समाजसुधारणा यशस्वी कां होत नाहीं?
गेल्या आठवड्यांत ज्या वेळीं आपल्या स्वागत मंडळाकडून मला विनंति करण्यांत आली त्या वेळीं माझी प्रकृति बरीच अस्वस्थ होती; यामुळें मी मोठें भाषण करीन अशी अपेक्षा आपण करूं नये. शिवाय समाजसुधारणेच्या विषयावर मोठें वक्तृत्वपूर्ण भाषण करण्याची आवश्यकता आहे असें कोठेंहि व केव्हांहि घडलेलें नाहीं. परिषदांमधून आपण भाषणें करण्यापलीकडे आपणांस कांहीं करतां येत नाहीं हें खरें, परंतु भाषणें, चर्चा किंवा ठराव यांच्या पाठीमागें कांहीं तरी भरीव असण्याचें परिषद हें एक दृश्य चिन्ह आहे हेंहि तितकेंच खरें आहे. आणि हें कांहीं तरी म्हणजे प्रत्यक्ष कृति हें होय. आपण हल्लीं प्रगतीच्या युगांत आहोंत; आणि कशाहि अडचणीच्या काळांतून चिकाटीनें व शांतपणें मार्ग काढणा-या, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व विशेषतः धार्मिक संस्था यांच्या योगानेंच राष्ट्राच्या प्रगतीस खरें सामर्थ्य प्राप्त होत असतें. आमच्या परिषदा या प्रकारच्या संस्थांच्या केवळ मदतनीस अशा असावयास पाहिजेत; अशा संस्था जर अस्तित्वांत नसतील तर नुसत्या परिषदा नसलेल्याच ब-या. पाठीमागें विधायक कार्य करणा-या संस्था नसतांना भरविल्या जाणा-या परिषदा ह्या नुसत्या आवाज करणा-या घंटांसारख्या किंवा पर्जन्यविरहीत वावटळीसारख्या विफळ होऊन त्यांच्या योगानें सार्वजनिक शांततेचा मात्र भंग होत असतो ! ज्याप्रमाणें एखाद्या यंत्रांत फाजील ताण पडूं नये म्हणून यांत्रिक योजना केलेली असते त्याप्रमाणें राष्ट्रीय सद्सद्विवेक बुद्धीवर पडणारा ताण कमी करण्याचा आभास उत्पन्न करण्याचें काम अशा प्रकारच्या परिषदा आजहि करीत असतात. कोणी म्हणतात कीं राष्ट्रीय सद्सद्विवेक बुद्धि निर्माण करण्याचें कार्य अशा परिषदांकडून होत असतें. कांहीं काळपर्यंत तसें कदाचित् होत असेल. परंतु हल्लीं मात्र अशा त-हेची सद्सद्विवेक बुद्धि निर्माण होण्याऐवजीं तिची तीव्रता कमी करण्याचें व ती अजिबात नाहींसें करण्याचें कार्य अशा परिषदांकडून होत आहे.
त्याखेरीज निरनिराळ्या परिषदांतून व राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनांतून, इतकेंच नव्हे तर ज्यांचें अस्तित्व केवळ मतदारांच्या संतुष्टपणावर अवलंबून आहे अशा कायदे कौन्सिलांतून सुद्धां इतके ठराव एकमतानें मंजूर होत असतां व त्यांचा वारंवार पुनरुच्चार केला जात असतांहि ते जितक्या लीलेनें पास होतात तितक्याच लीलेनें विसरलेहि जातात या गोष्टीची संगती लावतांच येणार नाहीं. उदाहरणार्थ, सक्तीचें प्राथमिक शिक्षण व सार्वजनिक जागांमधून अस्पृश्यतेचें उच्चाटण या दोन बाबतीकडेच पाहा, म्हणजे एखादा कायदा अगर वटहुकूम करून तो धूळ खात पडूं देणें हें प्रत्यक्ष दुष्कृत्य करण्याहूनहि कसें वाईट आहे हें दिसून येईल. कारण, दुष्कृत्यामुळें निदान विरोध तरी उत्पन्न होतो परंतु असल्या विफल कायद्यामुळें अगर हुकुमामुळें दुबळ्या अंतःकरणांस वाटणा-या संवेदना नष्ट होण्याचें कार्य मात्र हमखास घडतें. जर सतत तीन वर्षें करतां येईल इतकें तरी निदान प्रत्यक्ष कार्य आपणांपुढें आंखतां येण्याजोगें आहे असें जर आपणांस सिद्ध करतां येण्याजोगें असेल तरच आपण परिषदेची बैठक भरविण्याच्या भरीस पडावें, एरवीं परिषदा भरवूंच नयेत हें इष्ट आहे. आणि जर समाजसुधारणेस लोकप्रियता व वजन कशामुळें प्राप्त होणार असेल तर तें यामुळेंच होईल असें माझें नम्र मत आहे.