कुशान-काळ

पुढें मौर्यांचा अस्त होऊन, कुशान ह्या तुर्की राजकुलाचा उदय झाला. ह्यांची पेशावर आणि तक्षशिला येथें राजधानी होती. हे परकीय जातीचे होते तरी पण धर्मानें बौद्धच होते. तसेंच कंदाहार (गांधार) येथील ग्रीक राजांनींहि बौद्ध धर्मच स्वीकारला होता. ह्या सुमारास सर्व मध्य एशियाभर बौद्धांचा विस्तार होता. अशोकाच्या काळापर्यंत प्रत्यक्ष बुद्धाच्या मूर्ति बनवून त्याची पूजा करण्याची वहिवाट नव्हती. भव्य स्तूप आणि विहार होते, तरी त्यांतून अश्वत्थ वृक्ष, बुद्धाच्या पादुका वगैरे चिन्हांचीच पूजा होत असे. हत्ती, मोर, वानर, बोकड, बैल इ, प्राण्यांचीं सुंदर उठावदार चिंत्रें, यक्ष, गंधर्व, किन्नर इ. देवादिकांच्या मूर्तीदेखील बुद्ध गुरूची पूजा करीत आहेत, असे देखावे कोरलेले असत. पण पुढें कुशान आणि यवन ह्या परकीय लोकांनीं आपल्या पूर्वसंस्कारानुरूप बुद्धाच्याच सुंदर मूर्ति कोरण्यास सुरुवात केली. इतकेंच नव्हे तर देव म्हणून त्यांनीं त्यांची पूजाहि चालविली. ह्यामुळें बौद्ध धर्माचें रूप विकृत झालें. कुशान सम्राट् कनिष्क ह्यानें एक मोठी परिषद भरविली. त्यांत बुद्धालाच परमेश्वर मानणा-या पक्षाचा जय होऊन, बुद्धाच्या राजरोस मूर्ती करण्याला परवानगी मिळाली. ह्या पंथालाच महायान हें नांव पडलें. कंदाहारी घाट ग्रीस देशांतील कलेच्या वळणावर बांधेसूद व प्रमाणबद्ध असा होता. त्याचा छाप हिंदुस्थानांतील भावी शिल्पकलेवर व मूर्ति कलेवर पडला. पण ह्या बाबतींत तज्ज्ञ लोकांत मोठा वाद माजून राहीला आहे. फर्ग्युसन वगैरे ग्रीक ( पाश्चात्त्य ) पक्षाचें मत आहे कीं, हिंदुस्थानांत ही चित्रकला पश्चिमेकडून आली व ती अगदीं पूर्णतेला पोंचली नाहीं. उलट ई. वि. हॅवेल ह्या तज्ज्ञाचें मत आहे कीं, हिंदुस्थानांतील चित्रकला स्वतंत्र असून ती गुप्तांच्या काळीं पूर्णतेला गेली इतकेंच नव्हे तर तिच्यांतच कलेचा खरा प्राण आहे. प्रमाणबद्धपणा, नीटनेटकेपणा हीं केवळ कलेंची शरीरें होत. प्रेरणा हीच तिचा प्राण होय. पाश्चात्त्यांची धाव शरीरापर्यंतच पोंचते. आत्मप्रतीति पौरस्त्यांनाच घडली आहे, वगैरे.