बोल्शेव्हिझमचा बागुलबोवा

येथें जमलेल्या पांढरपेशे पुढा-यांना माझें येथवर भाषण ऐकून, मी कोणी एक नुकताच रशियांतून आलेला बोल्शेव्हिक आहे काय अशी भीति अथवा शंका येण्याचा संभव आहे. माझ्या संचारांत माझ्या कित्येक प्रेमळ मित्रांनीं ही शंका मला निर्भीड प्रश्न करून फेडून घेतली आहे. मी आपल्यास स्पष्ट विचारतों कीं मीं जर बोल्शेव्हिक असतोंच तर तुमच्यांशीं विचार विनिमय करायला आणि तुमच्या सहकार्याची अतिशय नम्र याचना करावयाला आलों असतों काय ? खोटी धास्ती घेऊ नका. बोल्शेव्हिकांचा मार्ग आणि उपाय आमच्याहून अगदीं भिन्न आहेत. ते भांडवलदारांशीं विचारविनिमय किंवा सहकार्य करण्यांत आपला वेळ गमावीत नाहींत. आम्हांला तर अद्यापि भांडवलदार व त्यांच्याच दाबाखालीं असलेले इतर पांढरपेशे ह्यांच्याच उदार व विवेकी साह्यानें खेड्यांतल्या मुक्या, झोपाळू पण कष्टाळू जनतेला जागें करावयाचें आहे. तेव्हां पांढरपेशांनो, कृपा करून, तुम्ही आमच्या कार्याविषयीं विनाकारण गैरसमजूत करून घेऊं नका. समजून उमजून तुम्ही खोटी हूल उठवाल असें आम्ही समजत नाहीं. अशा अप्रामाणिक हुल्लडखोर माणसांना येथपर्यंत येण्याची देखील तसदी घ्यावयाला नको. त्यांचें कार्य येथें न येतां व आमचें म्हणणें न ऐकतांहि करतां येईल ! त्यांचेकडे जसें आम्ही लक्ष देत नाहीं तसेंच तुम्हीहि दुर्लक्षच करा.