मराठींत कानडी शब्दांचा भरणा
मराठींत ग्रंथरचना होण्यापूर्वीं तिच्या कोशांतील शब्द अर्धेमुर्धे कानडींतून आलेले होते. पुढें वाङ्मयाच्या वाढीच्या जोरावर अभिजात बनल्यावर वाटेल त्या भाषेंतील शब्द ती आपल्या वेठीस धरूं लागली. जोशी ह्यांनीं आपल्या मराठी शब्दसिद्धि ह्या ग्रंथांत १७९-८० पानांवर मराठींत आढळणारे कानडींतील शब्द म्हणून सुमारें ३६३ शब्दांची यादी दिली आहे, पण ही यादी पूर्ण नाहीं. किती तर पटींनीं जास्त शब्द निवळ कानडींतले हल्लीं मराठींत बेमालूम वावरत आहेत. वरील ३६३ पैकीं सुमारें ४० वर शब्द कानडींतले नाहींत. कानडींतले कित्येक शब्द हल्लींच्या मराठींतून गेले आहेत, तरी जुन्या मराठींत ते आढळतात. ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभव ह्या ग्रंथांत खालील कानडी शब्द आढळतात, ते आतांच्या मराठींत नाहींत. आडवी = अरण्य, नींद = नीज, उपेगी = उपयोगी, मा (मत्तु) = मग, आणखी, अपाड (पाड) = चांगलें, बोण = नैवेद्य, मशी = शाई, भांगार = सोनें, आईता = असलेला, इत्यादी. पुढील शब्द अद्यापि प्रचारांत आहेत. मोळी (मोट्टी) = मोट, सगट (संगड) = सहित, उगळी = ओक, पळह = कापूस (पळकाट्या ह्या शब्दांतच हा योजला जातो), मुग (मुक) = मुका इ. इ. एकाच ग्रंथांत जर इतके शब्द आढळतात तर सर्व वाङ्मयांत आणि विशेषतः बोलण्याच्या व्यवहारांत किती शब्द त्या काळीं असतील ह्याची नुसती कल्पनाच केली पाहिजे. मला तरी असें वाटतें की, प्राचीन प्राकृत भाषेंतून जे देशीय म्हणून शब्द निवडले जात व ज्यांचा निश्चित संबंध वैदीक अथवा इतर आर्य भाषांशीं जोडणें शक्य नव्हतें ते सर्व शब्द द्राविड अथवा मुद्गली (चिनी, तिबेटी, गॉनखेमार) भाषेंतले असावेत. अशा सूक्ष्म दृष्टीनें पाहूं गेलें असतां जोशी ह्यांनीं आपल्या ‘शब्दसिद्धि’ ग्रंथांत मराठीच्या नांवाखालीं जो मोठा शब्दकोश संस्कृत व्युत्पत्तीसह दिला आहे, तो फिरून तपासण्यासारखा आहे. त्यांपैकीं निदान १५० वर शब्दांच्या व्युत्पत्तीविषयीं जबर शंका येत आहे. या १५० शब्दांपैकीं कांहींचा दूरचा संबंध जरी आर्य भाषेशीं लावणें शक्य असलें तरी हे सारे शब्द कानडींत पूर्वीं वापरले जात व कानडीच्या द्वारांच ते मराठींत आले याविषयीं शंका बाळगण्याचें कारण कानडी जाणणारांना तरी नाहीं. ह्यामुळें हल्लींच्या मराठींतील संस्कृत आणि इतर परकीय तत्सम शब्द वगळले तर जे शुद्ध आणि संस्कृत शब्द उरतात त्यांपैकीं शुद्ध मराठींतले कोणते आणि कानडीच्या द्वारां मराठींत आलेले कोणते हें ठरविणें कांहीं सोपें काम नाहीं. एक हजार वर्षें अगोदर प्रौढपणानें ज्या प्रदेशांत कानडी नांदली त्याच प्रदेशांत तिच्याच तालमींत वाढलेली मराठी पुढें नांदावयास आली हें ध्यानांत घेतलें तर वरील शिल्लक उरलेल्या शब्दसमूहावर मराठीपेक्षां कानडीचा हक्क अधिक शाबीत होतो असें मला वाटतें.