शब्दकोश (कानडी)
मुसलमानी अमलांत मराठी शब्दकोशांत इ. स. १४ व्या, १५ व्या आणि १६ व्या शतकांत अरबी फारसी आणि उर्दू भाषेंतील शब्दांचा किती तीव्र वेगानें शिरकाव झाला तें ध्यानांत घेतलें असतां जितांच्या भाषेवर जेत्यांच्या भाषेचा किती लवकर पगडा बसतो हें समजतें. सतराव्या शतकाचे आरंभीं महाराष्ट्रांत मुसलमानी सत्तेचा कळस झाला होता. तेव्हांच्या दरबारी व्यवहारांतून चालू असलेल्या मराठी भाषेंत निम्मेअधिक, केव्हां केव्हां तीनचतुर्थांशाहूनहि अधिक, शब्द मुसलमानी भाषेचे असत. धार्मिक ग्रंथांतून आणि बायकांच्या तोंडांत मात्र मराठी भाषा कशीबशी जीव धरून होती. तथापि पेशवाई काळांत वामन, रघुनाथ, मोरोपंत इ. संस्कृतज्ञ पंडित कवींचा उद्य होऊन चुकल्यामुळें मराठींत तत्सम शब्दाचें घोडें प्रमाणाबाहेर दामटण्यांत येऊं लागलें. १४|१५|१६ व्या शतकांत परकीय भाषेचा हल्ला जसा मराठीवर झाला तसाच एक हजार वर्षांपूर्वीं स्वकीय देशी भाषा जी कानडी तिचा हल्ला तत्कालीन महाराष्ट्रीवर झाला. फरक इतकाच कीं, मुसलमानी भाषा परकीय असल्यामुळें तिचा प्रवेश धार्मिक आणि घरगुती व्यवहरांतून होऊं शकला नाहीं. पण कानडी ही देशी भाषा असल्यामुळें तिनें नुसता राजदरबारच नव्हे तर घरगुती देव्हारा, चूल, जातें, झोंपाळा हा साराच प्रदेश हस्तगत केला. महाराष्ट्रांतील शातवाहन ऊर्फ आंध्रभृत्यांच्या राजवटीची अगदीं अखेरची मर्यादा म्हणजे इ. स. ३०४ हें साल होय. त्यानंतर जवळ जवळ दोन शतकें आभिर, राठोड (राष्ट्रकूट), शेलार आणि इतर लहानसान घराण्यांची सत्ता अथवा बंडाळी चालू होती. भाषावृद्धीचा तो कालच नव्हता. एकंदरींत इ. स. च्या पहिल्या पांच शतकांत गोदावरीच्या दोनहि तीरांवरील प्रांतांत महाराष्ट्रीचा किंवा तिला लागू असलेल्या एकाद्या अप्रौढ भाषेचा प्रचार होता म्हणावयास हरकत नाहीं. कृष्णेपर्यंत तर कानडीचाच मुलूख पसरलेला होता; किंबहुना कृष्णेच्या उत्तरेकडे आणि क-हाडच्या बाजूनें कोंकणांतहि कदाचित् कानडीच चालू असावी. ५ व्या व ६ व्या शतकांत चालुक्यांचें साम्राज्य झालें. हे आणि त्यानंतरचे सम्राट् निवळ कानडी अथवा तेलुगू होते. त्यामुळें कानडीनें हां हां म्हणतां गोदेचा किनारा गांठला. देवरकोंडें, कोईलकोंडें, गोवळकोंडें, नलगुंडें, हाणमकोंडें ह्या गांवांच्या नांवावरून हल्लींच्या निजामशाहीच्या पूर्वभागावरच नव्हे, तर इंदूर, तंदूर, माहूर, दारूर, एल्लूर (वेरूळ), कल्याणी, करहाटक, निंबाळ इत्यादि कानडी घाटाच्या नांवावरून भीमथडी आणि गंगथडीवरहि कानडीनें आपला पगडा बसविला होता हें उघड दिसतें. स्थळांचींच नव्हे तर पूर्वीं व्यक्तींचींहि पुष्कळ नांवें कानडीच असत हें खालील कांहीं प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तींच्या नांवांवरून दिसून येतें. पुलकेशी (चालुक्य), बड्डिग, कक्कल (राष्ट्रकूट), धाडियप्पा, वड्डिग, जिजाऊ (यादव), विठोबा, बसवण्णा, जयप्पा (शिंदे), व्यंकोजी (भोसले) याचें कारण त्या वेळच्या कानडी राजवट्या हें उघड असतां चिंतामणराव वैद्यांसारखे शोधक आपल्या मध्ययुगीन भारतांत “त्या प्रदेशांत कर्नाटकी भाषेचा प्रसार कां व कसा झाला हें अद्यापि गूढ आहे” असें म्हणतात हेंच मोठें गूढ आहे !
