सौम्य उपाय
वर जो करबंदीचा उपाय सांगितला तो निर्वाणाचा आहे. उठल्या सुटल्या त्याची वाच्यता पूर्वतयारीविना बाष्कळपाणाचें आहे. ती तयारी करणें म्हणजेच सौम्य आणि कष्टाळूपणाचे उपाय होत. असा एकहि उपाय हिंदुस्थानांतल्या शेतक-यांनीं बार्डोलीशिवाय इतर कोठें अजूनपर्यंत अंशतः देखील केला नाहीं, किंवा करण्यास त्यांना कोणीं इतर शहाण्यांनीं मदत केली नाहीं. पहिली गोष्ट तालुकानिहाय शेतकरी संघ निघाले पाहिजेत; इतकेंच नव्हे तर तालुकानिहाय कामकरी संघहि निघाले पाहिजेत. आणि ह्या जोडसंघाचें निरंतर सहकार्य चाललें पाहिजे. साता-यांतील खेडवळ म्हणजे वर्षांतील सहा महिने शेतकरी आणि दुसरे सहा महिने गिरणींतील अथवा गोदींतील कामकरी किंवा मजूर असतो. संघ कसे करावेत व आपल्याच बळावर आणि पैशावर चालवावेत ह्याचा श्रीगणेशा आतां त्या खेडवळाला अगदींच नवा नाहीं. शेतक-यांच्या व कामक-यांच्या जोडसंघाच्या वर्षभर घडणा-या सहकार्याविना बहुजनसमाज पाठकुळीवर बसून, पुन्हा त्यांचेंच रक्त शोषणारी जी भांडवलशाही तिला आळा कधीं बसणार नाहीं. खेड्यांत राहून जमिनीवर श्रम करून कच्चा माल उत्पन्न करणारे शेतकरी आणि शहरांत राहून त्याचा पक्का नग उत्पन्न करणारे गिरण्या, गोद्या आणि आगगाड्यांवरचे कामकरी हेच खरे राष्ट्राचे धारक आणि चालक; पण त्यांना भांडवलदारांच्या बुद्धीचें आणि युक्तीचें साह्य पाहिजे. ही तात्त्विक गोष्टहि विसरून चालावयाचें नाहीं. हा भांडवलदार इंग्लंड, अमेरिकेंतल्याप्रमाणें सावकार तरी असेल किंवा हल्लींच्या रशियाप्रमाणें सरकारचे रूपानें तरी राहीलच. अजीबात नष्ट होईल हें शक्यच नाहीं. पण ह्यापैकीं तो भांडवलासूर कोणत्या कां रूपानें राहिना तो शेतक-यांच्या व कामक-यांच्या मांडीखालील तट्टाप्रमाणें चालला पाहिजे. त्याची चंदी जर वर बसणा-या शेतकरी कामकरी ह्यांच्याच हातीं आहे तर त्याच्या ओठांतील लगामहि त्यांच्या हातांत नको काय ? ज्याची चंदी त्याचाच लगाम हें तत्त्व विसरल्याबरोबर भांडवलासूर ताबडतोब बादशाह बनून साक्षात विष्णूचा अवतार म्हणवूं लागतो. पण उलट ज्या हातांत चंदी त्याच हातीं लगाम आला, म्हणजे हाच भांडवलासूर उग्र रूप टाकून आपसुखानेंच अध्यक्षाचें गरीब रूप धारण करणारच. पण त्याचे अगोदर शेतकरी व कामकरी ह्या दोघांचे संयुक्त संघ (Federal Union) ठीक झाले पाहिजेत. ही मांजराच्या गळ्यांत घाट बांधावयाची ती शेतक-यांनीं आणि कामक-यांनींच बांधली पाहिजे. त्यांनीं ह्यापुढें ह्या कठीण, पण स्वतःच्या कामाकरितां येरागबाळांच्या तोंडाकडे पाहात राहूं नये. संप आणि करबंदी हे दोन केवळ तात्पुरते आणि शेवटचे उपाय आहेत. पण ते मधून मधून केवळ हुलकावण्या दाखविण्यासाठींच योजावयाचे असतात. त्यांना कायमपणा नाहीं. मांजराच्या गळ्यांत घाट बांधण्याची ज्यांनीं इतर सर्व तयारी केली असेल, त्यांनींच हे उग्र उपाय कांहीं काळ नाइलाजानें करावयाचे असतात. मिळून मुद्दा इतकाच कीं, वरील संयुक्त संघाची तयारी केल्याशिवाय, इतर सर्व वल्गना व्यर्थ आहेत. अशा संघाचीं सर्व तपशिलें ठरविण्याकरितां अशा परिषदा भरविणें अवश्य आहे.