ही कोणत्या राष्ट्राची भाषा?

(८) कोंकणी भाषा ही केवळ मराठीचा एक प्रांतिक पोटभेद नसल्यास ती कोणत्या तरी एका वेगळ्या राष्ट्राची असली पाहिजे. तें राष्ट्र अगर ती जात एक सारस्वत ब्राह्मण तरी असली पाहिजे, नाहीं तर रट्ट, राठोड किंवा राष्ट्रकूट, मौर्य, कदंब इत्यादि जे मध्ययुगीन क्षत्रिय वंश मध्य हिमालयाच्या दक्षिण पायथ्यावरून गौतम बुद्धाच्या उदयकाळापासून तों सुमारें ख्रिस्ती शकानंतरच्या ५०० शतकांपर्यंत वेळोवेळीं दक्षिणेंत वसाहतीस आले, ते तरी असले पाहिजेत. ह्या सर्व क्षत्रिय वंशांना, मराठे हेंच एक सामान्य नांव देणें मुळींच अयोग्य होणार नाहीं. म्हणजे ही भाषा सारस्वत ब्राह्मणांची तरी असावी किंवा मराठ्यांची असावी. जर ब्राह्मणांची नसून मराठ्यांची आहे असें ठरल्यास, ती मराठीचीच एक शाखा, फार तर तिची एक प्राचीन शाखा किंबहुना हीच मराठीचें मूळस्वरूप, जिला वररुचि “महाराष्ट्री” म्हणतो, ती असावी असें होतें. पण उलटपक्षीं ती कोंकणांत प्रथम सारस्वतांनींच आणली म्हणावी, तर सारस्वतांहिपेक्षां पूर्वीं हजार-पांचशें वर्षें दक्षिणेंत आलेले मराठे कोणती भाषा बोलत होते हा प्रश्न उद्भवतो. ते जर सारस्वत ब्राह्मण येण्यापूर्वीं कानडी भाषा बोलत होते, तर सारस्वतांनीं ही नवी कोंकणी आणल्याबरोबर, ती हजार वर्षें अंगीं रुळलेली कानडी भाषा टाकून त्यांनीं ही नवीन भाषा स्वीकारणें शक्य आहे काय? बरें, वादासाठीं तूर्त तीहि असंभवनीय गोष्ट गृहीत धरल्यास, दुसराच एक प्रश्न उद्भवतो. तो हा कीं, सारस्वतांनीं ही भाषा उत्तर हिंदुस्थानांतून एकदम कोंकणांत नेली, कीं वाटेवर महाराष्ट्रांत कांहीं दिवस वस्ती केल्या वेळीं तेथें स्वीकारलेली भाषा त्यांनीं आपल्याबरोबर कोंकणांत नेली? पहिल्या तर्काला इतिहासांत मुळींच पुरावा नाहीं, आणि दुसरा तर्क खरा असेल, तर ही सारस्वतांची कोंकणी ही मराठीचीच शाखा ठरते व तिचा स्वतंत्रपणा नष्ट होतो. पण हा दुसरा तर्क आपणांस मानवेना म्हणून, दालगादो ह्यांनीं गौड सारस्वतांची एक निराळीच भाषा होती, ती आतां गोष्ट झाली आहे असा कांहीं पाश्चात्त्य पंडितांचा तर्क आहे वगैरे मोघम शंका प्रदर्शित करून वेळ मारून नेली आहे. दालगादो म्हणतात त्याप्रमाणें, गौडसारस्वत हे तिरहुतहून खालीं ओरिसाच्या बाजूनें दक्षिणेंत पैठण येथें कांहीं दिवस राहून मग खालीं कोंकणांत उतरले, कीं काश्मीरहून ब्रह्मावर्त, राजपुताना, भडोच, सुरतेवरून परस्पर कोंकणांत उतरले, ह्याविषयीं अद्याप निश्चित पुरावा नाहीं. कोंकणी भाषेच्या अंतर्गत पुराव्यावरून हे दोन्ही मार्ग सारखेच संभवनीय दिसतात. किंबहुना निरनिराळ्या वेळीं हे लोक दोन्ही मार्गांनीं आले असल्याचे पुरावे इतिहासांत धुंडाळल्यास मिळण्याच संभव आहे. पण त्यांची एक निराळीच भाषा होती व ती आतां लुप्त झाली, असें मानण्यास मात्र कांहीं निश्चित पुरावा नाहीं. उलट गौडसारस्वत ब्राह्मण तिरहुतहूनच आले असल्यास, त्यांची स्वतंत्र भाषा नसून ती दक्षिणेंत आल्यावर सिद्ध झालेली मराठीच होय असें म्हणणें भाग पडतें. इतकेंच नव्हे तर ह्या कोंकणी भाषेचें मूळ मराठी स्वरूप ब्राह्मणांनीं बनविलेलें नसून क्षत्रिय-मराठ्यांनींच बनविलेलें असावें. पण तें मूळ स्वरूप सारस्वत ब्राह्मणांनीं कोंकणांत नेल्यावर त्यांनीं त्याला कांहीं अंशीं संस्कृत वळणावर नेलें आणि कोंकण व देश ह्यांमध्यें आतांइतकें पूर्वीं दळणवळण नसल्यामुळें, एक जी कोंकणांतल्या सारस्वतांच्या वळणांतली कोंकणी मराठी, आणि दुसरी जी देशावरल्या ब्राह्मणांनीं पुढें लवकरच जिला ग्रांथिक स्वरूप देऊं लागल्यामुळें प्रौढ झाली ती देशी मराठी, अशा त्या मूळ मराठीच्या वाढीमुळें पुढें दोन भिन्न शाखा झाल्या, असें मानणें इतिहासाला जास्त धरून आहे, असें मला वाटतें.
