मराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं
मराठ्यांतील प्रसिद्ध राजघराणीं (PDF साठी वर क्लिक करावे)
वरील नांवांचीं प्रतिष्ठित राजघराणीं महाराष्ट्रांत व खालीं दक्षिण हिंदुस्थानांत गेल्या दोन हजार वर्षांत लहानमोठी राजसत्ता गाजवून गेलीं आहेत. त्यांच्यांत परस्पर शरीरसंबंध झालेले शिलालेखी पुरावे आहेत. हीं सर्व नांवें आजच्या मराठ्यांत राजरोस आढळतात. तरी वंशदृष्ट्या ते परस्परांपासून कितीतरी भिन्न आहेत. सातव, साळवी, शिंदे हे नागवंशी, तर साळुंके, राठोड, पवार हे सूर्यवंशी; जाधव, शेलार, मोरे हे सोमवंशी; शेलार, शेळके हे धनगरहि आणि अहीर हे गवळीहि आहेत. चोळ हे द्रावीड, तर गंग हे मोगल असावेत. गाँग-डोकें, शिरोभाग असा तिबेटी आणि ब्रम्ही शब्द आहे. गंगा हें नदीचें नांव ह्याच शब्दापासून असावें. चोळ शिवायकरून बाकी सर्व उत्तरेकडून खालीं दक्षिणेंत आले असावेत असा अंदाज आहे. धारशिवाय सर्व राजधान्या गोदावरीच्या दक्षिणेस दंडकारण्यांत व त्याच्याहि खालीं आहेत. ह्या बहुतेकांच्या भाषा कानडी, तेलुगू किंवा तामीळ ह्या द्राविडी आणि सर्व चालीरीति तशाच होत्या. कारण मराठीचा उत्कर्ष होण्यापूर्वींच राजकीयदृष्ट्या ह्यांचा अपकर्ष होऊन चुकला होता. कांचीचे पल्लव (पालवे) हे पार्थ ( Parthians ) = पेहेल्लव असावेत असा आजमास आहे. कुंतल देशांतील कुरुंब (कुरुब) म्हणजे धनगर राजघराण्याशीं व धनकटक (गुंटूर जिल्हा) येथील चालुक्य सम्राटांशीं पल्लव घराण्याचे शरीरसंबंध होत असत असा पुरावा डॉ. भांडारकरांनीं दिला आहे. ह्या सर्व गुंतागुंतीवरून मराठ्यांची पूर्वपीठिका अचूक ठरविणें जवळजवळ अशक्यच असा भास झाल्यास नवल काय?
वर जो सूर्य, चंद्र इत्यादि वंशांचा उल्लेख आला आहे, त्या त्या वंशाचा संबंध सांगूनच हें प्रकरण संपत नाहीं. ह्या सर्व भौतिक वस्तूंचा अथवा देवकांचा प्रदेश मराठ्यांच्या आडनांवांत झालेला अद्यापि आढळत आहे. मराठ्यांत सुर्वे, सोमवे, नागवे अशीं उपनांवें आहेत. तीं सूर्यवंशे, सोमवंशे, नागवंशे ह्या शब्दांचे अपभ्रंश असावेत, किंवा सुरवसे, सोमवसे अशी जीं दुसरी नांवें आहेत तीं सूर्यवंशी, सोमवंशी (सुरवंसे, सोमोसे) इत्यादींचे अपभ्रंश असून सुर्वे, सोमवे, नागवे, हे सूर्यवाहन इत्यादींचे अपभ्रंश असणें अधिक संभवनीय आहे. शालिवाहन, शातवाहन ह्यांचे अपभ्रंश साळवे, सातव, असे आढळतात, त्यांवरून ही दुसरी व्युत्पत्ति अधिक संभवनीय दिसते. सुर्वा, सातवा, साळवा ह्या एकवचनांचीं सुर्वे इत्यादि अनेकवचनी रूपें आतां प्रचारांत आहेत हें उघड आहे. देवकांचें चिन्ह अथवा चित्र निशाणावर असणें हें आतां आणि पूर्वींहि प्रसिद्धच आहे. प्राचीन चालुक्यांच्या निशाणावर वराह, तर आतांच्या इंदूरच्या होळकरांच्या निशाणावर बैल, आणि ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्या ध्वजस्तंभावर शेष आढळतो. इतकेंच नव्हे तर इंग्लंड, जर्मनी आणि रशिया ह्यांच्या ध्वजांवर अनुक्रमें सिंह, गरुड आणि अस्वल हीं दिसतात; आणि जपानची बादशाही सूर्यवाहन ऊर्फ सुर्वे आहे !
