जैन आणि बौद्ध भागवत

तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनें सर्व भागवत संप्रदायांचा पाया सांख्य आणि योग ह्या सर्वांत प्राचीन दर्शनांवरून झालेला दिसतो. पूर्व मीमांसेच्या कर्मठपणाशीं कोणत्याहि भागवत संप्रदायाचें जुळणें शक्य नाहीं. उत्तर मीमांसेंतील शुद्धद्वैत भागाशीं कांहीं भागवताचे फारतर अंशत: जुळण्याचा संभव आहे. जैनबुद्धांपैकीं जैन मत पूर्वींचें. दोन्ही निरीश्वरवादी आणि वेदाशीं तुटून असलेलीं परंतु सांख्य - योगाशीं दोन्हीचें पूर्ण सख्य. त्यांतल्या त्यांत सांख्यांची आणि जैनांची फारच गट्टी. सांख्य-दर्शनहि निरीश्वर व वेदाला न मानणारें म्हटलें तरी चालेल. सांख्य दर्शन प्रकृति आणि पुरुष (अनेक जीव ह्या अर्थीं) दोनच तत्त्वें शाश्वत स्वरूपाचीं मानितें, तद्वत् जैन दर्शनहि जड आणि अजड (जीव) हीं दोनच शाश्वत तत्त्वें मानतें. ईश्वर हें तिसरें तत्त्व जैन, बौद्ध, अथवा सांख्य दर्शन मानीत नाहींत. पतंजलीच्या काळीं योगांमध्यें ईश्वर प्रथम केवळ चित्ताची एकाग्रता होऊन लय लागावा, येवढ्याच सबबीवर आला. पुढें कायमचेंच ठाणें धरून बसला. पतंजलि हा स्वत: ईश्वरवादी शिवभागवत होता. त्यानें योग दर्शनांत ईश्वर कल्पनेचा शिरकाव जोरानें केला, याचें कारण श्वेताश्वेतरोपनिषदच असावें. जैनांनीं मात्र ईश्वरतत्त्वाचा आपल्या ज्ञानांत शिरकाव होऊं दिला नाहीं. पण त्यांच्या उपासनेंत तीर्थंकारांनीं ईश्वराची जागा घेतली आहे. बुद्ध मुनि ईश्वरालाच नव्हे तर आत्म्याला किंबहुना ब्रह्म ह्या कैवल्य वस्तूलाहि मानण्याची आवश्यकता निर्वाणाला नाहीं, असें सांगत असे. पण त्याचा अतुल स्वार्थत्याग, करुणा, मैत्रिभावना, संघटनाशक्ति व चातुर्य इत्यादि गुणांचा त्यांच्या निकटवर्ती अनुयायांवर इतका मोहून टाकणारा परिणाम झाला असावा कीं, तो बुद्ध हा केवळ लोकोत्तर पुरुषच नव्हे तर मनुष्य कोटीवरील पायरी साक्षात् ब्रह्माचेंच एक स्वरूप होता, इ. वाद त्याचे तरुण भक्त उपस्थित करूं लागले. बुद्धाच्या निर्वाणानंतर लगेच भरलेल्या वैशाली येथील परिषदेंतच त्यांच्या अनुयायांचे स्थविरवादी आणि महासंघिक असे दोन तट पडले. पहिला पक्ष जो वृद्धांचा तो बुद्धाला एक लोकोत्तर महापुरुष येवढेंच समजून राहिला; पण दुसरा तरुणांचा पक्ष बुद्धाला देव किंबहुना शाश्वत ब्रह्माचेंच रूप मानूं लागला. असें होतां होतां, ३-४ शतकांनीं अश्वघोष आणि नागार्जुन ह्या आचार्यानीं तर महायान पंथ नांवाच्या बौद्धांचा एक स्वतंत्र पंथ स्थापला. ह्या नवीन पंथाचे बुद्ध म्हणजे साक्षात् सगुणब्रह्म असें मत आहे. तोच पंथ पुढें सर्व आशियाभर पसरला. मूळच्या बौद्धाचा ऊर्फ स्थविरवाद्यांचा पक्ष अल्पसंख्याक स्थितींत आपल्या स्वत:च्या निर्वाणापुरताच विचार करणारा असा होता, आणि तो प्रत्यक्ष बुद्धाच्या शिकवणीचा ज्या पाली ग्रंथांत समावेश आहे, अशांची पूर्वींच्या शुद्ध अनात्मवादी स्थितींत राखण करणारा असा सिंहलद्वीप आणि ब्रह्मदेशांतच काय तो हीनयान या नांवानें आहे. इतरत्र तिबेट, नेपाळ, चीन, जपान वगैरेकडे महायान पक्षाचाच विस्तार झाला आहे. ह्या महायानाचे मूळ ग्रंथ संस्कृत भाषेंत असून त्यांचीं भाषांतरें चीन, तिबेट, जपानी, सयामी भाषेंत ख्रिस्ती शकाच्या आरंभींच्या शतकांतच होऊन चुकलीं आहेत. हीनयानाचे सर्व ग्रंथ प्रथम सिंहली भाषेंत लिहिले होते, ते सुमारें ५ व्या शतकांत पाली भाषेंत लिहिले गेले. ते हल्लीं उपलब्ध आहेत.