(९) किना-यावर वसाहत करणा-या मौर्य, कदंब, शेलार इत्यादि क्षत्रिय मराठ्यांचा धर्म पूर्वीं बौद्ध किंवा जैन होता, हें कोंकणांतील त्या धर्मांच्या कोरीव लेण्यांवरून व शिलालेखांवरून दिसतें. पण पुढें शातवाहनाचें साम्राज्य इ. स. १५०० चे सुमारास नष्ट होऊन ३०० वर्षें बेबंदशाही चालली. ह्यापुढें चालुक्याच्या साम्राज्याचा उदय होऊं लागला. चालुक्य प्रथम शैव, नंतर वैष्णव होते. ह्यानंतर बौद्ध धर्माला हळूहळू उतरती कळा लागून अनुक्रमें जैन, शैव, आणि शेवटीं वैष्णव पंथाची चढती झाली. ह्यापुढल्या ५००|७०० वर्षांत मयूरवर्मा नांवाच्या एका मांडलीक राजानें सुमारें इ. स. ६|७ व्या शतकांत “नवीन कादंब” वंशाची गादी गोव्याकडे स्थापिली. तो वैष्णवपंथी होता. त्यानें राजपुतान्यांतून सुमारें दोन हजार ब्राह्मण आणविले, अशी दंतकथा आहे. सारा कोंकण प्रांत परशुरामानें समुद्र हटवून निर्माण केला, व तो त्यानें ब्राह्मणांस दान दिला; हे ब्राह्मण त्यानें कोंकणांतल्या कोळ्यांपासून निर्माण केले. त्यांचीं जाळीं तोडून त्यांच्यासाठीं जानवीं केलीं. पण ते आचारभ्रष्ट व कृतघ्न झाल्यानें पुनः दुसरे ब्राह्मण आणविले; इत्यादि पौराणिक दंतकथांचें तात्पर्य दक्षिण कानडा जिल्ह्याच्या गॅझेटिअरमध्यें वर्णिलें आहे. हे दुसरे ब्राह्मण कदाचित् मयूरवर्म्यानेंच आणिले असावेत व ते काठेवाडांतले सारस्वत असावेत. परशुरामानें आणिले, ही केवळ पौराणिक कल्पना असावी. पण ह्या तर्काला दंतकथेपलीकडे पुरावा नाहीं. स्कंद पुराणांतील सह्याद्रिखंडांत हविग, शिवल्ली इत्यादि नांवांच्या ब्राह्मण जाती तुळु भाषा बोलणा-या आहेत. मी मंगळूर येथें असतांना सन १९२४ सालीं ह्या ब्राह्मणांकडून त्यांच्या स्थळ-पुराणाची अस्सल हस्तलिखित प्रत मिळविण्याचा प्रयत्न केला; पण प्रत मिळाली नाहीं. कोंकणांतील ब-याचशा ब्राह्मणांविषयीं ह्या सह्याद्रिखंड नांवाच्या स्थळ-पुराणांतले कांहीं उल्लेख अनुकूल नसल्यामुळें अशी प्रत मिळणें कठीण आहे, असें कित्येकांचें मत पडलें. तथापि सारस्वतांविषयीं मात्र प्रतिकूल उल्लेख कोठेंच आढळत नाहीं. ते निश्चितपणें कोंकणांत केव्हां आले? कोणीकडून आले? मराठीहून निराली अशी त्यांची एक पूर्वीं भाषा होती काय? ह्यासंबंधीं कांहीं तरी विश्वसनीय पुरावा मिळेपर्यंत त्यांच्या तोंडीं हल्लीं असलेली कोंकणी भाषा ज्या अर्थी त्यांचीच अशी म्हणतां येत नाहीं, त्या अर्थीं हिचें मूळ हल्लींच्या महाराष्ट्रभर चालू असलेल्या मराठीपासून अगदीं भिन्न आहे, किंवा तिची वाढ स्वतंत्र आहे, असें म्हणतां येत नाहीं.
(१०) तें कसेंहि असो, उपरिनिर्दीष्ट “नवीन कदंब’ वंशाचा संस्थापक पहिला मयूरवर्मा ह्यानें आणिलेले ब्राह्मण सर्व सारस्वतच होते असें गृहीत धरिलें तरी त्यांचा काळ इ. स. पूर्वीं ६००-७०० च्या पलीकडे ज्या अर्थी जाऊं शकत नाहीं, आणि आधुनिक मराठीचा उगम ह्या काळाच्या पूर्वीं खास होऊं लागला होता असें ज्या अर्थीं संसोधक राजवाडे आणि वैय्याकरणीय रा. भि. जोशी ह्यांचें मत आहे त्या अर्थीं इतिहासाच्या दृष्टीनें तरी कोंकणीची मराठीपासून भिन्नता आणि स्वातंत्र्य सिद्ध होत नाहीं, हें स्पष्ट दिसतें.