श्रीशाहू व नाना
प्रो. जदुनाथांनीं वरील विषयावर जीं दोन विधानें केलीं, त्यांपैकीं पहिलें त्यांच्या अब्रूला शोभण्यासारखें नाहीं, हें पहिल्या अंकांत सांगितलें. आतां दुसरें त्याहूनहि धाडसाचें विधान साम्राज्याची कल्पना मराठ्यांच्या डोक्यांत त्यांनींच (पेशव्यांनीं) भरवून दिली. त्यांनींच मराठ्यांस साम्राज्य व संपत्ति मिळवून दिली. ह्यासंबंधीं संक्षेपानें विचार करूं.
वरील विक्षिप्त वाक्यांत ज्या शब्दांची व अर्थांचीहि ओढाताण झाली आहे ते “पेशवे” व “मराठे” “साम्राज्य” “संपत्ति” “कल्पना” हे होत. “पेशवे” ह्याचा पेशवेपदावर ज्या ज्या व्यक्ति व घराणीं आलीं तीं सर्व असा व्यापक अर्थ किंवा नुसतें एक भट घराणें असा रूढार्थ, असे दोन अर्थ आहेत. “मराठे” म्हणजे महाराष्ट्रांत राहणा-या मराठे ब्राह्मण इत्यादिपासून महारमांगांपर्यंत सर्व जाती असा विकृत अर्थ आणि महाराष्ट्रांत किंवा बाहेर राहणारे “मराठे” क्षत्रिय राष्ट्र किंवा जात असा साधा सरळ अर्थ, असे दोन होऊं शकतात. ह्या दुस-या दोन अर्थांनीं प्रो. जदुनाथांनीं वरील दोन “पेशवे” व “मराठे” हे शब्द योजिले आहेत, ह्यांत शंका नाहीं. “साम्राज्य” म्हणजे इतर राज्यावरचें एक मध्यवर्ती राज्य असा व्यापक किंवा उत्तर हिंदुस्थानांतील दिल्लीचें पातशाही पद असाहि विशिष्ट अर्थ होऊं शकतो. ‘संपत्तीच्या’ अर्थाला सीमाच नाहीं. त्यांत रामदासाच्या झोळीचाहि समावेश होऊं शकतो. ह्या शेवटच्या अर्थानें पाहतां मराठ्यांसच काय, पण हल्लींच्या वैभवशाली युरोपियन सम्राटांनाहि ही झोळीची संपत्ति ब्राह्मणांशिवाय किंबहुना शेवटच्या दिवट्या पेशव्याशिवाय मिळवून देणारा कोणीच समर्थ नाहीं. हें मला जदुनाथांपेक्षांहि अधिक माहीत आहे. तरी पण वरील चारी शब्दांचा शेवटच्याशिवाय इतर कोणत्याहि अर्थानें विचार करतां, जदुनाथांचें म्हणणें साफ खोटें आहे, इतकेंच नव्हे तर हल्लींच्या ताणलेल्या परिस्थितींत विनाकारण जातीजातींतील वैमनस्य वाढविणारें आहे, असें माझें मत आहे.
पेशवे म्हणजे मराठे नव्हत, ह्याची जाणीव बाबूजीला पूर्ण होती हें त्यांच्याच तुलनेवरून स्पष्ट होतें, चित्पावन ब्राह्मण कोंकणांतून शाहूच्या वेळीं वरती घाट ओलांडून नुकतेच येऊं लागले होते, हेंहि त्यांना माहीत असावें. देशस्थ ब्राह्मण त्यांचा अगदीं हलक्या जातीप्रमाणें तिरस्कार करीत, असें त्यांनीं आपल्या शिवचरित्रांत पान ४८२ वर म्हटलें आहे. उलट शिवरायाच्या खासगी चरित्राविषयीं व हिंदुस्थानांत हिंदूंचें स्वराज्य स्थापन करण्याच्या यशस्वी कामगिरीविषयीं ह्या पुस्तकाच्या शेवटीं त्यांनीं आपला अभिप्राय दिला आहे. इतकेंच नव्हे, तर शेवटच्या पानावर हिंदूंना छत्रपति ऊर्फ सम्राट होतां येतें हें शिवाजीनें शिकविलें, असें जो जदुनाथ म्हणतो, तोच पान ४८२ वर पेशव्यांनीं ह्या छत्राचा नाश केला, असेंहि म्हणतो. हा ग्रंथ जदुनाथानें सन १९१९ त लिहिला. त्यावर पांच वर्षें उलटतात न उलटतात तोंच, हेच जदुनाथ आतां म्हणतात कीं, ह्याच