भागवत धर्म
अतिसंक्षेकानें वर वैदिक धर्माचें लक्षण सांगितलें. आतां भागवत धर्माचें अगदीं थोडक्यांत लक्षण ओळखावयाचें आहे. ईश्वराचें केवळ संख्यावाचक एकत्व हें भागवत धर्माचें लक्षण नव्हे. निदान तें मुख्य लक्षणें तरी नव्हे. भागवत धर्माचें मुख्य लक्षण भक्ति (प्रेम) आणि श्रद्धा (विश्वास) हींच होत. हा भगवत् किंवा भगवान् एक आहे कीं अनेक आहेत, तो कोणी ऐतिहासिक पुरुष होता किंवा तत्त्व दृष्टीनें ओळखली जाणारी एक कैवल्य वस्तु (Metaphysical Absolute) होती, वगैरे विषय तत्त्वज्ञानाचे आहेत. ह्या विषयांचा धर्माशीं संबंध आहे, पण तेच विषय म्हणजे धर्म नव्हत. निदान भागवत धर्म नव्हत. अशी या विवेचनापूर्वी तरी माझी समजूत आहे. कर्म, ज्ञान, वैराग्य आणि भक्ति अशा मानवी मनाच्या चार अवस्था आहेत. त्यांपैकीं शेवटची अवस्था भागवत धर्माचा अगदीं प्राण किंवा आत्माच म्हटलेंतरी चालेल. कर्म (म्हणजे बाह्यविधि) आणि ज्ञान हीं वेदांमध्यें आहेत. पहिल्या तिन्ही वेदांत व ब्राह्मण ग्रंथांत कर्म आहे आणि चौथ्या वेदांत आणि विशेषतः उपनिषदांत उच्च प्रकारचें तत्त्वज्ञानहि आहे. शेवटीं शेवटीं हिंदुस्थानांत आल्यावर आर्यांच्या संस्कृतींत वैराग्याच्याहि छटा दिसूं लागल्या. पण वैराग्य हें आर्यांचें मुख्य लक्षण नव्हे. आर्यवंश हा एक अत्यंत तेजस्वी, परंतु प्रवृत्ति-प्रधान मानववंश होऊन गेला. श्रुति ग्रंथांत आणि संहिता कालीं चार आश्रमांची घटना नव्हती, फार तर काय भगवद्गीतेंतहि आश्रमांचा उल्लेख नाहीं ! इतकेंच नव्हे, चौथ्या ज्ञानप्रधान अथर्ववेदाचा तर गीतेंत नुसता उल्लेखहि नाहीं. स्मृति ग्रंथांतून चार आश्रमांचे उल्लेख भरपूर सांपडतात; तरी सर्व आश्रमांपेक्षां गृहस्थाश्रमाचें फार महत्त्व स्मृतींतून वर्णिलें आहे. वैराग्य आणि देहदंडन हीं झरतुष्ट्रानें केवळ पातकेंच गणलीं आहेत ! उपासातापासाचा अत्यंताभाव कोठें असेल तर तो हल्लींच्या पार्शी धर्मांतच आहे.
शेवटचें तत्त्व भक्तीचें, तें केवळ पांचरात्र अथवा सात्वत धर्मांतच प्रथम उदयास आलें, पण ह्याचा खरा परिपोष बौद्ध आणि जैन धर्मांचे संस्थापक व प्रचारक भगवान् बुद्ध आणि महावीर ह्यांच्या प्रभावशाली आणि प्रेमी प्रयत्नानंतरच हिंदुस्थानांत झाला. श्रीकृष्ण महात्म्यानें हा भक्तिधर्म प्रथम स्थापिला, असे प्राचीन वैदिक वाङ्मयांत अंधुक पुरावे आहेत, पण ह्या धर्माचे वैदिक धर्माशीं धागेदोरे उपलब्ध नाहींत. इतकेंच नव्हे तर इतरहि कोठें त्याविषयीं ऐतिहासिक पुरावे मिळावे तितके मिळत नाहींत, ही किंचित् निराशेची गोष्ट आहे. उलट भगवद्गीता हा ग्रंथ जो वासुदेव-कृष्ण-विष्णु धर्माचा बळकट पाया आणि किल्ला, त्यांतहि हा नवीन धर्म वैदिक त्रयीवर अवलंबून नाहीं; इतकेंच नव्हे तर खर्या मोक्षाला वेद अपुरे आहेत, असें स्पष्ट आणि वेळोवेळीं म्हटलें आहे. ॥ त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ॥४५॥ अध्याय २ श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला । समाधावचला बुध्दिस्तदा योगमवाप्स्यसि ॥५३॥ अध्याय २ रा. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गति प्रार्थयत्ने ॥ ....... क्षीणे पुण्ये मर्त्यलोके विशन्ति ॥ २०-२१ ॥ अध्याय ९ यान्ति देवव्रता देवान् .... यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥२५॥ अध्याय ९ इ. अनेक उतारे देतां येतील.
