महात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद)
(१) केशव इ. स. १८३८ त जन्मून १८८४ त वारला. तो सेन नांवाच्या ज्या अगदीं खानदानी कुळांत जन्मला तें क्षत्रिय आणि वैश्य ह्यांमधील एक थोर व कुलीन घराणें आहे. त्याचा संबंध एके काळीं बंगालचे राजे असलेलें सेन घराणें त्याच्याशीं असण्याचा संभव आहे. एकूण जगिक दृष्टीनें केशव हा कुलीन आणि गर्भश्रीमंत होता. जोतिबा इ. स. १८२७ त जन्मून १८९० सालीं वारला. तो एक अत्यंत गरीब माळी जातीच्या घराण्यांत जन्मला. आत्मिक दृष्ट्या ह्या भेदाला मुळींच महत्त्व नाहीं.
(२) केशवाला जरी विश्वविद्यालयाची इंग्रजी पदवी नव्हती तरी आधुनिक “सुशिक्षण” म्हणून गाजणा-या संस्कृतीची त्यावर पूर्ण कृपा होती. जोतिबाचें व लक्ष्मीचें जसें वांकडें होतें तितकें वांकडें नसलें तरी सरस्वतीचें त्याच्याशीं सख्यहि पण नव्हतें. त्याला गरजेपुरतें मराठी व मोडकें तोडकें तोडकें इंग्रजी येत होतें. पण जोतिबा बहुश्रुत होता, तरी शाब्दिक ज्ञानाचा त्याच्यावर म्हणण्यासारखा संस्कार नव्हता, असें त्याच्या ग्रंथांतील ओबडधोबड व क्वचित प्रसंगीं सदोष विचारांवरून व अशुद्ध व्याकरणांवरून दिसतें. ख-या धर्ममार्गांत लक्ष्मीप्रमाणेंच सरस्वतीचीहि किंमत फुटक्या कवडीचीहि नसल्यामुळें, जोतिबाला त्या दोघींची तमा नव्हती. केशवाच्या पायांत ह्या दोघींचा जो अडथळा होता, तो जोतीच्या नव्हता, हें त्या महात्म्याचें भाग्य होय.
(३) वरील भेदामुळें ह्या दोघांच्या कार्यक्षेत्रांत व कार्याच्या विस्तारांत फारकत झाली व दोघेहि एकदेशीय कर्ते पुरुष ठरले, हा मुद्दा विशेष ध्यानांत घेण्यासारखा आहे. केशवाचें क्षेत्र आधुनिक शिक्षणामध्यें अर्धवट होरपळून निघालेल्या हतभागी तेवर्णिकांपुरतेंच ठरलें, त्याचप्रमाणें जोतीचें क्षेत्र बाकी उरलेल्या ईश्वराच्या दृष्टीनें भाग्यवान् पण जगाच्या दृष्टीनें शूद्र व अतिशूद्रांमध्येंच ठरलें. “शूद्रादि अतिशूद्र” हें वर्गीकरण स्वतः जोती महात्म्याचें; तें केवळ शाब्दिक नसून तीच त्याच्या कार्याची अनुल्लंघनीय मर्यादा होती. अशा रीतीनें दोघेहि एकदेशीय झाल्यानें, ब्राह्म समाज आणि सत्य समाज ह्या दोन्ही संस्थांचें ध्येय व कार्य तंतोतंत एक असूनहि हे दोन्ही समाज अजूनसुद्धां तुटक तुटक नांदत आहेत ! किंबहुना एकमेकांस नुसती तोंडओळखहि नाहीं, असें म्हणण्यांत अतिशोक्ति मुळींच नाहीं !! ही एक ईश्वरी लीलाच !!!
(४) आधुनिक संस्कृतीच्या लाटेवर बसून केशवानें नुसत्या हिंदुस्थानांतच नव्हे तर सा-या जगांत जेथें जेथें ही भरीव अथवा पोकळ संस्कृति शिरूं शकेल तेथें तेथें आपली सत्यधर्माची सुवार्ता गाजविली. पण जोती बिचारा आपल्या भीमथडी तट्टावर बसून महाराष्ट्राच्या एका कोप-यांत आपला सार्वजनिक सत्यधर्माचा डफ साळी, माळी, तेली, तांबोळी किंबहुना त्यांच्याहूनहि खालील जातींचे जे महारमांग ह्यांच्यापुढें वाजवीत असे. इकडे लहुजी मांग हा जोताचा गुरु, तर तिकडे जगविख्यात पंडितशिरोभूषण राममोहन राय हे केशवाचे आजेगुरु होते. केशव इंग्लंडांत व त्याचे शिष्य ब्रह्मदेश, अमेरिका, जपान, सिंहलद्वीप, अरबस्थान वगैरे देशांत संचार करून आले. जोती पुण्याच्या बाहेर गेला असेल नसेल; त्याचे शिष्यहि दक्षिण महाराष्ट्र किंवा कोंकणांत त्याच्या वेळीं गेले असल्याचा पुरावा नाहीं.
