवचन आटोपलें.