वेदोक्त कीं पुराणोक्त?
कोलंबसानें अमेरिका शोधून काढिली, पण तो दरिद्री मेला. ख्रिस्तानें जगदोद्धारासाठीं एका धर्माची स्थापना केली; पण स्वतः त्याला दोन चोरांच्या मध्यें सुळावर डांबून प्राण सोडावा लागला. शेवट गोड झाला नाहीं, तरी इतिहासानें अशा कित्येक महात्म्यांना गोड करून घेतलें आहे. पण मानवी मतलब आणि मानवी कपट इतकें गहन आणि चिरपरिणामी आहे कीं इतर असंख्य महात्म्यांना देहान्त शिक्षा मिळूनहि वर इतिहासांत त्यांच्याच नव्हे, पण त्यांच्या वंशाच्या व जातीच्या कीर्तीला अक्षय्य कलंक फासण्यांत आला आहे. हयहयवंशी क्षत्रिय कार्तवीर्य अर्जुन हा महान् पराक्रमी चक्रवर्ति होऊन गेला. त्याच्या आणि अयोध्येच्या सूर्यवंशी क्षत्रिय घराण्यांत दीर्घकालीन तुंबळ युद्ध झालें. त्यांत हयहयांचा कायमचा नायनाट तर झालाच, पण त्यांचे जेते जे सूर्यवंशी क्षत्रिय त्यांनाहि उतरती कळा लागली. पण ही कलागत लावणारे जे भ्रूगु कुलांतील ब्राह्मण हे पुढें आले आणि विशेषतः त्यांतील परशुराम ह्याला ईश्वराचा अवतार बनवून त्यानें अखिल क्षत्रिय कुळांचा एकवीस वेळां नाश केला, अशी खोटी हूल पौराणिक इतिहासांत उठवलेली गाजत आहे. हिरण्यकश्यपू हा पराक्रमी आणि भक्तिवान शैव सम्राट् द्राविड वंशाचा होता. केवळ तो वैष्णव नव्हता एवढ्यावरून प्रत्यक्ष त्याच्याच पोटच्या मुलास त्याच्या उलटे फितवून त्याला साधु ठरवून व त्याच्या बापाचा वध करून त्याचा देश, धर्म आणि सगळी संस्कृति गारद करून टाकण्यांत आली ! बळीचें दान आणि वामन अवताराची गोष्ट ह्यांत तर पुराणें लिहिणा-यांच्या धडाडीच्या बेशरमपणाचा कळस झालेला प्रसिद्धच आहे. फ्रेंचांच्या आणि जर्मनांच्या चालूं लढायांतील एकाच पक्षाकडून केवळ वर्तमानपत्रांतील लेख एकत्र करून त्यांचें एक पुराण बनविलें, तर त्यांत जितका खरा इतिहास मिळेल, तितकाहि इतिहास आर्यांच्या व अनार्यांच्या कलहानंतर बनविलेल्या पुराणांत मिळणें कठीण आहे. चालू वर्तमानपत्रांचा आणि मध्य युगीन पुराणांचा विषारी महिमा अगाध आहे ! जनतेला ह्या विषाचें बाळकडू अशा कुशल आणि दीर्घ पद्धतीनें देण्यांत आलें आहे, कीं तिचा दृष्टीकोन बदलणें केव्हां केव्हां मानवी शक्तीच्या पलीकडची गोष्ट होऊन जाते.
ह्या हतभागी हिंदुस्थानाच्या गेल्या चार हजार वर्षांहि पूर्वींपासूनच्या इतिहासांत वेदोक्त आणि पुरणोक्त विषयांची इतकी दीर्घकालीन आणि गहन दंगल अगदीं आज चालूं घडीपर्यंत माजून राहिली आहे, कीं तिचें सविस्तर स्वरूप स्पष्ट करून दाखविण्याकरितां एक मोठी ग्रंथमालिकाच लिहावी लागेल. ती कधीं लिहिली जाईल तेव्हां जावो, तूर्त पाश्चात्य व आमच्या देशांत पुरातत्त्व शोधनार्थ जे तुरलक तुरलक प्रयत्न चालले आहेत, त्यांच्या द्वारां अशा मालेची आणि पर्यायानें भावी विचारक्रांतीची पूर्वतयारी चांगली जोरांत होऊं लागली आहे. ह्या तयारींत देशोदेशींचे विश्वविद्यालयीन निःस्पृह पंडितच पडले आहेत, असें नव्हे, तर जनतेचे मोठे मोठे अशिक्षित समूह व त्यांचे पुढारी राजेरजवाडेहि आतां पडूं लागले आहेत. एका बाजूस कलकत्ता हायकोर्टाचे एक माजी जज्ज आणि प्राचीन इतिहाससंशोधक मि. एफ्. ई. पार्जिटर ह्यांनीं अलीकडे प्रसिद्ध केलेला भारतीय पुराणासंबंधीं एक क्रांतिकारक ग्रंथ व दुस-या बाजूस उत्तरेकडे बडोद्यास सुरू झालेली. व दक्षिण महाराष्ट्रांत प. लो. श्री शाहूमहाराजांच्या नेतृत्वाखालीं कोल्हापुरास नांवारूपास आलेली वेदोक्ताची चळवळ, हीं आमच्या वरील विधानांचीं दोन ढोबळ उदाहरणें होत. श्री शाहू छत्रपती आणि पार्जिटर ह्या दोन विभूति नुसत्या नांवानेंहि परस्परांस माहीत असण्याचा संभव नाहीं. तरी मूळ पुराणांचे अभिमानी पार्जिटर आणि वेदोक्ताचे अध्वर्यु श्री शाहू छत्रपति ह्यांच्या प्रयत्नांचें रहस्य निरखूं लागलें असतां, एकच विचारक्रांतीची धुरा मानेवर घेऊन परस्परांस माहीत नसतांनाहि एकाच ध्येयाकडे धीरे धीरे वाट चालणा-या दोन वृषभेंद्रांप्रमाणें हे दोन पुरुष शोभत आहेत, असें सदय सत्यशोधकांना तत्काळ दिसल्यावांचून राहणार नाहीं.