पेशव्यांनीं मराठ्यांस साम्राज्य व संपत्ति दिली ! हें काय गौडबंगाल आहे, ईश्वर जाणे ! मेलेल्या स्वराज्यसंस्थापक छत्रपतीपेक्षां जिवंत स्वराज्यवादी ब्राह्मणी वर्तमानपत्राच्या संपादकाला सामान्य लोक भितात; पण ही ग्राम्य भीति जदुनाथासारख्या निस्सीम इतिहास-भक्ताला वाटावी, हा केवळ कालमहिमा ! “मराठे” म्हणजे हीन जातीय (Low Castes). महाराष्ट्र म्हणजे जातिभेदानें सडलेला, हल्लींप्रमाणें श्री शिवारायाचे वेळीं देखईल तो जातवार दृष्टीला वाहिलेला इ. इ. कांहीं अंशीं अल्प दृष्टीनें व बाकीच्या अंशीं क्षुद्र बुद्धीनें जदुनाथानें काढलेले उद्गार त्याच्या “शिवाजी आणि त्याचा काल” ह्या पुस्तकांत आढळतात. शिवाजी शूद्र होता; त्याचें राजकीय ध्येय अगदीं आकुंचित होतें; तो आणखी पुष्कळ दिवस जगला असता, तरी पेशव्यांच्या काळीं त्याच्या राज्याचा जो नाश झाला, तो त्याला चुकवितां आला नसता; वगैरे ह्या बाबूनें बिनधोक म्हटलें आहे (पान ४८२). जणूं काय, शिवाजी परशुरामाहून चिरंजीव झाला असता, तरी पेशवे हे २२ वे वेळीं पृथ्वी निःक्षत्रिय करण्यास अवतरणारच, ही विधिघटना आजच्या ह्या बंगाल्याला कळून चुकली आहे. जणूं पेशवे शिवाजीच्या पांचवीला पुजलेच होते.
प्रो. जदुनाथ कांहीं म्हणो न म्हणो, इ. स. १६६४ त श्रीशिवरायानें प्रसिद्धपणें आपल्यास राजा म्हणविलें व इ. स. १६७४ त पुनः आपल्यास छत्रपति ऊर्फ पातशहा म्हणवून विधिपूर्वक अभिषेकहि करून घेतला. प्रथम प्रथम जरी मराठे त्याच्या विरुद्ध गेले, तरी बहुतेक मराठे आपलें सर्वस्व अर्पून प्रमुखपणें आणि देशस्थ ब्राह्मण, शेणवी, प्रभू आणि महार ह्या चार जाती त्याला आपापल्या मगदुराप्रमाणें साह्य झाल्या. पहिल्या बाजीरावाला पेशवाईचीं वस्त्रें मिळेपर्यं किंवा फार तर त्याचा मुलगा नानासाहेब श्रीशाहूच्या मरणामुळें निरंकुश होईपर्यंत महाराष्ट्राला ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद म्हणण्याइतका बाधक झाला नाहीं. ह्याचें सर्व श्रेयहि श्रीशाहूसच आहे. ह्या श्रेयामुळें प्रत्यक्ष शाहूला तरी मरेपर्यंत विश्रांति मिळाली नाहींच; पण तो मेल्यावर लगेच सबंध भोसले घराण्याची विलक्षण वाताहत झाली. ती अशी कीं, त्याच्या प्रत्यक्ष वारसांस कायमचा तुरुंगवास, एकुलत्या एक बायकोस देहान्त शिक्षा, कोल्हापूर छत्रपतीस कायमचा शह, आणि नागपूरच्या भोसल्यास महाराष्ट्राबाहेर एक प्रकारची हद्दपारी मिळाली. भोसल्याइतकींच प्रसिद्ध नसलीं, तरी तितकींच खानदानी मराठ्यांचीं इतर जीं तेजस्वी घराणीं होतीं, तीं नष्ट झाली किंवा मागें पडलीं. घोरपडे, जाधव, आंग्रे, दाभाडे इ. इतिहासकर्त्या खानदानी मराठ्यांची ही गति, तर मग देशस्थ ब्राह्मण, शेणवी, प्रभू, महार वगैरेंचा काय कथा ! श्रीशाहूच्या श्रेयांचा आणि मुलुखगिरीवर कधीं न गेल्याचा फायदा एका भाग्यशाली व प्रसंगदक्ष भट नांवाच्या चितपावन घराण्यानें पूर्ण घेतला. ह्या घराण्यानें शिंदे, होळकर, धारचे पवार, पुरंदरे, पटवर्धन, भानू. इ. नवीन घराणीं