तांत्रिक वाममार्ग
धर्माला पार्थिव रूप देऊनच ह्या भागवत तंत्राची मजल थांबली नाहीं. वेदमंत्रांप्रमाणेंच भागवतांचेहि कांहीं गूढ मंत्र होते. शैव-वैष्णवांप्रमाणें ते महायान बौद्ध पंथांतहि होते. सर्व भागवतांमध्यें मूर्तीप्रमाणें किंबहुना मूर्तीहूनहि जास्त गुरुपूजेचें मोठें बंड माजलें. हे गुरु पुढें अडाणी, आळशी आणि शिरजोर झाल्यामुळें त्यांनाच त्यांच्या मंत्रांचा अर्थ कळेनासा झाला. म्हणून ह्या महायानाचें पर्यवसान मंत्रयानांत झालें. पुढें मंत्रयानाचें पर्यवसान बीभत्स वज्रयानांत झालें. अशा अधोगतीमुळें बौद्धांतच नव्हे तर पुढें शैवांत शाक्तमार्गी आणि वैष्णवांत राधावल्लभमार्गी अनेक अनिर्वचनीय कुनीतींचा प्रचार माजला. स्थलाभावामुळें त्यांचें वर्णन करणें शक्य नाहीं, व तें इष्टहि नाहीं. खेदाची गोष्ट ही कीं, अशा अनेक भ्रष्टाकाराच्या आचार्यपणाचा मक्ता निरनिराळ्या प्रांतीं व काळीं, अगदीं आतांपर्यंत, वरून संभावितपणाची शाल पांघरणा-या ब्राह्मणांनीं आपल्याकडेच ठेविला आहे !