राठोड ह्याची व्युत्पत्ति राष्ट्र + कूड = राठ + उड = राठोड असें वर सांगितलें; आणि असा एक रट्टांचा संघ असावा असें अनुमान निघतें असें आम्ही वर म्हणालों. त्याचप्रमाणें नलावडे, नायकोडे, गाइकवाड अशींहि आडनांवें प्रसिद्ध आहेत. नायकोडे हा मूळ नाग + वाड = नाकोड, किंवा नाक + कूड = नाकोड असा प्रयोग झालेला असावा. वाड हा शब्द राजपुतान्यांत मारवाड = मरु+वाड, मेवाड = मध्यवाड, ह्या देशवाचक आणि मेरवाड ह्या जातिवाचक नांवांत आढळतो. कर्नल टॉडनें आपल्या राजस्थानची बखर ह्या ग्रंथांत भाग १ ला, पान १२५ वर रजपूत वैश्यांच्या ज्या ८४ जातींची यादी दिली आहे त्यांपैकीं ३५ जातींच्या नांवाचा शेवटचा भाग वाळ असा आहे. जसें, ओस्वाळ, भागेरवाळ, दिसवाळ, पुष्करवाळ, दोहिळवाळ इत्यादि. हा वाळ शब्द आणि वरील वाड शब्द हे दोन्ही मुळांत एकच आहेत. ह्यावरून नलवडे, नायकोडे हे देशी मराठ्यांचे संघ असावेत असें दिसतें. नायक हा शब्द मूळ नाग किंवा नाक असा असून त्याचें पुढें नायक असें संस्कृतीकरण झालें आहे. नल लोकांचे राष्ट्र हल्लींच्या कर्नूल जिल्ह्याच्या आसपास कृष्णा व तुंगा ह्या नद्यांच्या संगमाजवळ प्राचीन काळीं होतें. नळ ह्या नांवाचा डोंगर आतां तेथें आहे. त्याचें नांव ह्या लोकांच्या नांवावरूनच पडलेलें दिसतें. रामायणांत नळ, नीळ, जांबुवंत ह्या वानरांच्या जाती होत्या असा उल्लेख आहे. आतां, नळगिरी, नीळगिरी अशीं नुसतीं डोंगरांची नांवें उरलीं आहेत. ह्यावरून हीं प्राचीन आर्येतर राजकुलें किंवा राजकारणी राष्ट्रें असावींत; ह्यांनीं आर्यांच्या दक्षिणेकडील वसाहतीचे बाबतींत मोठी मदत केलेली असावी. रट्टवाड किंवा रट्टकूड ह्यांच्या प्रमाणेंच नलवडे आणि नायकोडे ह्यांचे निराळे संघ असावेत. रड्डी हें जातिवाचक नांव मद्रासकडे आडनांवाच्या रूपानेंहि आढळतें. सर्वांत मोठा चमत्कार हा कीं, रट्टी हें आडनांव इटालियन लोकांतहि आढळतें. रोमचा पोप ११ वा पायस ह्याचें पूर्वाश्रमींचे नांव अबेटा अकिली रट्टी असें होतें ! असा हा नांवांचा गोतवळा दीर्घसूत्री आहे !!