अस्पृश्यांचें राजकारण

प्रस्तावना
सद्यस्थितींत या विषयावर मीं माझे विचार प्रकट करणें जरूर आहे असें समजून माझ्या कांहीं मित्रांनी व सहका-यांनी आग्रह धरला. इतक्यांत वसंत व्याख्यान मालेकडूनहि व्याख्यानाविषयीं विनंती करण्यांत आली, म्हणून मी माझे विचार व अनुभव सांगण्यास आज तयार झालों आहे. आजच्या व्याख्यानांत कोणत्याहि प्रकारचे सिद्धान्त ठरवावयाचे नाहींत अगर गाजवावयाचे नाहीत, म्हणून आज कोणी अध्यक्ष नको अशी मालाकारांजवळ विनंती केली, कारण माझें भाषण केवळ प्रवचन आहे. त्याला निर्णयाची जरुरी नाहीं, पण वहिवाटीच्या सबबीवर मालाकारांनीं माझी विनंती मान्य केली नाहीं. टीकाकारांनीं माझ्या भाषणावर वाटेल तशी टीका करावी, पण अध्यक्षांनीं निर्णय देण्याची तसदी घेऊं नये अशी माझी विनंती आहे. राजकारणांत कांहीं पक्षोपपक्ष असतात पण मी आतांपर्यंत राजकारणाच्या कोणत्याहि पक्षांत सामील झालेलों नाहीं. अस्पृश्यांतहि आज असे पक्ष जोरानें दंड थोपटून उभे आहेत. त्यांच्यांतहि मध्यस्थी करून राजकारणाचें जागतिक असें जें उच्च कार्य असतें तें करण्यास मी केव्हांही तयार आहें. श्रोत्यांनींहि अशाच निर्विकार व उदात्त भावनेनें माझे चार अल्पबोल ऐकावेत. खवळलेल्या सद्यस्थितींत पक्षाच्या लाटांवर वाहून जाण्याचा प्रयत्न मीहि करीन, आपणही सर्व कराल आशी आशा आहे.

अस्पृश्यांच्या राजकारणावर बोलण्यापूर्वीं राजकारणाचा अर्थ पाहूं. त्यामुळें प्रवचनाच्या अर्ध्याअधिक भागाचा खुलासा सहज होऊन या क्लिष्ट प्रश्नाचा मार्ग सोपा होईल. राजकारणाचा अर्थ अर्थकारक (Economics) म्हणजे अर्थाच्या आधारें समाजशास्त्राची धारणा एवढाच आहे. समाजाची धारणा व्हावी म्हणून अर्थशास्त्रासारखें शासनशास्त्राचेंहि तत्त्व राजकारणांत समाविष्ट होतें, पण हें दुसरें तत्त्व शक्य तोंवर गौण असावयास पाहिजे. प्राचीन काळीं जेव्हां जीवनकलह इतका तीव्र नव्हता तेव्हां राजकारणांत अर्थशास्त्राचेंच प्राधान्य होतें. पण पुढें जसजसें कनक आणि कांता या लोभनीय वस्तूंविषयीं मारामारी सुरू झाली तशी राजकारणांत अर्थशास्त्रापेक्षां शासनशास्त्राचें प्राबल्य वाढलें. पण अलिकडे इतर भावनामय अवांतर गोष्टींपेक्षां पोटापाण्याच्याच प्रश्नाला प्राधान्य येऊं लागल्यामुळें आजकालच्या राजकारणांत अर्थशास्त्रालाच पूर्ववत् प्राबल्य येऊं लागलें आहे. कनक हें मुख्य साध्य आणि त्यासाठीं शासनाची हांव हें केवळ साधन होऊन बसलें आहे.

