१ प्रस्तावना

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या या लेखसंग्रहाचें वैशिष्ट्य असें कीं इतक्या विविध प्रश्नांवरील त्यांचे संशोधनपर निबंध प्रथमच ग्रंथरूपानें प्रसिद्ध होत आहेत. यापूर्वीं १९१२ सालीं ‘विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्यानें आणि उपदेश’ या नांवाचा त्यांचा लेखसंग्रह प्रसिद्ध झाला होता. परंतु त्यांतील लेख हे मुख्यत: इंग्लंडमधील त्यांचीं प्रवासवर्णनें, प्रार्थनासमाज व ब्राह्मोसमाज यांची शिकवण व तत्सम इतर कांहीं विषय यांच्यापुरतेच मर्यादित होते. या लेखसंग्रहामध्यें त्यांनीं केलेला धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र, मराठ्यांचा इतिहास, समाजशास्त्र इत्यादि विषयांचा ऊहापोह समाविष्ट आहे. या लेखसंग्रहामध्यें विषयांची विविधता वैशिष्ट्यपूर्ण आहे.
लेखन मुख्यत: १९२३ ते १९३५ च्या काळांतील
कर्मवीर शिंदे यांचे या लेखसंग्रहांतील निबंध मुख्यत: १९२३ ते १९३५ या काळांत लिहिले गेलेले वा प्रसिद्ध झालेले आहेत. १९०६ पासून १९२३ पर्यंत ते ‘डिप्रेसड् क्लासेस मिशन’ या संस्थेच्या कामांत गढून गेले होते. १९२३ सालीं ते या संस्थेच्या कामांतून मुक्त झाले. त्यामुळें त्यांना स्वाभाविकच तुलनात्मक दृष्ट्या अधिक स्वास्थ्य मिळूं लागलें. १९३५ सालीं नंतर ते मधुमेह, गाऊट व इतर आजारानें अंथरूणाला खिळून होते, त्यामुळें १९३५ नंतरहि ते फारसें लेखन-वाचन करूं शकत नव्हते; म्हणून त्यांच्या आयुष्यांतील सर्व महत्त्वाचें लेखन १९२३ ते १९३५ या एका तपाच्या काळांतच झालेलें दिसतें. या लेखसंग्रहांतील कांहीं लेख विविधज्ञानविस्तार, रत्नाकर, केसरी, किर्लोस्कर, विजयीमराठा, सुबोध-पत्रिका यांतून प्रसिद्ध झालेले आहेत. तसेंच कांहीं लेख या संग्रहांत प्रथमच प्रकाशित होत आहेत. गेलीं अनेक वर्षें ते कर्मवीर शिंदे यांच्या खाजगी संग्रहांत हस्तलिखित स्वरूपांत पडून होते.
पिण्ड संशोधकाचा वा तत्त्वचिंतकाचा
श्री. विठ्ठल रामजी शिंदे हे महाराष्ट्राला मुख्यत: समाजसुधारक वा कर्मवीर म्हणूनच परिचित आहेत. परंतु या लेखसंग्रहांतून व्यक्त होणारें त्यांचें व्यक्तिमत्त्व एका तत्त्वचिंतकाचें वा संशोधकाचें आहे असें दिसतें. कर्मवीर शिंदे यांचा पिंड हा जसा एका कर्मवीराचा होता त्याचप्रमाणें एका तत्त्वचिंतकाचा, संशोधकाचा होता, असें यामधून दिसत आहे. भागवत धर्माचें मूळ कशांत आहे, अस्पृश्यतेचें उगमस्थान कोणतें आहे, मराठ्यांची पूर्वपीठिका कोणती आहे, मराठी भाषेचें उगमस्थान कोठें आहे यासंबंधीं त्यांनीं केलेल्या विवरणामध्यें त्यांच्या तत्त्वचिंतनात्मक मनाचा चांगला प्रत्यय येतो. महाराष्ट्राला त्यांचें हें दर्शन पुष्कळच वेगळें आहे. या दृष्टीनेंहि हा लेखसंग्रह उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.

आर्यपूर्व संस्कृतीचें महत्त्व
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनीं आपल्या लेखांतून भारतीय संस्कृतीवर आर्यपूर्व संस्कृतीची केवढी मोठी छाप होती हें दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. अण्णासाहेर शिंदे ज्या काळांत हे विचार मांडीत होते त्या काळाची पार्श्वभूमि या दृष्टीनें विशेष उल्लेखनीय आहे. ज्या काळांत अण्णासाहेब शिंदे हे विवेचन करीत होते त्या काळांत महाराष्ट्रांतीलच नव्हे तर हिंदुस्थानांतील बहुतेक सर्व विचारवंत भारतीय संस्कृति म्हणजे केवळ आर्यसंस्कृति आहे, असें समीकरण मांडीत होते. या विचाराचें मूलस्थान जर्मनींतील १९ व्या शतकाच्या उत्तरार्धांतील विचारवंतांच्या मध्यें आहे. आर्यसंस्कृति हीच खरी संस्कृति, आर्यपूर्व संस्कृति अत्यंत रानटी, मागासलेली, जंगली होती, असा विचार जर्मनीमधून १९ व्या शतकाच्या उत्तरार्धांत जगभर पसरला. या विचारवंतांची छाप हिंदुस्थानांतील व पर्यायानें महाराष्ट्रांतील बहुतेक सर्व संशोधकांवर पडली होती. त्यामुळें स्वाभाविकच भारतीय संस्कृतीची सुरुवात ही केवळ आर्यांच्या आगमनानंतरच झाली, येथील आर्यपूर्व संस्कृति ही अतिशय मागासलेली, केवळ रानटी टोळ्यांची होती, असें गृहीत धरूनच ते सर्व विवेचन करतात. याचा प्रत्यय ज्ञानकोशकार केतकर, इतिहासाचार्य राजवाडे, डॉ. भांडारकर, न्यायमूर्ति तेलंग या सर्वच विचारवंतांच्याबाबत येतो. आपल्या देशांतील बहुतेक सर्वच विचारवंत वरील विचाराच्या छायेखालीं वावरत असतां भारतीय संस्कृतीवर आर्यपूर्व संस्कृतीची फार मोठी छाप आहे, असें अण्णासाहेब शिंदे आपल्या लेखांतून सांगत होते. त्यांच्या विचाराचें दुसरें वैशिष्ट्य असें कीं, भारतीय संस्कृति म्हणजे केवळ आर्य व आर्यपूर्व संस्कृति नव्हे. या आर्यपूर्व संस्कृतीच्याहि आधीं येथें जे मूळचे रहिवासी राहात होते त्यांच्या जीवनपद्धतीचा आर्यपूर्व व आर्यसंस्कृतीवरहि परिणाम झालेला होता. या सर्व संस्कृतींचा एकत्रित झालेला परिणाम म्हणजे भारतीय संस्कृति आहे. या तिन्ही संस्कृतींमधून तयार झालेली एकात्म जीवनपद्धति म्हणजे भारतीय संस्कृति आहे, असें ते आपल्या विवेचनांतून सूचित करतात. त्यांची ही अभ्यासपद्धति अधिक वस्तुनिष्ठ व समाधानकारक आहे असें वाटतें.
योग - भक्ति - तत्त्वें : आर्यपूर्व संस्कृतीचीं वैशिष्ट्यें
आर्यपूर्व संस्कृतीचा भारतीय संस्कृतीवर झालेला परिणाम ते अनेक पद्धतीनें दाखवितात. ‘भागवत धर्माचा विकास’ या लेखांत भक्तिमार्ग हा आर्यपूर्व आहे, असें त्यांनीं सांगितलें आहे. ज्ञान आणि कर्म हीं आर्यसंस्कृतीचीं वैशिष्ट्यें आहेत तर योग व भक्ति हीं आर्यपूर्व संस्कृतीचीं वैशिष्ट्यें आहेत, असें ते सांगतात. याला त्यांनीं वाङ्मयीन व पुरातन संशोधनाचे आवश्यक ते पुरावे दिलेले आहेत. अण्णासाहेब शिंदे यांचा हा मध्यवर्ती सिद्धान्त पुष्कळच विचारप्रवर्तक व नव्या ज्ञानाच्या कसोटीला उतरणारा आहे, असें वाटतें. सिंधमध्यें मोहेंजोदारो, हराप्पा येथें सांपडलेल्या उत्खननांतील पुराव्यांवरून शिवपूजा व लिंगपूजा आर्यपूर्व असावी असें वाटते. तेथें तर सांपडलेल्या नागपूजा व वृक्षपूजेच्या पुराव्यांवरून भक्तिमार्ग हा आर्यपूर्व असावा असें वाटतें. आर्यांच्या अगदीं प्रारंभींच्या वाङ्मयांत योग व भक्ति यांचे उल्लेख अगदीं तुरळख तुरळक आहेत. अगदीं प्रारंभींच्या या वाङ्मयाकडून अलीकडच्या काळांत जसजसें यावें तसतसें त्याचे पुरावे अधिकाधिक मिळूं लागतात. यावरूनही आर्यपूर्व संस्कृतीचा आर्यांशीं दीर्घकाळ सहवास आल्यानंतरच हीं दोन्हीं तत्त्वें आर्यसंस्कृतींत आलेलीं असावींत, असें वाटतें. शिवाय भक्तितत्त्व हें दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत गेलें आहे. हें तत्त्व आर्यसंस्कृतींत असतें तर तें उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत गेलें असतें. यावरूनहि भक्तितत्त्व हें आर्यपूर्व असावें, असेंच वाटतें.