(५) केशवाला जिवंतपणींच त्याच्या कार्यांत यशाचा वांटा मिळावयाचा तो मिळाला. इतकेंच नव्हे तर शेवटीं त्याच्या यशाला किंचित् ओहोटी लागून त्याला निराशेचा चटका थोडाफार बसला. जोतीचें आयुष्य समग्र अपयशांतच गेलें. केशवांप्रमाणें शिष्यांची प्रभावळ जोतीभोंवतीं जमली होती, तरी त्यांचा मगदूर कमी ठरून जोतीनें पेरलेलें झाड त्याच्या नजरेंत भरेल इतकें भुईवर उमटलें नाहीं. पण त्याचेमागून तें आतां महाराष्ट्रांत जीव धरून कदाचित् बाहेरहि आपल्या शाखा पसरील अशा आशा करण्यास जागा आहे. तथापि ब्राह्म समाज व सत्य समाज हे असेच ह्यापुढेंहि सवता सुभा करीत राहतील, तर त्यांच्या आशा सर्व पोकळ. जोतिबाची काय कथा तर केशवाचेंहि नांव भावी ज्ञानकोशांत धुंडाळावें लागेल. आजकालच्या ज्ञानकोशांत ह्या दोघांचीं नांवें चकाकत नसलीं तर तो दोष ह्या दोघांचाहि नसून तो सर्वांशीं ज्ञानकोशाचा व कांहीं अंशीं ह्या दोन्ही समाजांच्या अर्धवट व अपात्र अनुयायींचाच म्हणणें भाग आहे.
(६) दोघांच्या शिक्षणांत व परिस्थितींतच नव्हे तर, स्वभावांत व प्रयत्नांतहि मोठा भेद आहे. केशव बंगाली वैष्णव कुळांत जन्मला व वाढला असल्यानें त्याच्यामध्यें कोमल व सर्वसंग्राहक भावनांची दैवी संपदा परंपरागतच होती. तो स्वतः मोठा रसिक भक्त होता, आणि खंदा विधायक घटनाचतुर होता. इकडे आमचा प्रिय जोती म्हणजे सह्याद्रीच्या रुक्ष घाटमाथ्यावरच्या कांटेरी रानांतील एक रानफळ होतें म्हणून त्याचें आयुष्य आपल्या बोथट विळ्या खुरप्यांनीं खंडणमंडणाचें जंगल तोडण्यांत, खडकाळ व रेताळ जमीन खणण्यांत व खुजट झालेल्या कदान्नाचें पीक कोळपण्यांतच घालवावें लागलें. केशवानें मधमाशीप्रमाणें चहूंकडून सत्यसंचय उदार सहानुभूतीचे जोरावर केला. ख्रिस्ती, मुसलमान, बौद्ध, वैदिक इत्यादि निरनिराळ्या धार्मिक संस्कृतीचे अमृतबिंदु गोळा करण्याच्या कामावर निरनिराळे अधिकारी शिष्यांची योजना केशवानें चतुराईनें केली, व आपल्या “नवविधान” रूपी सर्वसंग्राहक सत्यमंदिराची उभारणी करून दाखविली. परंतु जोतिबानें शिक्षणाच्या अभावीं बाहेरून मध न गोळा करितां केवळ आपल्याच अंतःप्रेरणेनें कोळ्याप्रमाणें आपल्याच रुक्ष पोटांतून सार्वजनिक सत्यधर्माचे तंतु बाहेर काढून, त्यांचें जाळें विणून सर्व बहुजनसमाजाला आवरण्याचा हव्यास धरिला. ह्यांत कोण मोठा, कोण लहान, कोण खरा, कोण खोटा, हें न ठरवितां दोघेहि धाडसी आणि यशस्वी बंडखोर होते, येवढें तरी त्यांच्या शत्रूंना कबूल करण्याची लाज कां वाटावी, हें कळत नाहीं.
