पहिल्या व्याख्यानांत 'भागवत' धर्माचा 'वैदिक' धर्माशीं किती अत्यल्प संबंध आहे, खरा संबंध पाहावयाचा असल्यास वैदिक धर्माच्याहि फार पलीकडे गेलें पाहिजे, हें सांगितलें. आधुनिक जाडे विद्वान् देखील हिंदुस्थानच्या कोणत्याहि बाबीचा इतिहास पाहावयाचा झाल्यास वेदांकडे धाव घेतात. ह्याचें कारण वेद हे इतिहासाचे उगम नव्हत, तर नुसते अशा विषयाचा एक उपलब्ध लेखी पुरावा येवढ्यामुळेंच, हेंहि प्रथमदर्शनींच सांगितलें; व शेवटीं ह्या भागवत धर्माचें संशोधन करण्यासाठीं हिंदुस्थानांतील वैदिक किंबहुना आर्य संस्कृतीपलीकडील द्रावीड, कोल, मोंगल किंवा त्याहूनहि प्राचीन इतर आर्येतर संस्कृतींचाहि शोध करणें क्रमप्राप्त आहे, असें सांगितलें. मात्र ह्या शोधासाठीं कागदोपत्रीं किंवा लेखी पुरावाच पाहिजे. अशा लेखी पुराव्याशिवाय कोणत्याहि गोष्टीला आम्ही सत्य म्हणणारच नाहीं, असा येथें आग्रह धरून चालावयाचें नाहीं. लेखी पुरावा म्हणजेच केवळ बिनतोड पुरावा, व इतर अनुमानें म्हणजे टाकाऊ, असें कोणी सुज्ञ म्हणणार नाहीं. इतकेंच नव्हे तर एखाद्या गोष्टीविषयीं अगदीं स्पष्ट लेख मिळाला, म्हणून त्या गोष्टीविषयीं अगदीं प्रत्यक्ष पुरावा मिळाला, असेंहि म्हणतां येणार नाहीं. नुसत्या पोशाखावरूनच सभ्य गृहस्थाला ओळखतां येत नाहीं, तसेंच नुसत्या लेखावरूनच त्यांतील गर्भितविषय सत्य आहे, असेंहि म्हणतां येत नाहीं. आमच्या विद्यार्थिदशेंतील एक विनोद आठवतो, तो सांगणें प्रासंगिक आहे. डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी आम्हां फर्ग्यूसनवाल्यांना टिन्पॉट् कॉलेजवाले, असें पूर्वी हिणवीत असत. डेक्कन कॉलेजांतील टेनिसक्लब, बोटक्लब वगैरे भपक्याच्या संस्था, विद्यार्थ्यांची आणि अध्यापकांची अक्कडबाज राहणी पाहून निदान माझे तरी डोळेच दिपत. इतकेंच नव्हे, एकदा तर कडक इस्त्री केलेला लिननशर्ट अंगांत नसलेल्या माणसाला सुशिक्षित तरी कसें म्हणावें, अशी शंका नवीन भरती झालेल्या कांहीं तरुण डेक्कन कॉलेजवाल्यांना आलेली पाहून, मी कधीं तरी सुशिक्षित होईन कीं नाहीं, ह्याची मला तेव्हां खात्री नसे ! असो. कडक इस्त्रीचा व सुशिक्षणाचा गेल्या पिढींत जितका संबंध होता, तितकाच किंबहुना कांकणभर जास्तच संबंध, लेखी पुरावा आणि ऐतिहासिक सत्य ह्यांमध्यें असावा, अशी कांहीं संशोधकांची अद्यापि समजूत असलेली आढळते; निदान आर्यानार्य वादांत तरी ही समजूत फार नडते, ही गोष्ट सर्व इतिहाससंशोधकांनीं समजून असणें सुरक्षितपणाचें आहे.