उत्तर (आधुनिक) पुराणांचा निषेध करून वेदोक्तांची ध्वजा श्री शाहूनें एकापक्षीं उभारली, आणि केवळ ऐतिहासिक महितीच्या दृष्टीनें पाहतां वेदांचा फोलपणा सिद्ध करून, पार्जिटरनें वेदाहिपूर्वींच्या मूळ पुराणांची ध्वजा उभारली हें पाहून वरवर विचार करणारांची अशी दिशाभूल होण्याचा संभव आहे, कीं वरील दोघां पुरुषांचे प्रयत्न परस्पर विरोधी आहेत. पण वस्तुतः असा मुळींच प्रकार नाहीं. ज्या पुराणांवर श्री शाहूनें हात उगारला तीं पुराणें ख्रिस्ती शकाच्या सुमारें १००० वर्षांपूर्वीं संपलेल्या महाभारताच्या युद्धानंतर, ब्राह्मणांनीं दूषित केलेलीं अथवा निर्माण केलेलीं आहेत. ज्यांचा पक्ष पार्जिटरनें उचलला आहे, तीं मूळ पुराणें क्षत्रियांनीं आपल्या वंशांसंबंधीं आणि पराक्रमासंबंधीं केलेलीं होत. ह्यांचा विषय केवळ ऐहिक व राजकीय होता; तर उलट पक्षीं ब्राह्मणी पुराणाचा विषय आणि हेतु, देव, तीर्थ आणि क्षेत्रें ह्यांचें स्तोम माजवून बुद्ध धर्माच्या उलट एका नवीन धर्माची उभारणी करण्याचा आणि अशा खटाटोपीनें क्षत्रियांवर आपल्या ब्राह्मण जातीचा आणि वृत्तीचा वरचष्मा मिरविण्याचा होता. येणेप्रमाणें पुराणांमध्यें जी पेशवाई माजविण्यांत आली, तिच्यामुळें प्राचीन क्षत्रियांचा पूर्ण पराभव होऊन त्यांची पहिली पायरी कायमची नष्ट होऊन, ब्राह्मण हे चातुर्वर्णांचे गुरु बनले आणि क्षत्रिय त्यांच्या भजनीं लागले. हल्लीं जसे पोवाडे करणारे आणि म्हणणारे शाहीर असतात, तसें भारतीय युद्धापूर्वीं सूत, मागध, बंदीजन इत्यादि नांवांचे पुराणें रचणारे व म्हणून दाखविणारे विशिष्ट अधिकारी पुरुष असत. ह्या अधिकारी वर्गाचा जन्म क्षत्रिय पुरुष आणि ब्राह्मण लोकांच्या स्त्रिया ह्यांच्यापासून झालेला असे. राजे लोकांच्या वंशावळी आणि पराक्रम पौराणिक गीतांच्या रूपानें रचून यज्ञयागामध्यें व इतर विशिष्ट महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रसंगीं मोठ्या आविर्भावानें म्हणून दाखवून, प्राचीन बहुजनसमूहाच्या स्मृतिपटावर ताजा ठेवणें व त्याच्या
पुढा-यांना भावी वैभवाची स्फूर्ति चढविणें हें ऐहिक पण शुद्ध आणि पवित्र कार्य ह्या सूतांचें असे. त्या वेळचें जग क्षत्रियप्रधान असें. लिहिण्याची कला प्रचारांत नसल्यानें अगोदरचीं पुराणें व मागाहून झालेले वेद, केवळ पठणाच्या द्वारांच अस्तित्वांत राखावे लागत असत. भारतीय युद्धानंतरचा काळ कलियुग असें समजण्यांत येत आहे. चातुर्वर्णाच्या हल्लींच्या विकृत स्वरूपाला त्याच काळापासून सुरुवात होऊन ह्या कलीच्या किल्ल्यांत नवीन ब्राह्मणप्रधान धर्माची व संस्कृतीची उभारणी होऊं लागली. नवीन पुराणें रचण्याचें काम सूत आणि मागधापासून ह्या काळांत ब्राह्मणांनीं आपल्याकडे घेतलें. इतकेंच नव्हे तर त्यांचा विषय आणि हेतूहि त्यांनीं पार बदलून टाकलें. श्री शाहूमहाराज, सत्यशोधक, पार्जिटर किंवा तत्समान इतर इतिहाससंशोधक ह्या सर्वांचा हल्ला जरी ह्या ब्राह्मणकृत उत्तर पुराणावर होऊं लागला, तरी इतिहाससंशोधकांना ज्याप्रमाणें प्राचीन मूळ पुराणांची अलीकडे माहिती झाली आहे, त्याप्रमाणें सत्यशोधक किंवा इतर असल्या साध्याभोळ्या बहुजनसमाजाला मूळ पुराणांची पायाशुद्ध माहिती झालेली असणें संभवनीय नसल्यामुळें, पार्जिटरप्रमाणें उत्तर पुराणांच्या उलट मूळ पुराणांची ध्वजा फडकविणें