गुरु गोविंदसिंग
मुसलमानांची पूर्वपीठिका सांगतांना त्या धर्मामध्यें तलवारीच्या शक्तीचा समावेश महमुदाच्या काळापासूने कसा झाला होता, हें वर सांगितलेंच आहे. हा समावेश मुसलमानी धर्माचें वैशिष्ट्य आहे. मुसलमान आपला धर्म केवळ तलवारीच्या जोरावरच पसरून तृप्त न राहतां तलवारीच्या जोरावर आपला पशूपणाहि जेव्हां व्यक्त करूं लागले, तेव्हां शीख गुरूला हें तलवारीचें तत्त्व केवळ स्वसंरक्षणार्थ स्विकारावें लागलें, व ही तेजस्वी कामगिरी गुरु गोविंदानें बजावली.
पांचवा गुरु अर्जुन ह्याचा सेलीम बादशहानें फार क्रुरपणानें वध केला. नववा गुरु तेजबहाद्दर ह्याला औरंगजेबानें दिल्ली येथें ठार मारलें; आणि त्याच्या शरीराचे चार तुकडे करून चारी बाजूंच्या वेशीवर टांगले. ह्या भयंकर कृत्याचा परिणाम तेजबहाद्दराचा तेजस्वी मुलगा गोविंदराय ह्याच्या मनावर कायमचा झाला. त्यानें शीख लोकांचें स्वसंरक्षणाला समर्थ असें एक पथक--लढाऊ राष्ट्र--तयार करण्याचा घोर पण केला व तो पूर्णपणें सिद्धीस नेला. गुरु गोविंद हा शिखांचा दहावा आणि शेवटला गुरु होय. हा लहानपणापासून धनुर्विद्येंत फारच निष्णात होता. ह्या वेळीं पंजाबांत जरी मोंगली सत्ता स्थापन झाली होती, तरी निरनिराळ्या डोंगरी मुलखांतून लहान लहान रजपूत राजे आपापल्या किंल्ल्यांतून आपली शिबंदी फौज ठेवून आपला स्थानिक अम्मल चालवीत होते. अशांपैकीं भीमचंद नांवाच्या एका रजपूत राजाशीं गुरु गोविंद ह्याच्या वेळोवेळीं झटापटी होत. ह्या झटापटींच्या व्दारें शिखांना लष्करी वळण लागलें! गुरु गोविंदानें ह्याप्रकारें आपल्या धार्मिक कामाशिवाय राजकीय तयारीची चळवळ चावविली, हें त्यांच्या सामान्य पंगू शिष्यवर्गाला बरें वाटत नसे. त्यांनीं त्यांच्या वृद्ध आईच्यामार्फत पुष्कळ रदबदली करून पाहिलें. पण गोविंदानें आपला बाणेदार निश्चय रतिभर ढळूं दिला नाहीं. त्याच्या मसनदांपैकीं (एजंट) बरेच जुलमी व बंडखोर झाले होते. अशा अपराध्यांना योग्य शिक्षा देऊन सर्वांना त्यानें आपल्या हुकमतीखालीं आणिलें. गोविंद नुसता मिणमिणीत गुरु नसून झणझणीत बादशहाहि होता, असें त्या वेळच्या उद्दाम बादशाहीला भासूं लागलें.
