वासुदेव आणि एकान्तिक धर्म
वरील माहितीवरून वासुदेव ह्या व्यक्तिविशिष्ट नांवाचा आणि कृष्ण ह्या आडनांवाचा क्षत्रिय कुळांतला, कोणी महापुरुष, गौतम बुद्धाप्रमाणेंच पण त्याच्या पुष्कळ पूर्वीं एक मुत्सद्दी (संत नव्हे) एका नवीन धर्माचा संस्थापक होऊन गेला असें सिद्ध होतें. तो शैव होता. ह्यावरून शिवोपासना त्याच्याहि पूर्वींची ह्या देशांत होती असें मानणेंहि क्रमप्राप्तच आहे. त्याचा धर्म एकान्तिक ब्रह्मवादी अहिंसावादी, यज्ञयागादि बाह्य विधीला अजीबात फांटा न देणारा, तरी पण वेदप्रामाण्याचें बंड न माजविणारा असा होता. जनक-भीष्मादि क्षत्रिय राजे, व्यासादिक संहिता संपादक क्षत्रियच नव्हत, तर याज्ञवल्क्यादि उपनिषदें आणि स्मृत्या रचणारे ब्राह्मणहि ह्या नूतन धर्माचे अनुयायी होते. पुढें पुढें तर पुस्करसंहिता, परम संहिता, सात्वत संहिता नांवाची पांचरात्र ऊर्फ सात्वत दर्शनें लिहिणा-या ब्राह्मणांनीं तर जवळ जवळ हा धर्म आपलासाच केला; इतकेंच नव्हे, ते आपलें वर्चस्वहि स्थापूं लागले; आणि मूळ स्थापक आणि आदि प्रचारक कृष्ण, भीष्मादिकाच्या क्षत्रिय जातीला कमी मानूं लागले. पण ह्या ब्राह्मणकृत पांचरात्र संहिता भगद्गीता काळानंतरच्या असाव्यात; कारण ह्यांत वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, आणि अनिरुद्ध अशीं जीं मुख्य एकान्तिक देवतेचीं चार पृथक् रूपें (व्यूह) सांगितलीं आहेत त्यांचा भगवद्गीतेंत कोठेंच उल्लेख नाहीं. इतकेंच नव्हे तर भगवद्गीतेच्या काळापर्यंत क्षत्रियांचेंच वर्चस्व अबाधित असून तेच भूदेव, धर्मसंस्थापक आणि मोक्षदाते होते ह्या गोष्टीला गीतेच्या १० व्यां अध्यायांतील विभूति-संग्रहांतील “नराणां च नराधिपम्” ह्या उक्तीचा आधार तेलंगांनींहि दिला आहे. तथापि गीता-काळाच्य किंचित् पूर्व किंवा कदाचित् तिचेच काळीं अशोक मौर्याच्या नंतर ब्राह्मणी धर्माची जी प्रचंड लाट उसळली आणि बौद्ध व जैन धर्मांवर तिचे प्रत्याघात पडूं लागले, त्या काळापासून सात्वत धर्म पूर्ण ब्राह्मणांच्या कबजांत जाऊन त्याला केवळ सांप्रदायिक रूप प्राप्त झालें. इतकेंच नव्हे तर ज्या अशोकाच्या मौर्य कुळानें शिकंदराच्या परचक्राला न जुमानतां भरतखंडांत पहिलें आसेतुहिमाचल प्रचंड आणि वैभशाली साम्राज्य उभारलें, त्याच कुळानें अकबराप्रमाणें तुलनात्मक धर्माचें नवें बंड उभें केलें, सर्व धर्माला सारखें महत्त्व दिलें, आणि विशेषत: बौद्ध धर्माला आश्रय दिला; ह्या सर्व गोष्टी ब्राह्मण धर्माच्या पुरस्कर्त्यांना अर्थातच फार असह्य झाल्या; म्हणून त्यांनीं “नंदान्तं क्षत्रियकुलं” हें थोतांड उभें करून मौर्य कुळाची नालस्ती आरंभिली आणि अशोकाच्या तुलनात्मक धर्माची कामगिरी तर नि:शेष गारद करून टाकली!