महाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी
गेल्या तीन शतकांत आमच्या ह्या हतभागी हिंदुस्थानांत दोन लोकोत्तर पुरुष निर्माण झाले, ह्यावरून जगाच्या इतिहासप्रभावळींत ठेवण्यासारखीं पुरुषरत्नें पैदा करण्याची आमच्या देशाची शक्ति नष्ट झाली नाहीं, हें आम्हीं निरभिमानपणें व केवळ आध्यात्मिक दृष्टीनेंहि म्हणूं शकतों. हीं रत्नें म्हणजे पुण्यश्लोक श्राशिवाजीमहाराज आणि पूज्यपादारविंद महात्मा गांधीजी हींच होत ! ह्या दोघांच्या चरित्रांची तुलना, आम्हीं त्यांचे व्यक्तिविषयक गोडवे म्हणून करीत नाहीं तर त्यांच्या मननीय चरित्रांत इतिहासाची पुनरावृत्ति तर झालेली दिसत आहेच पण मानवी समाजाच्या इतिहासांत विशेषतः राजकारणांत अलीकडे आशाजनक युगांतर होऊं घातलें आहे, आणि त्यांत आमचा जुनापुराणा देश पुढाकार घेत आहे अशा श्रद्धाळु समजुतीनेंच आम्हीं ही तुलना करण्याचें धाडस करीत आहों. ह्यांत कांहीं दोष घडत असेल तर त्याबद्दल आम्ही पूर्ण जबाबदार आहों. नुकतेच प्रिन्सिपॉल गो. चि. भाटे ह्यांनीं श्रीशिवाजी आणि नेपोलियन यांच्यामध्यें ‘नवयुग’ मासिकांत ओझरती तुलना केली आहे; पण तिच्यांत आम्हांला विशेष आध्यात्मिक दृष्टि दिसली नाहीं. असें म्हणण्यांत रा. भाटे यांच्या उलट कसला तरी आक्षेप घेण्याचा आमचा उद्देश मुळींच नाहीं. मात्र दोन दुभाषी चरित्रांसंबंधीं आपला अभिप्राय व्यक्त करतांना त्यांतून श्रीशिवाजीचें चरित्र वाजवीपेक्षां जास्त उठावदार वठविण्यांत आलें आहे, असा जो ध्वनि रा. भाटे यांनीं काढला आहे तो सर्वसंमत होईलच हें कांहीं सांगवत नाहीं. प्रो. जदुनाथ सरकार मोंगली ऐतिहासिक उपकरणांना बळी पडले ही जशी शंका रा. भाटे यांना आली तसेंच स्वतः भाटेसाहेबहि आपल्याच जड तर्कवादाला बळी पडले नसतील कशावरून ? अशी शंका कोणास आल्यास ते रागावणार नाहींत अशी उमेद आहे. आम्ही स्वतः श्रीशिवाजीचे किंवा गांधीजीचे पूजक मुळींच नाहीं. अवतारवादापासून रा. भाटे ह्यांच्यापेक्षांही चार पावलें जास्त दूर आम्ही आहों. तथापि आज जी आम्हीं अल्पमतीनें तुलना करीत आहों ती केवळ टिकात्मक नसून ज्यांना आम्हीं थोर समजतों त्यांच्याच नव्हे तर ख-या मानवी थोरपणासंबंधीं श्रद्धेनेंच आम्हीं करीत आहों हेंहि आम्हांस कबूल करणें भाग आहे. नेपोलियन जगज्जेता होता म्हणून श्रीशिवाजी हा त्याच्यासारखा जगज्जेता होता असें म्हणण्यांत आम्ही महाराजाला नीट ओळखलें असें आम्हांला तरी कधींच वाटणार नाहीं. ज्या मनुष्यानें स्वतःला जिंकलें नाहीं, त्यानें आणखी दहा जगें जिंकलीं तरी त्याचें आम्हांला काय ? असल्या बहिर्मुख जगज्जेत्यांनीं मानवी इतिहासाला आजपर्यंत जें काळें फासलें तेवढेंच पुरें आहे. त्याची बडेजावी करणें ही अत्यंत घातुक मूर्तिपूजा ! प्रश्न हा आहे कीं श्रीशिवाजीनें स्वतः आपल्यास जिंकिलें होतें कीं नाहीं ? आम्हांला वाटतें त्यांच्यांत आत्मजय होता. म्हणूनच त्यांना इतर जय मिळाले इतकेंच नव्हे तर रा. भाटे ह्यांनींच सिद्ध केल्याप्रमाणें आज परकीय किंबहुना स्वकीय इतिहासकारावरहि महाराज दिग्विजय मिळवूं लागले आहेत, म्हणूनच तर आम्हीं त्यांना पुण्यश्लोक म्हटलें आहे ! महात्मा गांधी सत्याग्रही व संयमी आहेत पण त्यांना आपल्या कामगिरींत अद्यापि यश यावयाचें आहे. श्रीशिवाजीला तें यश येऊन आज अडीचशें वर्षें झालीं. (त्यांच्या मागील दिवट्यांना तें घालवून आज शंभर वर्षें झालीं, ह्याबद्दल रा. भाटेहि हळहळत आहेत हा भाग वेगळा.)
