पुरस्कार
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हे महाराष्ट्रांतील गेल्या पिढींतील एक थोर पुरुष होऊन गेले. ते विद्वान व बहुश्रुत होते. समाजोद्धार व धर्मकार्य यांस अभेद्य मानून त्यांनीं बहुतेक आयुष्य या क्षेत्रांत सतत कार्य करण्यांत वेंचलें. त्याबरोबरच राष्ट्रीय चळवळींत महाराष्ट्रांत एक नवीन आघाडी उभारण्यांत त्यांनीं पुढाकार घेतला. महाराष्ट्रांतील ब्रिटिश राजवटींतील विद्वान, नि:स्वार्थी व लोकहितरत पुढा-यांच्या परंपरेंत त्यांस नि:संशय बहुमानाचें स्थान आहे. हें खरें असलें तरी त्यांच्या ह्यातींत त्यांच्या गुणांच्या व कार्याच्या मानानें एकंदर समाजावर त्यांची छाप पडली नाहीं, आणि आज तर त्यांचें ब-याच अंशीं विस्मरण झालेलें दिसतें. त्यांच्या कार्याची व विचारांची नवीन पिढीस ओळख करून द्यावी व त्यांचा दृष्टिकोन व त्यांचें धोरण यांचें महत्त्व पटवावें हा प्रस्तुत प्रकाशनाचा मुख्य हेतु आहे. महाराष्ट्राच्या सद्यस्थितींत हें कार्य फार महत्त्वाचें आहे असें मला वाटतें.
आपल्या आयुष्यांत कोणत्याच प्रचलित विचार अगर कार्यप्रवाहांत कर्मवीर शिंदे पूर्णपणें समरस झालेले दिसत नाहींत. धर्मकार्यांतील त्यांचें मूळ अधिष्ठान ब्राह्मोसमाजाचें. महाराष्ट्रांत ब्राह्मोसमाज राहोच, पण त्याची विशिष्ट मराठी आवृत्ति प्रार्थनासमाज यासहि कधीं महत्त्व प्राप्त झालें नाहीं. कर्मवीर शिंदे चिकित्सक व व्यासंगी होते. इतिहास व भाषाशास्त्र या दोन्ही क्षेत्रांतील त्यांचें ज्ञान सखोल व विचार स्वतंत्र होते. आज त्यांचे या विषयावरील लेख एकत्र छापल्यामुळें त्यांच्या विद्वत्तेची खोली व बुद्धीची चमक आपणांस कळून येते. परंतु प्रसंगोपात्त, वेळांत वेळ काढून केलेलें हें लेखन मधून मधून कोठेंतरी प्रकाशित झालें असल्यामुळें एक नवीन दिशा सूचित करणें यापलीकडे त्याचें वजन पडलें नाही. तसेंच त्या वेळचे मान्यवर संशोधक व विचारांची रूढ दिशा याबाबतचें बरेंचसें लिखाण टीकात्मक असल्यामुळें त्याची उपेक्षा झाली हेंहि घडलें असावें. आज त्यांचे मूलग्राही विचार, व्यापक दृष्टि व सडेतोड परंतु संयत टीकापद्धति यांचें कौतुक वाटतें. त्यांच्या कार्याचा अस्पृश्यतानिवारण हा गाभा मानला पाहिजे. या कार्यांत त्यांनी भरीव यश प्राप्त झालें नाहीं, यांत आज तरी आश्चर्य वाटावयास नको. त्यांच्या या कार्याच्या पूर्वार्धांत स्पृश्य समाजाची फारशी सहानुभूति व मदत त्यांस मिळाली नाहीं. पुनरुज्जीवित सत्यशोधक समाजाची दृष्टि ब्राह्मणांवरील हल्ल्यांत केंद्रित झाली व महात्मा ज्योतिबांच्या कार्याच्या या दुस-या बाजूकडे त्याचें दुर्लक्ष झालें. पुढील काळांत स्पृश्यांची वृत्ति व त्यांच्या कार्याची गतिमानता यांबद्दल अधिकाधिक निराशा उत्पन्न झाल्यामुळें डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालीं महाराष्ट्रांतील अस्पृश्यांनीं चढाऊ धोरण व स्वावलंबी मार्ग पत्करला, आणि शिंदे साहजिकच बाजूला पडले. राजकारणांतहि तीच गत झाली. कर्मवीर शिंदे यांचा पिंड राजकारणी दिसत नाहीं. ते राजकारणांत पडले तें कोणत्याहि पक्षांत अगर पक्षाकरितां नसून विशिष्ट विचारांच्य पुरस्कारार्थ. दारूबंदी, शेतक-यांची दुरवस्था असल्या विषयांत ते नेहमींच लक्ष घालत होते. म्हणून गांधीयुगांत समाजकारण, राजकारण व अर्थकारण हें जवळ येत आहे असें दिसल्यामुळें त्यांचें लक्ष थोडेंबहुत राजकारणाकडे गेलें असावें. परंतु ब्राह्मणेतरांचा सवता सुभा ज्यायोगें होईल असें कांहीं करूं नये, असें म्हणणा-याला त्या वेळेस मान्यता न मिळणें साहजिक होतें. आणि जे तरूण त्यांच्या विचाराशी तत्त्वत: सहमत होते त्यांचा कल मार्क्सवादाकडे वळल्यामुळें श्री. शिंदे यांची व्यापक भूमिका त्यांस पटणें शक्य नव्हतें.