बदामीचे व कल्याणीचे चालुक्य आणि नंतर मालखेडचे राष्ट्रकूट सम्राट् कानडी होते. म्हैसुरांतील गंगवाडी राजेदरबारांत तर जैन धर्माचार्यांचें मोठें प्रस्थ माजल्यानें त्यांनीं संस्कृत आणि कानडी वाङ्मयाचा प्रसार सर्व दक्षिण आणि पश्चिम हिंदुस्थानांत झपाट्यानें चालविला. त्यांनीं कानडीच नव्हे तर तामिळ, मल्याळी व तेलुगू ह्या चारहि द्राविडी भाषांची पुनर्घटना संस्कृताच्या पायावर केली. पूज्यपादासारखे विजिगीषु आचार्य इ. स. चौथ्या शतकापासून निरनिराळ्या राजवटींतून हिंडत असत व आश्रम मिळाल्याबरोबर जागजागीं मठ स्थापन करून आपला तळ रोवीत. त्यांनीं बौद्धधर्माला मागें हांकलें; इतकेंच नव्हे तर पाली आणि महाराष्ट्री भाषांनाहि दाबून टाकून विद्वानांत तसेंच सामान्य जनांत आपल्या मताच प्रसार करण्यासाठीं संस्कृत आणि कानडी व मागाहून तेलुगू वाङ्मय वाढविलें. चालुक्य राजे प्रथम प्रथम आपला जम बसण्यापुरते जैनांशीं आणि बौद्धांशीं सहिष्णुतेनें वागले. पण पुढें पूर्वेकडील वेंगी घराण्यांतील चालुक्यांनीं व कलच्छुरी घराण्यांतील राजांनीं शैवधर्माचा आणि कांचीच्या पल्लवांनीं वैष्णवधर्माचा जोराचा पुरस्कार चालविला, त्यामुळें जैनांचा बहुतेक आणि बौद्धांचा सर्वस्वीं नायनाट झाला; इतकेंच नव्हे तर ह्या नवीन धर्माचा भक्तिमार्ग बहुजनसमाजास पटण्यासारखा असल्यामुळें आधुनिक हिंदुधर्माची जरी घडी बसत चालली तरी जुन्या संस्कृत भाषेचा अवतार संपुष्टांत आला. ह्या राजकीय आणि धार्मिक क्रांतीच्या धांदलींत देवगिरी येथें यादवांचा उद्य (सुमारें १००० इ. स.) होईपर्यंत तुंगा आणि गोदा यांच्या दरम्यान कानडीचा व तिच्या आश्रयानें तेलुगूचा विजय निरंकुशपणानें चालू होता. त्यानंतर मराठीनें हल्ला चढविला. तिनें अखेरीस तेलुगूस मांजरा व सुशी नद्यांच्या पूर्वेस आणि कानडीस तर खालीं कृष्णेच्या पलीकडे घालवून प्रत्यक्ष तिच्या प्रांतीं कावेरी उतरून तंजावरावर आपला झेंडा रोविला. याचें श्रेय महादेव यादव आणि हेमाडपंत ह्यांना जितकें आहे तितकें, किंबहुना जास्तच भावार्थदीपिकेचे कर्ते ज्ञानेश्वरमहाराज यांना आहे.