अस्पृश्यता आर्यपूर्व संस्कृतींतच असली पाहिजे
भक्तितत्त्वाच्या मीमांसेप्रमाणेंच अस्पृश्यतेची मीमांसाहि मूलगामी व विचारप्रवर्तक आहे असें वाटतें. भारतीय अस्पृश्यतेचें मूळ शोधीत असतांनाहि अस्पृश्यता आर्यपूर्व असावी, असें अण्णासाहेब शिंदे यांना वाटतें. याला पुरावे म्हणून त्यांनीं दोन गोष्टींचा उल्लेख केला आहे. पहिला पुरावा असा कीं, आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जसजसे जातों तसतशी अस्पृश्यतेला अधिक धार प्राप्त होते. यावरून अस्पृश्यता ही मुळांत दक्षिणेकडे व आर्यपूर्व असावी, असें त्यांना वाटतें. शिवाय वाङ्मयीन पुरावे शोधिले तरी आर्यांच्या अगदीं प्रारंभींच्या वाङ्मयांत अस्पृश्यतेचा उल्लेख आढळत नाहीं. अगदीं प्रारंभींच्या वाङ्मयाकडून अलीकडे अलीकडे बुद्धकाळाकडे येऊं लागतों तसतसे यासंबंधींचे उल्लेख जास्त प्रमाणावर आढळूं लागतात. यावरूनहि अस्पृश्यता आर्यपूर्व असावी, असें त्यांनीं सूचित केलें आहे.
अस्पृश्यतेचें मूळ आग्नेय आशियांत असण्याचा संभव
भारतीय अस्पृश्यतेचें मुळ आर्यपूर्व संस्कृतींत असावें असें त्यांनीं म्हटलें आहे. परंतु भारतांत या आर्यपूर्व संस्कृतींतहि हें तत्त्व कोठून आलें असावें याचीहि त्यांनीं मीमांसा करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत ते म्हणतात, भारतीय अस्पृश्यता ही आग्नेय आशियांतील देशांतून आर्यपूर्व संस्कृतीमध्यें दक्षिणेकडे प्रथम आलेली असावी. याला पुरावा देतांना ते असें म्हणतात, कीं उत्तरेपेक्षां दक्षिणेंत अस्पृश्यता तीव्र प्रमाणांत आहे. परंतु दक्षिणेंतहि ती मलबारांत अधिक तीव्र स्वरूपांत आढळते. याचें कारण पूर्वीं दक्षिण हिंदुस्थानचा समुद्रमार्गें आग्नेय आशियांतील देशांशीं संबंध असावा, असें त्यांना वाटते. पुढें आर्यांच्या काळांत हिंदुस्थानचा संबंध वायव्येकडून मध्य आशियांतील संस्कृतीशीं मोठ्या प्रमाणावर आला. त्याचप्रमाणें आर्यपूर्वं काळांत हिंदुस्थानचा संबंध दक्षिणेकडून आग्नेय आशियांतील देशांशीं अधिक आला होता असें संशोधकांच्या संशोधनावरून दिसून येतें. हटनसारख्या विचारवंतानें याच गोष्टीवर विशेष भर दिला आहे. अस्पृश्यतेचें मूळ आर्यपूर्व संस्कृतींत व या आर्यपूर्व संस्कृतींतील अस्पृश्यतेचें मूळ आग्नेय आशियांतील बेटांत असावें, असेंच त्यानें आपल्या ‘Castes in India’ या ग्रंथांत सुचविलें आहे. अद्यापहि आग्नेय आशियांतील बेटांतून राहणा-या जंगली जातींच्या लोकांत ह्या अस्पृश्यत्वाचा व तद्दर्शक शब्दांचा प्रचार जास्त आहे. या दृष्टीनें भारतीय अस्पृश्यतेचें मूळ आग्नेय आशियांतील बेटांतून असावें हा अण्णासाहेब शिंदे यांनीं मांडलेला विचार अतिशय महत्त्वाचा आहे, असें वाटतें.
जातिव्यवस्थादेखील आर्यपूर्व असावी
हटन यांच्याप्रमाणेंच इतरहि कांहीं मानववंश शास्त्रज्ञांनीं केवळ अस्पृश्यताच नव्हे तर जातिव्यवस्था ही देखील आर्यपूर्व असावी, असें म्हटलें आहे. प्रत्येक जातिजातींत आढळणा-या चालीरीति, ल्गनपद्धति, अंत्यसंस्कार, त्यांच्या धर्मकल्पना, वेगवेगळ्या समजुती यांवरून या कल्पनेस पुष्टिच मिळते. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनीं हा विचार प्रथम फार स्पष्ट स्वरूपांत १९०९ व १९११ सालीं प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘History of Caste’ या पुस्तकांतून मांडला. आधीं या देशांत चार वर्ण होते व त्यांतून वर्णसंकरानें व इतर कारणांमुळें या देशांत शेंकडों जाति निर्माण झाल्या अशी कल्पना अनेक वर्षें रूढ होती. डॉ. केतकर यांनीं याबाबत बरोबर उलटा सिद्धांत मांडला. त्यांनीं असें सांगितले कीं, या देशांत अगोदर शेंकडों रानटी टोळ्या होत्या. त्यांच्याच पुढें जाति निर्माण झाल्या. या शेंकडों जातींतून आर्यांनीं चार वर्ण निर्माण केले. या सर्व जातींचें त्यांनीं वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळ्या वेळीं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या वर्णांत वर्गीकरण केलें. हें वर्गीकरण करीत असतांना निरनिराळ्या ठिकाणीं त्यांनीं निरनिराळे मानदंड वापरले. जाति या आर्यपूर्व होत्या हें सिद्ध करण्यासाठीं त्यांनीं कांहीं समाजशास्त्रीय पुरावे दिलेले आहेत. डॉ. केतकर यांच्यानंतर वेगवेगळ्या भूमिकेवरून याविषयीं संशोधन झालें आहे. त्यावरूनहि जाति या आर्यपूर्व असाव्या या कल्पनेला पुष्टिच मिळते. डॉ. इरावती कर्वे यांनीं पंचवीस-तीस वर्षें मानववंश शास्त्राच्या आधारें संशोधन करून जो निष्कर्ष काढला आहे तो वरील कल्पनेस पुष्टीच देत आहे. ‘Hindu Society-an Interpretation’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकांत डॉ. इरावती कर्वे ह्यांनीं हाच विचार समाजशास्त्रीय व मानववंशशास्त्रीय पुराव्यांच्या आधारें मांडला आहे. जातिव्यवस्था ही आर्यपूर्व असावी असें मानावयाला आतां पुष्कळ नवे पुरावे पुढें येत आहेत. जातिव्यवस्थाच आर्यपूर्व असेल तर अस्पृश्यताहि स्वाभाविकच आर्यपूर्व असावी असें समजावयाला अधिक बळकटी येते. या दृष्टीनें कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनीं यासंबंधीं केलेल्या विवरणाला पंचवीस-तीस वर्षांनंतर नव्या संशोधनानें पुष्टिच मिळत आहे, असें दिसून येईल.