हा तत्कालीन ऐतिहासिक घटनेचा विचार झाला. सद्य:स्थितीकडे पाहिलें असतां विठ्ठल रामजी शिंदे यांचे विचार व भूमिका यांचें महत्त्व टिकून आहे असें आढळून येतें व त्यांचें चरित्र फार उद्बोधक ठरतें. कर्मवीरांनीं हाताळलेले बहुतेक वाद अजून शिल्लक आहेत. मराठी-कोंकणी, मराठी-कानडी, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, स्पृश्यास्पृश्य, मराठे-मराठेतर या सर्व वादांचें सांप्रतचें स्वरूप कांहींसें बदललें आहे. परंतु शिंदे यांनीं याबाबत केलेलें विवेचन इतकें मूलभूत आहे कीं, तें आजहि मार्गदर्शक ठरतें. या सर्व लिखाणाचा विशेष हा आहे कीं, इतिहासाबद्दल लिहितांना ते कधीं वर्तमान परिस्थिति विसरले नाहींत. आणि चालूं वादाबद्दल लिहितांना वादांचें ऐतिहासिक स्वरूप व समाजाचें भवितव्य यांवर दृष्टी ठेवूनच त्यांनीं विवरण केलें. यामुळें त्यांच्या सर्वच लिखाणांत सत्यान्वेषणावरील भराबरोबर कळकळ व तळमळ दिसून येतात. उदाहरणार्थ, ‘भागवत धर्माचा विकास’ या व्यापक व विस्तृत आढाव्यांतील, ‘विचित्र मायपोट’ व ‘ओढिया जगन्नाथ’ हे परिच्छेद व्यापक ऐतिहासिक दृष्टि व सद्य:स्थितीचें मर्मभेदी वर्णन यांचा परिणामकारक भाषाशैलींत केलेला उत्कृष्ट संयोग म्हणून दाखवितां येईल. परंतु तळमळ कितीही असली तरी श्री. शिंदे यांचा तोल कोठेंहि सुटला नाहीं व पूर्वग्रहाला, पक्षपाताला त्यांनीं कोठें थारा येऊं दिला नाहीं. तत्कालीन परिस्थितीमुळें अनेकांवर टीका करणें श्री. शिंदे यांस अपरिहार्य होतें. ब्राह्मण समाज व ब्राह्मण लेखक यांचे दोष दाखविण्याखेरीज त्यांस गत्यंतर नव्हतें. पण यांतहि त्यांनीं कटाक्षानें समतोल राखला; दोषदर्शनाबरोबर गुणग्रहणहि केलें.
