अस्सल राजपुतांचीं मूळ ३६ कुळें

अस्सल राजपुतांचीं मूळ ३६ कुळें (PDF साठी येथे क्लिक करा)

 
वरील ३७ राजपूत नांवांपैकीं दक्षिणेंतील मराठ्यांमध्यें हल्लीं वर दाखविल्याप्रमाणें २४ नांवें तरी आढळतात. याचप्रमाणें मराठ्यांतल्या ९६ नांवांपैकीं राजपुतांत कितीतरी आढळतीलच. टॉडनें दाखविल्याप्रमाणें शकद्वीपांतून अर्धवट सुधारलेल्या कितीतरी शकवंशांतले पोटभेद पश्चिमेकडे सॅक्स्न, गेटी अथवा गॉथस हूण इ. जर्मनींत, ऑस्ट्रियांत, हंगेरींत पसरले; तसेंच शक, जाठ, हूण या नांवानें इराण, अफगाणिस्तान आणि नंतर उत्तर पश्चिम हिंदुस्थानांत आणि शेवटीं दक्षिण हिंदुस्थानांतहि पसरले. तेंच आजचे राजपूत, मराठे, रड्डी इ. होत.
शक आणि अश्ववंशाचा विचार वर झाला. आतां पल्लवांविषयीं कांहीं लिखाण मिळाल्यास पाहूं. पल्लव हें नांव पार्थवाचें रूपांतर आहे. इंग्रजींत यांनाच पार्थियन्स (Parthians) असें म्हणतात. यांत मूळ पृथु हा शब्द आहे. हें नांव इक्ष्वाकूपासून पांचव्या पिढीला अयोध्येच्या सूर्यवंशांतील पृथु या प्रसिद्ध राजाचें आढळतें. हा अनेनस नांवाच्या राजामागून गादीवर आला. पण हा वेन नांवाच्या एका दुष्ट राजाचा मुलगा होता असें महाभारत, शांतिपर्व, अध्याय ५९ आणि मनुस्मृति, अध्याय ७, श्लोक ४१ यांत उल्लेख आहेत. याशिवाय या वेनाचा कोठें उल्लेख नाहीं. पृथु हा मोठा बलाढ्य सुनीत आणि पृथ्वीवर मोठी सामाजिक, आर्थिक व राजकीय उन्नति करणारा असा युगप्रवर्तक राजा झाला अशी पुराणांत ख्याति आहे. किंबहुना याच्याच नांवावरून पृथ्वी हें नांवहि प्रचारांत आलें; कारण यानें पृथ्वीवरील खांचखळगे बुजवून शेतकीला आरंभ केला असेंहि वर्णन आहे. पार्थव अथवा Parthians कुळालाहि याच राजापासून नांव मिळालें असावें. शूरसेन यादवापासून कुंतिभोज राजानें दत्तक घेतलेली कन्या कुंती ही पांडवांची आई आदिपर्व, अ. ६३ श्लो, ५९ तिचेपासून झालेला पार्थ (अर्जुन) हाहि पार्थवच दिसतो. पृथाश्व नांवाचा एक राजर्षि झाला. सभापर्व, अ. ८-१४ यावरून सूर्य, चंद्र, पृथु, अश्व, इ. वंशांत परस्पर विवाह आणि दत्तकविधि होत असत असें समजतें. आणखी अज्ञ पौराणिक उल्लेख धुंडीत बसल्यास लेखविस्तार फार होईल. आतां या Parthians  ऊर्फ पार्थव अथवा पल्लवांचा ऐतिहासिक काळांत मराठ्यांशीं व राजपुतांशीं कांहीं मेळ जमण्यासारखें कांहीं लिखाण मिळतें कीं काय तें पाहूं.