अस्पृश्य एके काळचे राज-वैभव भोगलेले राजे
भारतीय अस्पृश्यांची मीमांसा करतांना ते असें म्हणतात कीं, येथील अस्पृश्य मूळचे येथील राजवैभव भोगलेले मोठमोठे राजे असले पाहिजेत. परंतु केवळ जेत्यांनीं त्यांचा पराभव केल्यामुळें त्यांच्या कपाळीं ही अस्पृश्यता आलेली असावी. आजचे अस्पृश्य हे एके काळचे मोठे राजे होते, असें त्यांना अनेक पुराव्यांवरून वाटते. ‘ब्रह्मदेशांतील बहिष्कृत जमाती’ या आपल्या लेखांतून त्यांनीं हाच विचार मांडला आहे. ब्रह्मदेशांतील बहिष्कृत जमातींचें संशोधन करतांना त्यांना वरील सिद्धान्ताला अगदीं अलीकडचा म्हणजे दहाव्या शतकांतला पुरावा मिळाला. त्यामळें त्यांच्या वरील संशोधनाला विशेष महत्त्व आहे, असें ते मानतात. भारतीय अस्पृश्यतेचें मूळ त्यामुळेंच राजकीय गुलामगिरींत असावें, असें त्यांनीं म्हटलेलें आहे. अस्पृश्य मानलेले वंश सारे संस्कृतिहीनच होते असें मुळींच नाहीं. ब्रह्मदेशांत तुहा याजा (अशुभ राजा) फया चुन वगैरे जे अस्पृश्य वंश आढळत आहेत ते जिंकले जाण्यापूर्वीं राजवंश होते असें अण्णासाहेब शिंदे आपल्या ‘अस्पृश्यांचें राजकारण’ या लेखांतूनहि सांगतात. (पान ९७)
अण्णासाहेब शिंदे यांनीं मांडलेला हा विचार पुढें डॉ. आंबेडकर यांनीं ‘Who were the Shudras ? How they came to be the furth in the Indo-Aryan Society’ या १९४६ सालीं प्रसिद्ध झालेल्या आपल्या ग्रंथांत मांडलेला आहे. डॉ. आंबेडकरांनीं यासाठीं महाभारतांतील शांतिपर्वांत उल्लेख केलेल्या पैजवन राजाचा आधार आपल्या विवेचनाच्या पुष्ट्यर्थ दिलेला आहे. पिजवन राजाचा मुलगा सुदास् याचा पुरोहित वाल्मीकि होता असें निरुक्तांतील वचनावरून डॉ. आंबेडकर यांनीं वरील ग्रंथांत दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचे अस्पृश्य हे एकेकाळचे लढवय्ये शूर राजे होते हेंच सिद्ध करण्याचा प्रयत्न डॉ. आंबेडकर यांनीं आपल्या वरील ग्रंथांतून केला आहे. महाराष्ट्रांत हा विचार प्रथम महात्मा फुले यांनीं १८६७ सालीं आपल्या ‘गुलामगिरी’ या पुस्तकांतून मांडला आहे. म. फुले, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व डॉ. आंबेडकर यांनीं याबाबत एकच विचार मांडला आहे असें दिसतें. परंतु कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे आणि महात्मा फुले व डॉ. आबेडकर यांच्या भूमिकेत कांहींसा फरक आहे. म. फुले व डॉ. आंबेडकर हे मुख्यत: आजचे अस्पृश्य एके काळचे माळी, कुणबी वगैरेसारखे शूद्र व क्षत्रिय होते. वंशानें ते सर्व आर्यच होते हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. उलट कर्मवीर शिंदे हे अस्पृश्य हे आर्यपूर्व वंशाचेहि असण्याचा संभव आहे, असें सूचित करतात. त्यांच्या भूमिकेंतील वरील फरक लक्षांत घेऊनसुद्धां या संशोधकांची अस्पृश्यांबाबत भूमिका पुष्कळशी समान आहे, असें दिसतें.
मानवी समाजांतील अस्पृश्यतेचें मूळ
जगांतील अस्पृश्यतेचें मूळ कशांत आहे यासंबंधीं निरनिराळ्या समाजशास्त्रज्ञांनीं व मानववंशशास्त्रज्ञांनीं वेगवेगळे सिद्धान्त मांडले आहेत. होकार्ट, इमाइल सेनार्ट, डॉ. घुर्ये, डॉ. आंबेडकर, हटन यांनीं यासंबंधीं केलेली मीमांसा महत्त्वाची आहे. परंतु कर्मवीर शिंदे यांनीं या प्रश्नांची केलेली समीक्षा वरील सर्व समाजशास्त्रज्ञांपेक्षां वेगळी आहे. मानवाच्या प्राथमिक अवस्थेंत त्याचा जादूटोणा, मंत्रतंत्र यांवर विश्वास होता. रोग बरे करायचे झाले व इडापीडा टाळायची झाली तर तो या जादूटोण्याकडे वळे. या जादूचे दोन प्रकार होते. त्यांतील एका प्रकारची जादू संकटें दूर करण्यासाठीं वापरली जाई आणि दुस-या प्रकारची जादू शत्रूला त्रास देण्यासाठीं उपयोगांत आणली जाई. या जादूटोणा करणा-या वर्गाला कोणी स्पर्श करायचा नसे. एका अर्थानें ते अस्पृश्यच होते. ही अस्पृश्यता प्रथम प्रथम वैयक्तिक व प्रासंगिक होती. परंतु पुढें तिला गूढ आणि दृढ स्वरूप प्राप्त होऊं लागलें व पुरोहितांच्या द्वारें त्याची परंपरा व घटना बनत चालली तसतशी अस्पृश्यता वैयक्तिक आणि स्थानिक स्वरूपांत न राहतां तिला जातीचें व सार्वत्रिक स्वरूप प्राप्त होऊं लागलें. अस्पृश्यतेचें मूळ अशा प्रकारें मंत्रतंत्राच्या (Magic) कल्पनेंत आहे, असें कर्मवीर शिंदे यांनीं म्हटलें आहे. आपल्या या विचाराचा प्रपंच करतांना ते आपल्या ‘भारतीय अस्पृश्यांचा प्रश्न’ या पुस्तकांत म्हणतात-
“अस्पृश्यता ही एक स्वतंत्र मानवी संस्था आहे. हिचा उदय मानवी जातीच्या अगदीं प्राथमिक स्थितींतच झाला असला पाहिजे. भूत, प्रेत, पिशाच्च, इत्यादि कल्पना मानवी जातीच्या प्राथमिक म्हणजे अगदीं रानटी स्थितींत सर्वत्र पसरलेल्या होत्या. तौलनिक धर्मशास्त्रांत ह्या कल्पनासमुच्चयाला भूतवाद (Animism) असें नांव आहे. हा भूतवाद व ह्याप्रमाणेंच इतर प्राथमिक धर्माच्या अडाणी कल्पना व त्यावरून बनलेल्या जादूटोणा, थातुरमातुर, इत्यादिकांना मीं पुढें अपधर्म असें नांव दिलें आहे. ज्या धर्माचा पाया मानवी प्रज्ञा आहे तो जरी निष्काळजीपणामुळें विकृत झाला तरी त्याला मी अपधर्म हें नांव देणार नाहीं. रागावलेल्या भुतांना संतुष्ट करणें किंवा एखाद्या भुताला लालूच दाखवून किंवा (एखाद्या भुताला भेडसावून त्याच्याकडून आपल्याला इष्ट असा अर्थ किंवा अनर्थ घडवून आणणें शक्य आहे, अशी प्राथमिक मानवाची समजूत असे. ह्या समजुतीप्रमाणें जादू, टोणा, मंत्र, तंत्र, यंत्र, वगैरे जे अपधर्माचे अनेक प्रकार असत त्याला अभिचार (Magic) असें एक सामान्य नागर नांव देतां येईल. ह्याचे कृष्ण अभिचार (Black magic) आणि भेषज (Medicinal) अथवा शुक्ल अभिचार (White magic) असे दोन मुख्य प्रकार सुधारलेल्या वैदिक काळांतहि होते..... जन्म, मृत्यु, सांथीचे रोग व इतर आकस्मिक आपत्ति ह्यांचा संबंध प्राथमिक जगांत भुताखेतांकडे आणि क्रुद्ध देवतांकडे लावण्यांत येत असे. त्याचें निवारण करण्यांत निष्णात असे पंचाक्षरी अथवा वैदु (Medicine men) होते. तेच पूर्वकाळचे ऋषि आणि पुरोहित असत. त्यांच्या
ब-यावाईट क्रियांना जादू किंवा अभिचार म्हणतां येईल. ह्याप्रमाणें ह्या जादूचा प्राचीन धर्मांत समावेश झाला, तो अद्यापि पुष्कळ ठिकाणीं सामान्य जनतेंत प्रचलित आहे. ह्या अपधर्मांतच अस्पृश्यतेचा उगम आहे.
