व्याकरण (कानडी)
येथपर्यंत शब्दांचा विचार झाला; परंतु व्याकरणांतील साम्य ह्याहूनहि अधिक महत्त्वाचें आणि मनोहर आहे. त्यावरून तर मराठीचा कानडीशीं गूढ आनुवंशिक संबंध असावा अशी शंका येते. मराठीच्या पूर्वीं बरींच शतकें कानडीची घटना झाली आणि ही नवी घटना करणार जैन आणि बौद्ध प्रचारक संस्कृतज्ञ आणि प्राकृतज्ञ असल्यामुळें कानडीची मूळ पीठिका जरी तामिळ होती तरी व्याकरणांत कांहीं प्राकृताचें आणि किंचित् संस्कृतचेंहि वळण दिसणें साहजिक आहे. पुढें प्राकृतामधून निघालेल्या मराठीची घटना ह्याच कानडीच्या निकट सान्निध्यांत होऊं लागल्यामुळें कानडीच्या व नवीन मराठीच्या व्याकरणामध्यें थोडेंबहुत साम्य दिसून येणें हेंहि साहजिक आहे. हें साम्य विशेषतः नामाच्या आणि क्रियापदाच्या अशा दोन्ही विभक्तींमध्यें आढळतें, ही विशेष लक्षांत घेण्यासारखी गोष्ट आहे. ज्ञानेश्वरीची आणि तिच्यापूर्वींची जी मराठी तिला जुनी व त्यानंतरच्या मराठीला नवी म्हणण्याचा जो परिपाठ आहे तो केवळ ह्या भाषांतील शब्दांच्या नव्याजुनेपणावरूनच नव्हे तर ह्या दोन्ही विभक्तींच्या नव्याजुनेपणामुळेंहि पडला आहे. कानडींतहि नवी आणि जुनी असे भेद आहेत. ते कशामुळें पडले हें सांगणें मला तूर्त शक्य नाहीं. तरी नवीन मराठीच्या आणि नवीन कानडीच्या दोन्ही विभक्तींच्या घटना आणि सामान्यरूपें ह्यांमध्यें विलक्षण साम्य आहे ही गोष्ट आश्चर्यकारक आहे यांत शंका नाहीं.