पंथभेद

गुरु नानक वारल्यावर त्याच्या पंथांत फूट पडूं लागली. अंगदाला गुरु नेमलेले त्याच्या मुलांना आवडलें नाहीं. त्याच्या कांहीं शिष्यांनीं श्रीचंद नांवाच्या त्याच्या वडील मुलाला आपला गुरु करून, निराळा पंथ काढिला. त्याला उदाशी असें म्हणतात. त्यांतील आनंदघन नांवाच्या एकानें श्रीचंद हा देवाचा अवतार बनवून त्यासच खरा वारस ठरविलें. ह्यानंतर मिना नांवाचा दुसरा एक पंथ निराळा झाला. नानकानंतर शीख धर्माचे दहा गुरु झाले. त्यांतील चौथा गुरु रामदास ह्याला पृथ्वीचंद, महादेव आणि अर्जुन हे तिघे मुलगे होते, पैकीं तिसरा अर्जुन हा आज्ञाधारक होता, म्हणून त्यालाच गुरु करण्यांत आलें. पृथ्वीचंदानें रागावून आपला निराळा पंथ काढीला, त्याला मिना (दरोडेखोर) हें नांव पडलें. तिसरा गुरु अमरदास ह्यानें दंदाल नांवाच्या एका जाटाला शीख धर्माची दीक्षा दिली हेती. त्यानें पुढें तिसरा पंथ काढिला. त्याचे नांव हंदाली असें पडलें. ह्यांनाच पुढें निरंजनी असें नांव पडलें. शिखांच्या मंदीरांतून कोणत्याहि मूर्तीची पूजा होत नसते. ग्रंथसाहेब म्हणून त्यांचा धर्मग्रंथ आहे, तोच पूजास्थानी ठेवलेला असतो. ह्या पुस्तकांत गुरु नानक, अंगद, अमरदास, रामदास, अर्जुन, तेजबहाद्दर आणि गुरु गोविंद इतक्या गुरूंचीं कवनें ग्रथित केलीं आहेत. शिवाय ह्या गुरूंचे बरोबर जे भक्त होते त्यांनी केलेलीं स्तुतिपर कवनेंहि ह्यांत आहेत. ह्याशिवाय नामदेव, जयदेव, रामानंद, कबीर, मिराबाई, रोहिदास, सेना, पीपा वगैरे एकवीस निरनिराळ्या वैष्णव साधूंच्या वचनांचाहि त्यांत समावेश करण्यांत आला आहे.