उठवून त्यांच्या साह्यानें बरीच राष्ट्रीय कामगिरी केली ह्यांत कांहीं संशय नाहीं. पहिल्या बाजीरावापर्यंत झालें तें झालें; पण तो निवर्तल्यावर रघूजी भोसल्यानें बाबूजी नाईक बारामतीकर ह्यास पेशवा करा, अशी श्रीशाहूस सल्ला दिली. तेव्हां रघूजीनें स्वतः सेनापतित्व स्वीकारून शाहूच्या हुकुमतीखालीं साम्राज्य स्थापण्याची हमी घ्यावी, अशी अट घातली असतां, १८ वर्षांचा पोर नानासाहेब पेशवे यानें काय केलें असतें, हें मुत्सद्दी शाहूनें पाहावयाचें होतें. ह्या १८ वर्षांच्या पोराहून, रघुजी हे खास वयानेंच नव्हे, तर अनुभवानें वृद्ध, स्वभावानें शांत, धोरणी, करारी व निर्व्यसनी मुत्सद्दी होता. इतकेंच नव्हे तर सर्व आयुष्य मुलुखगि-या करून साम्राज्यसंस्थापनेंत पुढें महादजी शिंद्यानें जी कामगिरी केली, तशी कर्नाटकांत व बंगाल्यांत करून शाहूची त्यानें खात्री केली होती. जर काय व्यंग असेल, तर तें इतकेंच कीं, तो शाहूच्या अस्सल जातीचाच नव्हे, तर घराण्यांतला जवळचा आप्त असल्यानें डोईजड होईल, अशी भीति होती. पण शाहूच्या मांडीवर लोळणारा मानसपुत्र पहिला बाजीराव कोठें डोईजड झाला नव्हता ? दाभाड्यासारख्या प्रत्यक्ष सेनापतीला दाबण्यांत “ध” च “मा” बाजीरावानें केला, म्हणून गंगाजळ निर्मळ उमाबाई दाभाडीपुढें बाजीरावाचा गळा आणि नागवी तलवार ठेवून, शाहूलाहि हात जोडून उभें राहावें लागलें नाहीं
काय ? तें असो. पण १८ वर्षाच्या पोराला म्हणजे मानसपौत्र नानाला पेशवाई देऊन तीन वर्षें झालीं नाहींत, तोंच त्यानें प्रतिनिधीच्या वरिष्ठ पदाला निर्माल्यवत् केलें; गायकवाडाचें तोंड दाबलें, रघूजी भोसल्याला भंडा-याच्या लढाईंत अगदीं लुटलें, आणि प्रत्यक्ष करवीर छत्रपति श्री संभाजीला थाप दिली (नव्हे गुप्त तह केला) कीं शाहूचे मरणानंतर करवीरकरांनाच सातारा आणि कोल्हापूरचीं अशीं दोन्हीं सिंहासनें देतों ! संभाजीशीं हा गुप्त करार, नाना आणि चुलता चिमाजी अप्पा ह्या दोघांच्या सह्यांनीं दिला. तो लेख नंतर ४२८ असा होता. “सातारचें राज्य स्वामीचें; आणि एक-छत्री शिक्का महाराजांचा (संभाजीचा) चालावा. शाहू महाराजांचा जीवात्मा आहे, तो बाह्यात्कारी आम्ही त्यांचे; परंतु अंतर्यामीं स्वामीचे, शाहू महाराज ह्यांनीं कैलासवास केल्यावर दोन्ही राज्यें स्वामीचीं आणि आम्ही सेवक स्वामीचें” ! भट घराण्याच्या बढतीसाठीं उर्फ साम्राज्यस्थापनेसाठीं नानानें जीं अघटीत कृत्यें केलीं, तीं सर्वच का त्यानें शाहूला कळवून केलीं ? अशा मानस पौत्रालाच पुनः ज्या शाहूनें आपले पंचप्राण व आपल्या वंशाचे गळे देऊन, वरती कोल्हापून घराण्याचा दत्तक घेऊं नका, असें स्पष्ट बजाविलें, तो मातीआड झाल्याबरोबर नानांचा बंडखोर भाऊ सदाशिवराव जेव्हां करवीर छत्रपतीकडे फितूर होऊन, त्यांची पेशवाई पटकावूं लागला तेव्हां साम्राज्याच्या एकीच्या सबबीवर तुमचा पेशवाहि मीच होतों, म्हणून स्वतः नानासाहेब कोल्हापुरास लाळ घोटूं लागला. हे केवढा मुत्सद्दीपणा ! अगदीं कडेलोट !!