प्रथम प्रथम ही अस्पृश्यता वैयक्तिक व प्रासंगिक उर्फ नैमित्तिक होती. बाळंतीण व तिची खोली, मृतांची जागा व आप्त, विशिष्ट रोगी, झपाटलेलीं माणसें, विक्षिप्त झाडें, खुनासारख्या अपघाताचीं ठिकाणें वगैरे बाबी अस्पृश्य आणि वर्जनीय ठरल्या. जादू करणारे जादूगार आणि पुरोहित हे देखील सोवळे म्हणजे एक प्रकारें अस्पृश्यच असत. देवपूजा करणा-या ब्राह्मणाला आणि यज्ञपरिषद् चालू असेतोपर्यंत सर्व ऋत्विजांना आणि इतर याज्ञिकांना नेहमीं सोवळ्यांत म्हणजे अस्पृश्य अथवा अलग स्थितींतच राहावें लागे. ... ... अशा अपधर्माला उत्तरोत्तर जसजसें गूढ आणि दृढ स्वरूप प्राप्त होऊन पुरोहितांच्या द्वारें त्याची परंपरा आणि घटना बनत चालली तसतशी ह्या अस्पृश्यतेच्या वैयक्तिक आणि स्थानिक स्वरूपाची परिणती जातीय आणि सार्वत्रिक उर्फ नित्य स्वरूपांत होऊं लागली........ आणि अस्पृश्यतेचें मूळ कारण हा जो अभिचारमूलक अपधर्म तो जरी पुढें लुप्त होऊन विस्मृत झाला तरी जातीय अस्पृश्यता शिल्लक उरलीच.”
(भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, पृ १२-१४)
अस्पृश्यता हिंदुस्थानांतच कां स्थिरावली?
अस्पृश्यता मानवाच्या प्राथमिक अस्थेंत सर्वत्रच उद्याला आली, परंतु ती हिंदुस्थानांतच शेंकडों वर्षें कां स्थिरावली व तिला इतकें घृणास्पद स्वरूप कां प्राप्त झालें हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यासंबंधीं कर्मवीर शिंदे यांनीं वरील ग्रंथांत मीमांसा केली आहे. भारतीय समाजांत अस्पृश्यता शेंकडों वर्षें टिकून राहिली याचें मुख्य कारण हा समाज स्वयंपूर्ण ग्रामरचनेवर उभारला आहे, असें त्यांना वाटतें. आमच्या ग्रामसंस्थेबरोबर अस्पृश्यतेमागील तात्विक भूमिका महत्त्वाची आहे. कर्मविपाकाचा सिद्धान्त, पुनर्जन्माची कल्पना हा जातिव्यवस्थेचा व अस्पृश्यतेचा तात्त्विक पाया आहे. अस्पृश्यतेविरुद्ध शेंकडों वर्षें वैचारिक बंड होऊं शकलें नाहीं याचें प्रमुख कारण या तत्त्वज्ञानात्मक अधिष्ठानांतहि असण्याचा संभव आहे. कर्मवीर शिंदे यांच्या विवेचनांतून हा विचार निसटलेला असावा असें वाटतें.
महाराष्ट्रांतील मराठे शकवंशाचे
‘मराठ्यांची उपपत्ति’ या लेखांत कर्मवीर शिंदे यांनीं महाराष्ट्रांतील मराठ्यांचें मूळ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. भाषाशास्त्र, समाजशास्त्र व लिखित पुरावे यांच्या आधारें मराठे हे शक वा पल्लव वंशाचे असावे असें त्यांनीं या लेखांत म्हटलें आहे. त्यांच्या वरील तीन प्रकारच्या पुराव्यांमध्यें समाजशास्त्रीय पुरावे विशेष महत्त्वाचे आहेत. शक वा पल्लव आणि मराठे यांच्या चालीरीति, आहार, पडदा-पद्धति, धर्मकल्पना, व्यवसाय, पोशाख-पद्धति, यांमध्यें मोठें साम्य आहे. यावरून मराठे हे शक वंशाचे असावे असें त्यांनीं सुचविलें आहे. गेल्या कांहीं वर्षांत महाराष्ट्रांतील लोकसमूहाचें मानववंशशास्त्रदृष्ट्या जें संशोधन झालें आहे त्यावरून कर्मवीर शिंदे यांच्या वरील निष्कर्षास पुष्टीच मिळते असें दिसतें. डॉ. इरावती कर्वे यांनीं महाराष्ट्रांतील वेगवेगळ्या जातींची मानवशास्त्रदृष्ट्या जी पाहणी केली त्यावरून त्यांनीं वरीलसारखाच निष्कर्ष काढला आहे. ‘मराठी लोकांची संस्कृति’ या ग्रंथांत त्या म्हणतात, “मराठे व इतर जाती आल्या कोठून हा प्रश्न शिल्लक राहतोच. मध्ययुगाच्या सुरुवातीस रजपुतांचें नांव प्रथम ऐकूं येतें. नंतर गुर्जरांचें ऐकूं येतें व गुर्जर रजपुतांपैकींच एक टोळी असावी असें दिसतें; पण त्यांच्याहि आधीं महाराष्ट्राच्या इतिहासांत अतिप्राचीन काळीं महाराष्ट्राचे पहिले राजे जे शातवाहन ते पश्चिमेकडून येणा-या शकांच्या आक्रमणाला तोंड देत होते असा इतिहास आहे. आर्यांच्या टोळ्या उत्तरेकडून दक्षिणेकडे ज्याप्रमाणें शतकेंच्या शतकें येत होत्या व जुन्या स्थायिक आर्यांचें जसें नव्यांशीं युद्ध होत होतें, तसेंच शकांच्या बाबतींत झालें असणार. शक लोक उत्तरेकडून येऊन गुजरातेंतून महाराष्ट्रांत शिरले, ते एका लहानाशा कालखंडांत नसून त्यांचें वांशिक आक्रमण कित्येक शतकें चाललेलें असण्याचा संभव आहे. ह्या शकांपैकींच अगोदर आलेल्या वंशांतील शातवाहन राजे असावेत असें दिसते. ह्या राजांचें राज्य जरी प्रतिष्ठानीं होते तरी सर्व महत्त्वाचे शिलालेख पश्चिमपट्टींत आहेत, हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे व त्या शिलालेखांत स्वत:स महारठी व महारठीजी म्हणविणारे लोक म्हणजेच मराठे असावे असा कयास करण्याजोगा आहे. रजपुत लोक हिंदुस्थानांत येण्याच्या आधीं कित्येक शतकें मराठी लोक महाराष्ट्रांत स्थायिक होऊन, राज्यें स्थापून, राहिले होते व ते इतिहासांत प्रसिद्ध पावलेल्या शक वंशापैकीं अगदीं पहिल्यानें आलेले वसाहतकार असावे असा तर्क करण्यास सध्यां हरकत दिसत नाहीं.” (मराठी लोकांची संस्कृति, पृ. १५३.)
कर्मवीर शिंदे आपल्या वरील लेखांत रजपूत व मराठे हे एकाच वंशाचे असावे असें भाषाशास्त्रीय पुराव्याच्या आधारें म्हणतात. परंतु डॉ. इरावती कर्वे यांनीं मानववंशशास्त्राच्या आधारें काढलेल्या निष्कर्षाशीं तो जुळतामिळता नाहीं. ‘रजपूत लोक दीर्घमस्तक आहेत’ व ‘मध्य महाराष्ट्रांतील बलाढ्य मराठा शेतकरी मध्यम कपाल आहेत’ व यावरून मराठे व रजपूत एकाच वंशाचे नव्हेत, असें डॉ. इरावती कर्वे म्हणतात. कोणताहि समाज पूर्णपणें एकाच वंशाचा आहे असें शास्त्रीय दृष्ट्या म्हणणें अवघड आहे. प्राचीन काळीं अनेक वंशांची परस्परांमध्यें मिसळ झाली आहे. त्यामुळें वरील विधान कांटेकोरपणें करतां येणार नाहीं. स्थूल अर्थानेंच तें आतां घ्यावें लागेल.
