श्रीमंत जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट हा एक असाधारण महात्मा महाराष्ट्रांत अव्वल इंग्रेजींत होऊन गेला, पण त्याला महाराष्ट्र आज जवळ जवळ विसरून गेला आहे. असें कां झालें हाच एक विशिष्ट विषय प्रस्तुत लेखाचा आहे.
ह्या विषयाचे दोन भाग पडतात. पहिला प्रश्न असा आहे कीं, नाना संस्मरणीय पुरुष मुळीं होते कीं नव्हते? मुळींच संस्मरणीय नसल्यास त्याला महाराष्ट्र विसरला काय? हा दुसरा भाग अथवा प्रश्नच उद्भवत नाहीं. कारण पुरुष संस्मरणीय नसेल तर देशानें त्याला विसरणें हेंच साहजिक आहे. पहिल्या भागांत पहिल्याच प्रश्नाचा विचार करूं.
भाग १ ला
नाना शंकरशेट हे शंकरशेट वाकलशेट ह्यांचे पुत्र इ. स. १८०३ सालीं मुंबईस जन्मले त्या वेळीं पेशवाई अद्यापि बुडाली नव्हती. नाना फडणीस इ. स. १८०० सालीं दिवंगत झाले होते. मराठ्यांशीं इंग्रजांचें दुसरें युद्ध होऊन लवकर सुरजी अंजनगांवचा तह इ. स. १८०३ सालीं झाला; त्याच वेळीं मराठेशाही नसली तरी पेशवाई जवळ जवळ बुडण्याच्या पंथास लागली. इंग्रजांचा हात महाराष्ट्रांत कायमचाच शिरकूं लागला. अशा संधीस एक नाना (फडणीस) अस्तंगत होऊन दुसरा नाना (शंकरशेट) जन्मला. पेशवाई इ. स. १८१८ ला पार बुडाली. इ. स. १८२२ सालीं ह्या दुस-या नानाचे वडील श्रीमंत शंकरशेट मुंबईस वारले आणि त्यांच्या अवाढव्य इस्टेटीची पूर्ण मालकी केवळ १८ वर्षांचें कोवळें पोर नाना शंकरशेटकडे आली ! काय योगायोग !! कारण ह्या कोवळ्या तरुणानें एकदम उगवत्या इंग्रज प्रभूशीं पुढें ४३ वर्षें मोठ्या बाणेदारपणानें जें असामान्य सहकार्य केलें त्याची योग्यता आजकालच्या महात्मा गांधींच्या असहकार्याच्या खालोखाल एक महत्त्वाचा भाग म्हणून मुंबई इलाख्याच्या इतिहासांत चमकेल ह्यांत तिळमात्र शंकानाहीं. मग हा थोर पुरुषश्रेष्ठ संस्मरणीय नव्हे असें कोण म्हणेल? तरी आजच्या महाराष्ट्रांतील किती तरुण - मग ते कितीहि पढिक पदवीधर असोत - नानांची योग्यता खरोखरी किती आहे हें नानांच्या चरित्राचें महत्त्व खालील गोष्टीवरून सिद्ध होतें.
१. नानांचें घराणें गर्भश्रीमंत व्यापारी पेशाचें होतें. त्यांचे खापरपणजे नारायणशेट ह्यांचा काठेवाडांतील पोरबंदर येथें मोत्यें व इतर जडजवाहिराचा व्यापार होता. पणजे माणिकशेट ह्याकडे ठाणें जिल्ह्यांतील तालुके मुरबाड ह्या गांवीं पोतद्दारी होती. हाच गांव ह्या इतिहासप्रसिद्ध घराण्याचा मूळ वतनाचा होता. पुढें नानांचे आजे बाबुलशेट ह्यांच्या कारकीर्दींत मुंबईजवळील कल्याण प्रांत हा पोर्तुगीजांच्या ताब्यांत असल्यामुळें ह्या सर्व प्रांतांत पोर्तुगीजांची देशबुडवीच नव्हे तर हिंदुधर्मांला रसातळास नेऊ पाहणारी कारवाई चालली होती. अशा धामधुमींत वसईच्या खाडीच्या तोंडाशीं असलेलें घोडबंदर नांवाचें मा-याचें बंदर आपल्या घराण्याच्या व्यापराचें केंद्र म्हणून निवडून काढून आपलें बस्तान थाटलें ! इतकेंच नव्हे कालांतरानें मुंबईबेट इंग्रजांकडे जाऊन तेथील व्यापारपेठ वाढूं लागली म्हणून लगेच बाबुलशेटीनें तेथेंहि आपली एक पेढी उघडली.
