क्रियापदांच्या विभक्ति

 सर्वनामाचीं रूपें लागून ज्याप्रमाणें नामाची विभक्ति होते, त्याप्रमाणें इरु, अस, ह्या धातूंचीं निरनिराळीं रूपें कोणत्याहि धातूच्या भूतकाळवाचक कृदंताला लागून त्या त्या धातूचीं निरनिराळ्या काळांचीं अथवा अर्थांचीं रूपें सिद्ध झालीं आहेत, असें कानडींतील रूपांचें सूक्ष्म निरीक्षण केलें असतां आढळून येतें. हा प्रकार संस्कृतांत, विशेषतः प्राकृतांतहि आढळतो. पण मराठींतला जुना वर्तमानकाळ जाई, पाहे, असा जाऊन त्याचेऐवजीं वर सांगितल्याप्रमाणें कृदन्ताला ‘अस’ धातूचीं रूपें लागून होणारा जातो, पाहतो, असा नवीन वर्तमान आला; ह्याचें कारणहि कानडी प्रचारच असावा. कानडींत धातूंचें ‘त’ प्रत्ययांत कृदंत होऊन त्याला ‘इरु’ म्हणजे ‘अस’ धातूचीं तीनहि काळांचीं रूपें लागतात. मराठींत पूर्वीं भविष्यकाळाचीं निराळीं रूपें नव्हतीं. हल्लींच्या भविष्यकाळाचें कानडींतल्या भविष्यकाळाशीं खालीलप्रमाणें साम्य आहे. त्यावरून भविष्यकाळाचा ‘ल’ कानडींतून आला असावा असें वाटतें. मी करीन = नानु माडुवेनु; आम्ही करूं = नाऊ माडुवेवु. तो, ती करील = आवनु माडुवेनु, आवळु माडुवळु, तें करील = आदु माडुवदु.
मराठींतील द्वितीय पुरुषाचीं रूपें मात्र संस्कृताशीं अधिक जुळतात. वर्तमान काळाचें उदाहरण :- मूळ माडू = कर धातु. तिचें माडुत असें कृदन्त होतें. माडुत (करीत) इद्धानें (आहे), माडुताने, करीत आहे = करितोय = करितो असा नवीन वर्तमान, कृदन्त आणि अस धातूचें रूप मिळून कानडींत भूतकाळहि असाच ‘अस’ धातूच्या साह्यानें होतो; पण मराठींत मात्र बंगालीप्रमाणें ‘ल’ प्रत्ययाच्या साह्यानें भूतकाळ होतो. कानडींत ह्या ‘त’ चा ‘द’ होतो, व नंतर त्याच्यांत इरू = अस धातूच्या रूपांचा एकजीव होऊन भूतकाळचें रूप सिद्ध होतें. “बाहेर पातली मुनीश्वर दुहिता” ह्यांतील पातली ह्या मराठी शब्दाचें पोदळ ह्या त्याच अर्थीं भूतकालवाचक कानडी शब्दाशीं किती साम्य आहे हें ध्यानांत घेण्यासारखे आहे. ह्यावरून हा भूतकाळाचा ‘ल’ हि कानडीच्या भूतकाळाचे प्रत्यय न, द, र, यांवरूनच आला असावा असें वाटतें. संस्कृतांत आख्यात प्रत्ययांना लिंगविकार होत नाहीं. त्याचप्रमाणें संस्कृतावरून झालेल्या मराठींतील क्रियापदाच्या काळांच्या जुन्या रूपांतहि लिंगविकार नाहीं. पण नवीन काळांत हा लिंगविकार आहे. त्याचें कारण केवळ कृन्दत विशेषणाला लिंगविकार होतो, येवढेंच नसून, कानडींत हा लिंगविकाराचा प्रचार आहे हेंहि असावें. सुंदर, तिखट, वाईट, इ. अकारान्त विशेषणाला लिंगविकार होत नाहीं, मग अकार कृन्दताला तरी कां व्हावा? संयुक्त क्रियापदांचा प्रचार मराठीप्रमाणेंच कानडींतहि आहे. करून सोड = माडी बिडू; जेवण करून घे = ऊट माडीको; करून टाक = माडी वगी इ. आणखी ब-याच संयुक्त क्रियापदांचा प्रचार कानडीशीं विशेष जुळता आहे. नये हें क्रियापद केवळ बारदू या कानडी शब्दाची नक्कल आहे.
बा = ये; आणि रदुअदे हा नकारार्थी प्रत्यय आहे.