महाराष्ट्रांतील त्यांच्या पूर्वकालीन व समकालीन इतर समाजसुधारकांपेक्षां कर्मवीर शिंदे यांची बैठक बरीच निराळी होती. भारतीय तत्त्वज्ञान व वैचारिक परंपरा यांचा सखोल अभ्यास त्यांनीं केला होता व या परंपरेवर कितीहि टीका केली तरी तिजविषयीं त्यांस नि:संशय आदर व ममत्व होतें. ‘कौलिकता हाच आत्मीय शिक्षणाचा पाया’ या लहानशा प्रवचनांतहि त्यांची कळकळ, त्यांचें सूक्ष्म निरीक्षण व मूल्यांबाबतचा अभिनिवेश हीं सर्व उत्कटपणें आढळतात, आणि त्यांस नवीन समाजाची निर्मिति करावयाची होती ती परंपरेचा गाभा व जिवंतपणा राखून सहेतुक करावयाची होती. यामुळें त्यांची भूमिका सत्यशोधक समाजाचे तत्कालीन पुढारी याहून निराळी होती. एवढेंच नव्हे तर आगरकरांसारख्या ‘बुद्धिवादी’ समाजसुधारकांपेक्षांही फार भिन्न होती. “सर्व प्रकारच्या भावनामय चळवळी या आध्यात्मिक चळवळी असतात. आपण कोठूनहि सुरुवात करा, शेवटीं एकाच उगमापाशीं पोहोंचतो, आणि तो उगम म्हणजे आध्यात्मिक होय.” हा त्यांचा मूळ सिद्धान्त होता. योगायोग हा कीं, एका दृष्टीनें फार निराळे वाटणारे डॉ. आंबेडकर यांच्या आयु:क्रमाकडे पाहतां त्यांचे बाबतींतहि हा सिद्धान्त तंतोतंत लागू पडला असें दिसतें. परंपरेचें जरी महत्त्व मानलें तरी प्रचलित राजकीय व आर्थिक परिस्थितीचें कर्मवीर शिंदे यांचें ज्ञान तपशीलवार व मार्मिक होतें व याबाबतचीं त्यांचीं मतें ‘जहाल’ होतीं. शेतकरीवर्गाची व अस्पृश्यांची हीन स्थिति ही त्यांनीं जवळून पाहिलेली होती, आणि म्हणून शेतक-यांस “स्वत:ची आर्थिक व सामाजिक उर्फ विधायक घटना करणें हाच आपला मुख्य उद्देश ठेवा आणि त्या कार्याला कोणाचीही वाट न पाहतां आपल्या पायांवर उभे राहून वागा” असा त्यांनीं उपदेश केला, आणि पूर्वींच्या समाजसुधारकांनीं कितीही कळकळीनें आणि स्वार्थत्यागपूर्वक काम केलें असलें तरी, “समाजस्थिति त्यांनीं प्रत्यक्ष पाहिलेली नाहीं अथवा तिचा प्रत्यक्ष अनुभवहि त्यांना घडलेला नाहीं. खरा सुधारक निघावयाचा तो सामान्य जनतेमधूनच निघावयाचा आहे.” असा त्यांनीं स्पष्ट अभिप्राय दिला. निर्विकार मनन व चिंतन आणि विविध कार्यांतील अनुभव यांमुळें कर्मवीरांचे प्रगल्भ विचार आजहि मार्गदर्शक ठरतात. मराठेतर या विषयावर त्यांनीं केलेलें निरूपण सद्य:स्थितींत असेंच महत्त्वाचें ठरतें. बहुसंख्यांकांतील मतभेदावर लक्ष ठेवून त्यांत फूट पाडण्याचा प्रयत्न करणें हें अल्पसंख्यांकांच्याहि अंतिम हिताचें नाहीं, हा त्यांचा इशारा अत्यंत मार्मिक आहे. फुटीचें राजकारण खेळणें कोणासच श्रेयस्कर नाहीं. सर्वांनीं एकी साधण्याचाच प्रयत्न केला पाहिजे, आणि तीहि शक्य तितक्या व्यापक भूमिकेवरून, हेंच त्यांचें पदोपदीं सांगणें आहे. एकी साधणें, सर्वांचा विश्वास संपादन करणें याची जबाबदारी जे श्रेष्ठ आहेत, सत्ताधारी आहेत त्यांजवर पडते, असें ते ठासून बजावीत. त्यांच्या वेळेस महाराष्ट्रांत ब्राह्मणांचें सर्वांगीण वर्चस्व अजून पुष्कळ अंशानें टिकून होतें. म्हणून महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा मार्ग आंखण्यांत किंवा अस्पृश्यता निवारण्यांत ब्राह्मणांवर मोठी जबाबदारी आहे, असें त्यांनीं वारंवार प्रतिपादन केलें. सुदैवानें आज परिस्थिति बदलली आहे आणि निदान ब्राह्मणांच्या बरोबरीनें महाराष्ट्राच्या पुढारीपणाचें ओझें मराठ्यांवर पडलें आहे. परंतु कर्मवीरांनीं ब्राह्मणांस उपदेश केला तो सर्व परिस्थितीस लागू पडेल अशा भाषेंतच केला. “आपल्या हातानें आपल्याजवळची सत्ता देऊन टाकणें हें प्रत्येक सत्ताधा-याचें आद्य कर्तव्य आहे” ही एका तत्त्वज्ञाची उक्ति सांगून, “ब्राह्मणांनीं सर्व समाजाला, मराठ्यांनीं इतर ब्राह्मणेतरांस व अस्पृश्यांस आपल्याजवळचे सर्व अधिकार देऊन त्यांच्या हितार्थ झटावें यांतच महाराष्ट्राचें कल्याण आहे” असा बहुमोल चिरकालिक उपदेश केला.
