ब्रह्मदेशाची यात्रा करण्याचें मनांत आणून मी जेव्हां गेल्या फेब्रुवारींत कलकत्त्याहून निघालों तेव्हां माझे मनांतील मुख्य उद्देश केवळ बौद्ध धर्माचें साधन प्रत्यक्ष पाहण्याचाच होता. हा निर्वेधपणानें साधावा म्हणून इतर माझे व्यवसाय कांहीं काळ तरी बाजूस ठेवावेत असें मला वाटत होतें. पण मी जेव्हां या विचित्र देशांत संचार करूं लागलों तेव्हां प्राचीन वस्तुशास्त्रें, तुलनात्मक भाषाशास्त्र, मानववंशशास्त्र इत्यादि ज्या माझ्या आवडीच्या गोष्टी त्यांनीं मजवर एकदम हल्ला चालविला. ब्राह्मधर्माचा प्रचारक ह्या नात्यानें तुलनात्मक धर्मशास्त्राचें अवलोकन मला आजन्म करणें भाग आहे. वरील शास्त्रें तौलनिक धर्मशास्त्राच्या अगदीं हद्दीवरतीं व त्याशीं सजातीय असल्यानें त्यांच्या अध्ययनापासून विशेषतः इतक्या भिन्न परिस्थितींत आल्यावर स्वतः अलिप्त राहणें मला फार कठीण पडलें.
ब्रह्मदेशांत हिंदुस्थानांतला जातिभेद मुळींच नाहीं, ही गोष्ट अगदीं खरी आहे. तेवढ्यावरून येथें कोणत्याहि प्रकारचा बहिष्कृत वर्ग मुळींच नाहीं किंवा पूर्वीं नव्हता असा माझा समज होता. इतकेंच नव्हे तर ह्या देशांत पुष्कळ वर्षें राहून वरवर पाहणारांचाहि असाच समज असलेला मला दिसून आला; पण खरा प्रकार असा नसू अगदीं अलीकडच्या काळापर्यंत ह्या देशांत बहिष्कृत स्थितींत निदान एक हजार वर्षें तरी खितपत पडलेले चार पांच तरी मानववर्ग मला आढळले ! श्वेयो ह्या टोपणनांवाच्या एका इंग्रजानें लिहिलेल्या Burma-His Life Nations ह्या इंग्रजी ग्रंथांत मीं जेव्हां ह्या बहिष्कृत दासवर्गाचें वर्णन वाचिलें तेव्हां मला त्याचें फारच आश्चर्य वाटलें आणि जातिभेद नसतांनाहि बहिष्कृत वर्ग असूं शकतो हें अमेरिकेंतील अत्यंत सुधारलेल्या संयुक्त संस्थानांतील सामान्य लोकांचें तेथील सुधारलेल्या संयुक्त संस्थानांतील सामान्य लोकांचें तेथील निग्रोंशीं जें वर्तन घडतें व दक्षिण आफ्रिकेंतील गौरकायांचें इतर वर्णियांशीं जें वर्तन घडतें तें ज्यांनीं पाहिलें आहे त्यांना सहज पटण्यासारखें आहे.
गेल्या वर्षीं भारत इतिहास संशोधक मंडळापुढें अस्पृश्यतेचें मूळ आणि तिचा हिंदुस्थानांतील विकास ह्या विषयावर मी माझा निबंध वाचला. तेव्हांपासून अधिकच ह्या विषयाचा मी शोध करीत आहे. ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्गांची मला जी माहिती शोधान्तीं मिळाली व जी हल्लींची वस्तुस्थिति जागोजागीं जाऊन मी प्रत्यक्ष निरखिली तिच्यामुळें माझ्या स्वीकृत विषयावर अधिक प्रकाश पाडणार आहे, म्हणून मी पुढील माहिती संक्षेपानें देतों.
ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्गांचा उगम ब्रह्मदेशांतील गुलामगिरीच्या संस्थेंत आहे. ब्रिटिश राज्याची संस्थापना ब्रह्मदेशांत इ. स. १८८५ सालीं पूर्णपणें झाली. ह्या पूर्वींच्या स्वराज्यांत ह्या देशांत गुलामगिरीची संस्था होती. ती तेथें किती पुरातन होती हें ठरविण्याची निश्चित साधनें तूर्त उपलब्ध नाहींत. अनेक सामुग्री जमवून जी. ई. हार्वे आय. सी. एस. ह्यांनीं नुकताच एक ब्रह्मदेशाचा नमुनेदार आमूलाग्र इतिहास दिलेला आहे. त्यांत त्यांनीं इसवी सनाच्या चालू सहस्त्रकाच्या आरंभीं सुरू झालेल्या पगान येथील राजघराण्यापासून विश्वसनीय इतिहास दिला आहे. हें घराणें अनिरुद्ध या नांवाच्या पराक्रमी थोर पुरुषानें स्थापिलें. ह्या घराण्यानें या देशांत जें मोठें मन्वंतर घडवून आणण्यासाठीं अनेक राष्ट्रीय हिताचीं कामें केलीं, त्यांत देशांतील बौद्ध धर्माची सुधारणा करून मोठमोठीं बौद्ध देवस्थानें बांधिलीं हें एक काम होय. हीं देवळें बांधण्यासाठीं खेड्यांतून शेतकीवरील पुष्कळशा लोकांना जबरीनें धरून आणून गुलाम करून त्यांच्याकडून काम घेतलें. ह्याशिवाय, कायमच्या गुलामगिरीचें दुसरें एक कारण ब्रह्मदेशांत असें आहे. देवस्थानांत झाडलोट व इतर राखणदारीचीं कामें करणें हें गुलामांचेंच काम आहे. कित्येक भाविक लोक ही गुलामगिरी आपण होऊन पत्करीत असत. पण साधारणपणें राजाज्ञेनें हा जबरीचा गुरवपणा खेड्यांतून धरून आणिलेल्या लोकांवर किंवा लढाईंत जिंकून आणिलेल्या लोकांवर लादण्यांत येत असे. हार्वे ह्यांनीं पान ३३१ वर एक इ. स. ११७९ चा शिलालेखाचा उतारा दिला आहे. त्यांत अभिनंदयू नांवाच्या एका श्रीमंत दरबारी गृहस्थानें एक मोठें देऊळ बांधून त्याच्या साफसफाईसाठीं स्वतःला, आपल्या बायकोला व मुलांना गुलाम म्हणून वाहिलें असा उल्लेख आहे.
अशा देवळी गुलामांना व त्यांतल्या त्यांत लढाईंत जिंकून आणिलेल्या गुलामांवर वंशपरंपरेचा बहिष्कार पडत असे. त्यांच्याशीं इतर साधारण स्वतंत्र समाज मिळून मिसळून राहत असे. म्हणजे ब्रह्मदेशांत जातिभेद मुळींच नसला तरी स्वतंत्र आणि गुलाम असे दोन मुख्य सामाजिक भेद असत. घरकामाकरितां ठेविलेल्या गुलामांना जरी समाजांत वावरावयास मुभा असली, तरी देवळी गुलामांना फारच हीन व तिरस्करणीय समजण्यांत येत असे त्याप्रमाणें गुलामगिरींतून ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्गाचा उगम झाला असावा. एकंदरींत ब्रह्मदेशांतील हल्लींची धार्मिक संस्कृति व कांहीं अंशीं घरगुती व सामाजिक संस्कृतीहि हिंदी संस्कृतींतून आली आहे असें दिसतें. निदान कांहीं वर्गांची ग्रामबहिष्कृतता तरी हिंदुस्तानांतूनच गेली असावी असें म्हणण्यास हिंदी बौद्ध संस्कृतीचाच पुरावा नसून इतरहि असा पुरावा आहे कीं, हल्लींहि जे दोन स्थितींतले बहिष्कृत वर्ग तेथें आढळतात त्यांची संडाला, डूनसंडाला, तुबायाझा अशीं जीं नांवें आहेत तीं हिंदी भाषेंतून तिकडे गेलीं आहेत. तीं नांवें चंडाल, डोम चंडाल, अशुभराजा ह्या हिंदी नांवांचेंच अपभ्रंश होत ह्यांत संशय नाहीं. संस्कृत अथवा पाली भाषांतील शब्दांचें उच्चार ब्रह्मी लोकांना नीट न करतां आल्यामुळें या भाषेंतीलच श, र ह्या अक्षरांच्या उच्चाराचा ब्रह्मी भाषेंत अनुक्रमें स, त, य असा विपर्यास व्हावा असा ब्रम्ही अपभ्रंशाचा नियम आहे. त्याबरहुकूम ब्रह्मी बहिष्कृत वर्गांचीं नांवें हल्लीं तेथें प्रचारांत आहेत. अशुभराजा ह्यांतील पहिल्या अचा लोप झाला व इतर नियमांप्रमाणें तुबायाझा असें शेवटलें नांव सिद्ध झालें आहे.
ब्रह्मदेशांत ब्रिटिश राज्य स्थापन होईपर्यंत खालील चार प्रकारचे बहिष्कृत हीन वर्ग आढळत असत.
(१) युद्धांत जिंकलेले कैदी आणि त्यांचे वंशज यांना देवळांतील सेवेला वाहिलेले गुलाम करण्यांत आलेलें असे. ह्यांना फयाचून् हें नांव आहे. फया हा शब्द बुद्ध ह्या शब्दाचा चिनी भाषेंतून आलेला अपभ्रंश आहे. बृद्ध – बुढ – भुर – फुर - फया अशी ही अपभ्रंश परंपरा आहे. फया हा शब्द ब्रह्मदेशांत बुद्ध, त्याची मूर्ति, देऊळ आणि कोणी मोठा सन्माननीय माणूस ह्या सर्वांबद्दल उपयोजिला जातो. चून म्हणजे नोकर असा अर्थ आहे.
