ओढिया जगन्नाथ
वरील विचित्र क्षेत्राचा दाखला देऊन हें विवेचन आटपूं. ह्या स्थलाची मूळ पीठिका म्हणजे इतिहास-संशोधकांचा गर्व हरण करणारें एक अजब कोडेंच आहे. कोणी म्हणतात हें पूर्वींचें एक बौद्ध क्षेत्र आहे. कोणी म्हणतात प्रागैतिहासिक शाक्त तांत्रिकांचें मूळस्थान आहे. कोणी म्हणतात प्राचीन कलिंग राष्ट्राचें हें कारस्थान आहे. हल्लीं तर ही पुरीच्या राजाची चिमुकली राजधानी आहे. ४००|५०० वर्षांपूर्वीं येथूनच श्रीचैतन्यदेवांनीं शुद्ध वैष्णवधर्माची उठावणी करून सर्व बंगाल देशाचा उद्धार केला, पण येथील हल्लींचें ओंगळ स्वरूप पाहून भागवत धर्माची अवनति किती होणें शक्य आहे, ह्याची ओझरती तरी कल्पना प्रेक्षकांस आल्याशिवाय राहात नाहीं. अशा अवनतीचा हें क्षेत्र एक बिनतोड वस्तुपाठ आहे. रोज लागणारा मणभर भाताचा भोग, त्रिकाल पूजा, मासिक उत्सव, वार्षिक रथोत्सव, बारा वर्षांचा महोत्सव, क्षेत्राचा मालक राजा, चालक पंड्ये, त्यांचे देशोदेशीं हिंडणारे एजंट, देवळाचा विस्तीर्ण बेढब व बीभत्स देखावा, विचित्र इतिहास आणि अज्ञेय मूळ, एक का दोन चमत्कार, जें डोळ्याला दिसेल तें मनाला वेडच लावतें! नेपाळची तंत्रविद्या, काशीची वेदविद्या, हरिद्वारचें वैराग्य, सोमनाथाची श्रीमंती, पंढरीचा भोळा भाव, मलबारचा लपंडाव, तामिळदेशची देवदासी-थोडक्यांत आटोपावयाचें म्हणजे पुरी येथें कोठलें काय आढळत नाहीं! मला वाटतें चोहिकडील ह्या गोष्टी येथूनच बाहेर कदाचित् गेल्या असाव्यात. येथें पाहूं गेल्यास ह्या विचित्र लक्षणांचा केवळ कडेलोट आहे! सोरटी सोमनाथ गिझनीच्या महमुदानें फोडला, काशी विश्वनाथ औरंगजेबानें दाबून टाकिला, तामीळ देशांतील भव्य देवळें इंग्रजी विद्येनें निस्तेज केलीं, शंकर, रामानुज वगैरे आचार्यांचा वेदान्त त्यांच्याबरोबरच गेला, महावीर जिन देशांतच दडला, गौतम बुद्ध पूर्वेकडे हद्दपार झाला, आणि वेदविद्या केवळ पाश्चात्त्यांच्या ज्ञानकोशांत निजली आणि आमच्या वांट्याला अद्यापि ओढिया जगन्नाथ मात्र भागवत धर्माच्या अवनतीची साक्ष देत पूर्व समुद्रावर उभा आहे! त्याला आमचा दुरूनच नमस्कार! ह्या अवनतींतूनहि भागवत धर्माचें पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न चालू राजशकाच्या आरंभापासून कसकसे करण्यांत आले, हें आपण पुढें पाहूं.