त्यांना अशक्यच होतें. म्हणून न समजतांच त्यांना अथवा श्री शाहूसारख्या त्यांच्या पुढा-यांना अर्धवट माहिती असलेल्या वेदोक्ताची ध्वजा उभी करावी लागली. वेदमार्ग जरी उत्तर पुराणांप्रमाणें सर्वस्वीं ब्राह्मणकृत नव्हता, तरी वेद आणि वेदांगें हीं ऐहिक नसून पारमार्थिक होतीं आणि क्षत्रियांप्रमाणें त्यांत ब्राह्मणांचा शिरकाव होता. आणि कलियुगांत तर क्षत्रियांचें लक्ष्य परमार्थावरून उडून त्यांचें वर्चस्व प्रमाणाबाहेर वाढून, केवळ धार्मिक बाबतींतच नव्हे तर सर्व ऐहिक व्यवहारांत ते केवळ भूदेवच बनले. त्यामुळें पुराणें रचण्याचें सर्वस्वीं क्षत्रियांचें काम जसें त्यांनीं आपल्याकडे घेतलें, तसें वेदांचेंहि अध्ययन ही कामें हळूहळू आपल्याचकडे ठेवून आणि कलियुगांत ब्राह्मण आणि शूद्र ह्या दोनच जाती आहेत; अशी हूल उठवून ब्राह्मण वर्ग आपणच सर्वाधिकारी बनला. ह्याचा परिणाम शेवटीं असा झाला कीं, “गोब्रह्म परिपालक” श्री शिवरायासारख्या क्षत्रिय कुलावतंसालाहि वेदोक्ताचा अधिकार आपल्यापुरता आपल्या भारंभार सोनें ब्राह्मणांना वांटून विकत घ्यावा लागला. तथापि असल्या काल्पनिक गोष्टींतहि त्यांच्या अस्सल वंशजाला अद्यापि शाब्दिक युद्ध चालवावें लागलें आहे.
वरील विवेचनावरून वाचकंच्या लक्षांत एक गोष्ट येईल कीं खरा लढा वेदोक्त आणि पुराणोक्त ह्यांमध्यें नसून तो पूर्वींचीं अथवा मूळचीं क्षत्रियकृत पुराणें ह्यांत आहे. दुस-या शब्दांत सांगावयाचें झाल्यास हा लढा ब्राह्मण व क्षत्रिय वर्गांतला असून तो पुरातन काळचा आहे, व ह्या तंट्याच्या लाटा अद्यापि आणि पुढेंहि भारतीय इतिहास महोदधीवर कमीअधिक प्रमाणानें उसळत राहणारच. जोंपर्यंत हल्लींची विषारी वर्णव्यवस्था कायम आहे आणि तिचे मतलबी आणि धूर्त मंडणमिश्र वावदूक ह्या जरठ देशांत पोट भरून आहेत, तोंपर्यंत ह्या महोदधीला अशीच शाब्दिक भरती-ओहोटी येत राहणार. ह्या लाटांना कोणी सनातन धर्माचा विजय, कोणी स्वराज्य, कोणी भारतीय इतिहाससंशोधन, कोणी आर्यांचा विस्तार अशीं अनेक भुरळ घालणारीं नांवें देतील; पण रहस्य जाणणारांना नांवाचा फोलपणा कळल्याशिवाय राहणार नाहीं.
पार्जिटर साहेबांचा Ancient Indian Historical Tradition ह्या नांवाचा एक ग्रंथ नुकताच ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनें प्रसिद्ध केला आहे. हा सुमारें ३२५ पानांचाच लहानसा ग्रंथ आहे, तरी ह्याची “सुरत लहान पण कीरत मोठी होणार” अशीं चिन्हें दिसत आहेत. पाश्चात्य वैदिक पंडितांनीं आजपर्यंत संस्कृत भाषा आणि भारतीय आर्य धर्माच्या पायावर भारतीय इतिहासासंबंधीं व समाजरचनेसंबंधीं जे कांहीं सिद्धान्त रचले होते, त्यासंबंधीं कोणत्याहि प्रकारें पूर्वग्रह करून न घेतां, अगदीं स्वतंत्रपणानें, धिटाईनें आणि बारकाईनें प्राचीन आणि मध्ययुगीन संस्कृत वाङ्मयाचेंहि मंथन करून, मि. पार्जिटर ह्यांनीं आपलीं कांहीं अंशीं क्रांतिकारक विधानें विचारी जगापुढें ह्या ग्रंथाच्याद्वारें मांडलीं आहेत. तीं सर्व जशींच्या तशींच भावी पंडितांना मान्य होतील कीं नाहींत, हें जरी आजच सांगणें कठीण आहे, तरी भारतीय इतिहासाच्या काळगणतीवर आणि आर्यांच्या व द्राविडांच्या समाजरचनेसंबंधीं प्रस्तुत रूढ झालेल्या कित्येक कल्पनांवर ह्या विधानाचा धक्का बसून तीं कांहीं काळ डळमळूं लागतील असें दिसतें.
