कानडी विरुद्ध मराठी
(२) इतर भाषांशीं मराठीचा कसाहि संबंध असो. गेल्या दीड हजार वर्षांत कानडी आणि मराठी ह्या दोन भाषांचा एकमेकांविरुद्ध जीवनकलह किती जिवापाड चालला आहे ह्याची केवळ अंधुक प्रस्तावना मीं केसरींतील वरील लेखांत केली होती. माझ्यापेक्षां अधिक अधिकारी पंडित हा हृदयंगम भाषाविषय हातीं घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या दोनहि देशांवर उपकार करण्यास पुढें येईपर्यंत मी केवळ नाइलाजानें व भीतभीत अशा तौलनिक विवेचनाचें धाडस करीत आहें. मराठीचा जन्म व तान्हेपण कोठें आणि कसेंहि होऊन गेलें असो, तिचें सर्व वर्धन, शील, कौमार्य, चालुक्य आणि राष्ट्रकूट ह्या कानडी व तेलंगी राजवटींतून खास कर्नाटकांतच बनलें असें मीं वरील निबंधांत ध्वनित केलें आहे. जास्त निरीक्षणावरून मराठी ही कानडीची पोटची नव्हे तरी पाळलेली मुलगी आहे, असें मला वाटूं लागलें आहे. अशा रीतीनें मराठीची जशी महानुभावी जुनी “बालबोध मराठी” आणि चिपळूणकरांनीं संस्कृत शब्दालंकार आणि इंग्रजी विचारालंकार ह्यांनीं घडविलेली आजची सुसंस्कृत मराठी हीं दोन रूपें जशीं मराठी वाङ्मयांत स्पष्ट दिसत आहेत, तशीच कानडींतहि जैन कविकुलगुरूंनीं वाढविलेली हळेकन्नाड (जुनी कानडी) आणि अलीकडच्या संस्कृत इंग्रजीच्या मिश्र संस्कृतींत स्वतः वाढलेल्या “सुशिक्षितांनीं” घडविलेली नवी कानडी अशीं दोन रूपें स्पष्ट आहेत. पण कालाचा मात्र हा फरक ध्यानांत ठेवला पाहिजे कीं, जुन्या मराठीचें कौमार्य संपून ती महानुभावी वाङ्मय प्रसवूं लागण्यापूर्वी जुन्या कानडीला जवळ जवळ म्हातारपण येऊं लागलें होतें. ज्ञानेश्वराची भावार्थदीपिका इ. स. १२९० त संपूर्ण झाली. हा काळ जुन्या ऊर्फ बालबोध मराठीचा जन्मकाळ नसून तिचा वाङ्मय प्रसविण्याचा काळ होय. पण या काळाचे पूर्वीच हळेकन्नाडचे धुरंधर कवि जैन नागवर्मा, जैन अथवा लिंगायत केशव आणि ब्राह्मण रुद्रभट्ट हे होऊन गेले होते; व त्यांच्या मागें त्या जुन्या कानडीच्या तारुण्याचा भरहि मावळूं लागला होता. त्या वेळीं मराठी ही कानडीच्या दायीपणापासून जरी अगदीं वेगळी झाली होती, तरी देखील ती कानडीचा शब्दकोश, व्याकरण, छंद-रचना व व्यवहारांतल्या बोलीचे संप्रदाय ह्यांतच अद्यापि गुरफटलेली आढळते.