सर्व राजकारणाची जर ही मीमांसा तर हिंदुस्थानांतील अस्पृश्यांच्या राजकारणाला पोटापाण्याचें महत्त्व यावें यांत काय नवल आहे ? ‘अस्पृश्य’ हे अल्पसंख्याक हतवीर्य हतबल पददलित आहेत. त्यांना दुस-यावर शासन चालवण्याची हांव अद्यापि तरी नाहीं. कशी असणार ? मात्र दुस-यांची त्यांच्यावर मिरवण्याची हांव अद्यापि तिळमात्रहि कमी झाली नाहीं; मग ते क्षत्रिय  असोत, ब्राह्मण असोत, शूद्र असोत, स्वकीय असोत, कीं परकीय असोत, प्रागतिक असोत कीं स्थितिनिविष्ठ असोत, जोंपर्यंत हे डोईजड वर्ग का आपल्या इज्जतीखातर अस्पृश्यांच्या योगक्षेमांत आणि स्वयंनिर्णयांत ढवळाढवळ करूं पाहतात तो ‘अस्पृश्य’ आजकाल करूं देण्यास तयार नाहींत. एवढाच त्यांच्या राजकारणाचा अर्थ आतांपर्यंत माझ्या अनुभवास आला आहे. पुढें काय होईल त्याविषयीं भविष्यवाद करण्याचे हें स्थळ नव्हे. अस्पृश्यांची आजची भूक एवढी थोडी असतांना त्यांच्या स्पृश्य शत्रुमित्रांना काय वाटतें तें पाहा. ‘अस्पृश्य’ स्पृश्यांच्या दावांतून सुटल्यावर लवकरच ते सूड उगवण्याच्या मार्गाला लागतील आणि स्पृश्यांवर आज जे जुलूम करणारे परकीय आहेत त्यांच्याशीं एकजीव होतील (जणू परकीय तसे होऊं देतीलच) आणि परकीयांच्या साह्यानें स्पृश्यांवर जुलूम करूं लागतील वगैरे वगैरे अनेक भीतीचे काहूर आम्हां स्पृश्यामध्यें माजलें आहे. ह्या काहुराला नीतीचें आणि न्यायाचें किती पाठबळ आहे हें मला स्पष्ट सांगण्याची इच्छा नाहीं. ही सांगण्याची इच्छा ऐकणा-याच्या तयारीवर अवलंबून राहणार.
अस्पृश्यांचें राजकारण अस्पृश्यतेइतकेंच प्राचीन आहे आणि तें सांगण्यासाठीं अस्पृश्यतेचा उदय कसा झाला हें सांगूं केल्यास प्रवचनाचा व्याप मर्यादेपलीकडे वाढेल. पुढेंमागें हाच विषय निराळ्या ग्रंथद्धारें प्रसिद्ध होत असल्यामुळें अत्यंत संक्षेपानें हा मुद्दा सांगणें जरूर आहे. मानववंशाचे पृथक् भाग प्राचीन कालीं एकमेकांशीं लढत असत. परस्परांच्या संस्कृतीबद्दल अभिनिवेश उत्पन्न होऊन वंशद्धेश मनुष्य जातींत रूढ झाला. याच वंशद्धेषाला जादुटोणा, मंत्र, विटाळचंडाळ, सोवळेंओवळें आणि शेवटीं रूढधर्म यांचेंहि पाठबळ मिळून कांहीं विशिष्ट वंश इतर मानववंशांनीं आपल्यापासून दूर ठेवले. याप्रकारें सामाजिक अस्पृश्यतेचा पाया घालण्यांत आला. एका वंशानें दुस-या वंशास जित केल्यावर जेत्यांनीं जिताला गुलामगिरींत ठेवल्याचीं अनेक उदाहरणें इतिहासांत आहेत. अशा गुलामांना ‘अस्पृश्य’ मानण्याचीं उदाहरणेंहि प्राचीन काळीं पश्चिम आशियांतील सेमेटिक, मध्य आशियांतील हिंदु आणि पूर्व आशियांतील ब्रह्मदेश, जपान इत्यादी राष्ट्रांत आढळते. ‘अस्पृश्य’ मानलेले वंश सारे संस्कृतिहीनच होते असें मुळींच नाहीं. ब्रह्मदेशांत ‘तुव्हायाजा’ (अशुभ राजा), फयाचून वगैरे जे अस्पृश्य वंश आढळत आहेत, ते जिंकले जाण्यापूर्वीं राजवंश होते. हेंच तर काय हल्लींच्या सुधारलेल्या काळींदेखील द. आफ्रिकेसारख्या ठिकाणीं हिंदूसारख्या काळ्या वंशाला तेथील गोरे वसाहतकार अस्पृश्याप्रमाणेंच ग्रामबाह्य ठरवतात. यावरून अस्पृश्यतेला संस्कृति अथवा संस्कृतिचा अभाव हें कारण ठरत नाहीं. जेत्यांनीं जितांशीं चालविलेलें राजकारण हेंच ह्या जातिविशिष्ट अस्पृश्यतेचे हेतू होत हें सिद्ध होतें.

