शेतक-यांचा स्वयंनिर्णय
मला शेवटीं एवढेंच सुचवावयाचें आहे कीं, आर्थिक स्वातंत्र्य व आर्थिक स्वयंनिर्णय हें साधावयाचें असल्यास तुम्हांला राजकारण, सामाजिक सुधारणा, धार्मिक स्वातंत्र्य ह्या सर्वच गोष्टींकडे लक्ष पुरविलें पाहिजे. पण त्यांच्यासाठीं तुम्ही केवळ ह्या निरनिराळ्या प्रकारच्या चळवळी चालविणारे जे कोणी बरेवाईट पुढारी असतील त्यांच्यावरच विसंबून राहूं नका, इतकेंच नव्हे तर या कार्यासाठीं केवळ पुस्तकी शिक्षणाची वाट पाहूं नका. महात्मा गांधींसारख्या दूरद्रष्ट्यांची ह्या शिक्षणावरूनच नव्हे तर अशा शाब्दिक सुशिक्षितांवरूनहि श्रद्धा पार उडाली आहे. अशा पोशाकी पंडितांना ह्या महात्म्याच्या पुढें पांच मिनिटें सरळ उभे राहण्याचीहि छाती होत नाहीं, पण तुम्ही अथवा तुमचे पुढारी म्हणविणारे कायदेमंडळाचे दलाल, अशाच पोशाकी पंडितांना आपले प्रतिनिधि म्हणून सर्व प्रकारच्या दिखाऊ दरबारांत पाठवीत. अशाच मतलबी भांडवलदारांशीं सख्य करतां, अशाच स्वार्थी भटा-भिक्षुकांचे पाय पूजतां, ह्याला काय म्हणावें? “ज्याचें त्यानें अनहित केलें तेथें कोणाचें काय बा गेलें?” असें तुकाराम रडले तें तुमच्यासारख्यांनाच पाहून रडले असावे.
असो. हल्लीं आमच्या देशांत केवळ राजकारणाच्याच हंडीला उतूं येऊं लागलें आहे. पोटापाण्याच्या गोष्टी, धंदाउदीम वगैरे आवश्यक गोष्टींकडेहि दुर्लक्ष होत आहे, मग सामाजिक सुधारणा व ख-या धर्माची चाड कोणासच नाहीं ह्यांत काय आश्चर्य? पंढरपुरांतील देवाच्या मूर्तीला ब्राह्मणाच्या सकेशा विधवांनीं स्पर्श करून पूजनाचा अधिकार मिळाला किंवा मिळाल्यासारखाच आहे. पण तुमच्या जिल्ह्यांतील काँग्रेस कमिटी आणि मुख्य म्युनिसिपालिटी अस्पृश्यांना नुसते देवळांत घ्यावयास तरी तयार आहेत काय? सातारा जिल्ह्यांतील एक शाळामास्तर माझे मित्र रा. कृष्णराव बाबर हे बेळगांवच्या ‘राष्ट्रवीर’ पत्रांत लिहितात कीं, “खेडेगांवांतील शाळांतून मराठे जातीचे पंच इतर जातींच्याच मुलींची भरती करून आपल्या जातीच्या मुलींना मात्र पडद्याबाहेर आणण्यास तयार नाहींत!” तुमच्या तालुक्यांतहि हाच प्रकार चालूं आहे काय? शेतक-यांचे प्रसिद्ध कैवारी माझे मित्र आमदार गुंजाळसाहेब मध्यवर्ती कायदेमंडळांत शारदा बिलाचा पास झालेला कायदा निदान कांहीं ब्राह्मणेतर जातींच्या मुलींना लागूं करण्यांत येऊं नये, अशी सवलत मागत आहेत. गुंजाळसाहेबांना ह्या प्रतिगामी प्रयत्नांत पाठिंबा देऊन कांहीं जाती आपल्या मुलांचे विवाह बाळपणींच उरकण्यांत गुंतल्या आहेत असें वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत आहे. शेतक-यांनो, तुमचा काय बेत आहे? इंग्लंडांत मजुरांचें राज्य झालें, रशियांत कुणब्यांचें राज्य झालें वगैरे गोष्टी तुम्ही दुरून तरी ऐकल्या असतीलच, पण तेथील मजूर आणि कुणबी तुम्हांसारखे अगदीं दुस-यावर हात टेकून बसणारे खात्रीनें नाहींत, हें ध्यानांत ठेवा. आणि त्यांना पुढें आणणारे महात्मे इकडील कांहीं पुढा-यांप्रमाणें शिळ्या कढीलाच पुनः ऊत आणून आपलें पोट भरण्यांतच पटाईत नाहींत. म्हणूनच तिकडची सुधारणा इकडे होण्यास वेळ लागत आहे. एरव्हीं काय तुम्ही आम्ही माणसें नव्हत? तुम्हांस साह्य करण्यास पुष्कळ पुढें येतील. तुम्ही मात्र त्यांचें साह्य पारखून घ्या. पण अखेर तुमचे मित्र अथवा वैरी तुम्ही स्वतःच हें गीतावचन खरें ठरणार ! माजे कांहीं विचार तुम्हांला कोयनेलापेक्षांहि कडू लागतील, अशी मला भीति वाटते ! पण त्यांचा परिणाम तरी गोड होवो.