एकदा कांहीं शिखांनीं येऊन गुरु गोविंदाजवळ फिर्याद दिली कीं, तुर्कांचा छळ फार झाल्यामुळें गुरूच्या दर्शनाला येणेंहि पुष्कळांना शक्य होत नाहीं. तुर्कांचा अर्थात् गुरूलाहि त्वेष आलाच होता. म्हणून त्या गनिमांच्या कायमच्या बंदोबस्तासाठीं व शीख राष्ट्राच्या संरक्षणासाठीं त्यानें पुढील बेत केला. वैशाखी पौर्णिमेच्या दिवशीं आपल्या सर्व शिखांचा दरबार आनंदपूर येथील आपल्या राजधानींत भरविला. वैशाख शुद्ध पौर्णिमा हा हिंदुस्थानांतील सर्व द्राविड क्षत्रियांचा मोठा राष्ट्रीय सण फार पुरातन काळापासूनचा आहे. बुद्धाचा जन्म आणि निर्वाणप्राप्ति ह्याच दिवशीं मानण्यांत येते. सर्वजण जमल्यावर गुरु गोविंदानें आपली तलवार म्यानांतून उपसली आणि गुरूसाठीं कोण निष्ठावान् शिष्य आपल्या प्राणांची आहुति देण्यास तयार आहे ? असें खडसून विचारलें ! सर्वजण घाबरून गेले. एकदा, दोनदा व तीनदा गुरूनें हा भयंकर सवाल केल्यावर दयाराम नांवाचा लाहोरचा एक शीख पुढें येऊन त्यानें आपली मान पुढें केली. गुरूनें त्यास पडद्याआड नेलें. रक्ताचा ओघ पडद्याबाहेर दिसूं लागला. रक्तानें भरलेली तलवार घेऊन बाहेर येऊन गुरूनें आणखी कोण शिष्य मजसाठीं आपलें शिर अर्पण करण्यासाठीं तयार आहे, असें दरडावून विचारलें. दिल्लीचा दुसरा धर्मदास नांवाचा पुढें आला. एकामागून एक असे द्वारकेचा मुहकमचंद, बेदरचा साहेबचंद, जगन्नाथचा हिंमत पुढें आले असतां अशा पांचहि शिखांना पडद्याआड करीतोंपर्यंत दरबारांतून बरेचसे ऐतखाऊ शीख नाहींसे झाले होते. पण उरले ते करारी व निधड्या छातीचेच राहिले होते. मग गुरु गोविंदानें मोठ्या आवेशानें पडदा एकीकडे सारून ते पांचहि कट्टे शिष्य एका रांगेनें बसलेले जमलेल्या मंडळींना दाखविले. त्यांच्याऐवजीं पडद्याआड प्रत्येक वेळीं त्यानें एकेक बकरा कापून त्याचें रक्त दाखविलें होतें. तो सर्वांना उद्देशून मोठ्यानें ओरडून म्हणाला, “शिष्यांनो, आद्य गुरु बाबा नानकाचे वेळीं अंगद हा एकच शिष्य मिळाला ! आतां मला पांच शिष्य मिळाले आहेत !! ह्या पांचांनीं आज नव्या शीख राष्ट्राचा पाया आपलें रक्त अर्पण करून घातला आहे.” सर्वांनीं विस्मित होऊन त्या पंचांना धन्यवाद देऊन साष्टांग प्रणिपात केला. गुरु पुढें म्हणाला, “बाबा नानकाच्या वेळेपासून गुरूनें चरणतीर्थ देण्याची वहिवाट चालत आली आहे. त्यापुढें शिखांचा खालसा (संस्थान) तलवारीच्या आणि शौर्याच्या बळावरच चालणें शक्य आहे. म्हणून मी आतांपासून तलवारीनें हालविलेलें पाणी पाजून शीख दीक्षा देण्याची चाल पाडतों. आतांपर्यंत जे शीख होते म्हणजे शिष्य होते, ते ह्यापुढें सिंग (सिंव्ह) म्हणजे राजे होतील ! ह्यापुढें सर्वांनीं एकच धर्म स्वीकारावा. चारी जाती अतःपर नष्ट झाल्या. सर्व आम्ही आतांसारखे भाऊ झालों. कोणी वरिष्ठ नाहीं, कोणी कनिष्ठ नाहीं; गंगा अगर दुसरें कोणतेंहि तीर्थ कोणी मानूं नये. राम, कृष्ण, ब्रम्हा, दुर्गा इ. देवतांचा त्याग करून केवळ नानक आणि शीख गुरूवरच निष्ठा ठेवावी. ह्या वेळीं सुमारें वीस हजार माणसांनीं उभे राहून ह्या नवीन जहाल धर्माची दीक्षा घेतली. त्यांत कित्येक वैश्य, क्षत्रिय व इतर शून्य मतांचे हिंदूहि होते. बाकी केवळ तमासगीरच होते.
गुरु गोविंदानें ह्यानंतर त्या पांच शिष्यांना श्रीसत् अकालच्या नांवानें खड्गधारेनें हालविलेल्या पाण्याची अभिषेक दीक्षा दिली. त्यानंतर त्यांच्यापुढें स्वतः आपण उभा राहून त्या पांचांनीं आपणांस अकाली धर्माची दीक्षा देण्यास नम्रपणानें विनंती केली. सर्वांस आश्चर्य वाटलें!! त्यांना सर्वांना गुरु गोविंदानें समजावून सांगितलें. अतःपर गुरूंची परंपरा बंद करण्यांत आली आहे ! खालसा हाच गुरु आणि गुरु हाच खालसा !!! म्हणून मलाहि तुम्हीच आतां खालशांत सामील करून घेणें इष्ट आहे ! त्या पांचांना “ पंचिप्यारा” पांच लाडके असें नांव पडलें. केस, कंगवा, कृपाण, कच्छ (आंखूड चोळणा) आणि कडे हीं शिखांचीं पांच लक्षणें प्रत्येक शिखानें धारण करणें, तेव्हांपासून अवश्य झालें आहे. ही गोष्ट इ. स. १६९९ सालीं घडली. हे पांचहि लाडके अगदीं हलक्या जातींतले व कुळांतलेच होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्या त्रैवर्णिकांपैकीं कोणीहि हरीचा लाल नव्हता, ही ध्यानांत ठेवण्यासारखी मर्मी गोष्ट आहे. इतकेंच नव्हे तर स्वराज्य अथवा ऐहिक स्वातंत्र्य मिळवायचें आणि टिकवावयाचें असल्यास तलवारीचें बळ आपल्या मनगटानें चालविणेंच अवश्य आहे हा गुरु गोविंदाचा धडा महात्मा गांधीनेंहि शिकण्यासारखा आहे !
