भांडवलशाहीचें भविष्य
माझ्या मतें शेतकरी म्हणजे तोच, कीं जो आपल्या कुटुंबाच्या व आश्रितांच्या पोषणाला, शिक्षणाला आणि योग्य त्या सुखसोयींना आवश्यक इतकीच, आणि आपल्या आप्तांकडून व आश्रितांकडून वाहवेल इतकीच जमीन बाळगतो आणि ती आपण स्वतः आपल्या आप्तांच्या व आश्रितांच्या श्रमानें योग्य रीतीनें खरोखर वाहतो. असें न करतां इतर जे जे म्हणून जमीन धारण करतात किंवा तिचेवर हक्क सांगतात ते ते सर्व केवळ भांडवलदार आणि म्हणून ते ख-या अर्थानें शेती करणारे शेतकरी नसून उलट त्या शेतक-यांचे अगदीं शत्रूच नसले, तरी त्यांचे दावेदार आणि प्रतिस्पर्धी, असें समजण्यास कांहीं हरकत नाहीं. अर्थात, राष्ट्रानें जर कांहीं जमीन कोणा व्यक्तीस अगर समूहास कांहीं इतर राष्ट्रकर्त्यासाठीं तात्पुरती वापरावयास दिली असेल, तर तिचा धारण करणारा त्या वेळेपर्यंत शेतक-यांचा प्रतिस्पर्धी म्हणतां येणार नाहीं. इतरांस तरी दावेदार किंवा प्रतिस्पर्धी कां म्हणावयाचा, तर ह्या जमिनीवर जिवापाड मुलाबाळांसह राबणारा एक, तर तिच्यावरचा लोण्याचा गोळा सबंध गिळून उरलेल्या ताकासाठीं देखील हेवादावा करणारा भांडवलदार शेतक-याच्या छातीवर कायमचा बसला असतो म्हणून हा भांडवलदार कोणत्याहि जातीचा, दर्जाचा, स्वकीय किंवा परकीय सरकार असो अथवा संस्थानिक असो, इनामदार असो किंवा खोत असो; हे चट सारे शेतक-याचे दावेदार होत. ते बहुतकरून शेतक-यांचे हितशत्रू आणि कित्येकदां तर अगदीं उघड शत्रू असतात. प्राचीन राजे शेताच्या उत्पन्नाचा सहावा हिस्सा घेत; पण ते स्वतःहि शेतकरी असत. त्या वेळीं शेती फार धोक्याची असे. म्हणून त्यांच्या संरक्षणाची आतांपेक्षां जास्त गरज असे. आतां धोका फार कमी; पण शेतक-यांवर सा-याच्या रूपानेंच नव्हे तर इतर अनेक दृश्य व अदृश्य रूपानें कराचा बोजा भारी; आणि खेड्यांतून आणि जंगलांतून रोगराई, वनपशु इत्यादि अनेक संकटांतून बचाव करण्याची जबाबदारी आपणावर जवळ जवळ नाहींच असें अलिकडचे राजे वागतात. बाकीचे जमीनदार तर केवळ नांवाचा मालकी हक्क सांगून आपण खरे जमिनीचे मालक आणि शेतकरी म्हणजे केवळ पिढीजाद गुलाम अशा समजुतीनें राजाशीं सहकार्य करून राहिले आहेत.