भागवत पुराण
भरतखंडांत भागवत धर्माला पूर्ण खग्रास ग्रहण लागलें असतां ‘श्रीमद्भागवतपुराण’ हा एक प्रासादिक ग्रंथ निर्माण झाला. हें सुंदर पुराण संस्कृतांत आहे. ह्याचा काळनिर्णय अद्यापि झाला नाहीं. कोणी म्हणतात, देवगिरीच्या रामदेवराव जाधव राजाच्या पदरीं बोपदेव नांवाचा एक वैय्याकरणी पंडित होता, त्यानें हें केलें. हें पण खरें नसावें. कारण ज्या अर्थीं त्याच्यापूर्वीं वीर वैष्णव मध्वाचार्य होऊन गेले आणि त्यांनीं “भागवतसार” नांवाचा लहानसा ग्रंथ ह्या पुराणाचें सार म्हणून केला, त्या अर्थीं ‘श्रीमद्भागवत’ हा ग्रंथ मध्वाच्या पूर्वींच प्रसिद्ध असला पाहिजे. प्रसिद्ध मुसलमान इतिहासकार आल्बेरूनी ह्यानें आपला इतिहास इ. स. १०३० चे पूर्वीं संपविला. विष्णुपुराणांत ज्या १८ पुराणांची यादी आहे, त्यांत श्रीमद्भागवताची गणना आहे, असें आल्बेरुनी ह्यांनीं लिहिलें आहे, ह्यावरून ‘श्रीमद्भागवत’ पुराण निदान इ. स. ९०० अगर फार तर १००० वर्षांच्या सुमारास झालें असावें, असा डॉ. फारकुहार ह्यांचा अदमास आहे. (Religious Literature of India, p. 232). ह्या पुराणाच्या ११ व्या स्कंधाच्या ५ व्या अध्यायांतील खालील श्लोक प्रसिद्ध आहेत. “कृतादिषु प्रजा राजन् कलो इच्छन्ति संभवम् | कलौ खलु भविष्यन्ति नारायणपरायण: ||३८|| क्वचित् क्वचित् महाराज द्रविडेषुच भूरिश:| ताम्रपर्णी नदी यत्र कृतमाला पयस्विनी ||३९|| कावेरी च महापुण्या प्रतीचीच महानदी | ये पिबन्ति जलं तासां मनुजा मनुजेश्वर | प्रायो भक्ता भगवति वासुदेवेSमलाशय: ||४०||” ह्या श्लोकांत ताम्रपर्णी, कृतमाला, कावेरी, प्रतीची आणि महानदी इतक्या नद्यांचा उल्लेख आहे; आणि ह्या नद्यांचें पाणी पिणा-या द्राविडांमध्यें कलियुगांत नारायणपरायण महाभागवत भूरिश: म्हणजे पुष्कळ होतील, असें भविष्यवजा सांगितलें आहे. ह्यावरून त्या काळीं ओरिसापासून खालीं दक्षिणेकडील सर्व दक्षिणेकडील सर्व देश द्राविड अशाच नांवानें ओळखिला जात असावा व ह्याच देशांत हें पुराणहि झालें असावें. अलीकडचा भक्तिमार्गहि ह्याच द्राविड देशांत प्रथम उद्यास आला; असा ह्या श्लोकांचा भावार्थ आहे. “भागवतमाहात्म्य” म्हणून एक नंतर झालेला लहानसा संस्कृत ग्रंथ भागवताला पुरवणीवजा जोडला आहे. त्यांत ‘भक्ति’ ह्या नांवाची एक तरुण स्त्री नारदाला भेटली, ‘ज्ञान’ व ‘वैराग्य’ हीं तिचीं दोन्हीं मुलें होतीं; कलियुगांत त्यांचे हाल झाल्यामुळें अतिशय कृश झालीं होती; वगैरे कथा आहे. येणेंप्रमाणें हा ग्रंथ म्हणजे एक लहानसें गोड रूपक आहे. हें रूपक पद्मपुराणाच्या उत्तरखंडांतील एक भाग आहे, असें म्हटलें आहे त्याचें तात्पर्य हेंच कीं, ज्ञानवैराग्ययुक्त भक्ति हें भागवत पुराण वाचल्यानेंच प्राप्त होतें. अशी ही उत्कट भक्ति, जी वेदकाळीं नव्हती, गीताकाळीं नव्हती, किंबहुना भागवत पुराण निर्माण होण्यापूर्वीं केव्हांहि नव्हती, त्या भक्तीनें ह्या रूपक ग्रंथांत आपली पूर्वपीठिका आणि विकास यांचा इतिहास पुढील मार्मिक शब्दांत सांगितला आहे. “उत्पन्ना द्राविडा साSहं वृद्धिं कर्णाटके गता | क्वचित् क्वचित् महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां गता” ||४८|| अध्याय १ ला. अर्थ :- मी (भक्ति) द्राविड देशांत जन्मलें, कर्नाटकांत व महाराष्ट्राच्या कांहीं भागांत वाढलें, आणि गुजराथेंत म्हतारी झालें. हें रूपक अगदीं यथार्थ आहे. मेलेल्या भागवत धर्माला पुनर्जन्म देणारा आधुनिक भक्तिमार्ग हा खरोखरीच प्रथम तामिळ देशांत उदयास आला. तेथून कर्नाटकांतून लवकरच महाराष्ट्रांतील पंढरपुरांत आला. हें म्हणणें इतिहासाला अगदीं धरून आहे.