संस्थानी शेतकरी परिषद, तेरदळ
पहिल्या अधिवेशनाचें महत्त्व
ब-याच कारणांमुळें ह्या पहिल्या अधिवेशनाचें महत्त्व किती ध्यानांत घेण्यासारखें आहे, हें भावी इतिहासकार ठरवितील. पण तुमच्याहि ध्यानांत हें महत्त्व भरावें म्हणून अशा घाईंतहि खालील परिस्थितीजनक कांहीं कारणांचा थोडक्यांत विचार करतों.
शेतक-याची हीन स्थिति
साधारणपणें पाहतांना जगांत कोठेंहि गेलें तरी शेतकरी, म्हणजे प्रत्यक्ष शेतांत पोटासाठीं रात्रंदिन खपणारा रयत, हा अनादिकालापासून कंगालच दिसून येत आहे. ह्याचीं उघड कारणें म्हणजे त्याचा साधेपणा, भोळेपणा व अडाणीपणा हींच होत. ह्या व्यक्तिगत कारणांत, संघटनेचा अभाव ह्या सामुदायिक कारणाचा अलीकडच्या सुधारलेल्या ऊर्फ यांत्रिक युगांत भर पडल्यामुळें शेतकरी हा एक कायमच्या गुलामांचा वर्ग बनला आहे. पिढ्यानुपिढ्या तो सावलींत राहणा-या भांडवलवाल्यांकडे कसा गहाण पडला आहे हें स्पष्ट असूनहि, भांडवलवाल्याला मात्र तें कबूल नाहीं, आणि स्वतः शेतक-यालाहि स्वतःची गुलामगिरी जाणवत नाहीं, हें मोठें दुर्भाग्य ! अशा ह्या पिढीजाद दुर्गतीमुळें शेतक-याची दानतहि बिघडत चालली आहे. त्याच्यांतला रामराज्यांतला साधेपणा व सरळपणा टिकणें अशक्य होत आहे. मग त्याचीं पावलें वांकडीं पडूं लागल्यामुळें तीं अधिक खोलांतच शिरतात; आणि त्याच्या मानगुटीवर अढळपद धारण करून बसलेल्या भांडवलशाहीला तर हीच स्थिति पाहिजे असते. ह्यांतच पुढें शेतक-यांच्या व्यसनांची, कायदेकोर्टांतल्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अन्यायांची, वकिलांच्या कपटनीतींची वगैरें अनेक कारणांची भर पडून शेतकरी हल्लीं सुधारलेल्या नरकयातना भोगीत आहे ह्यांत काय आश्चर्य !
संस्थानी कारभाराची अवनति
इतर ठिकाणच्या शेतक-यांची ही शोचनीय स्थिती, तर हिंदुस्थानांतल्या आमच्या स्वतःला स्वतंत्र समजणा-या संस्थानांतील शेतक-याकडे पाहिलें तर गहिंवर आल्यावांचून राहात नाहीं. राजा परका असला तर त्याचा जुलूम परकेपणाच्या सबबीवर तरी एक वेळ सहन होईल. पण राजा आणि त्याची प्रभावळ स्वतःच्या धर्माची, जातीची, हितसंबंधांची – फार काय तर हाडामांसाच्या सोयेरसुतकाच्याहि संबंधाची असून, जेथें जुलूम परकियांपेक्षां जास्त होतो, तेथें बोलणा-यांनीं बोलावें काय आणि ऐकणा-यानें ऐकावें काय ! सगळीं संस्थानें आणि तेथील सगळेच लहानथोर अधिकारी सारखेच नतद्रष्ट आणि निर्ढावलेले असतात, असें कोण म्हणेल ? पण ह्या बाबतींत अपवाद किती नियम किती हें पाहिल्यावर ज्या मानवाची छाती फाटत नाहीं तो एक पशु किंवा मुक्तच असला पाहिजे. असो, नुसते संस्थानिकांवरच उठल्या बसल्या तोंडसुख घेणें साहजिक असलें तरी, योग्य होणार नाहीं. पुष्कळ वेळां आमचे वरून आढ्य दिसणारे संस्थानिक आपल्या बड्या बड्या अधिका-यासह निराळ्याच एका अदृश्य सासुरवासांत गुरफटलेले असतात. तरी पण संस्थानिक माहेरीं असला काय, सासरीं असला काय त्याचें सुखदुःख गरीब शेतक-याला समजत नाहीं. त्यामुळें तो आपल्या धन्याला नांवें ठेवण्यापेक्षां दैवालाच नांवें ठेवीत, पशूप्रमाणें संतुष्ट स्थितींत राहतो. पण असला विषारी संतोष परिणामीं हितकर ठरेल काय ?