कुणब्यांची जूट

असा हा आपला विचार झाला. आपण कल्पना करूं कीं देशांत स्वराज्य झालें, जमिनींची तात्त्विक मालकी राष्ट्राला मिळाली; आणि वाहतुकीसाठीं जमीनधारणाचा हक्क श्रमजीवी कुणब्याकडे निर्विघ्नपणें आला, तरी दुसरी गोष्ट महत्त्वाची ही कीं, ह्या सर्व कुणब्यांनीं आपसांत आपली जूट व इतर जे श्रमजीवी खेड्यांतूनच नव्हेत तर शहरांतून राहात असतील त्यांच्याशीं कायमचें सहकार्य केलें पाहिजे व सहानुभूति राखली पाहिजे, शेतकरी श्रीमंत झाला कीं तोच जमीनदार बनतो, मग तो इतर गरीब शेतक-यांशीं फटकून वागतो आणि इतर श्रीमंत सत्ताधा-यांच्या पंक्तीस बसतो. म्हणून ही आपसांतील जुटीची फारच जरुरी आहे. अमेरिकेंतील शेतक-यांचें उदाहरण पुढें दिलेंच आहे. ती धोक्याची इशारत आहे. इतकेंच नव्हे तर सर्वांत मुख्य गोष्ट मला सांगावयाची आहे, ती ही कीं, शेतक-यांनो, तुम्ही नेहमीं काबाडकष्ट करणारे नांगरे म्हणूनच काळ न कंठतां राष्ट्राच्या अर्थकारणांत तुम्ही आपला एक हात अर्थउत्पादनांत गुंतवून दुसरा हात त्या उत्पन्न केलेल्या अर्थाची पुढें विल्हेवारी कशी चालली हें पाहून, ह्या अर्थगाड्याच्या बैलांची शिंग-दोरी खेंचण्याकरितां नेहमीं मोकळा ठेवणें जरूर आहे. हें जोंपर्यंत होत नाहीं तोंपर्यंत मागें गेलेल्या अनंत काळाप्रमाणें, पुढें येणा-या अनंतकाळींहि तुम्ही भारवाही, केवळ शेपूट व शिगें नसणारीं जनावरें राहणार ह्यांत काय संशय ! आणि ह्याबद्दल इतरांना उगाच वाईट वाटून तरी काय उपयोग?