२. बाबुलशेटीना शंकरशेट पुत्र झाले. ते तर बापसे बेटा सवाई निघाले. त्यांनीं आपल्या बापाच्या जुन्या व्यापाराला नवीन वळण लाविलें. त्यासाठीं शंकरशेटला घरीं खावयास कांहीं कमी नसतांहि त्यांनीं मुंबईस एका युरोपियन कंपनींत नोकरी धरली. हेतु हा कीं नुसतें आपल्याला इंग्रेजी भाषा यावी इतकेंच नव्हे तर इंग्रजांची व्यापारी मोड हस्तगत व्हावी. बाबुलशेटींना प्रथम प्रथम हा भ्रष्टाकार पसंत पडला नाहीं, पण लगेच जेव्हां शंकरशेटींनीं व्यापारांत चाराचे चव्वेचाळीस केले तेव्हां बाबुलशेटींनीं चिरंजिवाची पाठ थोपटली. शंकरशेटच्या अंतकाळीं “त्यांच्या खजिन्यांत सोळा लाख रुपये रोख आणि एक लाखाचें जवाहीर होतें” असें त्यांचे चरित्रकार रा. पितळे लिहितात !
३. अशा कर्तृत्ववान् वैश्याच्या पोटीं नाना हे इ. स. १८०३ सालीं रत्न निर्माण झालें. त्यांनीं वैश्य वृत्तींत तर आपल्या जनकावर सवाई शंकरशेटपणा गाजविला. इतकेंच नव्हे, तर महाराष्ट्रांतील मुत्सद्देगिरीतहि नाना फडणिसावर सवाई नानापणा गाजविला हें भावी इतिहासकारांना कबूल करावें लागेल. चार पिढ्यांचा गर्भश्रीमंतपणा भोगूनहि केवळ १८ वर्षांचें मूल असून त्या वेळचा पहिला मुंबईचा गव्हर्नर मौंट स्टुअर्ट
एल्फिन्स्टन हा महाराष्ट्राच्या शिक्षणाच्या बाबतींत नानाची सल्लाच नव्हे तर आर्थिक मदत मागावयास येतो हीं काय लहानसहान गोष्ट? ही गोष्ट नानाचा मोठेपणाच नव्हे तर अव्वल इंग्रेजीचा पाया घालणा-या इंग्रज बहाद्दरांचा नम्रपणाहि दाखविते. त्या वेळीं हल्लींच्या चर्चिलप्रमाणें सारेच इंग्रज उर्मट असते तर इंग्रजांचे पाय येथें रोवलेच गेले नसते.
४. नाना इ. स. १८०३ सालीं जन्मले. इ. स. १८२२ सालीं बाप वारल्यावर एकदम सार्वजनिक कार्यांत अगदीं अग्रेसर म्हणून धडकूं लागले. इ. स. १८४० च्या सुमारास तर त्यांच्या भ्रूकुटीशिवाय महाराष्ट्रांतील सार्वजनिक चळवळीचें एक पानहि हालेना ! १८५७ सालच्या बंडांत नाना सामील होते अशा संशय-पिशाच्चानें इंग्रज बहाद्दराला घेरलें. पण जेव्हा मुंबईच्या पोलीस कमिशनराची बालंबाल समक्ष खात्री झाली तेव्हां पुढील गव्हर्नरांनीं मागील सर्व गव्हर्नरांप्रमाणें नानांची पुन: मर्जी संपादण्याचा क्रम सुरू केला. फार काय नानांच्या निधनानंतर तेव्हांचे मुंबईचे गव्हर्नर सर बार्टल फियर ह्यांनीं व्यक्तिशःच नव्हे तर इलाखाधिपति आणि ब्रिटिश बादशहाचा प्रतिनिधि म्हणून जीं दोन उघड दुखवट्याचीं पत्रें पाठविलीं व जीं रा. पितळे ह्यांनीं लिहिलेल्या चरित्रांत पान ३५०, ३५१ वर प्रसिद्ध झालीं आहेत, त्यावरून नानांची स्वामिनिष्ठाच नव्हे तर देशनिष्ठाहि सिद्ध होत आहे !