वेद, उपनिषदें, भारत, रामायण, व त्यानंतरचीं हल्लीं रूढ असलेलीं मुख्य मुख्य पुराणें आणि इतर प्राचीन संस्कृत वाङ्मय ह्यांचें मंथन करून, पार्जिटरनें जीं निर्भीडपणानें आपल्या ह्या ग्रंथांत महत्त्वाचीं विधानें केलीं आहेत, त्यांपैकीं कांहीं खालीं दिलीं आहेत. “वैदिक वाङ्मयांत प्राचीन भारताची कांहीं माहिती मिळण्यासारखी आहे, पण ती सर्व ब्राह्मणांच्या व ब्राह्मणी धर्मांच्या दृष्टीनें दिलेली आहे, आणि क्षत्रिय पुराणांच्या साहाय्यानें आम्हांला क्षत्रियांच्या दृष्टीनें भारताच्या प्राचीन राजकारणाची कल्पना रेखाटतां येण्यासारखी आहे.” (पान ८) “वैदिक वाङ्मयांत ऐतिहासिक दृष्टि मुळींच नाहीं. इतकेंच नव्हे तर ह्या वाङ्मयांत ब्राह्मणांनीं आपल्यासंबंधीं जे हक्क आणि अधिकार सांगितले आहेत ते (एकपक्षीं असल्यानें) नेहमींच विश्वसनीय आहेत असें मानतां येत नाहींत.” (पान ९) ह्याचीं तीन कारणें आहेत : (१) “वैदिक वाङ्मय हें धार्मिक असून, ऐतिहासिक नाहीं. (२) ब्राह्मणांना ऐतिहासिक दृष्टीच नव्हती. (३) ते रानावनांतील आश्रमांत राहात असल्यानें त्यांना (ऐहिक व्यवहाराची) काटेकोट माहिती असणें शक्यच नव्हतें.” (पान १०) वेदांतील विषयांपेक्षां पुराणांतील विषयांचा काळ अधिक प्राचीन होता. “श्रुति” हा शब्द वैदिक धर्मग्रंथांना लावण्यातं येतो, पण “इति श्रुतिः” “इतिनः श्रुतम्” असे शब्दप्रयोग पुराणांतील ऐहिक विषयांसंबंधीं पुष्कळ वेळां करण्यांत आले आहेत आणि तशा विषयांचा उल्लेख वैदिक वाङ्मयांत कोठेंच नाहीं. (पान १९, २०) ह्या “श्रुति” पदाचा प्रयोग त्यांतल्या त्यांत मागाहून रचलेल्या पुराणांत मुळींच आढळत नसून पूर्वींच्या प्राचीन भागांत विशेषतः क्षत्रियांच्या कथाभागांतून आढळतो; आणि जेव्हां जेव्हां वेदांतील कथाभागासंबंधीं असा प्रयोग करण्यांत येत असे, तेव्हां तेव्हां “वैदिकी श्रुति” असा विशेष प्रयोग आढळतो. (पान २१) तसेंच ज्याप्रमाणें “वेदधित्” “योगवित्” “सांख्यवित्” इ. प्रयोग, वेदान्त, योग आणि सांख्य आदि करून शास्त्रांचे वेत्ते ह्या अर्थीं वायु, मत्स्य इत्यादि पूर्वींच्या पुराणांत आढळतात, त्याचप्रमाणें “वंशवित” “वंशकुशल” “पुराणज्ञ” असेहि शब्द वरचेवर आढळतात. ह्यावरून राजेलोकांच्या वंशावळींचें अध्ययन करणारे व रक्षण करणारे कोणी अधिकारी पूर्वीं असत असाहि अर्थ निघतो. (पान २७). वेदांप्रमाणेंच पुराणांचें नुसतें प्राचीनत्वच नव्हे तर महत्त्वहि दर्शविण्यासाठीं, मत्स्य, वायु, मार्कंडेय, ब्रह्मांड, पद्म इत्यादि जुन्यांतल्या जुन्या पुराणांत स्पष्ट म्हटलें आहे कीं, ब्रह्मदेवाचे तोंडांतून वेद निघण्याच्याहि पूर्वीं त्यानें पुराणांचें स्मरण केलें, वेदांच्या चार संहितांचे जनकत्व ज्याप्रमाणें श्री व्यासाकडे आहे, तसेंच अठरा पुराणांचे जनत्वाचाहि आरोप त्याच्यावरच आहे. तो खरा असो, खोटा असो, वेदाच्या जशा संहिता कोणाकडून तरी करण्यांत आल्या तशीच भारतरामायण आणि इतर १८ पुराणांचे विषयाला मूलाधारभूत प्राचीन कथांची एकादी संहिता असावी, अशा अर्थाचा उल्लेख ब्रह्मांड भाग २ रा. ३४, १२-१६, वायु ६०, १२-१६ विष्णु अंश ३ रा. ४, ७-१० ह्या स्थळीं आढळतो. विष्णु पुराणांतील अंश ३ अध्याय ६ श्लोक १५ वा असा स्पष्ट आहे :- पुराण संहितां चक्रे पुराणार्थ विशारदः | प्रख्यातो व्यासशिष्योभूत् सूतो वै रोमहर्षणः ||१५|| म्हणजे, वेदांच्या चार संहिता करून कृष्णद्वैपायन व्यासानें त्या आपल्या चार शिष्यांमध्यें अनुक्रमें पैल, वैशंपायन, जैमिनी, आणि सुमंत ह्यांमध्यें वांटून दिल्या. तशीच सर्व प्राचीन कथांची एक पुराणसंहिता करून ती आपला प्रख्यात शिष्य जो सूत रोमहर्षण ह्यास दिली. ह्या सर्व विवेचनावरून दिसून येईल कीं, जरी ही पुराणसंहिता ग्रंथरूपानें आज उपलब्ध नाहीं, तरी हल्लींच्या अनेक पुराणांना आधारभूत अशी ती वेदसंहिता-काळीं होती आणि तिच्यांत वर्णिलेल्या गोष्टी तर वेदकाळाच्याहि पुष्कळच पूर्वीं घडून आल्या असल्या पाहिजेत. ह्या पुराणसंहितेनंतर व्यासानें महाभारत केलें !