भगवद्गीता हा ग्रंथ मिश्र मतांचा ग्रंथ आहे. त्यांत कोणकोणत्या काळीं कोणकोणतीं मतें कशीं मिसळण्यांत आलीं, हें अस्पष्टपणानेंहि ठरविण्याचें दुर्घट काम आहे. तें प्रोफेसर गार्वे त्यांनीं आपल्या Introduction to the Bhagavat Gita ह्या लेखांत केलें असून त्याचें इंग्रजींत भाषांतर रा. उटगीकरांनीं केलेलें ह्या प्रकरणीं वाचनीय आहे (Indian Antiquary १९१८). भिन्न मतें कशींहि मिसळलीं असोत, सर्व भगवद्गीता गौतम बुद्धाच्या कालानंतरची असून तिच्यावर उमटलेले गौतम बुद्धाच्या शिकवणीचे स्पष्ट ठसे दिसून येत आहेत. विशेषतः कर्मयोग, मध्यमाप्रतिपत्ति आणि निर्वाण ह्या ज्या तीन गोष्टी सिद्धार्थाच्या शिकवणीच्या मुख्य प्राणभूत, त्या गीतेमध्यें स्पष्ट उल्लेखिल्या आहेत. तेलंग आणि टिळक ह्या दोघां विद्वानांनीं ह्यांचा केवळ ओझरताच उल्लेख केला आहे. टिळकांनीं भर भगवद्गीतेवरूनच पुढें महायान बौद्ध धर्माला प्रेरणा मिळाली, असें ठरविण्याचा प्रयत्न केला आहे; पण हिंदुस्थानांतल्या भागवत धर्माचा उगम श्रीकृष्ण कीं बुद्ध हा वाद यथासांग करण्याला येथें अवकाश नाहीं. तरी तत्त्वज्ञानाची कशीहि दृष्टि असो, भक्ति आणि श्रद्धा ह्यांना जैन आणि बौद्ध धर्मांत स्थान होतें, इतकेंच नव्हे तर ह्या आध्यात्मिक अवस्थांचा परिपोष निदान हिंदुस्थानांत तरी महावीर नाट-पुत्र आणि सिद्धार्थ शाक्य-पुत्र, हे महात्मे जन्मले नसते, तर इतका झाला असता कीं नाहीं हा एक चितनीय प्रश्न आहे.
असो. वरीलप्रमाणें वैदिक धर्म आणि भागवत धर्म ह्यांचीं लक्षणें ढोबळ मानानें व संक्षेपतः सांगितलीं. शाक्त आणि शैव धर्माविषयीं अद्यापि सांगावयाचें उरलेंच. जरी वेदांत ह्या दैवतांचा उल्लेख आहे किंवा उल्लेख झाल्याचा निदान भास होत आहे, तरी हीं दैवतें मूळ आर्यांच्या संस्कृतींत नाहींत. निदान हा वाद चालविण्याला येथें अवकाश नाहीं. गुरुवर्य सर डॉ. भांडारकर आपल्या Vaishnavism & Shaivism ह्या अमूल्य ग्रंथांत पान २४२ वर म्हणतात कीं ''रुद्र-शिव ह्या कल्पनेचा माग काढण्यासाठीं गृह्यसूत्रा (च्या काळा) पर्यंत आम्हीं वैदिक वाङ्मयाचा तपास केला, पण तेथें कोठेंहि कोणा देवीचा, मातब्बर दैवत अशा रूपानें, शोध लागला नाहीं.'' प्रो. मॅक्समुल्लर ह्यांनीं आपल्या Anthropological Religion, Gifford Lecture in १८९१ ह्या ग्रंथांत पान ४१० वरील परिशिष्टांत म्हटलें आहे कीं, ''ॠग्वेदांतील १० व्या मंडलांतील १२७ स्तोत्रांपुढें एका खिलामधील रात्री ह्या देवतेच्या स्तोत्राच्या चार चरणानंतर दुर्गा ह्या देवीचा स्पष्ट उल्लेख आहे.'' पण मुख्य व्याख्यानांत पुष्कळ प्रमाणांचा विचार करून ह्या जगप्रसिद्ध पंडितानें आपली स्पष्ट कबुली पुढील शब्दांत दिली आहे. ''म्हणून माझें असें मत आहे कीं, दुर्गा किंवा शिव हीं दैवतें वेदांतील कोणत्याहि दैवतांचीं विकसित किंबहुना विकृतहि रूपें नव्हेत.'' पान १६६. ह्या दैवतांचा संबंध वैदिक धर्माशीं नाहीं उलट पुरातन कालापासून ह्याचा निकट संबंध भागवत धर्माशीं आहे. इतकेंच नव्हे, तर विष्णु भागवतांच्याहि पूर्वी शिव भागवतांचे आणि देवी भागवतांचेहि स्वतंत्र ग्रंथ उपनिषत्काळांत आणि पुराणकाळांत भरपूर आढळतात. पण ह्या प्रकरणांचा तपशील पुढील व्याख्यानांत येणेंच बरें होईल. तूर्त एवढेंच ध्वनित करणें बरें कीं, कर्म (बाह्य विधि) आणि ज्ञान हीं जशीं आर्य संस्कृतीचीं विशिष्ट लक्षणें, तशींच वैराग्य, गूढज्ञान आणि भक्ति अथवा श्रद्धा हीं द्रावीड संस्कृतीचीं मुख्य लक्षणें होत, आणि ज्याअर्थी भागवत धर्माशीं ह्या दुसर्या मानसिक अवस्थांचा अधिक निकट संबंध आहे त्याअर्थी भागवत धर्माचा विकास समजून घेण्यासाठीं आर्यांच्यापेक्षां इतरांच्या संस्कृतींचाच अधिक अभ्यास करणें जरूर व इष्ट आहे.