महात्मा गांधी परकीयांचे किंबहुना कोणाचेहि द्वेष्टे नाहींत. पण महाराजहि नव्हते. त्यांना त्या वेळची राज्यपद्धति उलथून पाडावयाची होती, ती कोणाची भीड न ठेवतां, प्रत्यक्ष आपल्या गुरूची किंवा बापाची तमा न ठेवतां त्यांनीं पाडीली. तेव्हां कोठें भारंभार दक्षिणा घेऊन देवब्राह्मणांनीं त्यांना फुकाचे आशीर्वाद दिले ! (कांहींतर अद्यापि द्यावयाला तयार नाहींत हाहि भाग वेगळाच !) पुष्कळ वेळां मुसलमानी दुश्मन त्यांचे हातीं लागले असतां त्यांना जिवानिशीं सोडलें, व आपल्या कार्याला लावलें. उलटपक्षीं आपले जातिबंधू म्हणविणा-या हरामखोर धेंडांना तार्किकांची तमा न धरतां चिरून काढलें, इतकेंच नव्हें तर स्वीकृत सत्कृत्याला जेव्हां आपल्या स्वतःच्या पोटचा गोळा युवराज संभाजी आड जाऊं लागला, तेव्हां त्यालाहि दूर कारागृहांत ठेवलें. तो त्यांच्या मरणापर्यंत तेथेंच खितपत होता. पण नेपोलियननें इजिप्तमध्यें काय केलें ? तर पांच हजार मुसलमान कैदी शरण आले तेव्हां त्यांना पोसावे कोणी म्हणून त्यांची अक्षरशः कत्तल केली ! पूर्व ती पूर्वच व पश्चिम ता पश्चिमच !! तुलना करितांना घाई होऊं नये. उपमेय समानधर्मी असणें आवश्यक असतें. नाहीं तर लांडगा आणि शस्त्रवैद्य ह्यांमध्यें तुलना होऊन जावयाची एकादे वेळीं ! कोणी बाळ विद्यार्थी शंका सहज घेतील कीं गांधीजी अनत्याचारी आणि शिवाजीची तलवार तर सदाहि रक्तानें थबथबलेली. येथें साधर्म्य कोठें राहिलें ? पण महाराज हे दंडधारी क्षत्रिय होते. केवळ असहकारी चळवळे नव्हते. गनीम नुसत्या शब्दांनीं परावृत्त होत असता, तर दंड हा शब्द कशानेंहि निर्माण झाला नसता. अत्याचार हा नैतिक असतो, शारीरिक नसतो, हें तत्त्व आतां सहानुमतिहीन परकीय इतिहासकारांनींहि महाराजांच्या बाबतींत लागू केलें आहे. स्वकीय धूर्तांनीं महाराजांची तलवार ब्राह्मणांना लागली असेल अशी शंका काढून त्यांना प्रायश्चित्त दिलें व पैसा उकळला, त्याला आमचा काय इलाज ? गांधीजींचा अनत्याचार व महाराजांचा गीताप्रणीत क्षात्रधर्म ह्यांतील तादात्म्य ज्या बालकांना अद्यापि समजलें नसेल अशांसाठीं आजची तुलना मुळींच नाहीं. कोणी विचारतील, काय हो, गांधीजींनीं हिमालयाएवढ्या चुका केल्या, नेहमीं नामुष्कीची हार खाल्ली, जहाल-मवाळांचा छळ सोसला आणि आतां तर गुन्हेगाराप्रमाणें तुरुंगांत पडले. उलट श्रीशिवाजींनीं जें म्हटलें तें करून दाखविलें व शेवटीं त्यांच्या उलट असलेल्या महाराष्ट्रीय ब्राह्मणांनीं देखील त्यांच्यावर स्वराज्याचा अभिषेक केला, हें काय, कशास कांहीं पत्ताच नाहीं ना ! त्याला उत्तर इतकेंच कीं, श्रीशिवाजी होऊन गेले व महात्मा गांधीजींना होऊं घातलें आहे!
