(११) ज्याप्रमाणें कोंकणी त्याचप्रमाणें व-हाडी अथवा नागपुरी ही एक मराठीची उपभाषा आहे. केवळ इतिहासाच्या दृष्टीनें पाहतांना नागपुरी ही कोंकणीपेक्षां अधिक जुनी आहे. पण ती मराठीपासून कोंकणीइतकी तुटून वेगळी दिसत नाहीं. ह्याचें कारण कोंकणीपेक्षां ती जास्त अलीकडची हें नसून, तिचें आणि मराठीचें दळणवळण कोंकणीपेक्षां जास्त आहे, हेंच होय. व-हाडी ऊर्फ नागपुरी भाषेंत निराळे ग्रंथ नाहींत, व दळणवळणामुळें ते तसे असणें शक्यहि नाहीं. कोंकणींत जरी आज स्वतंत्र सारस्वत उपलब्ध नाहीं, तरी पूर्वीं अल्प-स्वल्प होतें, तें पोर्तुगिजांच्या अत्याचारांमुळें नष्ट झालें, व त्यांच्याच जुलमी राजसत्तेमुळें व धार्मिक दडपणामुळें अधिक निर्माण होणें अशक्य झालें. परंतु तें कधींच अस्तित्वांत नव्हतें, असें म्हणतां येणार नाहीं. कोंकणी भाषा विशेषतः सुशिक्षित सारस्वत ब्राह्मणांच्या व्यवहारंतली असल्यामुळें ती अल्प प्रमाणांत कां होईना, परंतु ग्रांथिक बनली म्हणून तिला कांहीं अंशीं वेगळेपणाचा भास प्राप्त झाला आहे. तो भास नागपुरींत वेगळें सारस्वत असण्याचा संभवच नसल्यामुळें, व ती नेहमीं निरक्षर समाजांत वावरत राहिल्यामुळें ती एक केवळ निराळी बोली अशाच स्थितींत राहिली व अजूनहि आहे. ह्या व-हाडीच्या पश्चिमेकडे खानदेशी व पूर्वेकडे हाळबी अशा मराठीच्या आणखी दोन शाखा आहेत. ग्रिअरसननें आपल्या “लिंग्विस्टिक सर्वें” मध्यें खानदेशीचा अंतर्भाव गुजरातींत आणि हाळबीचा हिदींत केला आहे. परंतु त्यांनीं कोंकणीचा अंतर्भाव गुजरातींत किंवा कानडींत केला नाहीं, ह्याचें कारण त्यांना किंवा कोणालाहि तसें करतां येतच नाहीं. ज्या प्राकृतांतून मराठीचा उद्भव झाला त्याच प्राकृतांतून कोंकणीचाहि झाला, ही गोष्ट दालगादो ह्यांनाहि कबूल आहे. ह्या सर्व ऐतिहासिक परिस्थितीचें अवलोकन केल्यावर कोणालाहि कोंकणी ही मराठीपासून भिन्न आहे किंवा स्वतंत्र आहे असा आग्रह धरतां येणार नाहीं.
(१२) वर सांगितलेली ऐतिहासिक आपत्ति किंवा उणीव पाहून पंडित दालगादो ह्यांचे कोणी अनुयायी अशी शंका काढतील कीं, ज्या अर्थीं कोंकणीचा अंतर्भाव मराठीशिवाय हल्लीं चालू असलेल्या कोणत्याहि भाषेंत करतां येत नाहीं आणि प्रत्यक्ष मराठीशींहि तिचें तादात्म्य पूर्णपणें सिद्ध करतां येत नाहीं, त्या अर्थीं कांहीं पाश्चात्त्य पंडित समजतात त्याप्रमाणें सारस्वत ब्राह्मणांची एक निराळी भाषा होती, व तिच्यापासून कोंकणीचा उद्भव झाला असावा, असें जें दालगादो म्हणतात त्यांत काय वावगें आहे? ही लुप्त भाषा आज सांपडत नाहीं, एवढ्याच आपत्तीचा फायदा घेऊन कोंकणीचा अंतर्भाव मराठींत करणें व कोंकणीवर मराठीची सत्ता चालविणें म्हणजे “बाप दाखीव नाहीं तर श्राद्ध कर” असें म्हणण्याप्रमाणेंच जुलुमाचें आहे. या शंकेवर माझें उत्तर असें आहे कीं, सारस्वतांची आतां लुप्त झालेली एक भाषा पूर्वीं केव्हां तरी होती, हें ज्या कांहीं पाश्चात्त्य पंडितांचें मत आहे, त्यांचीं नांवें व इतर पुरेसा दाखला दालगादो ह्यांनीं दिला नाहीं. दिला असता तर ह्या लुप्त समजल्या जाणा-या भाषेविषयीं अधिक शोध करण्यास अवसर सांपडला असता. ह्या अनिर्दिष्ट पाश्चात्त्य पंडितांची ही एक केवळ शंका असावी; अशी भाषा होतीच असा त्यांचा कांहीं सिद्धान्त नसावा. अशा शंकेवर दालगादो ह्यांनीं आपली स्वत:ची दुसरी एक शंका स्थापिली, ती ही कीं, त्या लुप्त भाषेपासून हल्लींच्या कोंकणीचा उद्भव झाला आहे. दोनच नव्हे, अशा अनेक शंका जरी एकत्र केल्या, तरी नुसत्या शंकेच्याच जोरावर कोणताहि सिद्धान्त तयार होत नाहीं. मी तर उलट असें म्हणतों कीं, मुलीच्या चेहेरेपट्टींत आईच्याहून कांहीं थोडीं लक्षणें जास्त आहेत, एवढ्याचवरून मराठी कोंकणीची आई नव्हे किंवा बहीण नव्हे; इतकेंच नव्हे तर पाश्चात्त्य पंडितरूपी पोलिसांच्या कचेरींत जी दुसरीच एक बाई बेपत्ता झाली आहे अशी खबर लागली आहे, तीच बेपत्ता बाई कोंकणीची आई असावी, असें समजणें हें कोंकणीची आई मराठीच आहे, असें समजण्यापेक्षांहि अधिक धाडसाचें आहे ! असो. हा ऐतिहासिक बाह्य मुद्दा येथेंच संपवून, आपण ह्या दोन्ही भाषांचीं अंतर्गत प्रमाणें म्हणजे शब्दकोश, व्याकरण, स्वरशास्त्र (Phonology) संप्रदाय (Idioms) इत्यादि अंतःप्रमाणांच्या तुलनेकडे वळूं.