अष्टादश पुराणानि कृत्वा सत्यवती सुतः ||
भारताख्यानमखिलं चक्रे तदुपवृंहितम्||
मत्स्य पुराण ५३-७०
अशाच अर्थाचा उल्लेख प्रत्यक्ष महाभारतांत पर्व १ अ. १ श्लोक ५४.६४ त आहे. पुराणांतील जितके उतारे महाभारतांत आढळतात, तितके महाभारतांतील उतारे पुराणांत सांपडत नाहींत. ह्या गोष्टीवरूनहि पुराणांचें भारतापेक्षांहि अधिक प्राचीनत्व सिद्ध होतें. (पान २२). पार्जिटरचीं वरील विधानें बहुतेक सहज पटण्यासारखीं आहेत. त्या ग्रंथाचें वैशिष्ट्य ह्या विधानांत नसून तें त्यानें निरनिराळ्या क्षत्रिय आणि ब्राह्मण कुलांच्या ज्या महत्त्वाच्या वंशावळींचें फार बारकाईनें अध्ययन केलें आहे, व त्यावरून जीं धिटाईचीं अनुमानें काढलीं आहेत त्यांत आहे. यादव, हैहय, द्रुह्यु, तुर्वस, कान्यकुब्ज, पौरव, काशी, वायव्येकडील आनव, पूर्वेकडील आनव, अयोद्या विदेह, आणि वैशाली ह्या १२ क्षत्रिय, आणि भार्गव, आंगिरस, वासिष्ट, आणि इतर कांहीं ब्राह्मण घराण्यांच्या अनुक्रमें ९५ व ९४ पिढ्यांच्या वंशावळी परस्परालगत दाखवून, निरनिराळ्या पुराणांतून त्यांतील कित्येक पिढ्यांच्या पुरुषांच्या पराक्रमाचा किंवा शरीरसंबंधाचा उल्लेख झालेला एकत्र निर्दिष्ट करून, प्राचीन इतिहासाची उभारणी करण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो विशेष मननीय आहे. पान १४४-१४९ वर ज्या ९५ पिढ्या, त्यांतील यादव (सोम) वंशांतील श्री कृष्णाचा मुलगा सांब आणि अयोध्येच्या सूर्यवंशांतला बृहतक्षय हे शेवटचे राजे आहेत. श्रीकृष्ण हा भारतीय युद्धांत पांडवांच्या बाजूनें लढला आणि बृहतक्षयाचा बाप बृहद्बल हा कौरवांच्या बाजूनें लढत असतां अभिमन्यूच्या हातानें मारला गेला. ह्या पिढीनंतर कलियुगाला आरंभ झाला. मगध देशाच्या गादीवरील चंद्रगुप्ताच्या राज्यारोहणाचा काल ख्रिस्ती शकापूर्वीं ३२२ धरून त्याच्यामागें नंद घराण्याचीं ८० वर्षें, १० शिशुनाग वंशांतील पुरुषांचीं १६५ वर्षें, प्रद्योत घराण्यांतील ५ पुरुषांचीं ५२ वर्षें आणि बृहदरथ घराण्यांतील १५ पुरुषांचीं २३१ वर्षें अशीं एकंदर ५२८ वर्षें होतात. ह्याप्रमाणें ३२२+५२८ = ८५० ख्रिस्ती शकापूर्वीं मगध देशाचा बृहदरथ घराण्यांतला पहिला राजा सेनाजित् ह्याचा काळ होतो. हस्तिनापूरचा पौरव राजा अधिसीमकृष्ण, अयोध्येचा ऐक्ष्वाकू राजा दिवाकर हे ह्या सेनाजिताचे समकालीन होते. हे तिन्ही समकालीन राजे आणि भारतीय युद्धांतील हस्तिनापूरचा युधिष्ठिर राजा ह्यांच्यामध्यें, हस्तिनापूर, अयोध्या व मगध देशाच्या गादीवर अनुक्रमें, ५, ४, ६ पुरुष बसले. सरासरीनें त्यांच्या ५ पिढ्या, आणि प्रत्येकीं अदमासें २० वर्षें धरलीं असतां, सेनाजिताच्या आणि युधिष्ठिराच्या दरम्यान १०० वर्षें होतात. येणेंप्रमाणें हिशेब करून पार्जिटरनें ख्रिस्ती शकापूर्वीं ८५०+१०० =९५० वर्षें हा भारतीययुद्धाचा काळ निर्णित केला आहे. इतर विद्वानांनीं हा काळ १४००|१५०० ख्रि. पू. धरला आहे. पण पार्जिटरनें आपले पुरावे नमूद केले आहेत, त्यावरून त्याच्या म्हणण्यांत बरेंच तथ्य आहे. ज्या प्राचीन इतिहासाच्या जीर्णोद्धारासंबंधीं पार्जिटरचा प्रयत्न आहे, तो ह्या कलियुगाच्या आरंभापासून म्हणजे ख्रिस्ती शकाच्या ९५० वर्षांच्या पूर्वींपासून मागच्या काळांतला आहे. आणि ह्या इतिहासाच्या उभारणीसाठीं त्याला वेदोक्त आणि उत्तर अथवा ब्राह्मणकृत पुराणोक्त विषयाच्या उलट झगडावयाचें