महाराष्ट्राचा गांवगाडा
हा व्यापारी पल्ला गांठणें ही कांहीं नुसती बोलण्याची गोष्ट नव्हे. त्याला शिक्षण, संवय, सहकार्य आणि कालावधि किती तरी पाहिजे. अखिल बहुजनसमाज, निदान खेड्यांतील सर्व गांवगाडा तरी मुळासकट दुरुस्त झाला पाहिजे. मी सांगतों ही गोष्ट हिंदुस्थानांत निदान महाराष्ट्रांत तरी नवी नाहीं. मी केवळ भविष्यपुराणहि रचीत नाहीं. परकीय सत्तेच्या धाडी वारंवार येऊन, शेवटीं अशा संकटपरंपरेवर आधुनिक यांत्रिक युगाच्या आपत्तीनें कळस चढविल्यावर, आमच्यांतला पूर्वींचा गांवगाडा आतां जमीनदोस्त झाला आहे. पण तो कधीं नव्हताच अशी आपली गैरसमज होऊं देऊं नका. महाराष्ट्रांत स्वराज्य वरचेवर उसळी मारून डोकें वर करतें, ह्याचें कारण महाराष्ट्रांतली रयतवारी जमीनधारणेची पद्धतच नव्हे, तर महाराष्ट्रांतील पूर्वींचा उतारपेठेवर ताबा ठेवणारा गांवगाडा हाच होय. महाराष्ट्राचा राजा महाराष्ट्राचा कुणबीच होता. वाणी व ब्राह्मण हे त्याचे आश्रित होते. महाराष्ट्रांतील मराठ्यांनीं ह्या वाण्याब्राह्मणांच्याच नव्हे, तर साळीकोष्टी वगैरे चतुर कारागिरांच्याहि वसाहती आपल्या सोयीप्रमाणें वेळोवेळीं करविल्या आहेत. ह्याचा इतिहास अद्यापि लिहावयाचा आहे. ही गोष्ट कोरडा व पोकळ जातीचा अभिमान बाळगणा-यांना मुळींच कळण्यासारखी नसून ख-या राष्ट्रोद्धारकांनीं शोधून काढून अमलांत आणावयाची आहे !