५. नानांचें सार्वजनिक कार्य. शिक्षणाचे बाबतींत इ. स. १८२२ सालीं बाँबे स्कूल बुक अँड स्कूल सोसायटीपासून तों शेवटीं शेवटीं हल्लींची मुंबई युनिव्हर्सिटी स्थापन होईतोंपर्यंत पुरुषांच्या व बायकांच्या, प्राथमिक, दुय्यम आणि वरिष्ठ शिक्षणांत, सर्व प्रकारें नाना होते. युक्ति, नेतृत्व आणि दानशूरपणा सारखाच गाजत राहिला. राजकारणांत :- १८२९ सालीं मुंबईचे चीफ जस्टिस सर जॉन पीटर ग्रँट ह्यांनीं हेबिएस कॉर्पस ऍक्टच्या बाबतींत हिंदी लोकांची बाजू उचलली म्हणून त्या वेळचे गव्हर्नर सर जॉन मालकम् ह्यांनीं या उदार न्यायाधिशाला राजीनामा द्यावयाला लावला म्हणून सरकारची निर्भर्त्सना करण्याकरितां जी हिंदी लोकांची मुंबईंत जाहीर सभा भरली तिचे नाना अध्यक्ष होते. इतकेंच नव्हे ज्याचा निषेध नानांनीं केला, तेच मालकमसाहेब हिंदुस्थानचे प्रत्यक्ष व्हाइसरॉय लॉर्ड बेंटिंक ह्यांच्याशीं मिळून जेव्हां हिंदुस्थानांतील सतीची दुष्ट चाल बंद करू पाहात होते, तेव्हां बंगाल्यांतील ब्राह्मणांनीं अतिशय तीव्र विरोध केला म्हणून महाराष्ट्रीयांची मदत मागण्यास लॉर्ड बेंटिंकसाहेबांना नाना शंकरशेटच्या भेटीस पुनः पुनः पाठविलें ! ह्याचेंच नांव सहकार्य-अथवा प्रतिसहकार्य ! ह्यांतच इंग्रजांचा व नानांचा मोठेपणा दिसतो. जें आजहि गांधी - आयर्विनला लवकर साधेना तें त्या वेळीं नाना - बेंटिंकला साधलें ! अनेक बिकट प्रसंगीं नानांची एकामागून एक तत्कालीन सर्वच गव्हर्नरांनीं भेट घ्यावी व द्यावी असा प्रकार पडद्याआड व पडद्यापुढें सारखा नाना मृत्युशय्येवर पडेपर्यंत चालूं होता. ज्यूरीचा व पेटी सेशनचा हक्क, स्मॉल कॉज कोर्टमध्येंहि बॅरिस्टरच्या मदतीवांचून कामे चालत असत त्याऐवजीं साध्या वकिलाकडून काम चालणें, वगैरे गोष्टीपासून प्रत्यक्ष कायदे-मंडळांत एतद्देशियांचा शिरकाव मिळवीपर्यंत सर्व हक्क नानांना पदोपदीं साम-दाम-दंड वगैरे निरनिराळ्या उपायांनीं संपादन करावे लागले ! त्या वेळच्या सर्वच संस्थांचे तेच बहुतेक संस्थापक होते. इतकेंच नव्हे तर बहुतेकांचे ते अध्यक्ष आणि सर्वांचे निदान आश्रयदाते तर होतेच ! फार तर काय मुंबई म्युनिसिपालिटी, मुंबई विश्वविद्यालय हींच नव्हत, तर बॅक बेची भर घालण्यासाठीं निघालेली व्यपारी चळवळ असो किंवा प्रत्यक्ष जी. आय. पी. रेल्वेसारख्या प्रचंड कंपनीची स्थापना असो, त्यांच्या प्रत्यक्ष मसलतीशिवाय व मदतीशिवाय कोणतेंहि कार्य होऊंच नये असा त्या वेळी नानांचा व्याप असे ! आणि या डोईजड झालेल्या रेल्वेचे नाना तर एक डायरेक्टर असत. आपलें वजन आहे कीं नाहीं हें पाहण्यासाठीं नाना केव्हां केव्हां आपण प्रवास करावयाचा असल्यास स्टेशनावर पांच पांच मिनिटें मुद्दाम उशीर करून जात, ते आल्याशिवाय त्यांचा फर्स्टक्लास रिझर्व्हड् डबा जागचा हालत नसे अशी आख्यायिका आहे !