ह्यानंतर गुरु गोविंदसिंगास औरंगजेबाच्या प्रचंड सत्तेशीं अविश्रांत आणि आमरण झुंजावें लागलें. त्यांत त्यानें आपल्या सर्वस्वाची आहुति कशी दिली, हें कथानक अखिल मानव जातीच्या इतिहासांत अत्यंत हृदयविदारक आणि स्फूर्तिकारक आहे. आपली राजधानी टाकून आपल्या कुटुंबाला घेऊन तो देशोधडीला लागला. बायकामुलांची ताटातूट झाली. त्याचे दोन तरुण मुलगे लढाईंत पडले. वृद्ध आई व पत्नी हाय हाय करून मेल्या. त्याचे दोन लहान नातू एका ब्राह्मणाच्या घरीं दडून होते. पण क्षुल्लक बक्षिसाच्या आशेनें त्या नीच ब्राह्मणानें, सरहिंदचा सुभेदार वझिरखान ह्याच्या हवालीं त्यांना केलें. मुसलमान होत असल्यास जिवंत ठेवूं, नाहीं तर त्या दोन्ही अर्भकांस ठार मारण्यांत येईल, असें वझिरखानानें फर्माविलें. पण त्या शूर अर्भकांनी आनंदानें मरण पत्करले !!! तरी पण अखेरपर्यंत गुरु गोविंद औरंगजेबाच्या हातीं लागला नाहीं. इ. स. १७०७ सालीं औरंगजेब वारल्यावर त्याचा मुलगा बहादूरशहा तक्तावर बसला. त्यानें गुरु गोविंदसिंगाशीं सलोखा केला, व त्याची मदत मागितली. पुढें गुरु गोविंदसिंग दक्षिणेंत निजामशाहींत नांदेड गांवीं एक शीख मंदीर आहे, तेथें जाऊन आपल्या अंतकाळची वाट पाहात राहिला. नांदेडचें मूळचें नांव ‘ नऊ नंद डेरा ’ असें होतें. तेथें एके दिवशीं गुरु एका जमातीला उपदेश करीत असतां एका अफगाण माथेफिरूला तो न आवडून त्यानें एकदम गुरूच्या अंगावर वार केला. त्यामुळें गुरु कांहीं दिवस अत्यवस्थ आजारी होता. बहादूरशहानें आपल्या दरबारी वैद्यास जखम बरी करण्यास दिल्लीहून पाठविलें. ती बरी होत आली होती; पण एके दिवशीं अंगांत शक्ती नसतांहि एक धनुष्य खेंचण्याचा बळेंच प्रयत्न केल्यामुळें त्याच्या जखमेचे टाके तुटले. पुढें दुखणें असाध्य होऊन हा हिंद देवीचा अत्यंत तेजस्वी सत्पुत्र इ. स. १७०८ सालीं कार्तिक शुद्ध पंचमीचे दिवशीं निजधामास गेला.
आमची भागवत धर्माच्या विकासाची गोष्टहि येथेंच संपली. पुढें रणजितसिंगानें शिखांचें स्वतंत्र राज्य स्थापिलें. इतकेंच नव्हे तर आजकालच्या अकाली शिखांनीं ब्रिटिश बादशाहीचेहि डोळे उघडविले. पण ह्या गोष्टी आमच्या प्रस्तुत टापूच्या बाहेरच्या आहेत. ब्राह्मसमाज, आर्यसमाज, व इतर मंडळ्या भागवत धर्माचा अद्यापि विकासहि करीतच आहेत. भागवत धर्म सनातन आहे, त्यांचें काम निरंतर चालणारच. पण हल्लीं युगांतर झालेलें आहे, म्हणून आजकालचीं वर्तमानें अद्यापि इतिहासाच्या ताब्यांत आलेलीं नाहींत. म्हणून यांची गणना आमच्या मुख्य विषयांत होणें इष्ट नाहीं. म्हणून येथेंच थांबणें बरें.