जैन धर्माच्या मतांत अगर उपासनेंत बौद्धांप्रमाणें विकास झाला नाहीं. त्याचा हिंदुस्थानाबाहेर फैलावहि झाला नाहीं. तरी पण हिंदुस्थानाच्या पश्चिम आणि दक्षिण भागांत ह्या धर्मानें संस्कृत आणि प्राकृत (देशी) वाङ्मय, साहित्य, ललितकला, राजकारण, लौकिक सुधारणा इ. अनेक बाबतींत विशेषकरून कर्नाटकांत आणि द्राविड देशांत अप्रतिम कामगिरी बजाविली आहे. ह्या धर्माला पाश्चात्त्य पंडित जुन्या मताचा, स्थितिस्थापक, अल्पसंतोषी, निवृत्तिपर, वाढ खुंटलेला अशीं कित्येक नांवें आपापल्या दृष्टिभेदानुसार देत आले आहेत; पण हा धर्म ह्या गुणांमुळेंच हिंदूंच्या उत्तरोत्तर वाढत जाणा-या तिरस्काराला आणि घोर छळाला तोंड देऊन अद्यापि अल्प प्रमाणांत का असेना, पण जीव धरून राहिला आहे, हेंच विशेष अभिनंदनीय आहे. उलट बुद्ध धर्म स्पष्टवादी, उदार, प्रगमशील, जगदुद्धाराच्या आणि प्रचाराच्या बाबतींत अत्यंत धाडशी आणि महत्त्वाकांक्षी असूनहि, शिवाय अत्यंत सहनशील, अहिंसावादी आणि अनत्याचारी असल्यामुळें तो अखेरीस हिंदुस्थानांतील उत्तरेकडील मुसलमानांच्या पशुतुल्य आणि क्रूर अत्याचारांखालीं दडपून गेला आणि दक्षिणेंतील हिंदु राजांच्या बळावर उन्मत्त झालेल्या नूतन हिंदुधर्माच्या आचार्यांच्या महत्त्वाकांक्षी विजिगिषुतेपुढें सपशेल हार खाऊन बिचारा शेवटीं आपल्या जन्मभूमींत केवळ नामशेष होऊन गेला !

जैन धर्म अल्पसंख्याक उरला आणि बौद्ध धर्म केवळ नामशेष झाला, हा जो हृदयद्रावक परिणाम घडून आला, तो कांहीं एक दोन शतकांतच घडला, अशांतला प्रकार नाहीं. हे दोन्ही धर्म भरपूर दीड हजार वर्षें आपलें सत्कार्य करून, विशेषत: बौद्ध धर्म आपले शुभाशुभ परिणाम आद्यापि पूर्ण रूपानें मागें ठेवून बाहेर गेला आहे. परंतु वैदिक धर्माचा मात्र आतां मागमूसहि उरला नाहीं. इतकेंच नव्हे तर हल्लींच्या शैव आणि वैष्णव धर्मांतहि आमूलाग्र उत्क्रांति होऊन त्यांची वैदिक धर्माशीं फारखत झाली; आणि भारत देश आतां अगदींच एकेश्वरी हिंदु धर्माचें ऊर्फ भागवत धर्माचें आचरण करीत आहे. परंतु ह्या सुधारणेचें बहुतेक श्रेय बौद्धांनीं व जैनांनीं जी धर्मसुधारणेची भली खंबीर पाचार मारली, हिंदुस्थानांतील धर्माचा इतिहास दुभंगून टाकला आणि आपल्या दीड हजार वर्षांच्या विरक्त, प्रेमी आणि परोपकारी प्रयत्नानें, नूतन आणि विशुद्ध भागवत धर्माची वाट खुली केली, ह्या गोष्टीकडेच आहे. असें असूनहि ही ऐतिहासिक उत्क्रान्ति आम्हां हिंदूंच्या डोळ्यांत भरावी तशी भरत नाहीं. त्याचें कारण आम्ही बौद्धांना व जैनांना अद्यापि परके, पाखांडी, नास्तिक म्हणून त्याज्य समजतों हेंच. आणि ते त्याज्य कां तर
प्रामाण्य बुद्धिवेदेषु साधनानामनेकता |
उपास्यानामनियम एष धर्म: सनातन: ||

ही आमच्या हिंदु धर्माची टिळकासारख्यांनीं केलेली धेड गुजरी व्याख्या ! प्रचलित हिंदु धर्माची टिळकांनीं जी व्याख्या केली ती कांहीं खोटी नाहीं. पण ती दुष्ट आहे, इतकेंच नव्हे तर ती विष्णुपुराणाहूनहि प्राचीन काळापासून उजळ माथ्यानें वहिवाटत आहे हें खालीं मान घालून कबूल करावें लागतें ! म्हणून बिचारे बौद्ध व जैन त्याज्य झाले.