मराठी भाषेचा प्रवास
कर्मवीर शिंदे यांनीं अस्पृश्यता, भक्तिमार्ग, महाराष्ट्रांतील मराठे यांचें मूळ शोधण्याचा जसा प्रयत्न केला आहे त्याचप्रमाणें मराठी भाषेचें मूळ कोठें आहे याचाहि त्यांनीं शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. याहिबाबत त्याचीं मीमांसा भाषाशास्त्राच्या दृष्टीनें विचारप्रवर्तक ठरेल, निदान विचारवंतांच्या विचाराला खाद्य पुरविणारी ठरेल, असा विश्वास वाटतो. महाराष्ट्रांतील मराठी ही मगध, पश्चिम बंगाल, ओरिसा, तेलंगण या प्रांतांतून प्रवास करीत करीत महाराष्ट्रांत आलेली असावी असें त्यांना वाटतें. आपल्या या विचाराचें विवरण करीत असतां ते म्हणतात, “बंगाल, ओरिसा, तेलंगण आणि दक्षिण कोंकण ऊर्फ केरळ या चार प्रांतांतून गेल्या दोन वर्षांत मला प्रवास करावा लागला. त्यावरून हल्लींची मराठी ही केवळ महाराष्ट्री असें नांव असलेल्या एका प्राचीन प्राकृतांतूनच आलेली नसून ती मगध देशांतून पश्चिम बंगाल, ओरिसा, तेलंगण, व-हाड आणि एक हजार वर्षांपूर्वींचा उत्तर कर्नाटक (कृष्णा आणि गोदावरी ह्यामधला भाग) या प्रांतांतून प्रवास करीत आलेली एक भाषा असावी, असा माझा पूर्ण ग्रह बनत चालला आहे. इतकेंच नव्हे तर अशा अर्धवट बनलेल्या स्थितींतच ही प्रगमनशील भाषा सुमारें हजारबाराशें वर्षांत उत्तर कोंकण ऊर्फ अपरांत या प्रांतीं आणि तेथून खालीं दक्षिण कोंकण ऊर्फ केरळ या प्रांतांत उतरली आणि त्या दोनहि प्रांतांत हल्लीं ही मालवणी, गाहेनी आणि कोंकणी या नांवांनीं रूढ आहे.” (पृ. १६६.) याला पुरावा म्हणून त्यांनीं भाषाशास्त्रांतील कांहीं वाक्यरचनेच्या वैशिष्ट्यांचा दिला आहे. मराठीच्या रूपांचा कल गुजराथी, सिंधी अगर हिंदीपेक्षां बंगाली अथवा ओरिसा भाषेंतील काळांच्या आणि प्रयोगांच्या रूपांकडे अधिक झुकता आहे, असें त्यांनीं दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय स्वरवैशिष्ट्याच्या दृष्टीनेंहि मराठी, कोंकणी, बंगाली या परस्परांना अधिक जवळच्या भाषा आहेत. कर्मवीर शिंदे यांनीं या भाषेंतले ध्वनि, त्यांच्यांतली रूपसिद्धि यांच्या साह्यानें मराठीचें मूळ मगध व पश्चिम बंगाल येथें शोधण्याचा जो प्रयत्न केला आहे तो भाषाशास्त्राच्या दृष्टीनें चिंतनीय ठरेल असा विश्वास वाटतो.
कोंकणी व मराठी यांच्या परस्पर संबंधाबद्दल कर्मवीर शिंदे यांनीं भाषाशास्त्राच्या भूमिकेवरून चिकित्सा केली आहे व कोंकणी ही मराठीचीच पोटभाषा आहे, असें त्यांनीं दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यासंबंधीं भाषाशास्त्रज्ञांमध्यें दोन विचारप्रवाह स्पष्ट दिसून येतात. यांतील एका विचार प्रवाहाचें असें मत आहे कीं, कोंकणी ही मराठीची पोटभाषा नसून ती तिची भाषाभगिनी आहे. गुजराथी, हिंदी या इतर भाषाभगिनी ज्याप्रमाणें संस्कृतापासून स्वतंत्रपणें निर्माण झाल्या त्याचप्रमाणें कोंकणी ही देखील संस्कृतपासून स्वतंत्रपणें जन्माला आलेली आहे. या भाषाशास्त्रज्ञांच्या प्रतिपादनाचें मुख्य सूत्र असें कीं, कोंकणीची उच्चारणपद्धति, हेल, आंदोलन, आघात, इत्यादि बाबतींत कोंकणी ही मराठीपेक्षां पुष्कळच भिन्न आहे. शिवाय ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या दृष्टीनें या दोन्ही भाषांचा अभ्यास केला तर असें दिसून येईल कीं ज्या स्थित्यंतरांतून परिवर्तित होत संस्कृताची ध्वनिरचना मराठी ध्वनिरचनेपर्यंत येऊन पोहोचली आहे त्याच मार्गानें संस्कृतचे ध्वनि कोंकणीपर्यंत येऊन पोहोचलेले असण्याचा दाट संभव आहे. याशिवाय या विचाराचे प्रवक्ते आणखी असा एक पुरावा पुढें मांडतात कीं, कोणतीहि भाषा दुस-या भाषेची पोटभाषा आहे कीं नाहीं हें ठरविण्याचा एक साधा निकष आहे. ही पोटभाषा बोलणा-या माणसाची भाषा दुस-या माणसाला पूर्वींचा अभ्यास नसतांना व फारसें आयास न घेतां जर ती समजत असेल तरच ती भाषा मुख्य भाषेची पोटभाषा आहे असें समजावें. पोटभाषा आहे कीं नाहीं हें ठरविण्याचा हा एक अतिशय महत्त्वाचा मानदंड आहे, असेंहि पहिल्या विचारप्रवाहाचे प्रवक्ते सांगतात. या दृष्टीनें कोंकणी ही विशेषत: दक्षिण कोंकणी ही मराठी भाषिकाला विनायास व पूर्वाभ्यास नसतांना समजणें केवळ अवघडच नव्हे तर अशक्य आहे. या दृष्टीनें कोंकणी ही मराठीची पोटभाषा नव्हे तर भाषाभगिनी आहे, असें भाषाशास्त्रज्ञ सांगतात. या प्रवाहाचे मुख्य प्रवक्ते म्हणून डॉ. सु. मं. कत्रे व डॉ. ना. गो. कालेलकर यांचा उल्लेख करतां येईल. याबाबतचा दुसरा विचारप्रवाह असें मानतो कीं, कोंकणी ही मराठीचीच एक पोटभाषा आहे. हा विचार मुख्यत: डॉ. भांडारकर, डॉ. पां. दा. गुणे, डॉ. ग्रिअर्सन यांनीं शास्त्रीय पद्धतीनें मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कर्मवीर शिंदे हे यांपैकीं या दुस-या विचारप्रवाहाचे एक प्रमुख प्रवक्ते आहेत. कोंकणी ही मराठीचीच पोटभाषा कशी आहे हें दाखवितांना ते म्हणतात, “क्रियापदांच्या काळांचीं रूपें, पाहिलीं असतां कोंकणीचें इतर कोणत्याहि चालू प्राकृतापेक्षां मराठीशीं विलक्षण साम्य आहे. इतकेंच नव्हे तर, गुजराथी, सिंधी अगर हिंदीपेक्षांहि बंगाली अथवा ओरिसा भाषेंतील काळांच्या आणि प्रयोगांच्या रूपांकडे तिच्या रूपांचा अधिक कल झुकत आहे. आणि तसाच मराठीच्याहि रूपांचा झुकत आहे. ह्या गोष्टीवरून मराठी भाषा बंगालचा पश्चिम भाग आणि ओरिसा ह्या प्रांतांतून प्रवास करून दक्षिणेंत आल्यावर तिचें जें रूप बनलें तें रूप सारस्वतांनीं कोंकणांत नेलें असावें असें अनुमान होतें.” पुढें मराठीचा व कोंकणीचा संबंध ज्ञानेश्वरकालीं कांहीं वर्षें आला. परंतु त्यानंतर ज्ञानेश्वरकालीन मराठी घेऊन कांहीं लोक गोव्याकडे गेले व पुढें सह्याद्रि पर्वतामुळें व त्याकाळीं दळणवळणाचीं साधनेंहि मर्यादित असल्यामुळें त्यांचे संबंध पुढें पुरेसे राहूं शकले नाहींत. पुढें कोंकणीची व मराठीची वाढ कांहींशा वेगळ्या पद्धतीनें झाली. परंतु तरीदेखील आजच्या कोंकणीवर ज्ञानेश्वरकालीन मराठीची छाप आहे, असें कर्मवीर शिंदे सांगतात. ज्ञानेश्वरकालीं कांहीं काळ एकत्र आल्यानंतर मराठीचा प्रवास कोंकणांत कसा झाला असावा यासंबंधींचें विवेचन करतांना ते म्हणतात, “मराठीचा आणि सारस्वत ब्राह्मणांचा समागम इ. स. १२०६ आणि १२९० च्या दरम्यान घडला असावा व त्यानंतर हे लोक ही नवीन अर्धवट संपादिलेली ज्ञानेश्वरीच्या काळची जुनी मराठी घेऊन कोंकणांत गेलेले असावेत. त्यानंतर त्यांचा आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडील मराठीचा संबंध तुटल्यामुळे त्यांच्या पुढील विकासात फरक पडलेला असावा.” (पृ. क्र. १४७-४८) कर्मवीर शिंदे यांचें हें विवेचन पुष्कळच विचार करण्यासारखें आहे. पुढें मराठीवर फारशी आणि इंग्रजीचे दीर्घ आणि दृढ संस्कार झालेले आहेत. त्याचप्रमाणें कोंकणीवर, विशेषत: अतिदक्षिणेकडील कोंकणीवर कानडी आणि पोर्तुगीज यांचा ठसा उमटला आहे. त्यामुळें पुढील काळांत दोन्ही भाषांच्या वाढीमध्यें फरक पडणें स्वाभाविक आहे.
