चैतन्यचरित्र

चैतन्याचें पूर्वाश्रमाचें नांव विश्वंभर. लाडकें नांव निमै. हा नवद्विप (नदिया) येथें इ. स. १४८६ सालीं वैष्णव ब्राह्मण आईबापांच्या पोटीं जन्मला. ह्याचा आजा मूळ ओरिसा प्रांतांतला राहणारा. संन्यास घेतल्यावर निमै आपल्या जीवनाचें कार्य करण्याला आरंभापासून अखेरपर्यंत ओरिसामधील जगन्नाथपुरी येथें येऊन राहिला, ह्यांत वावगें कांहींच झालें नाहीं. आढ्याचें पाणी वळचणीकडेच उतरावयाचें! निमै लहानपणीं उनाड होता. ठरलेलीच गोष्ट. आपल्यास धरावयास आलेल्या चौ-यांशी हत्यारबंद शिपायांची दरोडेखोर नाम्यानें (नामदेवमहाराजांनीं) कत्तल केली. निमै बंगाली असल्यानें असलीं कृत्यें त्याचेकडून होणें शक्य नव्हतें. तरी तो सहा वर्षांचा होण्यापूर्वींच, गंगेवर स्नानासाठीं ब्राह्मण आले असतां त्यांचीं धोतरें लपवून ठेव; पाणी भरण्यासाठीं मुली आल्या तर त्यांच्याशीं माकडचेष्टा कर, असे अनेक चाळे करूं लागला होता. आईबापांनीं असें करूं नको म्हणून सांगितलें, तर ह्याशिवाय माल जगाचा अनुभव कसा येईल, असा साळसूद जबाब देई. शिकण्यासाठीं शाळेंत जा म्हटलें तर माझें शिक्षण सर्वच चाललें आहे, असें म्हणे. “सर्वत्र अमार (माझें) एक अद्वितीय स्थान” हें वेदान्तांतील वाक्य सांगून त्याचा विद्वान् बाप जगन्नाथ मिश्र आणि साध्वी शचीदेवी आई ह्या दोघांचींहि तोंडें बंद करी. निमै अति गोरा व अति सुंदर बालक होता. त्याच्या ह्या चाळ्यांनीं तर तो सर्वांचा अधिकच लाडका झाला होता. नवद्वीप हा गांव त्या वेळीं पश्चिम बंगाल्यांत संस्कृत विद्येचें मोठें नामांकित आगर होतें. त्यांत लवकरच आपल्या कुशाग्र बुद्धीनें संस्कृत व्याकरणांत त्यानें चांगली प्रगति संपादन केली. मुरारी गुप्त नांवाच्या वैश्य जातीच्या एका संस्कृतज्ञांना त्यानें व्याकरणाचे प्रश्न विचारून कुंठित केलें.

संस्कृत व्याकरण हें कांहीं खोकल्यावर किंवा अजीर्णावर औषधाच्या पुड्या देण्याइतकें सोपें काम नाहीं, असा टोमणा मारला. गदाधर नांवाच्या एका नैय्यायिक ब्राह्मणालाहि तर्कशास्त्रांत हलवून थक्क केलें. तरुणपणीं त्यानें संस्कृत शिकविण्याची स्वत:ची एक स्वतंत्र पाठशाळा उघडली, आणि पांडित्यांत नांव मिळविलें पण ह्या कोवळ्या वयांत त्याच्या भक्तीचा अंकुर मात्र अगदीं दडून राहिल्यामुळें दिसून आला नाहीं. धार्मिक लोकांचीहि तो इतर कोरड्या शास्त्री-पंडितांप्रमाणेंच प्रसंगीं चेष्टा करी; पण भक्तिरसाचा ज्वालामुखी त्याच्या पोटांत धुमसत असलेला फार दिवस असा गुप्त राहणें शक्य नव्हतें. ख-या भक्तीच्या पोटीं ज्ञान आणि वैराग्य ही जुळीं व्हवयाचींच, हें आम्हीं गेल्या व्याख्यानांत जाणलेंच आहे.

निमैमध्यें ज्ञान तर होतेंच; पण तारुण्याच्या ऐन ज्वानींत त्याच्यामध्यें वैराग्यहि डोकाऊं लागलें. तो गयेस आपल्या वडिलांच्या श्राद्धानिमित्त निघाला असतां, वाटेंत कुमार हट्टा येथें ईश्वरपुरी नांवाच्या म्हाता-या साध्या सात्त्विक ब्राह्मणास भेटला; त्याच्या निर्व्याज शुद्ध भक्तीच्या साक्षात्कारामुळें निमैच्या भक्तीचा जो एकदा स्फोट झाला तो पुढें त्याला स्वत:ला देखील कांहीं आवरेना. गया क्षेत्रांत त्याला भक्तीचा आणखी साक्षात्कार घडून एकदा तर तो मूर्च्छित पडला. त्यानें यात्रेहून परत गेल्यावर संन्यास घेतला. कारण हिंदु धर्माचीं खुळचट जातिभेदाचीं बंधनें त्याला फार दु:खद होऊं लागलीं. म्हणून अगदीं तरुणपणीं कोणाचें कांहीं न ऐकतां, संन्यास घेऊन पुरी येथील जगन्नाथाच्या देवळांत जाऊन राहिला. तेथील देवळाच्या आवारांत त्याच्या भक्तिभावनांना पूर्ण अवसर मिळून शिवाय जातीचें कसलेंहि बंधन पाळावें लागत नसे. तेथें त्याला पुष्कळ शिष्यसमुदाय मिळाला. कांहीं शिष्यांसमावेत त्यानें हिंदुस्थानांतील बहुतेक सर्व क्षेत्रांची यात्रा आटोपली. इ. स. १५११ सालीं पुरी येथें तो परत आला. वृंदावनांत सहा वर्षें राहिल्यावर त्याच्या भक्तीची परमावधि झाली. इ. स. १५१६ चे सुमारास पुरीस परत आल्यावर तेथून १८ वर्षें आपलें धर्मप्रसाराचें काम सतत केलें. सर्व बंगालभर त्याचे शिष्य व त्याच्या वैष्णव मतांचा फैलाव झाला. पुरी येथें इ. स. १५३४ सालीं त्यानें देह ठेविला.