कर्मवीर शिंदे स्वत: ख-या अर्थानें कर्ते सुधारक होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितींत त्यांनीं केलेलें अस्पृश्यांविषयींचे कार्य आज सर्व अनुकूलता असूनहि होणा-या प्रगतीच्या मानानें उपेक्षणीय खास वाटत नाहीं. परंतु त्या कार्याचें स्वरूप पायाभरणीचें कार्य असें होतें आणि त्याचा बोलबाला व उठाव त्यांचे शिष्य म्हणून स्वत:स मानणा-या भाऊराव पाटलांच्या कार्याइतका होऊं शकला नाहीं. परंतु याबाबत असेंहि असावें कीं, कर्मवीर शिंदे यांचा पिंड कार्यकर्त्यापेक्षां मूलत: शास्त्रज्ञाचा, अभ्यासकाचाच होता. यामुळें पुणें विद्यापीठाच्या बोधवाक्याप्रमाणें, “य: क्रियावान् स पंडित:” हें सिद्ध करण्यापुरते ते क्रियाशील झाले तरी विचारानें पंडितच राहिले. ते स्वत: एके ठिकाणीं लिहितात, “अस्पृश्यतेचा छडा लावण्यांत-निवारण्याचा भाग तर राहूं द्या मला स्वत:ला जो जन्मभर अनुभव आला आणि आनंद झाला तो लक्षांत घेतां मला आणखी जन्म मिळाले तरी ते ह्याच शोधनांत आणि सेवाशुश्रूषेंत खर्चीन अशी उमेद वाटत आहे.” पण इतर पंडितांपेक्षां ते निराळे होते. पंडितगिरींत आनंद वाटला तरी त्यांची मूळ प्रेरणा अध्यात्माची व हीनदीनांबद्दलच्या करुणेची होती. यामळें त्यांच्या संशोधनांत व लिखाणांत वास्तविकपणा व जिवंतपणा हे दोन्ही गुण उत्कटत्वें आढळतात. सामान्य पंडित आणि त्यांच्यांतील दुसरा ठळक फरक म्हणजे कोणत्याहि अभिनिवेशाचा त्यांच्यांत पूर्णपणें अभाव होता, हा होय. ते वारंवार सांगतात कीं अहंकार सोडा, भेद विसरा आणि कांहीं शिकावयाचें असल्यास प्रथम पूर्वग्रह अजिबात टाकून द्या. हा त्यांनीं केवळ उपदेश केला एवढें नव्हे तर त्याचें पालन आपल्या कार्यांत व लेखनांत कटाक्षानें केलें. जुन्या परिभाषेंत सांगावयाचें तर त्यांचा आदर्श भक्तिमार्गी
योगी हा दिसतो आणि या आदर्शांनुसार वर्तण्याचा त्यांनीं आटोकाट प्रयत्न केला. गेल्या वीस वर्षांत महाराष्ट्रांतील परिस्थितींत समाजकारण, अर्थकारण व राजकारण या सर्व क्षेत्रांत बरेंच मोठें स्थित्यंतर घडलें आहे. समाजकारणांत व राजकारणांत महाराष्ट्रांतील मुख्य जमात मराठे यांचें महत्त्व पुष्कळ अंशीं वाढलें आहे. अर्थकारणांत शेतक-यांपैकीं बरेच पुढारले आहेत. डॉ. आंबेडकर यांच्या अनुयायांनीं बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळें एक मोठी क्रांति घडली. परंतु मूलत: परिस्थिति बहुतांशी होती तशीच आहे. जातिविचाराचें महत्त्व व समाजाची त्रिविध विभागणी कायम टिकून आहे. बहुसंख्य शेतकरी आणि अस्पृश्य समाज यांची दरिद्रावस्था संपलेली नाहीं. कर्मवीर शिंद्यांचें चरित्र व विचार यांच्या शिकवणीची महाराष्ट्रांत अजून तीव्रतेनें गरज आहे. या ग्रंथाच्या प्रकाशनामुळें या शिकवणीचा प्रसार होऊन महाराष्ट्र सर्वांगीण उत्कर्षाच्या मार्गास लागो एवढीच इच्छा.
---- ध. रा. गाडगीळ