कर्मवीर शिंदे यांनीं हें विवेचन केल्यानंतर गेल्या कांहीं वर्षांत याविषयीं जे नवीन पुरावे पुढें आले आहेत त्यावरून त्यांच्याच विचाराला पुष्टी मिळत आहे. खांडोळे या गांवाच्या गांवक-यांनीं तयार करविलेला इ. स. १३०० मधील ताम्रपट, वेरे गांवचा इ. स. १३४८ मधील ताम्रपट, वेळुस व फोंड्यांतील बांदोडे गांवचे इ. स. १४१३ मधील शिलालेख जे उपलब्ध झाले आहेत त्यांवरून कोंकणी ही मराठीचीच पोटभाषा असावी असें दिसतें. कारण या सर्व लेखांतील भाषा व महाराष्ट्रांतील तत्कालीन लेखांतील भाषा यांत फार मोठें साम्य आहे, असें भाषाशास्त्रज्ञांचें मत आहे. त्याचप्रमाणें गोमंतकांतील ग्रामसंस्था, देवालयें, पाटील-कचे-या यांचें दफ्तर फार प्राचीन कालापासून अद्यापपर्यंत मराठींतून असे व सर्व वर्गांचे गोमंतकीय हिंदु आपले खाजगी व्यापारविषयक पत्रव्यवहार व टिपणें मराठींतूनच करीत असत. अद्यापहि ते मराठींतूनच करतात. एवढेंच नव्हे, तर फादर स्टिफन्स, पाद्री इ तेव द भूज, पाद्री आंतोनिओ द सात्वांज इत्यादि मिशन-यांनीं सोळाव्या सतराव्या शतकांत ख्रिस्तांवरील पुराणें रचलीं तीं मराठींतूनच. त्या काळीं बहुसंख्य समाजाची भाषा मराठीच असल्यामुळें त्यांच्या गळीं उतरविण्यासाठीं त्यांना आपले धर्मग्रंथ मराठींतूनच लिहावे लागले. शिवाय पोर्तुगीज सरकार देखील आपल्या सरकारी गॅझेटांत विशेष प्रसिद्धि द्यावयाच्या मजकुराचें मराठींत भाषांतर देत असें. यावरूनहि त्या काळांतील बहुजन समाजाची भाषा मराठीच असावी असें दिसतें. कर्मवीर शिंदे यांनीं यासंबंधीं केलेलें विवेचन त्यामुळेंच काळाच्या कसोटीला उतरत आहे, असें वाटतें.

ज्ञानेश्वरकालीन मराठी घेऊन गेलेल्या सारस्वतांच्या कोंकणीमध्यें त्या काळांतील मराठी शब्द मोठ्या संख्येनें आढळतात. हें भाषाशास्त्रज्ञांचें मतहि विचारांत घेण्यासारखें आहे. शिवकालामध्यें छत्रपति शिवाजी महाराजांचे बंधु व्यंकोजी यांच्या बरोबर कांहीं मराठी कुटुंबें शिवकालीन मराठी घेऊन तंजावरकडे गेले. त्यानंतर त्यांच्या मराठीचे व मध्यवर्ती मराठीचे संबंध तुटले. त्यामुळें आज तंजावरकडील मराठी व महाराष्ट्रातील मराठी यांत पुष्कळच फरक पडला आहे. परंतु तंजावरकडील मराठीवर अद्यापहि शिवकालीन मराठीची छाप दिसते. त्याचप्रमाणें गोव्यांतील सारस्वतांच्या कोंकणी भाषेबाबत झालेलें असण्याचा संभव आहे.
हा प्रश्न भाषाशास्त्रज्ञांचा आहे. भाषाशास्त्रीय कसोटीवर घासुन पुसूनच या प्रश्नांचें निर्णायक उत्तर दिलें गेलें पाहिजे. परंतु एखाद्या भाषेचा अभ्यास करीत असतांना केवळ एकाच भाषाशास्त्रीय भूमीकेवरून अलगअलगपणें विचार करतां येणार नाहीं. त्या भाषीक गटांचे सांस्कृतीक संबंध, त्यांचे धर्मग्रंथ इत्यादि इतर अंगांचाही विचार झाला पाहीजे. या सर्वांगीण विचारपद्धतींतूनच या प्रश्नांचाहि अभ्यास झाला पाहिजे. या दृष्टीनें कर्मवीर शिंदे यांनीं प्रतिपादलेल्या विचाराला अधिकाधिक पुष्टि मिळेल, असें वाटतें.
खरा प्रश्न नैतिक मूल्यांचा आहे
इ. स. १९२० नंतर म. गांधींच्या नेतृत्वाखालीं राष्ट्रीय चळवळीला नवा जोम प्राप्त होऊं लागला. त्यानंतर या चळवळीचे  पडसाद कमी जास्त प्रमाणांत संस्थानी मुलखांत उमटूं लागले. संस्थानांतूनहि लोकप्रतिनिधींनीं जबाबदार राज्यपद्धति सुरू करावी अशी मागणी संस्थानी चळवळींतून  होऊं लागली. अशा  या काळांत भोर संस्थानांतहि लोकांनी अशा प्रकारची मागणी करण्यासाठीं चळवळ सुरू केली होती. भोर संस्थानांतील चळवळीचें नेतृत्व त्या वेळीं शेटे-पोतनीस यांच्याकडे होतें. अशा वेळीं ( इ. स. १९२८ ) कर्मवीर शिंदे यांच्या अध्यक्षतेखालीं ‘अखिल भोर संस्थान परिषद’ भरली होती.
