अनेक दृष्ट्या हें उपनिषद् फारच महत्त्वाचें आहे. ही एक शैवांची भगवद्गगीताच म्हणण्यास हरकत नाहीं; तथापि हा केवळ सांप्रदायिक ग्रंथ नसून ह्यांत उपनिषत्काळाचा ईश्वर धर्म अथवा एकन्तिक भागवत धर्म कसा कळसास पोंचला होता हें गुरुवर्य सर भांडारकरांनीं आपल्या (Vaishnavism & Shaivism पान १०६-११२) ग्रंथांत एका स्वतंत्र भागाच्या रूपानें फार मार्मिकपणानें दाखविलें आहे. गुरुवर्यांचें स्वत:च्या भक्तिमार्गविषयक सात्त्विक अभिमानाचें ह्या भागांत अतिसुंदर प्रतिबिंबच दिसून येत आहे. प्रकृति, जीव, ईश्वर, परब्रह्म इत्यादि वेदान्तांतील तत्त्वांचा परस्पर संबंधच केवळ ह्या उपनिषदांत आहे, असें नव्हे, तर ह्याच्या कर्त्यानें भक्ताची शरणागति, भक्तीचें माहात्म्य, ईश्वरी कृपा आणि सर्वव्यापित्व वगैरे भागवत धर्माला प्राणभूत अशीं इतर तत्त्वेंदेखील थोडक्यांत पण स्पष्ट निरूपिलीं आहेत. रुद्र, शिव, ईशान, महेश्वर हीं नांवें आलीं असून शिव हेंच ह्या उपनिषदाचें मुख्य आणि एकान्तिक दैवत उपास्य आणि अंतिम आदर्श आहे. श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेंत “रुद्राणां शंकरश्चास्मि” (अ. १० श्लो. २३), “ब्रह्माणमीशं कमलासनस्थम्” (अ. ११ श्लो. १५), “सर्व लोकमहेश्वरम्’ (अ. ५ श्लो. २९) वगैरे शैव नांवें आढळतात. पण श्वेताश्वेतरांत विष्णु, कृष्ण अथवा वासुदेव अशीं वैष्णव नांवें चुकूनहि आलीं नाहींत. कृष्णगीतेंत अनेक मतांची कालवाकालव आहे, तशी ह्या उपनिषदांत नाहीं. हें साध्या शुद्ध आणि आटपसर रूपांत आहे, तर उलट पक्षीं भगवद्गीतेंत फार ढवळाढवळ झालेली स्पष्ट दिसत आहे. कृष्णगीतेनें आपल्या अध्याय १३ व्यांतील १३ वा सबंध श्लोक आणि १४ व्या श्लोकाचा पहिला अर्धा भाग ह्या उपनिषदांतून घेतला आहे. दुस-या अनेक अंतस्थ रचनांवरून व तत्त्वांच्या मांडणीवरून कृष्णगीता ही ह्या उपनिषदानंतरचीच नव्हे, तर ह्या उपनिषदांतील तत्त्वांच्या धोरणांवरून फक्त उपास्य दैवत तेवढें बदलून रचलेली असावी अशी शंका येते. गीतोपनिषद् असें ज्या अर्थीं कृष्णगीतेच्या प्रत्येक अध्यायच्या शेवटच्या समाप्तिवाक्यांत म्हटलें आहे, त्या अर्थीं न जाणो ती ह्याच उपनिषदाचें रूपान्तर असणेंहि अगदीं अशक्य नाहीं. तें कसेंहि असो, कृष्णगीतेचें हल्लींचें स्वरूप श्वेताश्वेतराच्या काळानंतरचें खास आहे. श्वेताश्वेतरोपनिषदाचा कर्ता श्वेताश्वेतर ह्या नांवांतहि रहस्य आहे. कृष्णार्जुनाची जोडी पुरातन आहे. ह्यांचेच अवतार नर आणि नारायण रूपानें बद्रिकाश्रमांत राहात होते. श्वेताश्व हें नांव अर्जुनाचें होतें, मग श्वेताश्वेतर हें नांव कृष्णाचें तर नसेल? आणि इतर म्हणजे अर्जुन असा अर्थ होईल. श्वेताश्वेतर म्हणजे कृष्णार्जुन हें जोडपें व कृष्ण हा शैव होता, वैष्णव असणें शक्यच नाहीं. भगवद्गीतेपेक्षां श्वेताश्वेतराचाच संबंध कृष्णाशीं अधिक प्रत्यक्ष नसेल
कशावरून ?