रॉलिन्सन नांवाच्या एका विद्वान् आणि शोधक इतिहासकारानें Story of the Nations  या पुस्तकमालेंत History of the Parthians (पार्थवांचा इतिहास) नांवाचा एक ग्रंथ लिहिला आहे. त्यांत पर्थिवांच्या जातीय स्वभावाचीं आणि चालीरीतींचीं विशिष्ट लक्षणें म्हणून खालील पंधरा मुद्दे आपल्या ग्रंथांत प्रसिद्ध केले आहेत. ते उत्तरेच्या राजपुतांशीं व विशेषेंकरून दक्षिणेंतील मराठ्यांशीं इतके जुळतात कीं, ते येथें उद्धृत करणें अगदीं अवश्य वाटतें. हा इतिहासकार हिंदुस्थानांत आला असेल असें वाटत नाहीं. निदान त्याला येथील मराठ्यांची तरी माहिती असण्याचा संभव नाहीं. असें असूनहि त्यानें सहजासहजीं दिलेल्या पार्थवांचीं जातलक्षणें मराठ्यांशीं इतकीं तंतोतंत जुळावींत हें मोठें आश्चर्यकारक व अर्थपूर्ण आहे. त्यांचा उल्लेख केल्याविना या निबंधाची परिपूर्ति होणार नाहीं. म्हणून तो करून आम्ही हा लांबलेला लेख आटपतों. या पार्थवांचें साम्राज्य हिंदुस्थानाच्या वायव्य सरहद्दीवर ख्रिस्ती शकाब्दापूर्वीं थोड्या शतकापर्यंत मोठ्या वैभवानें चालू असल्याचे रॉलिन्सननें सविस्तर वर्णन केंलें आहे. त्यानें वर्णिलेल्या १५ मुद्यांचे मराठ्यांच्या स्वभावाशीं इतकें साम्य आहे कीं, तें त्याच्याच शब्दांत शक्य तितकें देणें भाग आहे. पण विस्तारभयास्तव तसें न करतां त्यांचा थोडक्यांतच मराठी गोषवारा दिला आहे. जिज्ञासूंनीं तें सर्व वर्णन मुळांतूनच वाचावें हें बरें.
Feudal System : मराठ्यांची जहागीरदारी व सरंजामपद्धति पार्थवांमध्यें तशीच होती. पान ७५.
Sophi पंडीत Magi पुरोहित : पार्थव बादशाहीच्या शेवटीं या भिक्षुकशाहीचा शहरांतून आणि खेड्यांतून डोईजडपणा फार झाला. भाग ५, पान ८०.
सत्यशोधक समाज : प्रथम प्रथम पार्थव, हे मागी ऊर्फ मध ब्राह्मणांच्या धार्मिक कह्याखालीं दडपून गेले होते. अग्निपूजा आणि प्रेतें उघड्यावर टाकण्याची चाल त्यांच्यांत होती. पण पुढें त्यांची अग्नीवरील श्रद्धा उडाली. मधांचें वजन नाहिंसें झालें. इतकेंच नव्हे, तर राज्यकारभारांतूनहि त्यांचा हात काढून टाकण्यांत आला. पान ३६४.
मृत राजांचीं देवळें अगर छत्र्या : राजे लोक मेल्याबरोबर त्यांच्या नांवानें देवळें बांधून त्यांत त्यांच्या मूर्तींची पूजा होत असे. त्यांचा संबंध सूर्य-चंद्राशीं भिडविण्यांत येई. (अशीं देवळें अद्यापि इंदूर आणि कोल्हापूर येथें पंचगंगेच्या कांठीं बांधण्यांत येत आहेत.) भाग ५, पान ८५.
सूर्य-चंद्र पूजा : राजघराण्यांतून सूर्य आणि चंद्र यांचीं कुळदैवतें म्हणून पूजा होत असे. भाग २३, पान ३९४.
टांक पूजा : सामान्य लोकांच्या घरांतून-मग त्यांचा संबंध राजघराण्याशीं असला तरी, त्यांच्या देव्हा-यावर पूर्वजांचे टांक ( सोन्यारुप्याच्या पातळ पत्र्याच्या मूर्ति) ठेवण्यांत येऊन त्यांची रोज पूजा होत असे. (मराठ्यांत ही चाल अद्यापि चालू आहे.) पान ३९५.
घोडदळ : पार्थवांमध्यें घोडदळाचे दोन भाग असत. [१] शिलेदाराचें भारी पथक. [२] बारगिरांचें हलकें पथक. चिलखत, भाला, बिचवा, हीं त्यांचीं नेहमींचींच आयुधें असत. पान ३९७.
गनिमी कावा : “Pretending panic, beating a hasty retreat, and scattering in their flight, they endeavoured to induce their foe to pursue hurribly and in disorder, being themselves ready at any moment to turn and take advantage of the least appearance of confusion.” पान ४०३. (ग्रॅंट डफनें मराठ्यांच्या गनिमी काव्याचें यापेक्षां निराळें वर्णन केलें आहे ?)
