वर उल्लेख केलेला गांवगाडा दुरुस्त करणें म्हणजेच शेतक-यांची संघटना करणें होय. शिक्षण, व्यसनाची बंदी, वाहतुकीचीं साधनें, सामाजिक सुधारणा, ख-या व भरीव धर्माचरणाची जबाबदारी, वगैरे पुष्कळ गोष्टींचा मी वेळोवेळीं आजन्म टाहो फोडीत आलों आहें. ह्या सर्व तपशिलाच्या गोष्टी आतां लांबणीवर टाकणें राष्ट्रहिताला घातुक आहे व त्याचा विचार आजच्या सभेंत झाला पाहिजे. ह्या तपशिलाची अंमलबजावणी करण्यासाठीं तालुक्यांतील म्युनिसिपालिट्या, बोर्डें व इतर स्थानिक संस्था प्रत्यक्षपणें, शेतक-यांनो, तुमच्या हातीं आल्या पाहिजेत. चळवळे लोक अशा संस्थांतून जागा पटकावण्यापुरतेच तुम्हांला आपल्या नादीं लावतात, व आश्चर्य हें कीं, तुमच्यांतलेच पुढारी म्हणविणारे ह्या चळवळ्यांच्या नादीं लागून तुमचें नुकसान करतात. ह्या गोष्टी आतां शाळेंतल्या विद्यार्थ्यालाहि कळूं लागल्या आहेत.