(७) सूफी भक्त, ख्रिस्ती साधु, बौद्ध श्रमण वगैरे सर्व रसिकांपुढें केशव दंडायमान लीन होत असे; तसेंच त्यानें हिंदु संस्कृतील चैतन्य देव आणि समकालीन स्वामी रामकृष्ण परमहंस वेदान्ती ह्यांचें शिष्यत्व पत्करिलें. ह्या लीनपणामुळें त्यानें आर्य समाजाचे संस्थापक स्वामी द्यानंद आणि नवीन वेदान्ताचे जगजाहीर पुरस्कर्ते स्वामी विवेकानंद ह्यांवरहि आपली छाप बसविली, व त्यांना मार्ग दाखविले. इकडे आमच्या फटकळ जोतिबाला ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकारामासारख्या संतांचीदेखील कदर ओळखतां आली नाहीं. मग त्यानें ब्रह्म समाज आणि प्रार्थना समाजाच्या शुद्ध हेतूंचा अभद्र विपर्यास केला, ह्यांत सूज्ञांना काय वाईट वाटून घ्यावयाचें आहे बरें? केशव सकळ संतांना, सर्व धर्मग्रंथांना उराशीं धरतात. पण जोतिबा आपल्या सत्यधर्म पुस्तकांतील १०५ पानावर खालील कर्कश विधान करीत आहेत !
“अज्ञानी शूद्र अतिशूद्रांच्या करपट्टींतून धूर्त आर्य भटब्राह्मणांचीं मुलें जेव्हां शाळांनीं विद्वान झालीं, तेव्हां त्यांच्या पूर्वजांनीं बाह्यात्कारी धर्मसंबंधीं परंतु आंतून शुद्ध राजकीय रचिलेल्या ब्रह्मगारुडावर केवळ झांकण घालण्याकरितां कपटानें आपला बचाव करण्यास्तव, आपल्या डोळ्यावर कातडी ओढून मोठ्या धांदलीनें त्यांनीं ब्राह्म समाज व प्रार्थना समाज उभारले आहेत; व त्यांनीं त्या समाजांत एकंदर सर्व ख्रिस्ती धर्माचें उष्टें माष्टें चोरून छपून गोळा केलें आणि त्यांनीं आपल्या कल्पित ब्रह्माजीच्या पुढें डोळे झांकून बाकीच्या अज्ञानी शूद्रादि अतिशूद्राच्या मनांत पुनः एक
त-हेचा ब्रह्मघोळ करण्याची खटपट सुरू केली आहे.”
ह्या वरील अडाणी उद्गाराबद्द जोतिरावाला काय नांवें ठेवावींत? त्याचें हृदय उपाशीं जनतेच्या वेदनेनें हैराण झालें होतें. डॉ. केतकरांसारखे महापंडित आपल्या क्वचित् स्थळीं विषारी ज्ञानकोशांत, ब्राह्म समाज केवळ “धर्मनाशक व राष्ट्रनाशक आहे,” तो पसरणें “इष्ट नाहीं” अशीं विधानें आजहि प्रसिद्ध करीत आहेत; तर मग अडाणी जोतिरावानें एकाद्या परकीय मिशन-याचें ऐकून वरील बेजबाबदार वाक्य आपल्या पवित्र पुस्तकांत राहूं दिलें, तर तिकडे कानाडोळा करण्यांतच अधिक धार्मिकपणा आहे. पण त्यातंल्या त्यांत ब्राह्म समाज उठल्या सुटल्या “सुशिक्षित”
म्हणविणा-यांचीच बहुतेक काळजी वाहत आहे; व तो आपलीं गोड गाणीं शहरांतच म्हणून स्वर्गास पोंचूं पाहतो, ही गोष्टहि अगदीं खोटी नाहीं. अडाणी जनतेच्या कैवा-यांच्या प्रामाणिक आसुडांचे फटके आणि “सुशिक्षितांचे” अप्रामाणिक आक्षेप, ह्या दोन्ही दिव्यांतून बंगाल्यांतील ब्राह्म समाज आणि इकडील प्रार्थना समाज सुरक्षित बाहेर पडून ते स्वतःचे डोळे उघडतील तेव्हांच त्यांना केशव आणि जोतिबा ह्या दोघांचीं कार्यें कशीं केवळ एकदेशीय झालीं, हें दिसेल. आणि तेव्हांच ह्या समाजांना जगण्याची आशा प्राप्त होईल. अशिक्षित व असंघटित सत्यशोधकांची गोष्ट तर दूरच राहो.
