ह्या व्यापाराचें पिलूं
आमच्या देशांत गेल्या शतकांत ह्या व्यापाराचें हें पिलूं कसें शिरलें, कसें मोठें झालें आणि आतां कसें डोईजड झालें आहे ह्या सर्व गोष्टी असणारास सहज दिसण्यासारख्या आहेत. पूर्वींच्या रामराज्यांतील गोष्ट राहो, पण परवांच्या आमच्या मराठी राज्यांत देखील दारूबाजी नव्हती असें विधान करण्याचें धाडस माझे हातून होत नाहीं. तरी पण हल्लींप्रमाणे दारूचें दुकान उघड मांडून त्याच्या बळावर सरकार-दरबारांत सरदारी पटकावणारे हल्लींचे बाटलीबहादूर शंभर वर्षांमागें निदान आमच्या देशांत तरी अत्यंत दुर्मिळ होते असें मला वाटतें. त्यांचा आतां आमच्यांत इतका सुळसुळाट झाला आहे कीं, ते आमच्या सरकारचे मुख्य आश्रयदाते झाले आहेत. मुंबई इलाख्याच्या चालू बजेटांत एकंदर जमा रु.१४,०१,२२,००० आहे. त्यांत अबकारी खात्याची जमा रु. ४,२४,५०,००० आणि काळीचा वसूल रु.५,८१,२८,०००. मुंबई इलाख्याची लोकसंख्या अदमासें २ कोटी आहे. ह्यांत तान्हीं मुलें, मोठीं माणसें व बायका या सर्वांचा समावेश होतो. ह्या इलाख्यांत दर माणशीं शेतकीचा कर २।। रुपये तर दारूबाजीबद्दल दर माणशीं दोन रुपये वसूल द्यावा लागतो. असें असूनहि “मुंबई इलाखा दारूबाज नाहीं” अशी सरकारी माहिती खात्याकडून आरोळी ठोकण्यांत आली आहे. या बाबतींत माहिती खात्याकडून जें एक तीन पानांचें पत्रक प्रसिद्ध झालें आहे तें वाचून सरकारची इज्जत वाढते कीं कमी होते हें कोणीहि आपल्याशींच ठरवावें. या पत्रकांत सरकारच्यातर्फेंच कबुली देण्यांत आली आहे कीं, मुंबई व लगतचा ठाणें जिल्हा ह्यांत गेल्या दहा वर्षांत दारूचा खप १४०००० गॅलननीं वाढलेला असून एका लहानशा कुलाबा जिल्ह्यांत तो २५००० गॅलननीं वाढला आहे. परंतु दारू पिऊन गुन्हे केल्याचें जें कोष्टक १९१९-१९२० सालच्या अबकारी खात्याच्या रिपोर्टांत सरकारनें प्रसिद्ध केलें आहे त्यांत कुलाबा जिल्ह्यांत ३७ आणि पुणें जिल्ह्यांत १२०८ गुन्हे घडून त्यांना शिक्षाहि ठोठावल्याची नोंद करण्यांत आली आहे. यावरून आमच्या स्वतःचे जिल्ह्याची दारूबाजीबद्दल जरी प्रसिद्धि नाहीं तरी आमच्या कपाळीं दारू पिऊन गुन्हे केल्याचा टिळा सर्वांपेक्षांहि अधिक ठळक लावण्यांत आला आहे. हें मात्र एक पुणेरी गौडबंगालच आहे. “मुंबई इलाखा दारूबाज नाहीं” आणि पुणें शहर दारू पिऊन गुन्हे करणारें आहे हें जें सरकार एकाच तोंडानें सांगत आहे तें आम्ही कोणत्या कानांनीं ऐकावें व कोणत्या मनानें विश्वासावें बरें ? तें कसेंहि
असो ! आमच्या देशांत शिरलेला हा दारूचा व्यापार ऊर्फ उंटाचें पिलूं आतां किती डोईजड झालें आहे आणि त्याला बाहेर काढणें म्हणजे सर्व घर पाडून नवीन बांधण्यासारखें कष्टमय झालें आहे. एक शेतकी सोडून दारूबाजी ही सर्वांत अधिक उत्पन्नाची बाब सरकारनें करून ठेवली आहे.