प्रांतिक सामाजिक परिषद, सातारा
या परिषदेचें अध्यक्षस्थान देऊन आपण जो माझा बहुमान केला त्याबद्दल मी जरी आपला फार आभारी असलों तरी या मानाकरितां स्वभावप्रवृत्तीमुळें मी अयोग्य व असमर्थ असतांहि आपण त्याकरितां माझीच निवड कां करावी असा प्रश्न माझ्यापुढें उभा राहिल्याशिवाय राहात नाहीं. मी विद्वान नाहीं किंवा व्यवहारांत मोठा धूर्तहि नाहीं, यामुळें राष्ट्रोद्धाराच्या कार्यांतील गाजावाजा न करतां येण्यासारखा जो भाग, म्हणजे ब्राह्मसमाजाच्या मतांचा पुरस्कार व अस्पृश्य वर्गाची सेवा, तोच मीं स्वीकारला आहें. हल्लीं अस्पृश्योद्धाराबद्दल जरी पुष्कळ गाजावाजा केला जात असला तरी या कार्याची खरी कळ राष्ट्राच्या अंतःकरणास जाऊन झोंबलेली नाहीं असें म्हणणें मला भाग आहे. यामुळें आपण माझ्यापेक्षां अधिक लोकप्रिय व अर्थात अधिक वजनदार अशा पुढा-यास हा मान दिला असता तर बरें झालें असते. आपली सूचना मला फार उशीरां व अत्यंत अनपेक्षित रीतीनें आली; व ती विनंति नसून सत्कार्याप्रीत्यर्थ करण्यांत आलेली आज्ञा आहे, आणि जर मीं ती नाकारली तर माझ्या हातून कर्तव्यच्युति होईल असें मला वाटलें. हें अध्यक्षपद स्वीकारण्यांत माझ्याकडून जो अतिक्रम झाला आहे त्याबद्दल यांकडे पाहून आपण क्षमा करावी अशी माझी विनंति आहे.