(८) केशवाला राजा राममोहन राय आणि महर्षि देवेंद्रनाथ ठाकूर ह्या दोन महापुरुषांनीं दोन पिढींत मेहनत करून तयार केलेली आदि ब्राह्म समाजाची भूमिका आयतीच तयार मिळाली. त्या भूमिकेंत पेरण्याचें व फुलें तोडण्याचें काम केशवनें केलें व त्यांत त्याला यशहि आलें. इकडेहि जोतिबाला हीच भूमिका सहज मिळाली असती. केशवच्या श्रमानेंच नव्हे तर त्याच्या पूर्वींपासून कांहीं महाराष्ट्रीय सुशिक्षितांनीं सन १८४० पासून मुंबई शहरीं परमहंस समाज नांवाची एक संस्था काढून समाजजागृतीचें अर्धवट काम चालविलें होतें. केशवानें असल्या बहिर्मुख प्रयत्नांत आध्यात्मिक भक्तीची फुंकर मारिली; तेव्हां मुंबई, पुणें, सातारा, नगर वगैरे अनेक ठिकाणीं प्रार्थना समाज इ. स. १८६७ पासून १८७४ च्या आंत स्थापन झाले. आणि त्यांत जोतिबाहि उघड जात येत होता. रानडे, भांडारकर ह्या अध्वर्यूंची दाट ओळख आणि गोवंडे, वाळवेकरांसारख्या प्रार्थना समाजिस्टांचें तर जिव्हाळ्याचें साह्य असूनहि, जोतिबानें तुसडेपणानें प्रार्थना समाजाशीं असहकार्यच पत्करलें. ह्यांत तत्कालीन रहस्य व परकीयांची कांहीं तरी कारवाई ह्यांचा वास येत आहे. तें कसेंहि असो, ही पूर्वभूमिका सोडून जोतिबांनीं सवता सुभा करून सन १८७३ मध्यें ‘सत्यशोधक समाज’ नांवाचा वेगळा समाज काढिला. बंगाल्यांत मात्र असें झालें नाहीं. ह्याचें कारण एक तर प्रार्थना समाजाचे इंग्रजी भाषेंतील संस्कृत विचार अडाणी जोतीला समजले नसावेत, किंवा जोतीच्या प्रामाणिक हृदयाला बसलेला “शूद्रादि अतिशूद्राच्या” वेदनांचा चटका प्रार्थना समाजांतील संभावितांना बसला नसावा. कारण कांहींहि असो, केशव आणि जोती समकालीन असूनहि एकमेकाला पारखे झाले. कर्नल ली ग्रँड जेकब व सर वुइल्यम जोन्स वगैरेंनीं वेद उजेडांत आणिले, असें आपल्या पुस्तकांत वेळोवेळीं सांगून अथर्व वेदांतील उतारे देणा-या जोतिबाला, महर्षि देवेंद्रनाथ ठाकुरांनीं इ. स. १८५० सालीं वेदांचें शाब्दिक प्रामाण्य उघड झुगारून दिलें व ब्राह्मधर्म म्हणजे केवळ सार्वजनिक सत्यधर्म आहे ही राममोहन रायांनीं २० वर्षांपूर्वीं दिलेली साक्ष खरी केली. ह्या गोष्टी कशा माहीत नव्हत्या, आणि ह्या सत्यधर्माची द्वाही प्रतापचंद्र मुजुमदार व त्याच्या प्रतापि गुरु केशव युरोप अमेरिकेंत गाजवून कैक वेळां परत स्वदेशीं आले तरी ह्याची कुणकुणहि जोतिबाला कशी कळली नाहीं, हें आश्चर्य आहे ! कोणत्या देवानें अगर दैवानें केशव आणि जोतिबा ह्यांच्यामध्यें हा आडपडदा सोडला होता, हें जाणणें फार कठीण नाहीं. हिंदुस्थानचे मूठभर “सुशिक्षित” पुढारी आणि खंडवजा अफाट बहुजनसमाज त्यांच्यामध्यें हा दुर्दैवी पडदा अद्यापि लोंबत आहेच ना? पहिल्याची भाषा दुस-याला समजत नाहीं, व दुस-याची कळ पहिल्याच्या काळजाला झोंबत नाहीं. आतां कोणीं कोणाच्या वंशाला जावें, म्हणजे हा भेदक पडदा नाहींसा होईल?