या वेळीं कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी सत्ता हस्तांतरीत होण्याच्या संदर्भांत कांहीं मूलग्रामी विचार मांडलेले आहेत. सत्ता केवळ राजाच्या हातांतून लोकप्रतिनिधींच्या हातांत जाणें म्हणजे महत्त्वाचें स्थित्यंतर नव्हे तर सर्वसामान्य माणसांबद्दल व प्रजेबद्दल सहानुभूति ठेवून त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टि निकोप करणें ही खरी सुधारणा होय. सत्ता केवळ एकाच्या हातांतून दुस-याच्या हातांत जाऊन हा प्रश्न सुटणार नाहीं. खरा प्रश्न सत्तेच्या हस्तांतराचा नसून नैतिक मूल्यांचा, शीलाचा वा विशाल अंतःकरणाचा आहे. आपला हा विचार मांडीत असतांना ते आपल्या अध्यक्षीय भाषणांत म्हणतात, “ लोक-कल्याण म्हणजे नुसतीच सनदेची अदलाबदल नव्हे, शीलाची व अंतःकरणाची पालट होय. ती पालट सावकाश घडत असते आणि ती घडवून आणण्याचें अधिक कठीण काम भावी शेटे-पोतनिसांवर अवलंबून आहे. ते कोणोहि असोत, हें काम करोत एवढेंच आमचें म्हणणें आहे. हल्लींचेंच ब्रिटिश हिंदुस्थान घ्या. त्यांत लोकनियुक्त कौन्सिलें थोड्याफार प्रमाणांत का होईना आहेतच. तेथील कारभार किती मिंधेपणाचा आहे, केवळ पगारासाठीं भुकेलेल्या नामधारी लोकमंत्र्यांना परकीय नोकरशाही कशी बोटांवर नाचविते, हें काय संस्थानिकांनो, तुमच्या नजरेंत येत नसेल ? खालसांतल्या म्युनिसिपालिट्या, लोकलबोर्डें, युनिव्हर्सिट्या, फार काय पण मोठमोठीं लोकांचीं हॅस्पिटलें, शाळा आणि वसतिगृहें ह्यांत तर परकीय नोकरशाहीचा हात नसतो ना? मग तीं कितीशीं ख-या दीनदुबळ्या प्रजेच्या इच्छांना व गरजांना जबाबदार आहेत ?  नसल्यास कां नाहींत ? कारण तेंथें शीलाची अद्याप आलटापालट झाली नाहीं. म्हणूनच महात्मा गांधीसारखे मोठमोठे शासनाचार्य कळवळ्यानें सांगत आहेत, कीं बाबांनों, नुसत्या सनदेची पालट करूं नका, तर शीलाची नव्हे प्रत्यक्ष हृदयाची – करा.” ( पृ. पान २८६.) केवळ सत्ता एकाच्या हातांतून  दुस-याच्या हातांत जाण्यापेक्षां मूल्यांच्या परिवर्तनावर दिलेला हा भर केवळ त्या काळांतच नव्हे, तर आज ना यापुढेंहि अनेक वर्षें महाराष्ट्राला मार्गदर्शक ठरणार आहे.
शासनयंत्रणेबाबत दोन विचारप्रवाह
महाराष्ट्राच्या शासनयंत्रणेविषयीदेखील त्यांनीं कांहीं महत्त्वाचे विचार मांडलेले आहेत. स्थूल मानानें १८१८ नंतर इंग्रजी राजवटीमुळें आपल्यापुढें नवीन शासनयंत्रणा सुरू झाली. अगदीं प्रारंभींपासूनच येथील शासनयंत्रणेसंबंधीं महाराष्ट्रांत दोन विचारप्रवाह निर्माण झाले. ते जवळ जवळ समांतर रेषेनें आमच्या समाजजीवनांत वाहात आहेत. येथील एका विचारप्रवाहानें मुख्यतः नागर भागांतील उच्चवर्गीय समाजाच्या शासनविषयक प्रश्नांचा विचार केला व या संदर्भांत त्यांनीं या देशांतील शासनयंत्रणेचें जास्तीत जास्त लवकर भारतीयीकरण झालें पाहिजे, आय. सी. एस्. श्रेणीमध्यें जास्तींत जास्त हिंदी लोकांचा समावेश झाला पाहिजे, यासाठीं आय. सी. एस्. ची परीक्षा इंग्लंडप्रमाणेंच हिंदुस्थानांतहि एकाच वेळीं सुरू झाली पाहिजे, या परिक्षेसाठीं बसावयाची वयोमर्यादा एकवीसवरून तेवीसवर नेली पाहिजे इत्यादि गोष्टींवर भर दिला. याशिवाय मोठमोठ्या शहरांतून इंग्रज अधिकारी नागरिकांवर अन्याय, जुलूम, जबरदस्ती करीत, त्याविरूद्धहि आवाज उठविला. नागर भागांतील अन्यायाविरूद्ध आवाज उठवून परकीय नोकरशाहीवर येथील विचारवंतांच्या एका शाखेनें टीका केली. या विचारप्रवाहाचे प्रवक्ते मुख्यतः लोकमान्य टिळक, नामदार गोखले, फिरोजशहा मेहथा हे होते.
येथील दुस-या विचारप्रवाहानें मुख्यतः खेड्यापाड्यांतील शासनविषयक प्रश्नांचा विचार करून स्वकीय नोकरशाहीचे दोष उजेडांत आणले व ही शासनयंत्रणा अधिक लोकाभिमुख व विशुद्ध करण्याच्या कल्पनेवर भर दिला. या विचारप्रवाहाचें जनकत्व महात्मा फुले यांच्याकडे जातें. त्यांनीं आपल्या  ‘गुलामगिरी’ या पुस्तकांतून आमचेच अधिकारी खेड्यापाड्यांतील अडाणी शेतकरी, गरीब मजूर, अस्पृश्य यांच्यावर कशी जुलूमजबरदस्ती करीत असतो याचें विदारक चित्र उभें केलें. खेड्यापाड्यांतील या मामलेदार, कुलकर्णी, सबजज्ज यांच्याकडून ग्रामीण जनतेची कशी अडवणूक होत आहे याचें तपशीलवार वर्णन केलें. शासनविषयक यंत्रणेच्या प्रश्नांचा विचार करणा-या या दुस-या परंपरेंत कर्मवीर शिंदे यांचें महत्वाचें स्थान आहे. त्यांच्या अनेक लेखांतून व भाषणांतून त्यांनीं आमचीच खेड्यापाड्यांतील नोकरशाही  कशी अधिक लोकाभिमुख व ‘मानवी’ होणें जरूर आहे, याच्यावर भर दिला आहे. दुस-या विचारप्रवाहाचे एक प्रवक्ते म्हणून महाराष्ट्राच्या शासनविषयक इतिहासांत कर्मवीर शिंदे यांना महत्वाचें स्थान आहे असें वाटतें.
प्रज्ञेला व्यापक सामाजिक जाणिवेची बैठक हवी
वरील संशोधनपर लिखाणाप्रमाणें महाराष्ट्राच्या उत्कर्षाच्या दृष्टीनेंही कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनीं (महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग) या लेखांत कांहीं महत्त्वाचे विचार मांडलें आहेत. महाराष्ट्राच्या उत्कर्षाच्या दृष्टीनें त्यांनीं मांडलेले दोन विचार अधिक चिंतनीय आहेत असें वाटतें. महाराष्ट्रांतील पुढारलेल्या बुद्धिजीवी वर्गाबद्दल ते म्हणतात, हा वर्ग बुद्धिमान् व कर्तबगार आहे. परंतु या वर्गानें आपल्या सामाजिक जाणिवा व्यापक करुन बहुसंख्य समाजाच्या प्रश्नांचा आत्मीयतेनें विचार करणें जरूर आहे. हा वर्ग आत्मकेंद्रित असल्यामुळें समाजाचें नेतृत्व तो करूं शकत नाहीं. या पुढारलेल्या बुद्धिमान् वर्गाच्या प्रज्ञेला व्यापक सामाजिक जाणिवेची बैठक मिळाली तरच ती अधिक फलदायी व उपकारक ठरेल. अण्णासाहेब शिंदे यांचा हा विचार मूलगामी आहे असें वाटतें. माणसाची प्रज्ञा ही व्यापक सहानुभूतीच्या आधारानें पावलें टाकूं लागली तरच ती अधिक समाजास उपकारक ठरते. प्रज्ञेचें महत्त्वहि त्यामुळें वाढतें. महात्मा गौतम बुद्धाचें श्रेष्ठत्व त्याच्या प्रज्ञेंत आहे, त्याचप्रमाणें त्याच्या व्यापक करुणेंत वा सामाजिक जाणिवेंत आहे. प्रज्ञा व करुणा यांचा सुंदर मिलाफ त्याच्या जीवनकार्यांत झाला यांतच बुद्धाच्या मोठेपणाचें रहस्य आहे. याचाच प्रत्यय आपणांस सॉक्रेटिस, बुद्ध, टॉलस्टॉय यांच्याहि जीवनकार्यांत येतो. या दृष्टीनें बुद्धिमान वर्गाच्या प्रज्ञेला व्यापक सहानुभूतीची वा करुणेची बैठक मिळणें जरूर आहे, असा जो विचार अण्णासाहेब शिंदे यांनीं मांडला आहे तो खासच महत्त्वपूर्ण आहे.