असो. अशा तपशिलाच्या गोष्टी लिहीत बसल्यास लेखाचा विस्तार आवांक्याबाहेर जाईल, म्हणून केवळ स्थूलमानानें व संक्षेपानेंच नानांच्या सार्वजनिक चरित्राकडे पाहणें भाग आहे. येणेंप्रमाणें इ. स. १८२२ पासून इ. स. १८६५ पर्यंत अव्वल इंग्रेजीच्या पहिल्या दोन पिढ्या नानांच्या केवळ मुठींत गेल्या. म्हणून ह्या युगाला महाराष्ट्रांतलें नाना-युग म्हटलें तरी अतिशयोक्तीचा आरोप आम्हावर येईलसें वाटत नाहीं. ह्यापुढें रानडे, टिळक वगैरेंची युगें झाली. पण तीं त्यांच्या अगदीं नानाइतकीं मुठींत वळलीं गेलीं नाहींत. बडोद्याचे सयाजीराव, कोल्हापूरचे शाहू छत्रपति, पुण्याचे जोतिराव फुले, रानडे, गोखले, टिळक, मुंबईचे दादाभाई नवरोजी किंवा फेरोजशहा मेथा, वगैरे थोर थोर धुरीणांचीं बृहन्महाराष्ट्रांत सिंहासनें आणि प्रभावळ्या होऊन गेल्या. परंतु आधुनिक महाराष्ट्राचा पितामह ही लौकिक संज्ञा जर कोणास देणें योग्य असेल तर ती, गुजराथ आणि महाराष्ट्राच्या दोन्ही देशांना आवरून धरणारी जी मध्यवर्ती मुंबई नगरी आहे तिच्यांत जन्मून अंतर्धान पावणा-या ह्या आमच्या नाना शंकरशेटजींनाच देणें प्राप्त आहे, असें आमचें मत विचाराअंतीं बनले आहे.
सार्वजनिक चरित्राप्रमाणेंच नानांचें खासगी आणि धार्मिक चरित्रहि उजळ आणि भाग्यवान् होतें. एक विशेष गोष्ट आणि त्याहूनहि विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या सार्वजनिक अथवा खाजगी चारीत्र्याला आपल्या विशिष्ट स्वज्ञाति अभिमानाची दुर्गंधी कधींच सुटली नाहीं, हें भावी इतिहासकारांना अवश्य ध्यानांत घेण्यासारखें आहे.
बंगालचे राजा राममोहन राय ह्यांना आधुनिक हिंदुस्थानचे पितामह समजण्यांत येतें. इसवी सन १८२२ पासून इसवी सन १८३१ पर्यंत ( ह्या सालीं राममोहन ब्रिस्टल येथें वारले) नऊ वर्षें नाना त्यांचे सार्वजनिक चारित्र्यांत समकालिन होते. इतकेंच नव्हे तर सतीची चाल बंद करण्यांत नाना राममोहनांचे सहकारी होते. राममोहनांचे चारित्र्य अखिल हिंदुस्थानालाच नव्हे तर जगाच्या रंगभूमीवर चमकणारें होतें. अगाध विद्वत्ता आणि ऋषितुल्य धर्मप्रवर्तकत्व ही दैवी संपत्ति राममोहनांच्या वांट्याला आल्यामुळें राममोहनाकडे अर्थात् आधुनिक हिंदुस्थानचें पितामहत्व जातें खरें. तरी महाराष्ट्रापुरतेंच पाहावयाचें झाल्यास नानाला ( धार्मिंक बाबीचा विचार वगळून) महाराष्ट्राचा राजा राममोहन राय म्हणावयास हरकत कोणती? असो. नाना शंकरशेट हे एक असामान्य पुरुषश्रेष्ठ होते म्हणून ते चिरस्मरणीय आहेत हें सिद्ध झालें. येथें आमच्या लेखाचा पहिला भाग समाप्त झाला.
[ या लेखाचा दुसरा भाग लिहिला गेला नाहीं ]