आहे. कारण त्याच्या म्हणण्याप्रमाणें हे दोन्ही विषय ख-या प्राचीन इतिहासाला मुळींच साधक नसून त्यांपैकीं उत्तर पुराणें तर उघड उघड बाधक आहेत. वेदांतील विषय धार्मिक आणि दृष्टि पारमार्थिक असल्यानें त्याचा ऐहिक इतिहासाच्या बाबतींत तादृश उपयोग नाहीं. उत्तर पुराणें तर जाणूनबुजून ऐहिक, विशेषतः क्षत्रियांच्या इतिहासाचा विपर्यास करण्याकरतां किंवा बौद्ध, जैन, शैव अथवा अशाच इतर क्षत्रिय अथवा द्राविड धर्माचा पाडाव करण्याकरतां लिहिलीं अथवा लिहविलीं गेलीं आहेत. ह्यावरून हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास लिहिणें किती कठीण काम आहे, हें ध्यानांत येईल. केवळ इतिहासाचा अभाव असण्यापेक्षां खोट्या इतिहासाची लयलूट होऊन, उलट ह्या खोट्या इतिहासालाच धर्मांचें सर्वमान्य आणि पवित्र स्वरूप येण्यानें ख-या इतिहासाची किती भयंकर हानि होते, हें साधारण जनसमूहासच नव्हे, तर परक्यांच्या ओंजळीनें पाणी पिणा-या पुढा-यांनाहि समजून येणें पुष्कळ वेळां अशक्य होऊन जातें. म्हणूनच पार्जिटरसारख्या सत्यशोधकांच्या निष्काम प्रयत्नाचें महत्त्व “सत्यशोधक” म्हणविणा-या बहुजनसमाजाला तरी लवकर पटेल कीं नाहीं, ह्याची वानवाच आहे.
पार्जिटरनें १२ क्षत्रिय मुख्य घराण्यांच्या एकंदर ९५ पिढ्यांच्या वंशावळी एकमेकांच्या लगत लावून त्यांतील कित्येक प्रमुख आणि पुराणप्रसिद्ध राजपुरुषांचा समन्वय अथवा समकालीनता शाबीत करून जी ऐतिहासिक कामगिरी केली आहे, ती फारच महत्त्वाची झाली आहे. वैवस्वत मनूपासून तों अयोध्येच्या सूर्यवंशी सगर राजापर्यंत ४० पिढ्या होतात. अयोध्येचें हें ऐक्ष्वाकु घराणें आणि दक्षिण माळव्यांतील (महिष्मति ऊर्फ हल्लींचे महेश्वरचें) हैहय वंशांतील क्षत्रिय घराणें ह्यांचें भृगु नांवाच्या ब्राह्मण पुरोहित घराण्यामुळें महायुद्ध जुंपलें. तें सुमारें १० पिढ्या चालून त्यांत ब-याच क्षत्रिय कुळांचा नायनाट झाला. क्षत्रियांच्या ह्या आपसांतील यादवीचा फायदा घेऊन ब्राह्मणांनीं आपल्या परशुरामाचें स्तोम माजविलें आणि त्यानें २१ वेळां पृथ्वी निःक्षत्रिय (?) केल्यामुळें पुढें क्षत्रियच उरले नाहींत, अशी हूल उठविली. असो ! सगर राजानें हैहयाचा पूर्ण निःपात केल्यावर कृतयुगाची समाप्ति होऊन त्रेतायुगास प्रारंभ झाला. पुढें सागरापासून त्याच्याच कुळांत झालेल्या ६५ वा राजा श्री दाशरथी रामापर्यंत २५ पिढ्या झाल्या. ह्या वेळीं रामरावणांचें दुसरें महायुद्ध होऊन, त्रेतायुग संपून द्वापार युगास आरंभ झाला. त्यानंतर श्रीरामचंद्राच्यां कुळांतला शेवटचा ९५ वा राजपुरुष जो बृहद्क्षय त्याचा बाप बृहद्बल हा भारतीय महायुद्धांत पांडवांकडील अभिमन्यूचे हस्तें युद्धांत मारला गेला. ह्या वेळीं द्वापारयुग संपून हल्लीं चालूं असलेलें कलियुग सुरू झालें. कलियुगांत पुराणें लिहिण्याचें काम ब्राह्मणांकडे आल्यानें मुळीं क्षत्रिय व वैश्य हे वर्गच अस्तित्वांत नाहींत असें त्यांनीं ठरविलें; मग राजेलोकांच्या वंशावळीच काय पण ऐहिक राजकारणाचें महत्त्व आणि ऐतिहासिक दृष्टीचा मागमूसच उरला नाहीं ह्यांत काय नवल ! पार्जिटरनें क्षत्रियांच्याच १२ घराण्यांच्या ९५ पिढ्यांच्या वंशावळ्यांचीच समकालीन माहिती दिली आहे असें नाहीं; तर ब्राह्मणांच्या अथवा ऋषींच्याहि भृगु, आंगिरस आणि वासिष्ट ह्या तीन घराण्यांच्या ९४ पिढींचा समन्वय करून कोष्टकांच्या