येथवर जी आम्हीं तुलना केली त्यावरून महाराज आणि महात्माजी ह्यांच्यामध्यें स्वतःचे कित्येक विशेष गुण नव्हते व तज्जन्य भिन्नता नव्हती असें आमचें मुळींच तात्पर्य नाहीं; उलट हें उघड आहे कीं, जुन्या संस्कृतींतले महाराज हे पुण्यश्लोक नृपावळींतले नृपवर होते, तर महात्माजी हे नव्या संस्कृतींतले प्रजापक्षाचे अखिल जगाला भूषणभूत अद्वितीय पुढारी आहेत हें सत्य महात्माजीनां शिक्षा ठोठावतांना न्यायाधिशालाहि कबूल करावें लागलें. ह्यावरून ब्रिटिश न्यायदेवता पूर्ण आंधळी नसून तिलाहि दिसत असावें अशी शंका घेण्यास जागा आहे. ह्या दोन विभूतींमध्यें संस्कृतिभेदान्वयें पुष्कळच भिन्नता पाहणारांनाहि दिसेल. उदाहरणार्थ, एक वृत्तीनें क्षत्रिय तर दुसरा बनिया; एक स्वराज्यवादी तर दुसरा प्रजावादी; एक राजकार्यधुरंधर तर दुसरा वाङ्मय विभूषित; एक पूर्व युगाच्या मावळतीवर तळपणारा सूर्य तर दुसरा नवयुगाच्या उगवतीवर डोकावणारा अरुण. पण असे उपाधिभेद कितीहि दिसले तरी ज्या ख-या विभूति असतात त्या संस्कृतजन्य गुणदोषांच्या ढगांआड फार वेळ लपून राहात नाहींत आणि इतिहासज्ञांच्या दुर्बिणीच्या शक्तीला असले तत्काळ विरघळणारे ढगहि अडथळा मुळींच करूं शकत नाहींत.
कोणी आमच्यावर विभूतिपूजेच्या अतिरेकाचा आक्षेप अणतील तर आम्हीं हेंहि येथें नमूद करीत आहों कीं विभूति झाले तरी हे दोघेहि मानवकोटींतलेच आहेत. ह्यांच्या महात्म्याप्रमाणेंच ह्यांचें लाघवहि इतिहासज्ञांच्या दुर्बिणीच्या आंवाक्याबाहेरची गोष्ट नाहीं. महाराजांनीं दिल्लीहून परत आल्यावर जो राज्याभिषेकाचा समारंभ केला, क्षुद्र दैवतें आणि विप्रवर्गाची आराधना केली किंबहुना आपल्या कार्यारंभीं आपल्या अंगांत देवी येते असा इतरांचा अथवा स्वतःचाहि भास करून दिला किंवा घेतला, ह्या व अशा इतर बाबी महाराजांच्या लोकसंग्रही लाघवाच्याच होत. त्यांना जें अपूर्व यश लाभलें तें लाभलें नसतें तर ह्याच क्षुद्र बाबी त्यांना जाचकहि झाल्या असत्या. कांहीं अंशीं त्या यशाला ह्या कारणीभूतहि झाल्या असतील. नाहीं कोणीं म्हणावें ? पण त्या भूषणावह किंवा आवश्यक होत्या असें मत सर्वसंमत होणार नाहीं. इतर पक्षीं गांधीजींना अहमदाबादच्या काँग्रेसचा सर्वाधिकारी कसा नडला, त्यांचे वर्णाश्रमधर्मासंबंधीं विचार किती पारदर्शक होते, त्यांचा वेळीं अवेळीं जो बालिश जयजयकार झाला त्यानें त्यांच्या मनाला त्रास आणि कार्याला बाधा कशी झाली वगैरे गोष्टी किंचित खोल पाहणाराला तेव्हांच दिसण्यासारख्या आहेत. महात्म्यांचें हें लाघव कोंदणाप्रमाणें कित्येक वेळां शोभून जातें. तरी ब-याच वेळां बाधकहि होतें. त्याच्या वेदना कशा असतात हें महात्माच जाणोत; आमच्यासारख्यांनीं त्याची विचक्षणा काय करावी ?
असो. आम्हांला ह्या तुलनेनें इतिहासाची पुनरावृत्ति कशी होते तें दाखवावयाची होती. शिवाय युगांतरहि कसें होत आहे हें सांगावयाचें होतें. पण हा विषय चालू समाजविकासाचा व राजकारण परिणतीचा आहे. तो भावनामय आणि अननुभूत असल्यामुळें त्याची आगाऊ चर्चा कदाचित अनाठायींच होईल. सर्व राष्ट्राला जितेंद्रिय करणें, त्याच्याकरवीं अनत्याचारी असहकार्य ह्या दोन निषेधांनीं दूषित झालेल्या विधींचा उपक्रम यशस्वी करून दाखविणें हें चालू नवयुगाचें मुख्य लक्षण आहे खरें. पण त्याचा श्रीशिवाजीमहाराजांच्या चरित्राशीं तादृश संबंध नाहीं. तुरुंगांत असोत किंवा राष्ट्रीय सभेंत असोत, महात्मा गांधी तो विधि यशस्वी करून दाखवितील अशी तूर्त आमची श्रद्धा आहे.