ह्याच वंशद्वेषाला पुढें पुढें रूढ धर्माचें पाठबळ मिळाल्यामुळें ह्या भरतखंडांत पूर्वीं अल्प असलेल्या अस्पृश्यांची संख्या कालवशात् इतकी अवाढव्य झाली आहे. समाज सुसंपन्न आणि सुसंस्कृत स्थितींत असला तर १० वर्षांत त्याची दुप्पट वाढ होते असा एक सामान्य लोकसंख्याशास्त्राचा अजमास आहे. ह्या अजमासाप्रमाणें अस्पृश्यांची संख्या वाढलेली असणें शक्य नाहीं. कारण हे दुर्दैवी मानववंश एकदा अस्पृश्य आणि ग्रामबाह्य ठरल्यावर त्यांच्यांत संपन्नता आणि संस्कृति कोठून उरणार ? असें असूनहि त्यांची संख्या जी इतकी प्रचंड वाढलेली आहे त्याला कांहीं विपरीत कारणेंच असलीं पाहिजेत. तीं कारणें म्हणजे या प्रचंड खंडवजा देशांत धर्माच्या आणि धर्मपंथाच्या नांवावर ज्या क्रांत्या आणि जुलूम झालेले आहेत तेच होत. बौद्ध, शैव, वैष्णव, शाक इत्यादि पंथांच्या मारामा-या दक्षिणेंत द्राविडांमध्यें व उत्तरेंत आर्यांमध्यें झाल्यामुळें पूर्वीं स्पृश्य असलेले जातिसमूह अस्पृश्यांत ढकलण्यांत आले. अशाविषयीं ऐतिहासिक दाखले कर्नल अलकॉटसारखे परकीय धर्मप्रचारक आणि महामहोपाध्याय हरिप्रसादशास्त्री यांच्यासारखे पुराणमतवादी संशोधक यांच्या ग्रंथांत आढळतात.
थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे अस्पृश्यता म्हणजे स्पृश्यांच्या दूषित राजकारणाचें एक दृढमूल झालेलें जाळें आहे. अस्पृश्यांमध्यें जो आतां हीनपणा आलेला आहे त्यामुळेंच अस्पृश्यता उदय पावली असें म्हणण्यानें कार्यकारणांचा विपर्यास हल्लींच्या काळींसुद्धां जाणत्या लोकांकडून होत आहे ही एक करमणुकीची गोष्ट. समाजशास्त्राचें निरपेक्ष अवलोकन केल्यावर जातीय अस्पृश्यता ही हीनतेचें कार्य नसून उलट ती दीनतेचें कारण आहे असें दिसून येतें; आणि ब्रह्मदेशांतील अस्पृश्य लोकांचा इतिहास पाहिल्यास हा कार्यकारणभाव सिद्ध होतो. कांहीं असो, अस्पृश्यतेची व अस्पृश्यांसंबंधीं स्पृश्यांच्या राजकारणाची ही मीमांसा साधारण लोकांच्या गळीं सहज उतरेल अशी माझी तरी अपेक्षा नाहीं. तथापि प्रस्तुत विषय माझ्या अपेक्षा नसून अस्पृश्यांसंबंधीं माझें निरीक्षण, अध्ययन, संशोधन, अनुवाद हींच होत.