(२) स्मशानांतील मार्तिकादि अशुभ संस्काराशीं संबंध असलेली, थडगीं खणण्यांचीं व तीं संभाळण्याचीं वगैरे हीन कामें करणारे ग्रामबाह्य वर्ग ह्यांना तुबायाझा (अशुभराजा) संडाला, डूनसंडाला अशीं नांवें आहेत.
(३) केवळ भिक्षेवर निर्वाह करणारे महारोगी व इतर असाध्य रोगांनीं पछाडलेले, हातपाय किंवा दुसरा एकादा महत्त्वाचा अवयव तुटून अपंग बनलेले ह्यांना केबा असें नांव आहे. केबा हें नांव आतां तुबायाझांनाहि लावण्यांत येतें. कारण, तेहि भीकच मागतात. के = मदत, बा = हो (संबोधन) मला मदत करा असें म्हणत भीक मागणारे असा ह्या नांवाचा मूळ अर्थ आहे.
(४) माफीचे भयंकर गुन्हेगार. अशा गुन्हेगारांना पूर्वीं स्वराज्यांत राजाच्या कृपेनें किंवा इतर कारणांनीं माफी मिळून, पोलिसची, जेलरची, फांशी देण्याची वगैरे तिरस्कृत कामें आणि अधिकार मिळत असत. त्यांना पॅगवे = पोलिस, लेयाटाँ - चोपदार, छडीदार अशीं नांवें असत. अशा
अधिका-यांचा जनतेमध्यें मोठा दरारा असला तरी त्यांच्याविषयीं सर्वत्र तिरस्कार असून ते समाजबाह्य मानले जात.
ह्याशिवाय तु – डै – डो म्हणजे राजे लोकांचे हलालखोर म्हणून एक वर्ग पूर्वीं असे; व ह्यांचा एक लहान गांव मंडालेपासून १०-१२ मैलांवर आहे असें माझें ऐकण्यांत आलें. पण मला प्रत्यक्ष जाऊन पाहण्यास वेळ मिळाला नाहीं. ह्यांचा समावेश वरील दुस-या वर्गांत मीं केला असता पण हल्लीं फारसे हे ग्रामबाह्य नाहींत असेंहि मीं ऐकलें.
वरील चारी बहिष्कृत वर्गांतील लोकांची हल्लींची संख्या हिंदुस्थानांतील बहिष्कृतांच्या मानानें फारच थोडी, म्हणजे सा-या ब्रह्मदेशांत ५|६ हजार असेल. ह्यांची स्थितीहि येथल्याइतकी करुणास्पद नाहीं. हें आपलें ठिकाण सोडून, धंदा सोडून व मूळ लपवून सर्वसाधारण समाजांत छपून गेल्यास हल्लींच्या राज्यांत कोणी पर्वा करीत नाहींत. हे जरी आपल्या मूळ गांवींच बहिष्कृत स्थितींत राहिले तरी पूर्वीं देखील, हिंदुस्थानांतल्याप्रमाणें ह्यांना अस्पृश्य मानण्यांत येत नसे; तरी पण ह्यांना गांवांत येण्याला व इतर धंदे करण्याला व लोकांत मिसळायला परवानगी नसे. म्हणून अजूनी हे मागासलेल्या विपन्नावस्थेंत खितपत पडलेले मी प्रत्यक्ष गांवोगांवी मुद्दाम जाऊ पाहिले. ब्रह्मदेशांत अस्पृश्यता नव्हती निदान हल्लीं नाहीं हें खरें असलें तरी देखील बहिष्कृतांचा व अंतःकृतांचा बेटीव्यवहार पूर्वीं होत नसें व आतांहि होत नाहीं. मग रोटीव्यवहार व बेटीव्यवहाराची गोष्टच नको. हल्लींदेखील कोणी उघडपणें आपलें मूळ वरील चार पांच प्रकारांपैकीं एकांत आहे असें सांगितलें तर त्यांच्याशीं ब्रह्मदेशांतील पुराणमतवादी बहुसंख्या नुसता भेटीव्यवहार करण्यासहि तयार नाहीं. म्हणजे गृह्य आणि सामाजिक प्रसंगीं समानतेनें बहिष्कृतास आमंत्रण करण्यास अंतःकृत वर्ग अद्यापि तयार नाहीं. ब्रह्मदेशांतील पुराणमतवाद हिंदुस्थानांतल्यापेक्षां कमी दृढमूल आहे व जो आहे तो झपाट्यानें मावळत आहे, तरी पण तो मुळींच नव्हता किंवा नाहीं असें नाहीं म्हणून तेथील बहिष्कृत वर्ग हा एक संशोधनीय विषय आहे.
वरील चारी प्रकारच्या बहिष्कृतांचा इतिहास माझ्या अल्पशा संशोधनांत जो आढळला तो संक्षेपानें पुढें देत आहे. ब्रह्मदेशाचा इतिहास अद्याप तयार व्हावयाच आहे. साधनसामुग्री मुबलक आहे. ह्या साधनसामुग्रीचा भारतीय सामाजिक इतिहासाशीं निकट संबंध आहे आणि तो रंजक व तसाच बोधकहि आहे.