रूपानें दाखविला आहे. ह्यांत अयोध्येच्या ऐक्ष्वाकू सूर्यवंशीं घराण्याचा आणि त्यांचे पुरोहित वासिष्ट घराण्याचा जम बसण्यासारखा आहे. पण ऋषी कुळाची परंपरा औरस पुत्राच्या द्वारें होत नसून, बहुतेक शिष्य अथवा दत्तक पुत्राचे द्वारें होत होती. ह्यांतील कित्येक पुरुष ब्राह्मण वंशांतले, तर कित्येक क्षत्रिय वंशांतले ब्राह्मणाची वृत्ति धारण केलेले आढळतात. उदाहरणार्थ, भृगुकुळांतील ६२ आणि ६३ वा पुरुष वध्याश्व आणि दिवोदास हे क्षत्रिय होते. आंगिरस कुळांतील ५४ वा पुरुष भारद्वाज ह्या ब्राह्मणाला दुष्यन्ताचा पुत्र भरत ह्यानें दत्तक घेतलें आणि त्याच्याबरोबर अजामीढ ह्या क्षत्रिय राजपुत्रानें ब्राह्मणाची वृत्ति स्वीकारली. वासिष्ट कुळांतला ९२ वा पुरुष, वेदांच्या आणि पुराणांच्या संहिता करणारा प्रसिद्ध श्री कृष्णद्वैपायन व्यास ऋषि तर सत्यवती नांवाच्या कोळिणीचा मुलगा होता ! एकूण काय, कीं ब्राह्मणांची दृष्टी पारमार्थिक असल्यामुळें त्यांना ऐहिक वंशपरंपरेचें महत्त्व मुळींच वाटत नव्हतें. ऋषींचे एक तर विवाहच होत नसत, झालेच तरी वंशशुद्धीची त्यांना गरजच भासत नसे. तथापि आधुनिक ऐहिक विषयांत गुरफटलेल्या ब्राह्मणांनीं आपल्या जातिशुद्धीच्या नांवानें उलट्या आरोळ्या माराव्या, ही किती भयानक नवलाची गोष्ट !
प्रस्तुत संशोधकाचीं अगदीं नवीं आणि अत्यंत धाडसाचीं अनुमानें जीं आहेत, तीं ह्यांहून पुढेंच आहेत. त्यांनीं आपल्या ग्रंथाच्या पहिल्या २३ भागांत पुराणांची पूर्वपीठिका, त्यांतील वंशावळीचा समन्वय व त्यांवरून काळगणतीचा वगैरे विचार केल्यावर, २४ व्या भागांत ह्या पुराणांतल्या कथानकांवरून हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासाची जुळवाजुळव केली आहे. आणि मग २५ आणि २६ व्या भागांत ह्या कथानकांवरून निरनिराळ्या प्राचीन राजवटींतील क्षत्रिय आणि ब्राह्मण वर्गांच्या वंशांसंबंधीं स्वतंत्र अशीं अनुमानें काढलीं आहेत. हीं मात्र फार वादग्रस्त होणार आहेत. त्याचें मुख्य अनुमान असें आहे कीं हिंदुस्थानांतील प्राचीन राजघराण्यांचें परस्पराहून भिन्न आणि स्वतंत्र असे तीन मुख्य वंश आहेत. ते वैवस्वीत मनूपासून झालेला मानव अथवा सूर्यवंश, पुरूरवा ऐल ह्यापासून झालेला पौरव अथवा सोमवंश, आणि सुद्युम्नापासून झालेला आणि ह्या दोघांइतका प्रसिद्ध नसलेला सौद्युम्नवंश. ह्यांपैकीं सर्वांत प्राचीन आणि प्रतिष्ठित असा सूर्यवंश अयोद्ध्या, विदेह, वैशाली येथें होता. ऐलवंश हा मागाहून प्रतिष्ठान (अथवा हल्लींचें अलाहाबाद) येथें उद्यास येऊन, पुढें क्रमाक्रमानें बहुतेक सर्व उत्तर आणि मध्य हिंदुस्थानभर पसरला आणि त्यानें आपली छाप सूर्यवंशावरहि बसविली. सौद्युम्न हा गया आणि पूर्वदेश व्यापून होता. ह्यांपैकीं ज्याला हल्लीं आर्यवंश समजण्यांत येते, तो काय तो ऐल हाच होय; मानव अथवा सूर्यवंश येथील मूळचा द्राविड वंश होता, आणि सौद्युम्न हा तिबेट अथवा ब्रह्मदेशांतून आलेला मोंगल वंश असावा. ह्या ऐलाची ऊर्फ आर्यांची उत्पत्ति मूळ मध्य हिमालयांतून झाली असावी. नंतर सर्व हिंदुस्थानभर ह्यांचा पगडा बसल्यावर ह्यांचा विस्तार पश्चिमेकडे इराणांत झाला असावा. त्याचप्रमाणेंच ब्राह्मणवर्ग मूळचा सर्व अनार्य होता. तो प्रारंभीं मानव अथवा सूर्यवंशी राजाच्या आश्रयाला होता; तो निराळा वंश नसून एक निराळी वृत्ति, वर्ण, अथवा धंदा होता. तो धंदा