शीख धर्म मुसलमान संस्कृतीचा प्रवेश

ख्रिस्ती शतकाच्या सहाव्या शतकांत इ. स. ५७० सालीं अरबस्थानांतील मक्का येथें मुसलमानी धर्माचा संस्थापक महमद पैगंबर हा जन्मला. ह्यानें स्थापलेला इस्लाम धर्म सेमेटिक् लोकांच्या धर्माची सुधारून वाढविलेली तिसरी आवृत्ति होय. एकदेवत्व, त्याची निराकार, उपासना, मानवी समानता, स्वतंत्रता, बंधुता, वगैरे भागवत धर्माच्या मूळ तत्त्वांचा जोर जगांतील इतर धर्मांपेक्षांहि सेमेटिक् लोकांच्या धर्मांत मुळापासूनच कांहीं बाबतींत अधिक होता. पण इतर वैभवशाली मूर्तिपूजक राष्ट्रांच्या संसर्गानें मोजेसनें स्थापलेल्या इस्त्रायल धर्मांत पुढें पुढें मूर्तिपूजा, विधि, संस्कार, सोंवळेओवळें आणि जातिभेदाचें बंड वगैरे माजल्यानें, येशु ख्रिस्तानें ह्या धर्मांत सुधारणा केली. पण ख्रिस्ती धर्माचा प्रसार विशेषेंकरून युरोपांत पश्चिमेकडे झाल्यानें, पश्चिम आशियांत आणि विशेषेंकरून अरबस्थानांत महमदाचे काळापर्यंत धर्मांचा गाढ अंधकार माजला होता. महमदाच्या आत्मिक पराक्रमानें सेमेटिक् धर्माला पूर्वींचें शुद्ध स्वरूप अरबस्थानांत प्राप्त झालें. इतकेंच नव्हे तर आत्मिक आणि राजकीय सत्ता ह्या दोन्ही महमुदामध्येंच केंद्रीभूत झाल्यामुळें त्याच्या प्रयत्नाला त्याच्या ह्यातींतच राजकीय स्वरूप प्राप्त होऊन, त्याच्या धर्माचा प्रसार अरबस्थानभर व थोडास बाहेर झाला. त्याच्या मागें तर जवळ जवळ सर्व दक्षिण युरोपांत आणि पश्चिम आशियांत हिंदुस्थानाच्या सीमेपर्यंत हा धर्म लवकरच पसरला. बौद्ध धर्माची प्रेरणा गौतमानें केली व प्रसार अशोक राजानें केला; ख्रिस्ती धर्माची प्रेरणा येशूनें केली व प्रसार कॉन्स्टंटाईन बादशहानें केला; इस्लामी धर्माची प्रेरणा आणि प्रसार दोन्हीहि महमुदानेंच केलीं म्हणून त्याच्या धर्मांत आत्म्याची प्रीति आणि तलवारीची शक्ति ह्या दोन्ही तत्त्वाला मान्यता आहे. हें शीख धर्माचा विचार करतांना ध्यानांत ठेवावें लागेल. इ. स. ६६४ सालीं महलब नांवाचा एक मुसलमान सरदार मुलतानपर्यंत येऊन परत गेला. पुढें बगदादचे खलिफानें महमद कासीम नांवाच्या सरदाराला सिंध प्रांतावर पाठविलें. त्यानें दाहीर नांवाच्या राजपूत राजाला ठार मारून हा प्रांत काबीज केला. कासीमवर खलिफाची इतराजी होऊन तो मारला गेल्यानें आपसांतल्या तंट्यामुळें मुसलमानांना पुढें ३०० वर्षें हिंदुस्थानाकडे येण्यास अवसर मिळाला नाहीं.