व्यापाराचा इतिहास
या निषिद्ध व्यापाराचा इतिहास फार मनोरंजक आणि बोधपर आहे. ह्या व्यापाराचा उगम आधुनिक पाश्चात्य राजकारणाशिवाय इतरत्र कोठें शोधून काढणें अत्यंत कठीण काम आहे. ख्रिश्चन आणि झोरोऑस्ट्रियन धर्मांखेरीज इतर कोणत्याहि आधुनिक सुधारलेल्या धर्मांमध्यें दारूचा पूर्ण तिटकारा व्यक्त करण्यांत आलेला आढळतो. इतकेंच नव्हे, कोणत्याहि ख्रिस्ती अगर पार्शी सहृदय सभ्यगृहस्थास या व्यापाराचा मनापासून तिटकारा आल्याशिवाय राहणार नाहीं अशी माझी समजूत आहे. असें असून सुधारलेल्या देशांतील आधुनिक राजकारणांत या व्यापाराचा व्यभिचार कसा शिरला, हा एक मोठा मनोरंजक प्रश्न आहे. हें कोडें मुळींच नाहीं. आधुनिक राजकारण म्हणजे भांडवलवाल्यांचा धुडगुस होय. जगांत अद्याप खरी लोकशाही कोठेंच अवतीर्ण झाली नाहीं, आणि ती बसल्या बसल्या कोणाच्याहि खाटल्यावर लौकरच उतरणार आहे अशांतलाहि भाग नाहीं. परचक्राची भीति वाटल्यावरून अमेरिकेसारख्या सुधारलेल्या किंवा रशियासारख्या मागासलेल्या देशांतील मुत्सद्द्यांनीं जरी थोडाबहुत हा व्यभिचारसंन्यास केलेला आढळतो तरी तेथेंही परचक्राची भीति नष्ट होतांच हा संन्यासहि अस्तंगत होण्याची भीति उदय पावत असलेली आढळत आहे. याचें कारण एवढेंच कीं, जबाबदार मुत्सद्द्यांचे पाठीवर भांडवलवाल्यांचा सवाई सोटा उगारलेला असतो. आणि ह्या दोघांच्या संगनमतामुळें हे व्यभिचार पुन्हा पूर्वींहून अधिक दुणावतो. त्यापुढें धर्माच्या किंवा नीतीच्या वायबारांचें कांही चालत नाहीं.