हिंदुस्थानांतील आहे नाहीं तें सर्व सत्य आणि शुभ चार वेदांतच आहे, बाकी उरेल तो अंधकार अशी भाविक समजूत केवळ जुन्या कर्मठ ब्राह्मणांचीच नसून अगदीं आजच्या कांहीं आर्यसमाजी प्रोफेसरांचीहि आहे. प्रोफेसर मॅक्समुल्लर हे परकीय असूनहि त्यांना आर्यत्वाचाच नव्हे तर वेदांचाहि त्यांच्या पांडित्यामुळें मोठा अभिमान होता. त्यांनीं आपल्या पौरस्त्य पवित्र ग्रंथमालेंतील, उपनिषदांवरील ग्रंथाच्या प्रस्तावनेंत म्हटलें आहे कीं, राममोहन राय ह्यांनीं उपनिषदांचें भाषांतर केलें, तुलनात्मक धर्माचें पहिलें अधिष्ठान उभें केलें व त्यांचे अनुयायी देवेंद्रनाथ, केशवचंद्र सेन आणि 'साधारण ब्राह्मसमाजा''चे संस्थापक व चालक ह्या सर्वांना आपल्या धर्माची प्रेरणा उपनिषदांतून झाली आहे, हें मॅक्समुल्लरचें म्हणणें सर्व खरें आहे. पण शेवटीं देवेंद्रनाथांनींच उपनिषदांतून जरी स्वतः प्रेरणा घेतली तरी वेदाचें प्रामाण्य गौतम बुद्धाप्रमाणेंच झुगारून दिलें, हेंहि पण तितकेंच खरें आहे. ह्या गोष्टींत जें रहस्य आहे, तें हेंच कीं, वेद संहिता काळचा जो आर्यांचा अस्सल 'वैदिक' धर्म तो पुढें उपनिषत्काळांत आपल्या शुद्ध आर्यस्वरूपांत उरला नाहीं. प्रस्थानत्रयीचा शेवटचा टप्पा जो भगवद्गीता धर्म त्यांत तर तो फारच कमी उरला, आणि शेवटीं देवेंद्रनाथांच्या काळीं तर तो धर्म आपल्या कीर्तिरूपानेंच केवळ उरला, प्रामाण्यरूपानें उरणें शक्यच नव्हतें. तात्पर्य इतकेंच कीं, उपनिषत्काळीं म्हणजे गौतम बुद्धाच्या पूर्वी १।२ शतकांचा धर्म म्हणजे वैदिक धर्म नसून बाहेरून आलेल्या आर्य धर्मावर, सुमेरियन ऊर्फ सुमेरु, आसुर, नाग, द्राविड, मोंगल, कोल, इ. आर्यांच्या इतकेंच किंबहुना कांहीं बाबतींत आर्याहूनहि निःसंशय अधिक सुसंस्कृत मानववंश सिंधू नदीच्या पूर्वेकडे हिंदुस्थानांतच जे राहात होते, त्यांच्या धर्मांचा, भाषेचा व इतर संस्कृतीचा संस्कार घडून बनलेला मिश्रधर्म तत्कालीन वरिष्ठ वर्गात चालू होता. आर्यांहून अधिक वैभवाची संस्कृति, ते येण्यापूर्वी हिंदुस्थानांत होती; तिचे प्रत्यक्ष आणि आश्चर्यकारक अवशेष नुकतेच सिंध आणि पंजाब प्रांतांत ब्रिटिश सरकारच्या संशोधनखात्याला सांपडले आहेत. ते डोळ्यांनीं पाहूनहि उपनिषत्काळाच्या अत्यंत संकीर्ण संस्कृतीमुळें नवीन निर्माण झालेल्या स्वतंत्र व उदार धर्माचें सर्व श्रेय अस्सल पण आर्ष 'वैदिक' धर्मालाच देणें म्हणजे आजकालचें तुलनात्मक धर्माचें शास्त्र आणि वाङ्मय वाचून, ख्रिस्ती अथवा त्याहूनहि कडव्या इस्लाम धर्माच्या कांहीं सुशिक्षित प्रचारकांमध्यें आज जें मनाचें औदार्य व दृष्टीचा मोकळेपणा आला आहे, त्याचें सर्व श्रेय बायबलला किंवा कुराणाला देण्यासारखेंच आहे. श्रेयाच्या ह्या भोळसर वांटणीला अगदींच सौम्य नांव द्यावयाचें झाल्यास 'अनैतिहासिक' ह्यापेक्षां दुसरें यथार्थ नांव सांपडावयाचें नाहीं.