तपशिलाचें वर्गीकरण
वरीलप्रमाणें व्यापक विचारसरणीची मांडणी झाल्यावर आपणापुढील कार्याच्या महत्त्वाच्या व तांतडीच्या तपशिलाकडे आपण दृष्टि वळवूं या. खुलाशाच्या सोयीकरितां व त्याचें महत्त्व बरोबर रीतीनें अजमावतां यावें म्हणून सदर तपशिलाच्या बाबींचें खालीलप्रमाणें वर्गीकरण तर्कशास्त्रदृष्ट्या करतां येईल. पहिला आणि विशेष अगत्याचा वर्ग म्हटला म्हणजे पुनर्घटनेच्या बाबतीचा होय. त्यामध्यें अस्पृश्यतानिवारण, ब्राह्मणेतरांचा असंतोष, हिंदुमुसलमानांचें ऐक्य व हिंदु संघटन यांचा समावेश होतो. या बाबती निरनिराळ्या व परस्पर भिन्न आहेत अशी पुष्कळ दिवसांची एक भ्रामक समजूत आहे. वस्तुतः बृहत् हिंदु समाजास जडलेल्या एकाच अंतर्गत रोगाचीं हीं भिन्न भिन्न लक्षणें आहेत; किंबहुना, जरी त्यांच्या तीव्रतेच्या निरनिराळ्या परी असल्या तरी त्यांच्या योगाने त्या रोगाचें जुनाट स्वरूपच व्यक्त होत असतें हें निश्चित आहे. हिंदु समाजाच्या अंतरक्रियामध्यें एकसारखा बिघाड होण्याची अशी एक हट्टी प्रवृत्ति दिसून येते कीं त्याच्या योगानें केव्हां केव्हां नकळतहि एक प्रकारचा कृत्रिम ताठरपणा एकसारखा चालू राहिलेला असतो. हिंदुस्थानची ही व्याधी अशी कांही विचित्र आहे कीं कोणाहि समाजशास्त्रवेत्त्याला तिचें निदानहि करतां आलें नाहीं. मग उपाययोजना करणें तर दूरच राहिलें ! श्रीशंकराचार्यांच्या अद्वैतवादासारखीं मोठमोठीं ध्येयेंच काय पण भगवानबुद्धाच्या मूलान्वेषी प्रयत्नांनासुद्धां या व्याधीनें दाद दिलेली नाहीं. भरतखंडामध्यें जीं हीं बेकीचीं व फुटीचीं बीजें घुसलीं आहेत त्यांचा खुलासा वर्णवैचित्र्य, धर्मवैचित्र्य किंवा संस्कृतीभिन्नता यांच्या योगानें समाधानकारक रीतीनें करतां येत नाहीं. कारण हिंदुस्थानच्या पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असणा-या कितीतरी देशांत अशा त-हेचें वैचित्र्य दिसून येत असतें, परंतु हिंदुस्थानप्रमाणें त्या देशांत अस्वाभाविक असे सामाजिक भेद किंवा पोटभेद आपल्या कल्पनातीत संख्याधिक्याच्या योगानें कोणास घाबरून सोडीत नाहींत. काल्पनिक भेद काढून त्यांना केवळ खासगी व्यवहारांतच नव्हे तर सार्वजनिक व्यवहारांमध्येंसुद्धां उच्च दर्जाचें राजकारण व चारित्र्याचें पावित्र्य यांच्या वर स्थान देण्याची जी हिंदी जनतेच्या मनोवृत्तींना स्वयंस्फुरित संवय आहे, तीच हिंदुस्थानला विशिष्ट असलेली अशी मानसिक व्याधि होय. या व्याधीचें प्रत्यक्ष व महत्त्वाचें लक्षण म्हणजे सांप्रदायिक अस्पृश्यता हें होय.