वर घडलेल्या उलट्या सुलट्या अनेक प्रकारांबद्दल मी भट घराण्याला किंबहुना नानासाहेबालाहि दोष देत नाहीं. पण जदुनाथ बाबूला मी विचारतों कीं, ह्यांतील निदान हे उलटे प्रकार जर घडून आले नसते, तर काय मराठ्यांना साम्राज्य व संपत्ति मिळाली नसती ? ज्या सरदेसाईंनीं आपल्या मराठी रियासत भाग २ पान ५ वर नाना आणि चिमाजीचा करवीर छत्रपतीशीं गुप्त करार दिला आहे, त्यांनींच, शाहूनें वृद्ध आणि पराक्रमी रघुजी भोसल्यापेक्षां १८ वर्षांच्या नानावर अधिक विश्वास दाखविल्याबद्दल महाराजांची पाठ थोपटली आहे; आणि ते आतां सर्व जगास आव्हान करीत आहेत कीं, “महाराष्ट्रांत दुसरी कोणती व्यक्ति जास्त कर्तृत्ववान् होती, हें पेशव्यांच्या आक्षेपकांनींच दाखविलें पाहिजे !” पण मी नानासाहेबांचा आक्षेपक म्हणून नव्हे तर अंशतः चहाता म्हणून सरदेसायांना विचारतों कीं, नानाच्या १८ व्या वर्षींच त्याला असले आगाऊ अजिंक्यपत्र देण्याचा मोह सरदेसायांना कां सुटतो ? तरुण चित्पावनांना (पहिला बाजी व नाना) सात खून माफ, तर वृद्ध रघूजीकडून निदान एक खून होईपर्यंत तरी त्यावर विश्वास ठेवण्यास काय हरकत होती ? बरें, रघूजीनें तरी पेशवाईसाठीं आपले दांत कोठें विचकले होते ? ती मागणी बाबूजी नाईक ह्या भट घराण्याच्या व्याह्यासाठींच केली ना ?
हा आकस धरून शाहूला न कळवतांच नानांनीं रघूजीवर उत्तरेकडे हल्ले चढविले. तेव्हां जवळच्या कारभा-यांनीं शाहूजवळ तक्रारी पुष्कळ केल्या; त्यांचा काय परिणाम झाला ? “ब्राह्मण माजले; भोसले लुटले, म्हणाले महाराजांनीं दोन दिवस ऐकोन उत्तर केलें. माझे ब्राह्मणांनीं लाथा मारल्या तरी पुरवले, परंतु त्यांची सावली लागत नाहीं. मद्यप्राशन करून दौलत बुडविलें.” शेवटल्या वाक्याचा संदर्भ लावतांना जे सरदेसाईस, पाँडिचरीच्या गव्हर्नरकडून रघूजीला दारूच्या बाटल्यांचा नजराणा आला, त्या बाटल्या रघूजीच्या बायकोला आवडल्या, येवढ्यावरून द्राविडी प्राणायाम करीत बसले आहेत, तेंच पुनः गोविंदपंत बुंदेले उत्तर हिंदुस्थानांतून पेशव्याकडे “पोरी, चिजा, उंची वस्त्र इ.” पाठवित असत, असा घाणेरडा आरोप रा. राजवाडे करितात, म्हणून राजवाड्यांवर रागावतात, ह्याची मोठी मौज वाटते. इतकेंच नव्हे तर नानांनीं उत्तरेंतून एक पत्र पाठविलें आहे, त्यांतील त्यांचा रंगेलपणा, शृंगार, रसभिज्ञता व विद्वत्ता पाहून सरदेसाई उलट त्यांचें फार कौतुक
करितात ! “प्यारी ! तूं गोड तर तुझें कुत्रेंहि गोड” अशांतलाच हा कांहींसा विलायती प्रकार दिसतो. असो. तरी आजकालच्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची भुरळ आमच्या चार दिवसांच्या बंगाली पाहुण्यावर कां पडावी, हा प्रश्न तसाच उरला.