अस्पृश्यांच्याविषयीं पूर्ण आणि निष्काम सहानुभूति वाटल्यावरून भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी या नांवानें अखिल भारतांतील अस्पृश्यांच्या सेवेसाठीं आणि शुश्रूषेसाठीं एक विधायक धर्मकार्य उघड स्थापण्यांत आलें. पण त्यापूर्वीं बरींच वर्षें त्यांच्या स्थितीचें अध्ययन चाललेंच होतें. हें कार्य निघाल्याबरोबर अनुकूल व प्रतिकूल टीकांचा गहजब उडाला, सहानुभूतीइतकाच विरोधाचा वर्षाव झाला, बाहेरील सहका-यांइतकाच अंतःकलह माजला. या मंडळींच्या विधायक कार्यामुळें मंडळीच्या बाहेरहि विक्षोभक चळवळ प्रचंड माजली. राष्ट्रीय सभेच्या केवळ राजकारणाच्या रणांगणांत अस्पृश्यांच्या नांवावर रणशिंग वाजूं लागले. पक्षात्मक राजकारणांत भाग न घेतां मंडळीनें उच्च आणि मूलभूत राजकारणांत अस्पृश्यांच्याहि वतीनें भाग घेण्यास माघार घेतली नाहीं. मात्र हें सर्व काम मंडळीनें गाजावाजा न करतां केलें. त्यांचा प्रयत्न विधायक असल्यामुळें तो अद्यापि चालूं आहेच. हा प्रयत्न चालूं असतां मंडळीवर प्रतिकूल टीकास्त्रांचा जो वर्षांव झाला त्यांतील कांहीं मासल्यांचा उल्लेख करणें विषयाला धरून आहे. हे उल्लेख मंडळीच्या संरक्षणासाठीं नसून विषयाच्या परिपूर्ततेसाठीं आहेत.

या मंडळीचें हें कार्य अस्पृश्यांच्या उद्धारासाठीं नसून ब्राह्मणादि उच्च वर्गांना खालीं ओढण्यासाठीं आहे, अशीं नुसतीं सुटींसुटीं विधानेंच करून न राहतां या जाड्या जाड्या विद्वानांनीं सुसंबद्ध व्याखानें दिलीं आहेत. तीं मला आज चांगलीं आठवतात. मंडळीच्या कार्याची घटना सर्व देशभर होऊन त्याचा परिणाम जाणवूं लागल्यावर १९२३ सालच्या जानेवारीच्या अंकांत अस्पृश्योद्धार या मथळ्याखालीं रा. रा. महादेव राजाराम बोडस या लेखकानें चित्रमयजगतासारख्या सन्मान्य मासिकांत एक मननीय लेख लिहिलेला आहे. त्यांतील एक महत्त्वाचा मुद्दा व्यक्तिविषयकता बाजूस ठेवून आजच्या विषयासाठीं विचारांत घेणें जरूर आहे.