शमला : “Previously the royal headdress had been a diadem, which was a band encircling the head, and terminating two long ribbons or ends that hung down behind the head on the back.” पान ४५. (आतांच्या ग्वाल्हेर दरबारांतील श्रीमंत फाळके सरदारांच्या पाठीवर लोंबणा-या जोड शमल्यांचें हें खासें वर्णण आहें!)
बुरखा : बायकांमध्यें बुरखा जारी असे. त्यांच्या व्यभिचाराला कडक शासन असे. पुष्कळ बायका करण्याची चाल प्रतिष्ठित झाली होती. काडीमोड होत असे. पान ४१४. (मुसलमानांत या चाली मागाहून पडल्या. मराठ्यांतील पडदा मुसलमानांच्याहून फार जुना ठरतो!)
झनाना : “राणीवसा म्हणजे एक विस्तीर्ण झनाना असून, त्यांतील पट्टराणी लग्नाची व मुख्य मानाची असे. इतर पुष्कळ राण्या व शिवाय रखेल्या असत. सर्वजणी नेहमीं कडक पडद्यांत कोंडलेल्या असत. त्यांना फक्त नातलगांशीं आणि फार तर खोज्यांशीं बोलण्याची परवानगी असे. एकदाच मात्र एका राणीनें मोठा हिय्या करून आपल्या नव-याचीं राज्यसूत्रें आपल्या हातीं घेऊन आपल्या मुलाच्या साहाय्यानें तीं उत्तम रीतीनें चालविलीं.” पान ४०५. (ही एक तत्कालीन ताराबाई किंवा अहल्याबाईच म्हणावयाची!)
सोन्याची शय्या : सोन्याच्या पलंगावर निजण्याचा मान फक्त राजालाच असे. इतरांना सक्तमनाई असे. पान ४०५ (अद्यापि ही मनाई आहेच. श्री. सयाजीरावमहाराज गायकवाड यांनीं आपले पहिल्या नंबरचे सरदार घोरपडे यांना पायांत सोन्याचा तोडा घालण्याचा मान मोठी मेहेरबानी म्हणूनच बहाल केला आहे.)
शिकार : युद्धानंतर सिंहाची व वाघाची शिकार मोठ्या हौसेनें करीत.
नजराणा : भेट घेणा-यांनीं प्रथम भल्या मोठ्या नजराण्याची तयारी करण्याची आवश्यकता असे.
निशेबाजी : निरनिराळ्या कैफांचीं त्यांना व्यसनें असत. पार्थव हे एकंदरींत त्यांचे समकालीन ग्रीक आणि रोमन यांच्यापेक्षां कमी सुधारलेले होते. तथापि प्राचीन इतिहासकार दाखवितात इतका कांहीं हा संस्कृतीचा भेद फार मोठा नव्हता. भाग २३, पान ४१७.

पार्थव, पार्थियन्स, पल्लव, या सर्व नांवांचा औपपत्तिक संबंध, पेहल्लवी (भाषा), पेहलू (बाजू) या शब्दांशीं येतो असें प्रसिद्ध पारशी संशोधक शमसुलउल्मा जमशेटजी मोदी यांनीं मला एका समक्ष भेटींत सांगीतलें. संस्कृतांत पार्श्व म्हणजे बाजू या अर्थाचा शब्द आहे. संस्कृतांतील ‘स’ची किंवा 'ह' ची अवेस्ता भाषेंत ‘त’ अशी परस्पर अदलाबदल होते. उदाहरणार्थ-संस्कृत ऋत = अवेस्त अश (सत्य) संस्कृत मर्त्य  = अवेस्ता मर्श्य (माणूस) या न्यायानें पार्श्वचें पार्थ होणें साहजिक आहे. यावरून पार्थव म्हणजे आर्यांनीं व्यापलेल्या मध्यआशियांतील मोठ्या भागाच्या बाजूबाजूंनीं शिवेवर राहणारें एक राष्ट्र दिसतें. हिराडॉटस, स्ट्रॅबो, इ. ग्रीक आणि रोमन संस्कृतीचे गोडवे गाणारी प्राचीन इतिहासकार मंडळी यांनीं समग्र शक राष्ट्रसमूहाला आर्यांचें नुसतें सामंतचक्र बनविलें आहे. रॉलिन्सन, टॉडप्रभृति आधुनिक इतिहासकार त्याच शकादीनां इतिहासांत त्यांचें योग्य पद परत देऊं पाहात आहेत. हिंदुस्थानांतील राजपूत आणि मराठ्यांनीं तर तें पद स्वतःच्या आपल्या कर्तबगारीनें मिळविलें आहे.