स्वत: बुद्धमुनि अनात्मवादी होता, निदान जीव, ईश्वर, ब्रह्म इ. आत्मवादांचा मोक्षाशीं कांहीं संबंध नाहीं असें सांगत असे. त्यानें अशा अनेक वादांचें जें त्याच्या काळीं शुष्क बंड माजविण्यांत आलें होतें, त्याचा प्रसार आपल्या अनुयायांत माजूं दिला नाहीं, हें सर्व खरें आहे तरी त्याच्या मागून लवकरच त्याच्या अनुयायांत हा आत्मवाद कोणत्याना कोणत्या तरी रूपानें शिरलाच. पाली भाषेंतील जातक कथांच्या द्वारां बुद्धाला देव मानण्यांत येऊन त्याचे अनेक अवतार कल्पण्यांत आले. बुद्धानें आपल्या मागें आपल्या अनुयायांचा कोणी शास्ता नेमला नव्हता. केवळ आपलें स्मरण आणि आपल्या शिकवणीचें अनुपालन तेवढेंच करण्याविषयीं त्यांनीं सांगितलें होतें, त्यामुळें बुद्धाच्या अनुस्मरणासाठीं मूर्ति आणि मंदिरें उद्भवलीं. पुढें क्रमप्राप्त महायानाचा विकास होऊन प्रत्यक्ष बुद्धालाच परब्रह्म प्राप्त झालें. तेव्हां बुद्ध, धर्म आणि संघ ह्या तीन तत्त्वांच्या पृथक् पृथक् तीन देव आणि त्यांच्या तीन मूर्तीहि बनल्या. अहिंसावाद, अवतारवाद, मूर्तिपूजा, मंदिरस्थापना, उपोसथ किंवा उपासनेचे दिवस, उपासादि व्रतें, गुरुभक्ति, इतकेंच नव्हे तर रथयात्रेसारखे सार्वजनिक उत्सवाचे प्रकार आणि तीर्थ स्थळें वगैरे जीं लौकिक भागवत धर्माचीं अनेक उपांगें आतां सर्वमान्य होऊन बसलीं आहेत, तीं सर्व जैन व बौद्ध ह्या धर्मांतूनच प्रचलित हिंदु धर्मांत हळूहळू शिरलीं आहेत, यांत शंका नाहीं. तीं वेदांच्या संहिता काळांतहि नव्हतीं, इतकेंच नव्हे तर बुद्धापूर्वींच्या प्राचीन उपनिषत्काळांतहि नव्हतीं. महाभारतांत नारायणीय पर्वांत प्रथम अवतारवाद दिसतो, पण हें पर्व निखालस बुद्धानंतरचें आहे. भारतांत मूर्ति आणि देवळें नाहींत. क्वचित् उल्लेख असले तरी ते बुद्धोत्तरकालीनच समजले पाहिजेत. विष्णुपुराणांत स्वत: बुद्धालाच विष्णूचा अवतार बनविलें आहे. फार तर काय पण वेदान्ताचें तिसरें व विष्णुभागवताचें मुख्य प्रस्थान म्हणून ज्या भगवद्गीतेची प्रसिद्धि आहे तिच्यांतील शिकवणिवरहि बुद्धाच्या मुख्य तत्त्वाचे कसे संस्कार झालेले आढळतात, यांचा उल्लेख पहिल्या व्याख्यानांत केला आहेच.
वरील विवेचनावरून विष्णु-भागवतांच्या मतावरच नव्हे तर उपासना, भक्ति आणि आचारावरहि बौद्ध सांप्रदायाचा कसा संस्कार घडला आहे किंबहुना बौद्ध सांप्रदायिक तपशिलांवरच वैष्णव सांप्रदायिक बहुतेक तपशिलांची उभारणी केली आहे, हें सूक्ष्म आणि निर्विकार दृष्टीनें पाहिल्यास दिसून येईल. इतकेंच नव्हे तर पुढें वैष्णव अथवा शैव सांप्रदायांत ज्या अनेक अनिष्ट गोष्टी शिरून त्यांची अवनति झाली, त्यांनाहि कांहीं अंशीं कारण बौद्ध महायान धर्माचें जें पुढें तांत्रिक धर्मांत रूपांतर झालें तेंच होय, हें पुढील व्याख्यानांत सांगण्यांत येईल. बौद्ध महायानाशीं शैव मतांचा आणि उपासनांचा वैष्णवांच्याहूनहि अधिक निकट संबंध आहे. शैवमत बौद्धाहून अगोदरचें असल्यामुळें कदाचित् शैवांचाच महायान बौद्धांवर परिणाम झाला असणें अधिक संभवनीय आहे. नेपाळ, बंगाल, ओरिसा प्रांतांत ह्या दोन्ही सांप्रदायाची फारच भेसळ झालेली दिसते. इतकेंच नव्हे तर पुढें इ. स. १००० नंतर जो मच्छिंद्रानें नाथपंथ उभारिला तो तर ह्या भेसळीचाच एक उघड पुरावा होय. मच्छिंद्राचा तेजस्वी शिष्य गोरखनाथ हा तर स्वत: बौद्ध योगी होता. शाक्तांमध्यें जो वाम मार्ग अद्यापि गाजत आहे, त्याचा संबंध तिबेटातूंन आलेल्या बौद्धांच्या वज्रयानाशीं विशेषत: त्यांच्या तंत्रभागाशीं आहे, हेंहि पुढील व्याख्यानावरून कळेल. तूर्त इतकेंच ध्यानांत ठेविलें पाहिजे कीं, जैन आणि बौद्ध धर्म हे “हिंदु” म्हणविणा-यांना पूर्वींपासून कोणत्याहि कारणांनीं आणि कितीहि नकोसे झाले असले, तरी वैदिक धर्माच्या आर्ष स्वरूपाला मागें टाकून हल्लीं गाजत असलेले शैव आणि वैष्णव सांप्रदाय जे बहुजन समाजापुढें आहेत, त्यांचें प्रत्यक्ष नाहीं तरी पर्यायानें बरेंच श्रेय आणि कांहीं अंशीं अपश्रेयहि जैन बौद्धांकडेच आहे.