म्हणजे जादू, मंत्र अथवा वैद्यकी करण्याचा होता. ऐलांच्या अथवा आर्यांच्या सहवासानें ब्राह्मण हे यज्ञयाग आणि पौरोहित्य करूं लागले. त्यापूर्वीं ते केवळ वैदु अथवा जादुगार असून कडक तपश्चर्या करण्यांत मात्र त्यांची प्रसिद्धि असे. आणि त्यासाठीं राजदरबारीं त्यांना मोठा मान असे; इतकेंच नव्हे तर राजेलोकांशीं त्यांचा शरीरसंबंधहि होत असे. प्रथम ऐल अथवा आर्य क्षत्रियांनीं ब्राह्मणांशीं मोठा विरोध केला; पण पुढें विशेषतः दौल्यन्ति भरताच्या काळापासून ब्राह्मण हे संस्कृतीनें आणि धर्मानें आर्य बनले; आणि त्यांच्या द्वारा आर्य संस्कृतीचा विस्तार हिंदुस्थानभर झाला. स्वतः भरताला मुलगा नसल्यामुळें, त्यानें भारद्वाज नांवाच्या ब्राह्मणाला दत्तक घेतलें होतें. दैत्य, दानव, राक्षस इ. नांवें द्राविड आणि अस्सल सूर्यवंशी क्षत्रियांचीं होतीं. ते आर्यांप्रमाणेंच किंबहुना कांहीं बाबतीतं अधिकच सुधारलेले होते. दैत्यांचा गुरु शुक्राचार्य यांना संजीवनी विद्या अवगत होती. व वेदांचे मंत्रहि जुन्यांतले जुने तवढे मानव राजे आणि मानव ऋषींच्याच नांवानें आहेत. आर्य पुरूरव्याच्या नांवानें एकच आहे व तोहि पण मागाहून दुस-या कोणीं तरी केला असावा, असें अनुमान आहे. हे मानव राजे व ऋषी मध्य आणि पूर्व देशांतलेच होते. ह्यावरून वेदांची रचना प्रथम पूर्वेकडे होत होती व पुढें हळूहळू ती पश्चिमेकडील देशांतून होत गेली. जसजसा ऐलांचा ऊर्फ आर्यांचा हिंदुस्थानांत प्रसार होत गेला, तसतसा आणि विशेषकरून भरताच्या काळानंतर वेदरचनेवर आर्य संस्कृतीचा परिणाम होऊं लागला; इतकेंच नव्हे तर ब्राह्मण वर्ग जो मूळ अनार्यधर्मी होता, तोहि आर्यधर्मी होऊन वेदांनाहि आर्य वळण लागलें.
असो ! ह्या अनुमानांचा सांगोपांग विचार करावयाचा झाल्यास निराळीच एक लेखमाला लिहावी लागेल. एवढें मात्र खरें कीं पार्जिटरनें आपल्या विधानांच्या पुष्ट्यर्थ जागजागीं भरपूर पुरावे दिले आहेत; आणि ते सर्व अत्यंत मनन करण्यासारखे आहेत. ह्या नवीन ग्रंथामुळें इतकें उघड होतें कीं जरी हल्लींचीं मुख्य पुराणें अगदीं विकृत स्वरूपांत आहेत, तरी त्यांचें नीट संशोधन केल्यास, त्यांतून प्राचीन ख-या इतिहासाचीं साधनें सांपडण्यासारखीं आहेत. इतकेंच नव्हे तर केवळ इतिहासाच्या दृष्टीनेंच पाहूं गेल्यास प्रत्यक्ष वेदांपेक्षांहि ह्या पुराणांचें महत्त्व अधिक आहे. वेद ज्या काळीं लिहिले गेले, त्याच काळची माहिती त्यांत ग्रथित झाली आहे, आणि वेद जसेच्या तसेच अद्यापि राखले गेले आहेत. पण उलट पक्षीं पुराणांत विलक्षण ढवळाढवळ झाली असून शिवाय गोष्टी घडलेला काळ, लिहिल्या गेलेल्या काळाच्या फार पूर्वींचा होता. ह्यावरून वेदांची विश्वसनीयता हल्लींच्या पुराणाहून अर्थांत पुष्कळ अधिक आहे, हें स्वतः पार्जिटरनें स्पष्ट आणि प्रांजलपणें सांगितलें आहे. तरी पण वेदांतील विषयच मुळीं ऐहिक नसल्यामुळें आणि ते रचणारे जे ब्राह्मण त्यांच्यांत ऐतिहासिक दृष्टीचा अत्यंत अभाव असल्यामुळें पुराणांतच जे कांहीं इतिहासाचे कण मिळण्यासारखे आहेत, आणि ते पुष्कळ आहेत, त्यांची किंमत वेदांतील काव्यापेक्षां फार मोठी आहे, असें पार्जिटरनें वेळोवेळीं निक्षून सांगितलें आहे. ह्या ग्रंथामुळें ‘वेदोक्त कीं पुराणोक्त?’ ह्या वादावर पुष्कळ प्रकाश पडून त्याचा ओघ बदलून त्याला निराळेंच वळण लागेल, असें मानण्यास बरीच जागा आहे.