वैश्य वर्ण वाढला पाहिजे
महाराष्ट्राच्या उत्कर्षासंबंधीं त्यांचा दुसरा विचार येथील व्यापार, कारखानदारी, उद्योगधंदे यांच्या वाढीसंबंधींचा आहे. महाराष्ट्रांत मुख्यतः ब्राह्मण व क्षत्रिय हे दोनच वर्ण वाढले. तिसरा वैश्य वर्ण येथें वाढलाच नाहीं. औद्योगिक क्रांतीनंतरच्या नव्या उद्योगप्रधान समाजांत तिसरा वैश्यवर्ण वाढल्याशिवाय कोणताहि समाज उत्कर्षाला जाऊं शकत नाहीं, असें त्यांनीं सुचविलें आहे. या दृष्टीनें महाराष्ट्रानें आपलें लक्ष या उपेक्षित अशा तिस-या वर्णाकडे द्यावें असें त्यांनीं आग्रहानें सांगितलें आहे. महाराष्ट्राच्या गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासांत येथील तिसरा वैश्यवर्ण फारसा वाढलाच नाहीं, असें आपणांस दिसून येईल. येथील व्यापार त्यामुळेंच उत्तरेकडून  आलेल्या गुजराथी, मारवाडी लोकांच्या हातांत आहे वा दक्षिणेकडून आलेल्या लिंगायत लोकांच्या हातात गेला. फाळणीनंतर आतां तो सिंधी लोकांच्याकडे चालला आहे. या दृष्टीनें महाराष्ट्रांत वैश्यवर्ण हा उपेक्षितच राहिला, असें आपणांस दिसून येईल. याचीहि मीमांसा झाली पाहिजे व महाराष्ट्र या उपेक्षेच्या वृत्तींतून बाहेर पडला पाहिजे. गुजराथ, सौराष्ट्र व सिंध येथील गुजराथी, मारवाडी वा सिंधी समाजांत व्यापार व उद्योगधंदे यांची वाढ झाली याचें कारण बहुधा या भागाला लागून असलेला समुद्रकिनारा असावा. समुद्रमार्गें या भागाचा अगदीं प्राचीन काळापासून बाहेरच्या देशांशीं व्यापारउदीम चालत होता. हिंदुस्थानांतला व्यापार येथील जैनधर्मीयांच्या हातांत अनेक शतकें होता व आहे. याचें मूळ त्यांच्या धार्मिक शिकवणुकीमध्यें आहे असें वाटतें. जैन धर्म हा अहिंसा हाच परमधर्म आहे असें मानतो. त्यामुळें या धर्मांतील अनुयायी युद्धाकडे मोठ्या प्रमाणांत वळूं शकले नाहींत किंवा शेतीकडेहि वळूं शकले नाहींत. कारण शेतींतहि कळत न कळत जीवनहिंसा होते अशी या धर्माची श्रद्धा आहे. हे दोन्ही मार्ग बंद झाल्यामुळें हा समाज स्वाभाविकच मोठ्या प्रमाणावर व्यापारउदीमाकडे वळला. निरनिराळ्या ठिकाणीं वरील वेगवेगळे समाज वैश्य व्यापारउदामाकडे वळला. निरनिराळ्या ठिकाणी वरील वेगवेगळे समाज वैश्य वर्णाकडे कां वळले यांचीं वेगवेगळीं कारणें आपणांस सांपडतील, परंतु महाराष्ट्रांत हा वर्ण कां वाढूं शकला नाहीं याचें समाधानकारक उत्तर अद्यापहि मिळत नाहीं. येथें कदाचित् ब्राह्मण व क्षत्रिय या वर्णांप्रमाणें तिस-या वैश्य वर्णाला पुरेशी सामाजिक प्रतिष्ठा मिळालेली नसावी आणि स्वाभाविकच समाजांतील कर्तबगार माणसें प्रतिष्ठेच्या व्यवसायाकडे वळतात. त्यामुळेंहि या तिस-या वर्णाची उपासमार झाली असावी. परंतु पुन्हां असा प्रश्न उपस्थित होतो कीं, येथें या तिस-या वर्णाला प्रतिष्ठा तरी कां नाहीं प्राप्त झाली. याचीं कारणें येथींल भौगोलिक व आर्थिक परिस्थितींत कितपत होतीं याचेंहि संशोधन झालें पाहिजे. या वर्णाच्या उपेक्षेचीं कारणें कांहींहि असोत, महाराष्ट्रानें व्यापार, उद्योगधंदे, कारखाने इकडे यापुढील काळांत उपेक्षेनें पाहून चालणार नाहीं, हा आण्णासाहेब शिंदे यांचा इशारा महत्त्वाचा आहे, यांत शंका नाहीं.
महाराष्ट्र, हिंदुस्थान व जग : परस्पर संबंध
महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा विचार करतांना महाराष्ट्रीयांना ते आणखी एक महत्त्वाचा विचार सांगत आहेत. महाराष्ट्राच्या प्रकृतींतील जातीभेद, प्रांतभेद हे सर्व गेले पाहिजेत व येथील समाजांत एकात्मता निर्माण झाली पाहिजे, हें ते आग्रहानें सांगतात. परंतु महाराष्ट्रांत एकात्मता करीत असतांना महाराष्ट्र हा व्यापक अशा भारताचा एक घटक आहे हा विचार सुटूं नये असेंहि ते आग्रहानें सांगतात. व्यापक हिंदुस्थानचा एक घटक या संदर्भांतच महाराष्ट्राचा विचार झाला पाहिजे. भारतीय समाजाच्या एकात्मतेच्या द्ष्टीनेंहि त्याचा हा विचार महत्त्वाचा आहे. परंतु भारतीय एकात्मतेचा विचार करीत असतांना भारत हाहि मोठ्या विश्वाचा एक घटक आहे याचें अवधान सुटूं देऊं नका, असें त्यांनीं सुचविलेलें आहे. प्रांत, देश व जग यांचे परस्पर संबंध त्यांच्या दृष्टीसमोर स्पष्ट आहेत. आणि अखेरीस आपल्याला विश्वकुटुंबवादाकडे जावयाचें आहे या दृष्टीनेंच या सर्व घटकांचा विचार झाला पाहिजे. याहिसंबंधीं त्यांची भूमिका स्पष्ट आहे. आपला हा विचार मांडीत असतांना अण्णासाहेब शिंदे आपल्या मुलाखतींत म्हणतात, “आतांपर्यंत झालें तें सर्व लक्षांत घेऊन तरूण पिढीनें आपण केवळ हिंदी आहोंत येवढें ध्यानांत ठेवावें. एकी करावयाची तीसुद्धां महाराष्ट्रापुरती न करतां प्रांतिक भेद वा मात्सर्य यांना आपणांमध्यें येऊं देऊं नये.” इतकें सांगून राष्ट्राचा जगाशीं काय संबंध आहे हें स्पष्ट करतांनां ते म्हणतात, “महात्मा गांधी तर विश्वकुटुंबीय आहेत. तरुणांनीं आपला दिलदारपणा विश्वकुटुंबीयत्वाला शोभेल असाच ठेवला पाहिजे.” (पृ. क्र. १०७) अण्णासाहेब शिंदे यांचे हे विचार तरुण पिढीला स्फूर्तिदायक नाहींत असें कोण म्हणेल!
आण्णासाहेब शिंदे यांच्या या लेखसंग्रहास प्रा. ध. रा. गाडगीळ यांनीं आपल्या कामाच्या व्यापांतून सवड काढून पुरस्कार लिहून दिला याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. महाराष्ट्रांतील एका उपेक्षित विचारवंतांच्या कार्याकडे व विचाराकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टीनें त्यांच्या पुरस्काराचें महत्त्व मी विशेष मोलाचें मानतो.
या लेखसंग्रहांतील लेख आण्णासाहेब शिंदे यांचे चिरंजीव श्री. प्रतापराव शिंदे व रवींद्र शिंदे यांच्याकडून मिळाले याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. माझे स्नेही श्री. ग. ल. ठोकळ यांनीं या संग्रहाच्या प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली व एक महत्त्वाचें सामाजिक कार्य पार पाडलें याबद्दल त्यांचा मी अंत:करणपूर्वक आभारी आहे. ग्रंथाच्या संपादन- कार्यामध्यें माझे स्नेही प्राचार्य व. द. देसाई व श्री. अशोक अकलूजकर यांचें मला प्रथमपासून महत्त्वाचें सहकार्य मिळालें याबद्दल त्यांचाहि मी मन:पूर्वक आभारी आहे.
मा. प. मंगुडकर
‘कालभैरवप्रसाद’,
माडीवाले कॉलनी, पुणें २.
वर्षप्रतिपदा, २६ मार्च १९६३