भविष्य
अनेक यंत्रांचा शोध लागून हल्लींच्या औद्योगिक क्रांतीच्या काळांत ह्या भांडवलासुराचा जन्म झाला आहे. हा चिरंजीव नाहीं. इतर प्राचीन असुराप्रमाणें हाहि आपल्या कर्मानें आणि इतरांच्या जागृतीनें मरणारा आहे. सार्वत्रिक शिक्षणाचा आणि सार्वत्रिक वाहतुकीचा जसजसा प्रसार होईल. तसतसें ह्या असुराचें आयुष्य संपुष्टांत येणार. मजूर आणि मालक हा भेदच नव्हे. तर खेडें आणि शहर हाहि भेद भविष्यकाळीं टिकणार नाहीं. अमेरीकेंत असें एक खेडें नाहीं कीं, जेथें वीज, मोटार, रेडिओ आणि हवाई जहाज ह्यांचा शिरकाव नाहीं. हा ढेरपोट्या भांडवलासूरहि न्यूयॉर्क शहरापेक्षां दूरदूरच्या खेड्यांत रात्रीं निजावयास अधिक जातो. उलट खेड्यांतले कामकरीहि दिवसा शिक्षणासाठीं आणि कामासाठीं शहरांत राहून रात्रीं निजण्यास खेड्यांतच जातात. भावी शहरें किंवा खेडीं हीं दोन कधीं न भेटणा-या मानवी मित्र वर्गांचीं भिन्न निवासस्थानें अशीं न राहतां सर्वांचींच दिवसा कामाचीं व रात्रीं विश्रांतीचीं ठिकाणें होतील. हें पुढील भविष्य अजमावून जर वरील संयुक्त संघ आपलें कार्य नेटानें आटोपतील तरच ह्या भांडवलासुराची आयुर्मर्यादा संपून तो अंतर्धान पावेल; आणि प्राचीन काळचें बळीचें राज्य पुनः बळीलाच मिळून पुनः घडी बिघडेपर्यंत सर्व सुरळीत चालेल.