वरील लेखांत पान ४५ वर खालील उतारा वरील मंडळीच्या कार्यासंबंधानेंच नव्हे तर साधारण हितासंबंधींहि महत्त्वाचा आहे –

“ आपलीं सामाजिक व धार्मिक सुधारणांचीं तट्टें चोहींकडे नाचविण्याकरतांच निराश्रितांचा कैवार घेणा-यांचे हातून त्यांचा उद्धार कधींहि व्हावयाचा नाहीं. कारण त्यांच्या प्रामाणिकपणावर लोकांचा विश्वास बसत नाहीं. कोणतीहि चळवळ एकनिष्ठ असल्याशिवाय यशस्वी होत नाहीं. एका कामांत दुसरीं दहा खेकटीं घुसडलीं कीं, सर्वच कामें बिघडतात. अस्पृश्यतेच्या प्रश्नाला रोटीबेटीव्यवहार आणि सनातन धर्माची टवाळी चिकटविल्यानें निराश्रित शिखंडींना पुढें करून सबगोलंकार करण्याचा या मंडळीचा बेत आहे. अशी साधारण लोकांची समजूत झाली व त्यामुळें कारण नसतां सर्व जातींचा या चळवळीला विरोध होऊं लागला. पण तेच सन १९१८ सालीं लो. टिळकांनीं सहानुभूति दाखविल्याबरोबर १९२० सालीं महात्मा गांधींनीं हा प्रश्न हातीं घेतला व १९२१ सालीं अहमदाबादच्या काँग्रेसमध्यें राजकीय व राष्ट्रीय करून टाकला. विठ्ठलराव शिंद्यांना १२ वर्षांत जें कार्य करतां आलें नसतें तें गांधींनीं दोन दिवसांत केलें, म्हणजे शिंद्यांच्या कामाचें महत्त्व कमी होतें असें नाहीं. उलट असेंहि म्हणतां येईल कीं, शिंद्यांच्या १२ वर्षें नांगरणीमुळें गांधींना बीजारोपण करतां आलें. परंतु एकाच कार्याविषयीं उभयतांचा दृष्टिकोण आणि कार्यपद्धति यांतील भेद दाखविण्याकरतांच ही तुलना केली. रा. शिंदे निराश्रितांना व्यक्तिशः सुखी करण्याकरतां झटत असल्यामुळें समाजाला, विशेष कळकळ वाटत नव्हती. समाजांत सुखी व दुःखी दोन्ही प्रकारचे लोक असल्यामुळें वैयक्तिक सुखाविषयीं लोकांना फारशी आस्था वाटत नाहीं. पण राष्ट्राच्या भवितव्यतेचा प्रश्न आला कीं, सर्व समाज खडबडून जागा होतो. पांचसहा कोटी निराश्रितांचा उद्धार करावयाचा तो त्यांनीं अधिक सुखांत व ऐषआरामांत राहावें म्हणून नव्हे तर तीस कोटी हिंदी राष्ट्र एकजीव होऊन स्वराज्य मिळवण्यास लायक व्हावें म्हणून. लो. टिळकांनीं निराश्रितांविषयीं नुसती शाब्दीक कळकळ दाखविली म्हणून त्यांची टवाळी करणाराच्या एक गोष्ट लक्षांत येत नाहीं कीं, ज्यांच्या हातांत निराश्रितांची चळवळ आहे त्यांची जास्त योग्यताच नाहीं. टिळक-गांधींसारख्यांकडून जास्त मदत मिळवायची असेल तर त्यांच्याप्रमाणेंच राष्ट्रकार्याला कंबर बांधली पाहिजे. साहेब लोकांना खुष ठेवायचें, मिशनरींच्या मागें लागावयाचें, पैशाकरतां श्रीमंत लोकांच्या दारोदार हिंडावयाचें; मग लो. टिळकांनींहि असल्या भिक्षेक-यांना नुसत्या शब्दांची भीक घातली तर नवल काय ? ‘ You cannot serve both God and mamom at the same time’  अशी एक इंग्रजींत म्हण आहे. निराश्रितांना केवळ ऐहिक सुखें देणेंच ज्यांचें ध्येय त्यांनीं सर्व ऐहिक सुखावर पाणी सोडलेल्या टिळक-गांधींसारख्यांकडून मदतीची अपेक्षा करूं नये हेंच उत्तम, कारण त्यांचें ध्येय निराळें, मार्ग निराळा व दृष्टिकोणहि निराळा.”